करोना विषाणूने वर्षभरापासून वेठीस धरलेल्या जगापुढे त्यावरील लशींमुळे आशादायी चित्र निर्माण झाले असताना, या विषाणूच्या नव्या अवतारामुळे वर्षअखेरीसही चिंतेचे मळभ दाटले आहे. ब्रिटनमध्ये आढळलेल्या नव्या करोनावताराचा संपूर्ण तपशील समोर यायला आणखी काही काळ जावा लागेल. तथापि, त्याची दखल घेत तज्ज्ञांच्या साह्य़ाने विश्लेषण करण्याचा प्रयत्न जगभरातील माध्यमांनी केल्याचे दिसते.

नव्या करोनावतारामुळे भारतासह जगभरातील ४० हून अधिक देशांनी ब्रिटनच्या प्रवाशांना प्रवेशबंदी केली आहे. अर्थात, त्यात युरोपीय महासंघातील देशांचा समावेश आहे. त्यामुळे मालवाहतूक ठप्प झाल्याचे चित्र ब्रिटनच्या सीमेवर गेल्या आठवडय़ात दिसत होते. त्याची दखल घेत युरोपीय महासंघातील देशांनी प्रवास निर्बंध मागे घ्यावेत, असे आवाहन युरोपीय आयोगाने केले. त्यास किती प्रतिसाद लाभला, युरोपीय महासंघातील अन्य देशांची काय भूमिका आहे, याबाबतचे वृत्तलेख ‘बीबीसी’च्या संकेतस्थळावर आहेत. नवकरोनाचा फैलाव वेगाने होतो; मात्र तो कमी प्राणघातक आहे, असे मानले जाते. त्याचा फैलाव लहानग्यांमध्ये किती प्रमाणावर होतो, याबाबत ब्रिटनमध्ये संशोधन सुरू आहे. शक्य झाल्यास जानेवारीमध्ये शाळा सुरू करण्यात येतील, असे ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी गेल्या सोमवारी म्हटले होते. आता त्याबाबत असलेली अनिश्चितता, नाताळ, नववर्ष स्वागतावरील नवकरोनाचा परिणाम याचेही तपशीलवार वृत्तांकन ‘बीबीसी’ने केले आहे.

नवकरोना नेमका काय आहे आणि सध्या विकसित करण्यात आलेल्या लशी त्यावर परिणामकारक ठरतील का, याचा सखोल वेध ‘द गार्डियन’ने घेतला आहे. हा करोना वेगाने फैलावत असून, जपान, फ्रान्स, स्पेन, स्वीडन, कॅनडा आदी देशांमध्ये त्याचे रुग्ण आढळले आहेत. त्याचा तपशील देत ‘गार्डियन’ने अग्रलेखात पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्यावर कठोर भाषेत टीका केली आहे. ‘नवकरोनाचे रुग्ण ब्रिटनमध्ये झपाटय़ाने वाढत आहेत. इतकी मोठी रुग्ण्वाढ कशामुळे होत आहे, याची जॉन्सन यांना कल्पना नसावी. मात्र काहीतरी चुकतेय, हे जॉन्सन यांच्या सहकाऱ्यांना माहीत होते. जॉन्सन यांनी वेळेवर प्रतिबंधात्मक पावले उचलायला हवी होती. ती उचलण्यासाठी कार्यक्षम नेतृत्व लागते. पंतप्रधान जॉन्सन हे अकार्यक्षम आहेत,’ अशा शब्दांत ‘गार्डियन’ने त्यांना लक्ष्य केले. ब्रिटन सरकारने वर्षभरात तिसऱ्यांदा वास्तव स्वीकारून वेळेत आवश्यक पावले उचलण्यात अक्षम्य दिरंगाई केली. याच दिरंगाईने हजारोंचे बळी घेतले आणि नियमपालनासाठी आवश्यक असलेला सरकारवरील विश्वास ढळू दिला, असे निरीक्षण या अग्रलेखात नोंदविण्यात आले आहे. करोनाच्या नव्या अवतारावर नियंत्रण मिळवण्यासाठी कठोर निर्बंध लागू करण्याची गरज व्यक्त करणारा लेखही ‘गार्डियन’मध्ये आहे.

नवकरोनाचा अर्थ काय, अशा आशयाचा एक लेख ‘द न्यू यॉर्क टाइम्स’मध्ये आहे. करोना विषाणूने रूप बदलणे हे अनपेक्षित नाही. लसीकरण आणि त्यातून निर्माण होणाऱ्या प्रतिकारशक्तीमुळे करोना नवनवी रूपे धारण करील, असा संशोधकांचा अंदाज आहे. मात्र, करोनाच्या एखाद्या छोटय़ा स्वरूपातील बदलामुळे संपूर्ण मानवी प्रतिकारशक्ती निष्प्रभ ठरणार नाही, असे मत व्यक्त करणाऱ्या एका संशोधकासह अन्य संशोधक, तज्ज्ञांची निरीक्षणे या लेखात नोंदवण्यात आली आहेत. करोनाप्रसार रोखण्यासाठी किती लोकसंख्येत सामूहिक प्रतिकारशक्ती निर्माण व्हायला हवी, याचे विवेचन करणारा लेखही ‘न्यू यॉर्क टाइम्स’मध्ये आहे. करोना संसर्ग किंवा लसीकरणातून ही प्रतिकारशक्ती निर्माण व्हायला हवी. सुरुवातीला हे प्रमाण ६० ते ७० टक्के आहे, असे सांगण्यात येत होते. आता मात्र ते प्रमाण ८० टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आले आहे. करोना अधिक वेगाने फैलावत असल्याने तो रोखण्यासाठीही मोठय़ा लोकसंख्येत सामूहिक प्रतिकारशक्ती निर्माण होणे आवश्यक आहे, हे तज्ज्ञांचे निरीक्षण या लेखात नोंदवले आहे.

करोनाच्या नव्या अवताराबाबत देशोदशींच्या आघाडीच्या माध्यमांनी सोप्या भाषेत हा विषय वाचकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. ‘द वॉशिंग्टन पोस्ट’चा त्यात विशेष उल्लेख करावा लागेल. नवकरोना नेमका काय आहे, आपल्या देशात त्याचा संसर्ग झाला आहे का, त्याच्यावर लस परिणामकारक ठरेल का, आदी प्रश्नांची उत्तरे देण्याबरोबरच त्याचे विविध पैलू समोर आणण्याचा प्रयत्न  ‘द वॉशिंग्टन पोस्ट’ने केला आहे. ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्याच दुसऱ्या एका लेखात हा विषाणू ब्रिटनसह अन्य देशांत मोठय़ा वेगाने पसरत असल्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली आहे. एकूणच, नवा करोना कमी प्राणघातक आहे असे सारेच मान्य करीत असले, तरी करोनाच्या संभाव्य नवनव्या रूपांवर लस किती परिणामकारक ठरेल, हा प्रश्न माध्यमांनी अधोरेखित केला आहे.

(संकलन : सुनील कांबळी)