सुमारे दीड हजार वर्षे सुलतानी स्थित्यंतरे आणि धार्मिक उलथापालथींना तोंड देत उभ्या असलेल्या इस्तंबुलमधील हागिया-सोफिया (उच्चार : आया सोफिया) या सहाव्या शतकातील मूळ चर्च असलेल्या जागतिक वारसा वास्तूला ‘मशीद’ हाच दर्जा अधिकृतपणे देण्याचा मार्ग टर्कीच्या सर्वोच्च न्यायालयाने मोकळा करताच त्या देशाचे अध्यक्ष रिसेप तय्यीप एदरेगन यांनी तत्परतेने तशी घोषणाही केली. नमाजसाठी त्यांनी शुक्रवार, २४ जुलै हा दिवसही मुक्रर केला. माध्यमांमध्ये त्याचे तीव्र पडसाद उमटले.

नोबेलविजेते इस्तंबुलवासी कादंबरीकार ओऱ्हान पामुक यांनी ‘बीबीसी’कडे व्यक्त केलेल्या भावनेचा हवाला ‘वॉशिंग्टन पोस्ट’सह अनेक वृत्तपत्रांनी विश्लेषणांमध्ये दिला आहे. आया सोफियाचे मशिदीत रूपांतर करण्याच्या निर्णयामुळे ‘दुर्दैवाने आम्ही आता धर्मनिरपेक्ष राहिलेलो नाही’, असा संदेश जगाला दिला गेला आहे. माझ्यासारखे लाखो धर्मनिरपेक्ष तुर्क नागरिक त्याविरोधात आवाज उठवत आहेत, परंतु आमचे ऐकले जात नाही, अशी खंत पामुक यांनी व्यक्त केली आहे.

‘वॉशिंग्टन पोस्ट’मधील लेखात ईशान थरूर यांनी आया सोफियाचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व कथन केले आहे. तुर्की साम्राज्याने १४३७ मध्ये या भव्य बायझंटाइन चर्चचे रूपांतर मशिदीत केले. त्यानंतर आधुनिक टर्कीचा (तोवरचे ‘तुर्कस्तान’) धर्मनिरपेक्ष नेता, मुस्तफा केमाल ‘अतातुर्क’ याने १९३४ मध्ये या वास्तूचा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी तिचे संग्रहालयात रूपांतर केले. त्यामुळे हे एक धर्मातीत, सार्वभौम वारसा स्मारक ठरले. ज्याने दोन वेगळ्या संस्कृती आणि श्रद्धा जोपासणाऱ्यांच्या हृदयात इस्तंबुलचे स्थान अधोरेखित केले, याचे स्मरण थरूर यांनी करून दिले आहे.

राजकीय विश्लेषक सलीम कोरू यांचा ‘अरब न्यूज’मधील लेख एदरेगन यांच्या निर्णयाची कारणमीमांसा करतो. एदरेगन यांची टर्कीची आर्थिक अवनती, सीरिया आणि लिबियामधील लष्करी कारवाईत आलेले अपयश, संकटजनक मुत्सद्देगिरी, त्यांनी बांधलेला अकराशे खोल्यांचा राजवाडा आणि त्यांच्या कुटुंबीयांवर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे डागाळलेली प्रतिमा सुधारण्यासाठी एदरेगन यांना एक प्रभावी मुद्दा हवा होता. म्हणून त्यांनी सर्वाधिक ऐतिहासिक मूल्य असलेल्या आणि ख्रिस्ती साहित्यात महत्त्व असलेल्या आया सोफियाची निवड केली. तालिबान्यांनी केलेला बामियान बुद्धशिल्पाचा आणि ‘आयसिस’ने इराकसह सीरियातील इस्लामिक आणि ख्रिस्ती वारसा वास्तूंचा केलेला विध्वंस यापेक्षा एदरेगन यांचा निर्णय भयंकर असल्याने तो ख्रिस्ती समुदायांच्या मनात इस्लामविरोधी भावना निर्माण करील, असा इशाराही या लेखात दिला आहे.

लोकप्रियता घसरू लागल्याने एदरेगन यांनी इस्तंबुलच्या ‘सहिष्णू महानगर’ या ऐतिहासिक कीर्तीला धोका पोहोचवणाऱ्या कट्टरतावाद्यांचे लांगूलचालन सुरू केल्याचे मत किंग्ज कॉलेज ऑफ लंडनमधील प्रा. ज्युडिथ हेरिन यांनी ‘वॉशिंग्टन पोस्ट’मधील आणखी एका लेखात मांडले आहे. ही वास्तू इस्तंबुलच्या संस्कृतीचा अर्क आहे. याच ठिकाणी जागतिक साम्राज्ये आणि धर्मामध्ये संघर्ष झाला, परंतु त्याची स्मारके आणि कलाकृती मात्र जगाला आनंद देत आहेत. अशा सहिष्णुतेचे प्रतीक असलेल्या वारशाचा अस्त होत आहे. ही वास्तू संपूर्ण जगाच्या मालकीची आहे, अशी भावनाही प्रा. हेरिन यांनी व्यक्त केली आहे.

आया सोफियाचे पुनरुज्जीवन हे जेरुसलेममधील ‘अल् अक्सा’ला मुक्त करण्याची नांदी असल्याचे वक्तव्य एदरेगन यांनी केल्यानंतर, टर्कीच्या बेलगाम अध्यक्षांपासून आता जेरुसलेमलाही कसा धोका आहे, असे वृत्त ‘ज्युईश प्रेस’ने प्रसिद्ध केले आहे. ‘अल् अक्सा’ ही जगातली तिसरी मोठी मशीद. ज्यूंच्या पवित्र जागेवर इस्लामचे विजयप्रतीक म्हणून ती बांधण्यात आली होती. ‘अन्य निरंकुश मुस्लीम सत्ताधीशांप्रमाणे एदरेगनही स्वत:ची इस्लामरक्षक अशी ओळख निर्माण करीत आहेत,’ असे मतही या वृत्तातच आहे.

एदरेगन यांच्याकडे आता नवी मशीद आहे, परंतु त्याची किंमत संपूर्ण देशाला मोजावी लागेल. त्यांनी त्यांच्या वैयक्तिक लाभाचा विचार केला, खिसे रिकामे असलेल्या आपल्या मतदारांचा नाही, असा टोला ‘हारेत्झ’मधील विश्लेषणात लगावला आहे, तर ‘आया सोफियाच्या रूपांतराची घोषणा टर्कीच्या  इस्लामी पुनर्जन्माचीच ग्वाही देत’, असे ‘या लिबनान’ या वृत्तसंकेतस्थळाने म्हटले आहे.

अनेक साम्राज्ये, विविध श्रद्धा आणि विचारधारांमधील संघर्षांची साक्ष देणाऱ्या खुणा आया सोफियाच्या भव्य सभागृहात आहेत. घुमटाची शोभा वाढवणारी ख्रिस्ती श्रद्धाचिन्हे आणि भिंतींवरील मुस्लीम सुलेखनाची अदाकारी ही त्याची उदाहरणे आहेत, असे नमूद करताना पाकिस्तानातील ‘डॉन’ या वृत्तपत्राच्या अग्रलेखाने एक इशारा दिला आहे. तो असा की, आया सोफियाच्या निमित्ताने (मशिदीकरणाची प्रतिक्रिया म्हणून) युरोपातील मुस्लीम अल्पसंख्याकांच्या धार्मिक स्वातंत्र्याचे  प्रश्न निर्माण होऊ शकतात!

संकलन : सिद्धार्थ ताराबाई