भारत आणि चीन यांच्यातला सीमावाद अनेक दशकांचा. मे महिन्याच्या सुरुवातीस लडाख आणि सिक्कीममध्ये भारत व चीनचे सैनिक आमनेसामने आले आणि सीमेवर पुन्हा तणाव निर्माण झाला. त्यामुळे तीन वर्षांपूर्वीच्या डोकलाम तिढय़ाचे स्मरण झाले. ऐन करोनाकाळात निर्माण झालेल्या या तणावाचे नेमके अर्थ काय आहेत, याचा वेध घेताना आंतरराष्ट्रीय माध्यमांनी भारत-चीन सीमावादावर भाष्य केले आहे. यात भारताची बाजू समजून घेण्याचा माध्यमांचा प्रयत्न लक्षणीय ठरतो.

चीनने लडाखमध्ये घुसखोरी केल्याचा भारताचा आरोप आहे; तर या सीमावादास भारत जबाबदार असल्याचा चीनचा दावा आहे. लडाखमध्ये भारत मोठय़ा प्रमाणात पायाभूत सुविधा प्रकल्प राबवत असल्याने चीनचा तिळपापड झाला असावा. त्यामुळेच एरवी शांततेत वाहणारी गालवान नदी तणावाचे केंद्र बनली आहे, असे ‘बीबीसी’च्या संकेतस्थळावरील एका वृत्तलेखात म्हटले आहे. भारत-चीन सीमावाद मिटविण्यासाठी गेल्या तीन दशकांत चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. मात्र, त्या निष्फळ ठरल्या. तरीही, चर्चेतून मार्ग काढून करोना संकटामुळे बिघडलेली अर्थव्यवस्थेची घडी नीट करण्यावर या देशांना भर द्यावा लागणार असून, लष्करी संघर्ष टाळावा लागेल, असे तज्ज्ञांचे मतही या वृत्तलेखात आहे.

भारत-चीन यांच्यातला सध्याचा सीमावाद छोटा दिसत असला तरी त्याचे जागतिक परिणाम मोठे आहेत, असे निरीक्षण ‘द वॉशिंग्टन पोस्ट’मधील एका लेखात नोंदविण्यात आले आहे. भारत आणि चीन यांच्यातील सीमावाद नवा नाही. याआधी २०१७ मध्ये डोकलाम तिठय़ावरून उभय देशांदरम्यान तणाव निर्माण झाला होता. चिनी सैन्याकडून डोकलाम तिठय़ावर करण्यात आलेल्या बांधकामास भारताने आक्षेप घेतला होता. जवळपास दोन महिन्यांनंतर हा तणाव मिटला. त्याप्रमाणे आताचा वादही मिटेल, असा आशावाद भारतीय विश्लेषकांना आहे. मात्र, कोणत्याही ठोस तोडग्याशिवाय असा तात्पुरता वाद मिटला तरी सीमावादाचे मूळ कायम राहील. भारताच्या आकडेवारीनुसार, २०१६ ते २०१८ या कालावधीत चीनने १,०२५ वेळा भारतीय हद्दीत घुसखोरी केली, याकडे या लेखात लक्ष वेधण्यात आले आहे. एरवी, अशा प्रकारांकडे द्विपक्षीय वाद म्हणून पाहिले गेले असते. मात्र, अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सीमावादात मध्यस्थीची भूमिका घेण्याची दर्शवलेली तयारी ही (अमेरिकेची) चीनविरोधी भूमिका असल्याचे मानले जाते, असे या लेखात म्हटले आहे.

जग करोनाशी लढत असताना चीन प्रादेशिक वर्चस्वासाठी आक्रमक भूमिका घेत असल्याचे ‘द न्यू यॉर्क टाइम्स’च्या एका लेखात अधोरेखित करण्यात आले आहे. भारताच्या सीमेजवळच्या प्रदेशांवर दावा करण्याबरोबरच चीनने दक्षिण चीन समुद्रात व्हिएतनामची मच्छीमार बोट नुकतीच बुडवली. काही प्रमाणात स्वायत्त असलेल्या हाँगकाँगवर पकड घट्ट करण्यासाठी चीनने काही दिवसांपूर्वी कायदा मंजूर केला, अशी काही उदाहरणे या लेखात आहेत. भारतात अजूनही करोना विषाणू मोठय़ा प्रमाणात फैलावत आहे. शिवाय टाळेबंदीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे भारत सीमेवर संघर्षांच्या मन:स्थितीत नसेल, याचा अदमास घेऊन चीनने हे पाऊल उचलले असावे. तसेच (भारताने) अमेरिकेशी फार जवळीक वाढवू नये आणि करोना हाताळण्याबाबत अमेरिका करत असलेल्या टीकेला पाठबळ देऊ नये, यासाठी एक राजकीय संदेश देण्याचा हा चीनचा प्रयत्न असू शकतो, असा सूर या लेखात आहे. दक्षिण आशियात चीन आपला आर्थिक आणि भूराजकीय प्रभाव वाढवत आहे. अलीकडेच नेपाळने आपला नवा नकाशा प्रसिद्ध करण्याचा घाट घातला. या कुरापतीस चीन जबाबदार असल्याचा आरोप भारताने केला होता. आता नव्या वादातून युद्धाचा चीनचा विचार नसला तरी भारतावर दबाव आणण्याचा हा प्रयत्न आहे, असे तज्ज्ञांच्या हवाल्याने या लेखात नमूद करण्यात आले आहे.

भारताने भू-राजकीय मुद्दय़ांबाबत सावध भूमिका घ्यावी, असा संदेश चीनला द्यायचा असावा़, असे निरीक्षण नोंदवतानाच ताज्या सीमावादाबाबत भारत आणि चीन यांच्या भूमिका काय आहेत, याचा तपशील ‘द गार्डियन’च्या वृत्तलेखात आहे.

‘साऊथ चायना मॉर्निग पोस्ट’मध्ये सीमेवरील तणावाच्या वृत्तासह, मध्यस्थीचा ट्रम्प यांचा प्रस्ताव भारताने धुडकावल्यासंदर्भात एक वृत्तलेख आहे. शांततेच्या मार्गाने सीमावादावर तोडगा निघेल, असा सूर त्यात आहे. चीनच्याच ‘ग्लोबल टाइम्स’मध्ये मात्र सीमावादबाबत अनेक लेख आहेत. भारताने चिनी प्रदेशात लष्करासाठी बांधकाम केल्याचा दावा करत शांततेसाठी भारताने चीनकडे पाश्चिमात्यांच्या चष्म्यातून पाहू नये, असा अनाहूत सल्ला देण्यापर्यंत ‘ग्लोबल टाइम्स’च्या एका लेखाची मजल गेली आहे. भारत-चीन सीमावादात ट्रम्प यांच्या मध्यस्थीची गरज नाही, असे ‘ग्लोबल टाइम्स’च्याच दुसऱ्या एका लेखात म्हटले आहे.

संकलन : सुनील कांबळी