इस्रायल- पॅलेस्टाइन यांच्यातील संघर्षांचा ज्वालामुखी पुन्हा खदखदू लागला आहे. हा संघर्ष जुना असला तरी पश्चिम किनारपट्टी भूप्रदेशाच्या सामीलीकरणासाठी इस्रायलने सुरू केलेल्या हालचालींमुळे नवी ठिणगी पडली. इस्रायल-पॅलेस्टाइन संघर्षांवर तोडगा काढण्यासाठी अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शांतता योजनेचा प्रस्ताव मांडला होता. अर्थात, या प्रस्तावानुसारच पश्चिम किनारपट्टीचा भाग इस्रायलमध्ये ‘१ जुलैपूर्वी’ सामील करून घेण्यात येणार असल्याचे इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांचे म्हणणे आहे. मात्र, तसे झाल्यास पॅलेस्टाइनचा भूप्रदेश आणखी आक्रसेल आणि हे पाऊल नव्या संघर्षांची, अस्थिरतेची नांदी ठरेल, असे विश्लेषण करताना आंतरराष्ट्रीय माध्यमांनी या विषयाचे विविध पदर उलगडले आहेत.

पश्चिम किनारपट्टीतील भागाबाबत प्रस्ताव वा योजना मांडण्याचा अधिकार डोनाल्ड ट्रम्प यांना कुणी दिला? या भूप्रदेशावर त्यांची मालकी आहे का? – असे अनेक प्रश्न उपस्थित करणाऱ्या पॅलिस्टिनी नागरिकांपासून ते हा संपूर्ण भागच ताब्यात घ्यावा, असे मत मांडणाऱ्या इस्रायली नागरिकांपर्यंत अनेकांच्या प्रतिक्रिया असलेला वृत्तलेख ‘बीबीसी’च्या संकेतस्थळावर आहे.

इस्रायलने पश्चिम किनारपट्टीचा भाग सामील करून घेतल्यास द्विराष्ट्र पर्यायाची आशा संपुष्टात येईल. ट्रम्प यांच्या योजनेनुसार पश्चिम किनारपट्टीतील ३० टक्के भाग इस्रायलने सामील करून घ्यायचा आहे. मात्र, त्यासाठी पॅलेस्टाइनशी वाटाघाटी करणे आवश्यक आहे. इस्रायलने एकतर्फी असा निर्णय घेतल्यास त्यांना ट्रम्प यांचा रोष ओढवून घ्यावा लागेल. शिवाय या निर्णयाचा इस्रायलला कसा तोटा होऊ शकतो, याची सहा कारणे ‘द न्यू यॉर्क टाइम्स’च्या एका लेखात नोंदविण्यात आली आहेत.

पश्चिम किनारपट्टीचा भाग सामील करून घेणे ही इस्रायलची ऐतिहासिक चूक ठरेल, असे परखड मत नोंदवणारा इस्रायलच्या माजी परराष्ट्रमंत्री तेझिपी लिवनी यांचा लेख ‘द वॉशिंग्टन पोस्ट’मध्ये आहे. त्यांच्या मते, हा तांत्रिक मुद्दा नसून इस्रायलची ओळख, मूल्ये आणि भविष्य या सर्वावर व्यापक परिणाम करणारा हा मुद्दा आहे. ‘पॅलेस्टाइनने ट्रम्प यांचा शांतता प्रस्ताव फेटाळला आहे. त्यामुळे शांतता प्रक्रियेला खीळ बसेलच; पण भावी पिढय़ांना संघर्ष, अस्थिरतेत ढकलण्याची चूक आपल्याकडून घडेल,’ असे निरीक्षण लिवनी नोंदवतात. ‘इस्रायलच्या निर्णयाचे समर्थन करणाऱ्यांना इस्रायलचे अधिकाधिक भूप्रदेशावर वर्चस्व हवे आहे. मात्र, पश्चिम किनारपट्टीवर वास्तव्य करणाऱ्या पॅलेस्टिनी नागरिकांच्या अस्तित्वाकडे ते दुर्लक्ष करत आहेत. माझी भूमिका वास्तववादी आहे. शांतता करार खूप दूर आहे, हे मला ज्ञात आहे. नजीकच्या भविष्यात शांतता करारापर्यंत आपण पोहोचू शकत नसलो तरी करारासाठी मार्ग मोकळा ठेवायला हवा,’ असे मतही त्या या लेखात व्यक्त करतात.

इस्रायलचे नवे पाऊल पॅलेस्टिनी नागरिकांसाठी आणखी एक संकट ठरेल, याकडे ‘द गार्डियन’च्या लेखात लक्ष वेधण्यात आले आहे. अनेक आंतरराष्ट्रीय कायद्यांचा आणि संयुक्त राष्ट्रांच्या ठरावांचा भंग होऊ शकेल, अशी भीती व्यक्त करतानाच रशियाप्रमाणेच इस्रायलवरही निर्बंध घालावे लागतील, असे या लेखात म्हटले आहे. इस्रायल-पॅलेस्टाइन यांच्यात २०१४ पासून शांतता चर्चाच झालेली नाही. इस्रायलच्या भूमिकेमुळे आधीच संघर्षग्रस्त भागात अस्थिरता वाढण्याची शक्यता या लेखात वर्तविण्यात आली आहे.

इस्रायली हालचालींमुळे निर्माण होणारी गुंतागुंत आणि त्यासाठी या देशाला मोजावी लागणारी किंमत यावर ‘द इकॉनॉमिस्ट’ने सखोल भाष्य केले आहे. पश्चिम किनारपट्टीचा भाग १९६७ मधील युद्धाद्वारे ताब्यात घेतल्यानंतर किमान दहा जणांनी इस्रायलचे नेतृत्व केले. मात्र, पूर्व जेरुसलेमपलीकडे कोणताही भूप्रदेश सामील करून घेणे धोकादायक आहे, असे त्यापैकी बहुतेकांचे मत होते. वेगळे पाऊल उचलल्यास हा प्रदेश अस्थिर होण्याबरोबरच द्विराष्ट्राच्या संकल्पनेनुसार कधी तरी पॅलेस्टाइन आणि इस्रायल शांततेत नांदतील, या आशेवर पाणी फिरवल्यासारखे होईल, असे त्यांना वाटत होते. मात्र, आपल्याला अधिक समज आहे, असे नेतान्याहू यांना वाटते. पश्चिम किनारपट्टीचा भाग सामील करून घेण्यासाठी काय किंमत चुकवावी लागेल, याचा अंदाज बहुधा त्यांना नसावा, असे या लेखात म्हटले आहे. इस्रायलने आपल्यापुढील धोका ओळखायला हवा. अमेरिकी अध्यक्षीय निवडणुकीत ट्रम्प यांच्यासमोर डेमोक्रॅटिक पक्षातर्फे जो बायडेन यांचे तगडे आव्हान आहे. प्रस्तावित  एकतर्फी नकाशाबदलास बायडेन यांचा विरोध आहे. काही युरोपीय देशांनीही इस्रायलच्या भूमिकेला विरोध दर्शवला आहे. शिवाय अरब देशांचा रोषही पत्करावा लागेल, याकडे या लेखात लक्ष वेधण्यात आले आहे. ‘अल जझीरा’ने ही चाल नेतान्याहू यांचे राजकीय स्थान बळकट करील, असे म्हटले आहे. नवे पाऊल उचलण्याआधी इस्रायलने सार्वमत घ्यावे, असा सूर इस्रायलच्या ‘हारेत्झ’ या दैनिकासह काही माध्यमांत उमटला आहे.

शब्दांकन : सुनील कांबळी