अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीने मध्य आशियात नुकतीच मोठी आणि महत्त्वाची घडामोड घडली. इस्रायल आणि संयुक्त अरब अमिराती (यूएई) यांच्यात शांतता करार होऊन तंटा संपुष्टात आला. ‘वेस्ट बँक’च्या काही भागांच्या सामीलीकरणाच्या योजनेला स्थगिती देण्यास इस्रायलचे पंतप्रधान बेन्जामिन नेतान्याहू राजी झाल्यामुळे हा  करार झाला आहे. मध्य आशियातील विशेषत: आखाती देश, युरोप आणि अमेरिकेतील वृत्तमाध्यमांनी त्याविषयी परस्पर विरोधी मजकूर प्रसिद्ध केला आहे. ट्रम्प समर्थकांनी या कराराचे कौतुक केलेले आहेच.

हा करार म्हणजे यूएईच्या आर्थिक शक्तीशी इस्रायलच्या तंत्रज्ञानाचा विवाहसोहळा आहे, अशी भलामण ‘जेरुसलेम पोस्ट’मधील लेखात अमेरिकेतील अभ्यासक मार्टिन ओलीनर यांनी केली आहे. काही अमेरिकी ज्यू नागरिकांना ट्रम्प आवडत नसावेत, पण त्यांनी इस्रायलसाठी जे काही केले त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची ही वेळ आहे. हा करार हा पॅलेस्टिनींसाठी एक ‘वेकअप कॉल’ आहे. त्यांना पटते की नाही, याचा विचार करण्याचे दिवस आता अधिकृतरीत्या संपले असून इस्रायलला वेठीस धरण्याची त्यांची क्षमताही त्यांनी गमावली आहे, अशी मखलाशीही या लेखात आहे.

‘न्यू यॉर्क टाइम्स’ने काही अभ्यासकांच्या मतांवर आधारित प्रसिद्ध केलेल्या वृत्तलेखात मात्र, ‘हा करार म्हणजे पॅलेस्टिनींसाठी आणखी एक दु:स्वप्न’ असल्याचे म्हटले आहे. काही आखाती देशांना अमेरिकेच्या अध्यक्षपदी पुन्हा ट्रम्पच हवे आहेत. ट्रम्प यांच्या इराण धोरणामुळे त्यांना उकळ्या फुटत आहेत, असा उपहास बिरझीट विद्यापीठाचे राजकीय शास्त्रज्ञ डॉ. घसन खातिब यांनी केला आहे. पॅलेस्टिनी मिशनचे प्रमुख हसुम झोमलोत यांनी, हा करार शांततेसाठी हानीकारक आहे, पॅलेस्टिनी भूमी बळकावण्याचा आपला कार्यक्रम पुढे ढकलण्याच्या बदल्यात अरब देशांशी शांतता प्रस्थापित करण्याचा सौदा इस्रायलने केला आहे, अशी टीका केली आहे.

यूएई आणि इस्रायलचे छुपे संबंध हे एक रहस्य होते. ते आता उघड झाले. त्यामुळे पॅलेस्टिनींना त्यांचे मित्र कोण, हे कळले असेल. यूएई-इस्रायलचे हे प्रेमप्रकरण घातक आहे, अशा कानपिचक्या टर्कीच्या ‘टीआरटी’ या सरकारी वृत्तवाहिनीच्या संकेतस्थळावरील लेखात मध्य-आशियातील सामरिक आणि संरक्षणविषयक घडामोडींचे अभ्यासक तल्लाहा अब्दुलरझाक यांनी दिल्या आहेत.

टर्कीचा प्रभाव कमी करण्यासाठी आणि इराणमधील राजवटीचा विनाश करण्यासाठी अमेरिका-इस्रायल-यूएई अशी सामरिक युती स्थापन करण्याच्या आशेने यूएईने अमेरिका आणि इस्रायलशी हा लाभकरार केल्याची टिप्पणी ‘अल्जझीरा’चे राजकीय विश्लेषक मारवान बिशारा यांनी केली आहे. तर पॅलेस्टिनींसाठी हा आणखी एक ‘वाईट दिवस’ असल्याची खंत इस्रायल-पॅलेस्टाइन संघर्षांवर आधारित मजकूर प्रसिद्ध करणाऱ्या ‘मिडलईस्ट मॉनिटर’ या नियतकालिकाने केली आहे.

‘स्वतंत्र पॅलेस्टाईनच्या संकल्पनेला अलविदा’ अशा शीर्षकाचे संपादकीय ‘डॉएचे वेले’ (डॉइश वर्ल्ड) या जर्मन वृत्तवाहिनीचे संपादक रेनर सॉलिश यांनी संकेतस्थळावर लिहिले आहे. अमेरिकेने इस्रायल आणि यूएई यांच्यातील राजनैतिक संबंध सुधारण्यासाठी पुढाकार घेतला हे ठीक; परंतु हा करार म्हणजे पॅलेस्टिनी नागरिकांच्या हितसंबंधांचा विश्वासघात आहे, असे भाष्यही त्यांनी केले आहे.

शांतता करार झाला असला तरी पॅलेस्टिनी नागरिकांच्या हक्कांच्या प्राधान्यक्रमात काहीही बदल झालेला नाही, असा बचावात्मक सूर अमिरातींपैकी दुबईतून प्रसिद्ध होणाऱ्या ‘खलीज टाइम्स’मधील लेखात आहे. अबूधाबीतून निघणाऱ्या ‘द नॅशनल’ या वृत्तपत्राच्या अग्रलेखाने तर, ‘करारामुळे एक नवी पहाट होऊ  शकते, हा एका ऐतिहासिक अध्यायाचा आरंभ आहे. शिवाय पॅलेस्टिनी नागरिकांचा आत्मसन्मान परत मिळवण्याची ही सुरुवात ठरू शकते,’ अशीही विधाने केली आहेत.

इस्रायलने एक अवाढव्य राजनैतिक लाभाची लढाई जिंकली आहे, असे प्रतिपादन ‘हारेत्झ’ या इस्रायली दैनिकातील लेखात अमेरिकेचे इस्रायलमधील माजी राजदूत डॅनियल बी. शापिरो यांनी केले आहे. पॅलेस्टिनी नागरिकांनी या कराराकडे संधी म्हणून पाहावे. ते त्यापासून दूर राहिले तर त्यातून त्यांच्या हाती काहीच येणार नाही, असा इशाराही या लेखात दिला आहे.

दोन्ही देशांच्या (इस्रायल/यूएई) प्रमुखांना या कराराचा निवडणूक लाभ वा राजकीय लाभ होऊ  शकतो, परंतु त्याहीपेक्षा याचा लाभ ट्रम्प यांना येत्या निवडणुकीत होऊ  शकतो. कारण त्यांच्या दृष्टीने हा करार हे त्यांच्या परराष्ट्र धोरणाचे मोठे यश आहे, अशी स्पष्टोक्ती ‘जेरुसलेम इन्स्टिटय़ूट फॉर स्ट्रॅटेजिक स्टडीज’चे जोश क्रस्न यांनी ‘हेओम’ या हिब्रू दैनिकातील वृत्तलेखात केली आहे.

संकलन : सिद्धार्थ ताराबाई