गेल्या दीड वर्षांहून अधिक काळ जगाची करोनाशी झुंज सुरू आहे. एक करोना लाट ओसरतेय असे वाटत असतानाच नवा करोनावतार डोके वर काढतो आणि नवी लाट तडाखा देते. भारतात दुसरी लाट ओसरत असली तरी ‘डेल्टा प्लस’ या करोनाच्या उत्परिवर्तित विषाणूचा धोका आहे. जगभरात मात्र ‘डेल्टा’ या सर्वप्रथम भारतातच आढळलेल्या करोनावताराने थमान घातले आहे. जगभरातील ८५ देशांमध्ये ‘डेल्टा’चा फैलाव झाला आहे. या विषाणूचा प्रसारवेग अधिक असल्याचे नमूद करत जागतिक आरोग्य संघटनेने याबाबत नुकतीच चिंता व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर माध्यमांतील वृत्तविश्वात ‘डेल्टा’ने मोठी जागा व्यापलेली दिसते.

युरोपातील अनेक देशांमध्ये ‘डेल्टा’चा फैलाव वाढला आहे. युरोपमध्ये ऑगस्टअखेपर्यंत एकूण करोनाबाधितांमध्ये ‘डेल्टा’चे ९० टक्के रुग्ण असतील, असा इशारा आरोग्यतज्ज्ञांनी दिला आहे. युरोपला या करोनावताराचा मोठा धोका असल्याचे विधान जर्मनीच्या चॅन्सेलर अँगेला मर्केल यांनी गेल्या आठवडय़ातच केले होते. त्यामुळे वेगवान लसीकरणानंतरही तेथील करोनाछाया गडद झाली आहे. युरोपातील माध्यमविश्वात त्याचे प्रतिबिंब दिसते. ‘डेल्टा’मुळे अनेक देशांना नव्याने निर्बंध लागू करावे लागले आहेत, याचा आढावा ‘बीबीसी’, ‘द गार्डियन’ने घेतला आहे. ब्रिटनमध्ये नव्याने आढळणारे बहुतेक करोनाबाधित रुग्ण ‘डेल्टा’चे आहेत. त्यातच आरोग्यमंत्र्यांच्या राजीनाम्यामुळे ब्रिटिश माध्यमांत वादळ उठले आहे. ‘डेल्टा’मुळे पोर्तुगालमध्ये नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या देशाने ऑगस्टअखेपर्यंत ७० टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवले होते. मात्र लसतुटवडय़ामुळे ते गाठणे अवघड असल्याचे निरीक्षण ‘बीबीसी’ने नोंदवले आहे. फ्रान्समध्ये ‘डेल्टा’चे जवळपास १० टक्के रुग्ण आहेत.

ऑस्ट्रेलियाच्या सिडनीमध्ये ‘डेल्टा’चे रुग्ण आढळले असून, तिथे दोन आठवडे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियन नागरिकांसाठी विलगीकरणमुक्त प्रवासाची मुभा बंद केली. करोनाविरोधातील लढय़ात ऑस्ट्रेलिया आणि इस्राएलने आघाडी घेतली होती. मात्र, आता दोन्ही देशांत पुन्हा निर्बंध लागू करण्यात आले आहेत. इस्राएलने मुखपट्टी सक्ती मागे घेतली होती. जगभरातील माध्यमांनीही त्याची दखल घेतली होती. मात्र, ‘डेल्टा’मुळे सर्वाधिक लसीकरण होऊनही तिथे मुखपट्टीसक्ती पुन्हा लागू करण्यात आली आहे. अर्थात, जगभरातील सर्वच बडय़ा माध्यमांत याबाबतचे वृत्त दिसते.

सर्वात आधी लस विकसित करणाऱ्या देशांमध्ये रशियाचे वरचे स्थान आहे. मात्र, या देशात आतापर्यंत सुमारे १५ टक्के जणांचेच लसीकरण झाले असून, त्यातील १० टक्के जणांना दोन्ही लसमात्रा मिळाल्या आहेत. सध्या मॉस्कोमध्ये आढळणारे ९० टक्के रुग्ण ‘डेल्टा’चे आहेत. त्यामुळे करोना फैलाव रोखण्यासाठी रशियाला वेगाने पावले उचलावी लागतील, अन्यथा ‘डेल्टा’ संपूर्ण रशियाभर थमान माजवेल, असा इशारा ‘मॉस्को टाइम्स’च्या एका लेखात देण्यात आला आहे. ‘डेल्टा’वर स्पुटनिक लस परिणामकारक असल्याचा दावा लसनिर्मार्त्यांनी केला असला, तरी पुरेशा तपशिलाअभावी अनेक तज्ज्ञांनी याबाबत शंका उपस्थित केली आहे. या तज्ज्ञांच्या प्रतिक्रियाही या लेखात आहेत.

‘करोना, मुले आणि डेल्टा’ अशा आशयाच्या शीर्षकाचा लेख ‘द न्यू यॉर्क टाइम्स’मध्ये आहे. अमेरिकेत लसीकरण वेगाने सुरू असल्याने लसलाभार्थी निर्धास्त आहेत. आपल्याला लागण झाली तरी सौम्य लक्षणे असतील, अशी खात्री त्यांना आहे. मात्र, १२ वर्षांखालील मुले लसीकरणासाठी पात्र नसल्याने ‘डेल्टा’च्या फैलावामुळे पालक चिंतेत आहेत. या चिंताग्रस्त पालकांना या लेखात मार्गदर्शन करण्यात आले आहे.

अमेरिकेत ‘डेल्टा’चे १० टक्के रुग्ण आहेत. लसीकरण बऱ्यापैकी झालेल्या ठिकाणी जनजीवन पूर्वपदावर येत असताना लसीकरण कमी झालेल्या ठिकाणी मात्र मोठी रुग्णवाढ होत आहे, असे नमूद करताना ‘द वॉशिंग्टन पोस्ट’च्या एका लेखात लशीबाबत दोन महत्त्वाची निरीक्षणे नोंदविण्यात आली आहेत. त्यातील एक म्हणजे, अमेरिकेतील तरुणांमध्ये लस घेण्याबाबत असलेला निरुत्साह. अमेरिकेत १८ ते २९ या वयोगटांतील केवळ ३८.३ टक्के तरुणाईचे लसीकरण झाले आहे. दुसरे म्हणजे, रिपब्लिकन पक्षाचे प्राबल्य असलेल्या भागांत कमी आणि डेमॉक्रॅटिक पक्षाचे वर्चस्व असलेल्या ठिकाणी जास्त लसीकरण झाल्याचे निरीक्षण या लेखात नोंदविण्यात आले आहे. शिवाय, ग्रामीण आणि शहरी ही लसीकरणातील दरी माध्यमांनी अधोरेखित केली आहे.

पाश्चात्त्य देशांनी लसीकरणावर जोर देऊन करोना फैलावाची जोखीम कमी केली आहे. आफ्रिका खंडातील देशांना मात्र ‘डेल्टा’चा मोठा फटका बसण्याची भीती आहे. केवळ एक टक्का आफ्रिकी नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. दक्षिण आफ्रिकेत ‘डेल्टा’च्या रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. तिथे दैनंदिन सुमारे २० हजार रुग्ण आढळत असून, त्यांपैकी बरेच ‘डेल्टा’बाधित आहेत. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेसह संपूर्ण आफ्रिका खंडात ‘डेल्टा’चे भय अधिक  आहे.

संकलन : सुनील कांबळी