‘एका व्यक्तीच्या सत्तालोलुपतेमुळे संपूर्ण देश वेठीस धरता येऊ शकत नाही. नागरिकांना आता आत्मभान आले आहे. सत्तापरिवर्तनाचा त्यांचा निर्धार आहे.’ स्वेतलाना तिकानोव्हस्काया आत्मविश्वासाने सांगताना एका चित्रिफितीत दिसतात. बेलारूसमध्ये २६ वर्षांपासून सत्तेवर असलेल्या अलेक्झांडर लुकाशेन्को यांच्या त्या प्रतिस्पर्धी. खरे म्हणजे स्वेतलाना यांचे पती सर्जी तिकानोव्हस्की यांनी अध्यक्षीय निवडणूक लढविण्याची घोषणा मे महिन्यात केली होती. दोनच दिवसांनी त्यांना अटक करण्यात आली. अखेर पतीऐवजी त्या स्वत: निवडणूक रिंगणात उतरल्या. जनमताच्या बळावर त्यांनी निवडणूक लढवली. मात्र, एकाधिकारशाही असलेल्या देशातील निवडणुकीत जे होते तेच बेलारूसमध्ये झाले आणि लुकाशेन्को यांना सुमारे ८० टक्के मतांनी विजयी घोषित करण्यात आले! निवडणुकीत गैरप्रकार झाल्याच्या आरोपावरून बेलारूसमध्ये जनक्षोभ उसळला. हे आंदोलन चिरडण्याचे प्रयत्न करणारी लुकाशेन्को राजवट माध्यमांची गळचेपी करते आहे. आंतरराष्ट्रीय माध्यमांनी बेलारूसमधील अस्थर्याचे सर्वव्यापी विश्लेषण करताना माध्यमस्वातंत्र्याचा संकोच अधोरेखित केला आहे.

बेलारूसमधील परिस्थिती स्फोटक बनली असून, त्यात संयुक्त राष्ट्रांनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी स्वेतलाना तिकानोव्हस्काया यांनी नुकतीच केली. आपल्याला ६० ते ७० टक्के मते मिळाली, असा त्यांचा दावा आहे. याबाबत त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार करताच त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांना शेजारच्या लिथुआनियामध्ये जाण्यास भाग पाडण्यात आले. याबाबतचा निवडणूकपूर्व आणि निवडणुकोत्तर घटनाक्रम ‘बीबीसी’च्या वृत्तलेखांत तपशीलवार सापडतो.

स्वेतलाना देशाबाहेर असताना आंदोलनाचे नेतृत्व कोणाकडे आहे, असा प्रश्न पडणे स्वाभाविकच; पण या आंदोलनाला एकच नेता नाही. प्रत्यक्षात आंदोलनात सहभागी न होता त्याचे नियोजन करणाऱ्यांचीही मोठी टीम आहे. त्यातला एक तरुण म्हणजे स्टीफन स्वेटलोव्ह. सध्या वास्तव्य पोलंड; पण मूळचा बेलारूसचा. त्याने समाजमाध्यमाद्वारे आंदोलनाला रसद पुरवली आहे. त्याची आंदोलनात नेमकी भूमिका काय, हे सांगणारा लेख ‘द न्यू यॉर्क टाइम्स’मध्ये आहे. बेलारूसमधील आंदोलन हा लुकाशेन्को यांच्या सत्तेचा अस्ताचा मार्ग आहे. मात्र, माझी हत्या झाली तरच नव्याने निवडणुका होतील, अशी आक्रमक भूमिका लुकाशेन्को यांनी घेतल्याने या मार्गावर काटे अधिक आहेत, असे ‘द गार्डियन’च्या लेखात म्हटले आहे.

लोकशाहीवाद्यांच्या पाठीशी ठाम उभे राहण्याची अमेरिकेची संस्कृती आहे. मात्र, अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बेलारूसमधील आंदोलनाबाबत मौन बाळगले. बेलारूस आपल्या कवेत घेण्यासाठी आसुसलेले रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांची नाराजी ओढवून घेऊ नये, अशी ट्रम्प यांची भूमिका असल्याची टीका ‘द वॉशिंग्टन पोस्ट’ने केली आहे. रशियाचे पंतप्रधान मिखाइल मिशुस्टीन गेल्या गुरुवारी बेलारूसला जाऊन आले. लुकाशेन्को यांची बेलारूसवर पकड कशी घट्ट राहील, याचीच तजवीज रशियाने केली असणार, असे ‘द वॉशिंग्टन पोस्ट’च्या अन्य एका लेखात म्हटले आहे. पुतिनविरोधक अ‍ॅलेक्सी नवाल्नी यांच्यावर विषप्रयोग झाल्याचा आरोप साफ चुकीचा असल्याचे लुकाशेन्को म्हणतात. रशियाची मर्जी राखत, हुकूमशहांच्या पोतडीतील सर्व क्ऌप्त्या लढवत लुकाशेन्को हे सत्तेला चिकटून राहिले आहेत. मात्र, त्या फार काळ चालणार नाहीत, असे निरीक्षणही हा लेख नोंदवतो.

बेलारूसमधील माध्यमांच्या गळचेपीबाबत अनेक आंतरराष्ट्रीय माध्यमांत लेख आहेत. लुकाशेन्को यांनी जवळपास १९ परदेशी पत्रकारांची अधिस्वीकृती काढून घेतली. तसेच तेथील ५० वृत्तसंकेतस्थळे बंद केली. तिथल्या सरकारी माध्यमांतील पत्रकारही राजीनामे देत आहेत. ते का, याबाबत जर्मनीच्या ‘डॉएचे वेले’ संकेतस्थळावर एक वृत्तलेख आहे. त्यात या पत्रकारांनी मांडलेल्या कैफियतीतून एकाधिकारशाही असलेल्या देशातील शासकीय माध्यमांतील पत्रकारांची वेदना प्रतिबिंबित होते. बेलारूस अध्यक्षीय निवडणुकांचे वृत्तांकन एकतर्फीच असावे, यासाठी या पत्रकारांवर दबाव होता. विरोधकांचे काहीच छापायचे नाही, अशी सूचना त्यांना करण्यात आली होती. अगदी त्यांचे नावसुद्धा! सर्जी तिकानोव्हस्की यांच्या अटकेनंतर ते कसे गुन्हेगार आहेत, याचे रसभरीत वर्णन करणारे लेखन करण्यास सांगण्यात आले. सरकारी वृत्तवाहिन्यांवर विरोधकांची छायाचित्रे दाखविण्यास मनाई होती. तसेच करोना हाताळणीत सरकार कसे यशस्वी ठरते आहे, असे चित्र निर्माण करणाऱ्या सकारात्मक बातम्याच प्रसारित करण्याची सूचना देण्यात आली होती, असे त्यातील काही पत्रकारांनी सांगितल्याचे या वृत्तलेखात म्हटले आहे. बेलारूसच्या सरकारी माध्यमांतील एकतर्फी वार्ताकनाच्या निषेधार्थ काही पत्रकारांनी राजीनामे दिल्यावर त्यांच्या जागी रशियन सरकारनियंत्रित ‘आरटी’ माध्यमाचे पत्रकार सेवेत रुजू झाले. अर्थात, सत्ताधाऱ्यांची खुशामत करण्याचा मोठा अनुभव त्यांच्या गाठीशी आहेच.

संकलन : सुनील कांबळी