‘दहंगर गेम्स’ ही सुझॉ कॉलिन्स यांची गाजलेली कादंबरी. ‘कादंबरी’ या आकृतिबंधाचा पुरेपूर वापर करून घेणारा आशय, वेगवान घडामोडी, उत्कंठावर्धक कथानक, वाचकाच्या नजरेसमोर पानन् पान जिवंत करून चित्रपटाप्रमाणे ती चित्रं झरझर फिरवण्याची अद्भुत शैली अशी कितीतरी वैशिष्टय़ं या कादंबरीत आढळतात. इंग्रजीतल्या अशा अनेक उत्कंठावर्धक कादंबऱ्यांची नावं सांगता येतील; पण त्यातल्या फारच थोडय़ा अभिजात कलाकृतींमध्ये ‘एपिसोडिक’ थरार-प्रसंगांच्या पुढे जाऊन वेगळ्या मानवी भावभावना, मानवी जीवनातले मूलभूत प्रश्न आणि समकालीन वास्तवाचं प्रतिबिंब आदीचा वेध घेण्याचा प्रयत्न दिसतो. ‘द हंगर गेम्स’ नक्कीच या दर्जाच्या कादंबऱ्यांत समाविष्ट होईल.
कॅपिटॉल नावाच्या एका बलाढय़ राजाने स्वत:च्या अंकित असलेल्या बारा डिस्ट्रिक्ट्सवर ताबा ठेवत त्यांच्या केलेल्या शोषणाची ही कथा आहे. या शोषणाचं कादंबरीत प्रकट झालेलं माध्यम आहे- कॅपिटॉलकडून दरवर्षी खेळवला जाणारा खेळ- ‘हंगर गेम’! या खेळात बारा डिस्ट्रिक्ट्समधून चिठ्ठय़ा टाकून २४ तरुण स्पर्धक निवडले जात असतात. खेळाचं स्वरूप म्हणजे ‘अरीना’ नामक दूरवरच्या अज्ञात प्रदेशात जाऊन एकमेकांना मारणं! जो जिवंत राहील, तो विजेता! या खेळात भाग घेणं या डिस्ट्रिक्ट्सवर सक्तीचं असतं. कारण फार पूर्वी या डिस्ट्रिक्ट्सनी कॅपिटॉलविरुद्ध बंड केलेलं असतं आणि त्यात या डिस्ट्रिक्ट्सचा पराभव झालेला असतो. त्याचीच शिक्षा आणि त्यांच्यावर कायमस्वरूपी नियंत्रण ठेवण्यासाठी म्हणून दरवर्षी हा हंगर गेम खेळवला जातो. या डिस्ट्रिक्ट्सपैकी बाराव्या आणि अत्यंत मागास असलेल्या भागातल्या सोळा वर्षीय, धीट व स्वत:चं कुटुंब सांभाळणाऱ्या कॅटनीस एव्हरडीन या मुलीच्या निवेदनातून कादंबरीची कथा पुढे जाते. हंगर गेम्समध्ये सहभागी होण्याच्या आधीपासून, हा खेळ चालू असताना ते अगदी खेळ संपेपर्यंत कॅटनीस तिच्या डिस्ट्रिक्टविषयी, तिच्या घरच्यांविषयी, तिथल्या सामाजिक व्यवस्थेविषयी आपल्याशी बोलत राहते. यात तिच्याबरोबर तिचा मित्र गेल, आई, लहान बहीण प्रिम, गेममधला सोबती पीटा तसेच अन्य अनेक पात्रं आहेत. वरवर पाहता हे कथानक कॅटनीसची दुर्दम्य इच्छाशक्ती, धाडस, थरार, लढाईचे प्रसंग आणि शेवटचा विजय अशा ठरावीक साच्यातून फिरत असल्याचं जाणवतं. त्यामुळे याचा शेवट कुठल्याही मुरलेल्या वाचकाला सुरुवातीलाच कळू शकतो. पण त्याही पुढे जाऊन कॅटनीसच्या संपूर्ण प्रवासात आजच्या काळातले कितीतरी संदर्भ जाणत्या वाचकाला यानिमित्ताने भराभर आठवत राहतात. संपूर्ण कादंबरीभर हे संदर्भ वाचकाच्या डोळ्यासमोर येत राहतात. या संदर्भातले पेच कादंबरीतल्या संवादांच्या निमित्ताने जिवंत होतात. आणि हेच या कादंबरीचं सर्वात मोठं वैशिष्टय़ आहे. कॅपिटॉल हा कधी वाचकाला जगभर छोटय़ा-मोठय़ा राष्ट्रांची दाणादाण उडवून देणारा आजचा अमेरिका हा देश वाटू शकतो, तर कधी हा सगळा ‘हंगर गेम’ आजचा ‘बिग ब्रदर’ किंवा हिंदी ‘बिग बॉस’सारखाही वाटू लागतो. विशेषत: कॅटनीस आणि तिचा खेळातला सहकारी यांच्यातल्या प्रेमसंबंधांचं राजकारण तर आज ढिगाने चाललेल्या रिअ‍ॅलिटी शोज्चाच थेट आभास निर्माण करतं. कादंबरीचा आणखी एक विशेष म्हणजे ती एक कल्पनाविलास किंवा पूर्णपणे फॅण्टसी असली, तरी तिची भूमी वाचकाला जवळची वाटते. ती हॅरी पॉटर किंवा तत्सम कलाकृतींप्रमाणे पूर्ण अमानवी वाटत नाही. समकालीन जागतिकीकरणाचे पेच, सॉफ्ट पॉवरची संकल्पना आणि चीन, अमेरिका यांचं आजचं वर्तन यांच्याशी आपण कादंबरीतलं कथानक, संदर्भ जोडून घ्यायला लागतो. कदाचित कादंबरीकाराला या कल्पित कथानकामधून हेच अपेक्षित असावं. तसं असेल तर त्या अर्थानेही कादंबरी यशस्वी झाली आहे. मांडायचाय तो विचार, त्यासाठी वापरलेली रूपकं, प्रतिमा, कथानक आणि वाचकाला बांधून ठेवणारा ‘रंजन’ नावाचा घटक हे सगळंच ‘द हंगर गेम्स’मध्ये जुळून आलं आहे. साहित्यात किंवा कलेत नुसता विचार महत्त्वाचा असून चालत नाही, तर ज्या पद्धतीने तो रंजनातून वाचकांपर्यंत पोहोचतो, तिथपर्यंत पोहोचायला प्रतिभाच लागते. कॉलिन्स अत्यंत ताकदीने हे आव्हान पेलतात.
कादंबरीच्या शेवटापर्यंत थरार आणि पुढे काय होणार, याची उत्कंठा शाबूत ठेवण्याचं लेखिकेचं कसब, त्यातली तिची कल्पकता यांना दाद द्यावी लागेल. हंगर गेम्समधल्या जंगल, आग, पक्षी, प्राणी, कॅटनीसच्या शिकारी, खाण्याचे पदार्थ यांची वर्णनं आपल्याला एका वेगळ्याच जगात नेतात. डिस्ट्रिक्टमधलं जीवन, तिथले नियम, स्थानिक रहिवाशांतील वेगवेगळे वर्ग, कॅपिटॉलचे
शांतिरक्षक, भ्रष्टाचार अशा सगळ्याच गोष्टी लक्ष वेधून घेणाऱ्या आहेत.
कादंबरीची भाषा ओघवती, सोपी आणि सुटसुटीत आहे. काही ठिकाणी जाणीवपूर्वक ठेवलेले इंग्रजी शब्द- उदा. ‘डिस्ट्रिक्ट्स’, ‘कॅपिटॉल’, ‘अरीना’ आशयाला घट्ट करण्याचंच काम करतात. मात्र, काही ठिकाणी मराठीकरण करताना संस्कृतप्रचुर शब्द खटकतात. उदा. ‘आगप्रक्षेपक’ इत्यादी.
सुमिता बोरसे यांनी केलेला अनुवादही उत्तम जमून आला आहे.
कॅटनीस या जीवघेण्या हंगर गेममधून सुटू पाहते तो मुक्तीचा क्षण आणि पुन्हा कॅपिटॉल नामक व्यवस्थेची ती आजन्म बंदिवान असल्याच्या जाणिवेतून तिला झालेलं दु:ख यांतून पीटा आणि तिच्या संबंधांत निर्माण झालेला तिढा या सर्व गोष्टी कादंबरीतल्या पात्रांप्रमाणेच जणू काही स्वत:च्या बाबतीतही घडत असल्याचं वाचकाला वाटत राहतं. खरं तर हेच या कादंबरीचं यश आहे. हंगर गेम्स या खेळातली कॅटनीस-पीटाची प्रेमाची खेळी, त्यातले पेच आणि दोन व्यक्तींमधल्या संबंधांमध्ये बलाढय़, न दिसणाऱ्या शक्तीने केलेला हस्तक्षेप हा प्रवास सामान्य वाचकाला तथाकथित ‘मार्केट’ नामक व्यवस्थेने आज जे काही चालवले आहे त्याची चुणूक दाखवून जातो. समकालीन कलेने व्यवस्थेला धक्का दिला पाहिजे, तिला विचारप्रवृत्त केलं पाहिजे, या भूमिकेला कादंबरी या आकृतिबंधाचा पुरेपूर वापर करून, त्यातलं कलामूल्य टिकवून, रसरशीतपणे आणि रंजनाची कास न सोडता किती समर्थपणे जागता येऊ शकतं याचं उदाहरण म्हणजे ‘द हंगर गेम्स’ ही साहित्यकृती होय.
‘द हंगर गेम्स’ : सुझॉन कॉलिन्स, अनुवाद : सुमिता बोरसे, कनक बुक्स, डायमंड पब्लिकेशन्स, पुणे, पृष्ठे : ३२१, किंमत : ३०० रुपये.