‘ट्रम्प इन्साइट्स मॉब’.. ‘मॉब स्टॉम्र्स कॅपिटॉल’.. ‘ट्रम्प मॉब स्टॉम्र्स कॅपिटॉल’.. अमेरिकेतील ‘द न्यू यॉर्क टाइम्स’, ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’, ‘द वॉशिंग्टन पोस्ट’ या आघाडीच्या दैनिकांच्या ७ जानेवारीच्या अंकातील मुख्य बातमीचे हे मथळे. शब्दांत किरकोळ फरक, सूर मात्र एकच. गेल्या बुधवारच्या ‘कॅपिटॉल’-अमेरिकी संसदेवरील हल्ल्यानंतर बहुतांश अमेरिकी माध्यमांमध्ये हाच सूर उमटला असूऩ, त्यांनी ‘ट्रम्पवादा’चे वाभाडे काढले आहेत.

‘अध्यक्षीय निवडणुकीतील पराभव अमान्य करत ट्रम्प यांच्या दंगलखोरांनी बंडाचा प्रयत्न केला. ट्रम्प यांच्या चिथावणीमुळे झालेला हिंसाचार अमेरिकेच्या आधुनिक इतिहासातील असा पहिला विध्वंसक प्रसंग आहे..’- ‘द वॉशिंग्टन पोस्ट’च्या वृत्ताचा हा सूर अन्य माध्यमांतही आढळतो. या वृत्तपत्राबरोबरच ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’, ‘लॉस अँजेलिस टाइम्स’ आदींनी ट्रम्प यांच्या हकालपट्टीच्या मागणीला मोठी प्रसिद्धी दिली आहे.

ट्रम्प यांच्या अध्यक्षीय कालावधीत अमेरिकेतील राजकारणाप्रमाणेच सामाजिक दुभंगस्थितीचा प्रत्ययही वारंवार आला आहे. ट्रम्प समर्थक हल्लेखोरांबाबत पोलिसांच्या भूमिकेबद्दल ‘ब्लॅक लाइव्हज् मॅटर’च्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. कृष्णवर्णीय आंदोलकांनी ‘कॅपिटॉल’मध्ये घुसून हैदोस घातला असता तर पोलिसांनी काही क्षणांत ते आंदोलन चिरडले असते, असे म्हणत सुरक्षा यंत्रणेच्या पक्षपातीपणावरही ‘द वॉशिंग्टन पोस्ट’मधील एका लेखात बोट ठेवण्यात आले आहे. ‘कॅपिटॉल’ इमारतीजवळ जमावावर नियंत्रण मिळविण्यासाठी सुरक्षा यंत्रणा सज्ज नव्हती, असे निरीक्षण अनेक माध्यमांनी नोंदवले. सुरक्षा यंत्रणा अपयशी ठरली. ‘कॅपिटॉल’वरील आंदोलक आणि कृष्णवर्णीय आंदोलक याबाबत पोलिसांची भूमिका वेगवेगळी होती, याकडे ‘लॉस अँजेलिस टाइम्स’ने लक्ष वेधले आहे. या हल्ल्यावेळी श्वेतवर्णीय वर्चस्ववादाचे प्रदर्शन झाले, ही बाब त्यात अधोरेखित करण्यात आली आहे. सुरक्षा यंत्रणेच्या अपयशाप्रकरणी चौकशी करण्याची मागणीही एका लेखात करण्यात आली आहे.

‘कॅपिटॉल’वरील हल्ल्याप्रकरणी या माध्यमांनी संपादकीय भूमिका आक्रमकपणे मांडलेली दिसते. ‘ट्रम्प्स फायनल डिसग्रेस’ या शीर्षकाच्या ‘द वॉशिंग्टन पोस्ट’च्या अग्रलेखात ट्रम्प यांच्यावर परखड टीका करण्यात आली आहे. ‘कॅपिटॉल हल्ल्याच्या देशद्रोही कृत्यास ट्रम्प जबाबदार आहेत. त्यांनी अध्यक्षपदावर कायम राहणे हा अमेरिकी लोकशाहीला गंभीर धोका आहे. त्यामुळे त्यांची हकालपट्टी करावी,’ अशी भूमिका या अग्रलेखात मांडण्यात आली. ‘नागरिकांचा विश्वास असेपर्यंतच नियम, कायदे, घटना यांना काहीएक अर्थ असतो. मात्र देशाच्या सर्वोच्च पदावरील व्यक्तीच या विश्वासास तडा जाऊ देत असेल तर ती व्यक्ती अध्यक्षपदी असेपर्यंत तरी देश धोक्यात आहे,’ असे अग्रलेखात म्हटले आहे. ‘काही अध्यक्ष कार्यकाळ समाप्तीवेळी उत्तम भाषणाने अमेरिकी नागरिकांची मने जिंकून घेतात. ट्रम्प यांनी मात्र कार्यकाळ संपता-संपता दंगलीचा आधार घेत अध्यक्षपदाला काळिमा फासला आहे,’ असे मत ‘द वॉशिंग्टन पोस्ट’च्या एका लेखात नोंदवले आहे. ‘ट्रम्प यांनी आपल्या चार वर्षांच्या विध्वंसक कार्यकाळात नियम, कायद्यांची मोडतोड केली होतीच. आता त्यांच्या खात्यात आणखी एक गुन्हा समाविष्ट झाला आहे- देशद्रोह,’ अशी टिप्पणी करणारा आणखी एक लेख ट्रम्पवादाची कुं डली मांडतो.

‘ट्रम्प यांच्या समर्थकांनी कॅपिटॉलवर हल्ला करून लोकशाहीला काळिमा फासला. ट्रम्प हे अध्यक्षपदाच्या पात्रतेचे नव्हतेच. त्यांच्यावर महाभियोगाची कारवाईही व्हायला हवी,’ असे नमूद करत ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’ने ट्रम्प यांचे राजकीय भवितव्यही संपुष्टात आल्याचे म्हटले आहे. रिपब्लिकन पक्षाच्या अनेक नेत्यांनी ट्रम्प यांच्या भूमिकेवर टीका केली आहे. मात्र सध्या रिपब्लिकन पक्षच दिशाहीन झाला आहे, असे निरीक्षण नोंदवणारा लेखही ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’मध्ये आहे.

ट्रम्प यांच्या हकालपट्टीची मागणी सर्वच माध्यमांत ठसठशीत दिसते. हल्लेखोरांवर विमानप्रवासास बंदी घालण्याची मागणी पुढे आली आहे. माध्यमांनी त्यासही ठळक प्रसिद्धी दिली आहे. हल्लेखोरांकडे निश्चित उद्दिष्ट असते तर काहीतरी आणखी भयंकर घडले असते, अशी भीती ‘लॉस अँजेलिस टाइम्स’च्या लेखात व्यक्त करण्यात आली आहे. ‘कॅपिटॉल’वरील हल्ला न रोखू शकलेली सुरक्षा यंत्रणा संसदेतील सदस्यांना संरक्षण देऊ शकली असती का, असा सवालही त्यात विचारला आहे.

आता ट्रम्पोत्तर काळात अमेरिकेपुढे काय आव्हाने आहेत, याचा वेधही माध्यमांनी घेतला आहे. नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडेन यांच्या पदग्रहण सोहळ्यापर्यंत ट्रम्पवादी उन्माद रोखणे, देशांतर्गत दहशतवाद्यांवर आणि त्यांना चिथावणी देणाऱ्यांवर बारीक लक्ष ठेवणे ही अल्पकालीन आव्हाने आहेतच. मुख्य म्हणजे देशाचा गौरवपूर्ण इतिहास व घटनात्मक संस्थांचे नुकसान भरून काढण्याचे आव्हान देशापुढे आहे, याकडे ‘लॉस अँजेलिस टाइम्स’सह अन्य माध्यमांनी लक्ष वेधले आहे.

(संकलन : सुनील कांबळी)