‘‘जर आपण संघटितरीत्या याच मार्गावरून पुढे जाऊ  शकलो, तर जॉर्ज फ्लॉइडचा मृत्यू हा त्याचा बळी घेणाऱ्या व्यवस्थेचाच मृत्यू ठरू शकतो..’’ अमेरिकेलगतच्या कॅनडातील जेसी लिप्सकॉम्ब या कृष्णवर्णीय कलावंत- कार्यकर्त्यांचा हा आशावाद. अमेरिकी पोलिसांनी गुडघ्याखाली मान दाबून कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लॉइडची हत्या केल्यानंतर जगभरातील नागरिक रस्त्यावर उतरले ते ट्रम्पविरोध म्हणून नव्हे, तर वर्णभेदाविरोधात!  शनिवारी कॅनडाच्या एडमण्टन शहरातील नागरिकांनी तीव्र निदर्शने केली. त्यांत जेसीही सहभागी झाला होता. त्याने ‘एडमण्टन जर्नल’मधील लेखात वर्णभेदमुक्त समाजाचे स्वप्न पाहताना, ‘जॉर्जचा मृत्यू व्यवस्थेत बदल घडवू शकतो,’ अशी आशा व्यक्त केली आहे.

जॉर्ज फ्लॉइड-हत्येच्या निमित्ताने अमेरिकेतील वर्णभेदाचे भीषण वास्तव आणि कृष्णवर्णीयांबद्दल पोलिसांचा वर्णद्वेषी दृष्टिकोन पुन्हा अधोरेखित झाला. त्यावर जगातील सर्वच माध्यमांनी विविध प्रकारे भाष्य केले आहे.

‘आय कान्ट ब्रीद’, हे फ्लॉइडचे अखेरचे शब्द. पाच वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियातील तुरुंगात डेव्हिड डुंगे या २६ वर्षीय ‘अ‍ॅबओरिजिनल’- आदिवासी- कैद्याचा पोलीस मारहाणीत मृत्यू झाला, तेव्हा त्याचेही अखेरचे शब्द हेच होते! डेव्हिडचा बळी गेलेल्या ऑस्ट्रेलियातून प्रकाशित होणाऱ्या  ‘सिडनी मॉर्निग हेराल्ड’मध्ये, स्तंभलेखक टॉम स्वित्सर म्हणतात, अमेरिकेच्या इतिहासातील अराजकाचा हा आणखी एक नमुना आहे. पोलिसांच्या अत्याचारापासून कृष्णवर्णीयांना संरक्षण देण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे. अन्याय माजतो तेव्हाच अमेरिकेतील अनेक शहरांमध्ये जाळपोळ, हत्या आणि वर्णद्वेषी हिंसाचाराचा स्फोट होतो. सध्याची परिस्थिती हुबेहूब तशीच आहे.

‘ल माँद’ या फ्रेंच वर्तमानपत्राने अग्रलेखात वर्णभेद रचनेचे आणि कृष्णवर्णीयांवरील पोलिसी क्रौर्याचे चित्र रेखाटले आहे. जॉर्ज फ्लॉइड (मिनेआपोलिस, २०२०) किंवा एरिक गार्नर (न्यू यॉर्क, २०१४) यांचे बळी वेगळे नाहीत. पोलिसांच्या अत्याचारांचे बळी ठरलेल्या कृष्णवर्णीय अमेरिकी नागरिकांची ही यादी मोठी आहे. जेथे बंदूक खेळणे म्हणून बाळगली जाते आणि मौज म्हणून किंवा वर्णद्वेषातून तिचा चाप ओढला जातो, त्या देशासाठी हे नवे नाही. त्यामुळे तेथील कृष्णवर्णीय मातांनी आपल्या वयात येणाऱ्या मुलांना रस्त्यावर कसे वागावे, हे शिकवले तर त्यांचे प्राण वाचतील. त्याचबरोबर बागेत धावण्याचा व्यायाम करणाऱ्या मोठय़ा शहरांतील कृष्णवर्णीयांनाही ‘थांबा’ असा एक पोलिसी इशारा त्यांच्यासाठी जीवघेणा ठरू शकतो, हे चांगले माहीत आहे, असे उपरोधिक उद्वेगी भाष्य ‘ल माँद’च्या संपादकीयात केले आहे.

दक्षिण आफ्रिकेतील ‘मेल अ‍ॅण्ड गार्डियन’ने इफ्रा उडगून या सोमाली स्थलांतरित महिलेला अमेरिकेत राहताना आपल्या मुलाबद्दल वाटणाऱ्या भीतीचे शब्दरूप प्रसिद्ध केले आहे. ती म्हणते, ‘‘कृष्णवर्णीय माता आपल्या मुलांचा विचार करतात तेव्हा त्यांचा भीतीने थरकाप उडतो. अमेरिकेची माती कृष्णवर्णीयांच्या रक्ताने भिजली आहे. गुलामी, सामूहिक तुरुंगवास आणि पोलिसांच्या क्रौर्यकथांमुळे कृष्णवर्णीयांच्या वेदनाच नष्ट झाल्या आहेत. जेव्हा आपण फ्लॉइडला पाहतो तेव्हा एक माणूस नव्हे तर अमेरिकेचा वर्णद्वेषी इतिहासच आपल्यासमोर उभा राहतो.’’

जॉर्ज फ्लॉइडच्या हत्येमुळे अमेरिकेतील सडक्या वर्णभेदाचा पर्दाफाश  झाला, असे भाष्य चीनचे सरकारी मुखपत्र ‘ग्लोबल टाइम्स’ने केले आहे. तर स्पेनच्या ‘अल पेरिडिको’ने अमेरिकेच्या वांशिक विद्वेषाच्या इतिहासाकडे लक्ष वेधताना तेथे ही संस्कृती किती खोलवर रुजली आहे, याची कल्पना येते, अशी टिप्पणी केली आहे.

‘न्यू यॉर्क टाइम्स’ने प्रसिद्ध केलेला आफ्रिकन-अमेरिकन स्टडीजचे प्राध्यापक डॉ. किआना मिराया रॉस यांचा लेख ‘वर्णभेद’ या शब्दासंदर्भात वेगळी मांडणी करतो. डॉ. रॉस म्हणतात, ‘‘आफ्रिकन-अमेरिकी नागरिकांना रोजच्या जगण्यापासून मृत्यूपर्यंत आरोग्यसेवा, अन्न, निवारा, नोकऱ्या असोत की पोलिसांची वागणूक; या बाबतीत जे भोगावे लागते ते एकाच शब्दात वर्णन केले जाते- वंशभेद. पण कृष्णवर्णीयांच्या यातना पकडण्यात हा शब्द तोकडा पडतो. त्यासाठी ‘अँटी ब्लॅकनेस’ हाच योग्य शब्द आहे.’’ डॉ. रॉस स्पष्टीकरण करताना लिहितात, वर्णभेद हा अर्थहीन शब्द नाही. परंतु कृष्णवर्णीयांना तारण कर्ज नाकारण्यापासूनचे सर्व काही या शब्दात समाविष्ट होते. आशियातल्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत मात्र ‘अल्पसंख्याक’ असा शिक्का मारला जातो. म्हणून कृष्णवर्णविरोधी जगात कृष्णवर्णीय असणे म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी काही कृष्णवर्णीय विद्वानांनी ‘अँटी ब्लॅकनेस’ ही संकल्पना मांडली. ती वर्णभेदापेक्षा खूप काही सांगते. ‘अँटी ब्लॅकनेस’ ही अशी सैद्धांतिक चौकट आहे जी कृष्णवर्णीयांच्या अस्तित्वाचा तिरस्कार करते, त्यांना बदनाम करते आणि त्यांचे माणूसपण समजून घेण्यातील समाजाची असमर्थता दर्शवते.

संकलन : सिद्धार्थ ताराबाई