पुस्तकाच्या शीर्षकावरून आणि लेखकाच्या नावावरून पुस्तकाच्या अंतरंगासंबंधी वाचक काही आडाखे बांधतो. लेखक जर परिचित असेल, त्याचे पूर्वीचे काही लेखन वाचलेले असेल तर आडाख्यांचे रूपांतर अपेक्षांतही होते. उपरोक्त पुस्तक जुने आणि नावही (लेखकाचे) अपरिचित, तरीही शीर्षकावरून ते एक प्रवासवर्णन असेल अशी कल्पना झाली. प्रत्यक्षात तो एक अनुवाद आहे आणि तोही बंगाली मासिक ‘प्रवासी’ यात प्रसिद्ध झालेल्या इंग्रजीतील (युरोपिअन प्रवाशाच्या) आत्मवृत्ताचा. लेखकाने प्रस्तावनेत तसे नमूदही केले आहे. हा अनुवाद प्रसिद्ध का केला याबद्दल ते म्हणतात, ‘‘प्रवासवर्णनापासून अनेक फायदे आहेत. जे प्रवास करू शकत नाहीत त्यांना निरनिराळ्या देशांचे रीतिरिवाज, धर्म, धंदे यांचे ज्ञान होऊन त्यांच्या अंगी चातुर्य येते. कोत्या समजुती नाहीशा होऊन दुराभिमान जातो व चांगल्या गोष्टींबद्दल यथार्थ अभिमान उत्पन्न होतो. परंतु दु:खाची गोष्ट अशी की, मराठीत अशी प्रवासवर्णने फारशी नाहीत व जी आहेत ती बहुतेक एकाच प्रकारची म्हणजे पाश्चात्त्य देशांच्या वर्णनाची आहेत. त्यातही बालवाचकांकरिता एकही प्रवासवृत्त तयार झालेले नाही म्हटल्यास चालेल. ही उणीव भरून काढण्याकरिता हा प्रयत्न करण्यात आला आहे.’’
या ९० पानी पुस्तकात हकीगत आहे ती एक युरोपिअन प्रवासी आणि त्याचे काही मित्र/ सहकारी/ नातेवाईक यांनी केलेल्या आफ्रिकेतील विविध शिकारींची. प्रवाशाने स्वत: प्रथमपुरुषी एकवचनात लिहिलेली हकीगत या मर्यादित लक्षणाने ती आत्मकथा आहे; पण खरे म्हणजे ते वर्णन आहे शंभर वर्षांपूर्वीची आफ्रिकेची जंगले, त्यात युरोपिअन/अन्य शिकारी लोकांनी केलेल्या शिकारी, त्या करताना त्यांना दिसलेले प्राणी, त्यांनी तुडवलेली जंगले, पाण्याअभावी झालेले कष्ट, जीव बचावण्याचे प्रसंग, वन्य श्वापदांनी केलेले हल्ले अशा रोमांचकारी गोष्टींची वर्णने आहेत.
प्रस्तावनेत लिहिल्याप्रमाणे हे मूलत: मुलांकरिता लिहिलेले वर्णन आहे. त्यांना माहिती व्हावी, तीही कंटाळवाणी न होता रंजकपणे व्हावी या उद्देशाने हे पुस्तक लिहिले आहे. त्याची सुरुवातच ‘‘मुलांनो, आपल्या या महाराष्ट्रात प्राचीन काळी मनुष्यवस्ती फारशी नव्हती.. रामायणातील राक्षस व वान्नर यांची वर्णने तुम्ही वाचली असतील. त्यांचेच हल्ली वंशज म्हणजे भिल्ल, कोळी वगैरे लोक होत.’’ अशी केली आहे. पुढे ते लिहितात, ‘‘पृथ्वीच्या एका भागात आफ्रिका म्हणून देश आहे. तेथील लोकांना काफ्री अथवा काफीर म्हणतात. त्यांचा रंग काळामिट्ट, केस मेंढराच्या लोकरीप्रमाणे राठ व आखडलेले, ओठ बाहेर उलटलेले व मोठे व लठ्ठ, शरीरचना ओबडधोबड आणि बलिष्ठ अशी आहे.’’
पुढे अशाच शैलीत ते पायथॉन, उंट, पक्षी, पांढऱ्या मुंग्या यांची माहिती देतात. पाण्याअभावी कसे हाल झाले हे सांगताना ते लिहितात, ‘‘वाळवंटात रस्त्यामध्ये विसावा घेण्याकरिता काही खळगे पाडलेले असतात. त्यात थोडे खणले म्हणजे पाणी लागे. एकदा अतिशय तहान लागल्यामुळे एके जागी बरेच खणले. तेव्हा थोडेसे पाणी लागले, पण ते मोठे चमत्कारिक होते; परंतु त्यानंतर तीस मैलपर्यंत रस्ता चालून गेलो, परंतु पाण्याचा कोठे मागमूस लागला नाही.’’
वाटेत त्यांना दिसलेले प्राणी- शहामृग, जिराफ, हिप्पोपोटॅमस यांची चित्रमय वर्णने आहेत. त्यांनी केलेल्या विविध शिकारी, दोन श्वापदांच्या एकमेकांशी झटापटी, हत्ती व शिकारी यांची झटापट, सिंहानी केलेले हल्ले अशा अनेक घटनांची नाटय़मय वर्णने आहेत. त्या काळच्याच नाही तर आजच्या मुलांनाही ती मनोवेधक वाटतील.
लेखक स्वत: शिक्षक होते आणि तसे ते आडजागी रहात होते. त्यामुळे त्यांच्या भाषेचे स्वरूप मुलांना समजावून सांगण्याचे, वर्णन करण्याचे असे आहे. मात्र ते पूर्ण रूढ/छापील मराठी वळण नाही.
‘जॉन’- येथे जान होतो, (एक प्रकारचा कोळी) ‘‘आपल्या उद्योगात इतका गढून गेला होता व तो इतका कष्टिक होता की त्याचा तो उद्योग पाहून मी अगदी चकित झालो.’’ ‘‘ही संधी बरी आहे असे पाहून मी फेरगोळी झाडली.’’
मात्र (मूळ युरोपिअन) लेखकाने सरसकट स्थानिक लोकांना वाईट म्हटलेले नाही. (सुरुवातीच्या त्याने केलेल्या शारीरिक वैशिष्टय़ांचा उल्लेख वाचताना तशी कल्पना होऊ शकते.) ‘‘त्या लोकांनी या वेळेपर्यंत आमच्याशी जे सत्त्वशीलतेचे व सभ्यपणाचे आचरण केले होते, त्यामुळे त्यांच्या बोलण्यावर अविश्वास करण्याला आम्हाला काहीच कारण नव्हते.’’ (पृष्ठ ४६)
सुमारे शंभर वर्षांपूर्वीच्या मराठीत खूब (खूप), अझून (अजून) अशा पद्धतीचे शब्द येत, ते येथेही दिसतात. क्वचित इंग्रजीची छाप दिसते.
‘‘आम्ही बंदुकीचे वांझे बार काढले.’’(४८),
टोको म्हणाला, ‘‘तुम्ही एकटे शिकारीला जात जाऊ नका. त्यामुळे तुमचे एकंदरीत बरे होणार नाही.’’ (५२)
‘‘आमच्या चीत्कारांच्या उत्तरार्थ तेही गर्जना करू लागले व फारच चंचल झाले.’’ (६१)
‘‘तेथील नाना प्रकारची गिधाडे उडून येऊन त्या सिंहाची सद्गती करू लागली.’’ (६२)
यातल्या प्राण्यांच्या झटापटी व प्राण्यांनी शिकाऱ्यांवर केलेले हल्ले यांची वर्णने वाचताना आज सहजच आठवण होते ती अल्ल्रें’ ढ’ंल्ली३ या वाहिनीची. ही वाहिनी १९९६ साली सुरू झाली. २००८ साली ती फी’ं४ल्लूँ झाली तेव्हा त्याचे लक्ष्य २५-४९ या वयातील प्रेक्षक होते. भारतात ही वाहिनी १९९९ मध्ये आली. हिंदीमध्ये येण्यास २००८ साल उजाडले.
या पाश्र्वभूमीवर प्रस्तुत पुस्तकाचे मोल निश्चित जाणवते. खुद्द अमेरिकेतही अ‍ॅनिमल प्लॅनेट सुरू होण्याच्या पूर्वी पाऊणशे वर्षे तशाच प्रकारची माहिती बंगाली व मराठी भाषेत मुलांना उपलब्ध होत होती हे मराठी अस्मितेला निश्चितपणे सुखावह आहे. ब्रिटिश शासन भारतात पेशवाईच्या अस्तानंतर पूर्णपणे प्रस्थापित झाले. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस स्थानिक भाषेतून साम्राज्याला उपयुक्त ठरणारे शिक्षण देण्याचे प्रयत्न सुरू झाले, त्याचबरोबर परंपरागत पाठय़पुस्तके दूर करून अधिक माहितीपूर्ण पुस्तके अनुवादित करून घेण्याचाही प्रघात पडला.
१९२९ साली शिक्षक, व्यवसायाचे प्रशिक्षण घेणाऱ्या वि. आ. मोडक यांनी ‘भूगोलावरील काही विचित्र प्राणी’ हे १९३१ साली प्रसिद्ध केले. त्याला आचार्य अत्रे यांचा पुरस्कार आहे. त्यात उत्तर ध्रुव प्रदेश, सूचिपर्णी जंगलाचा प्रदेश, वाळवंटाचे प्रदेश, उष्ण कटिबंधातील घनदाट अरण्ये, द. आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, इतर बेटे व दक्षिण अमेरिका यांची भौगोलिक माहिती व प्राण्यांचे प्रकार, वैशिष्टय़े संवादरूपाने दिले आहेत. सोबतीला अनेक चित्रे आहेत.
सुमारे ऐंशी-शंभर वर्षांपूर्वी मुलांना सोप्या भाषेत ज्ञान देण्यासाठी केले गेलेले प्रयत्न
पाहता आजच्या मुलांनी काहीतरी गमावलंय असं वाटून जातं.

लेखक : शिकंदर लाल आतार.
शिक्षक सेंट्रल स्कूल, भिलवडी, जि. सातारा.
आवृत्ती पहिली १९२२.
प्रकाशक : स्वत: लेखक. मूल्य : ८ आणे.
तळटीप- १) याच शिकंदरलाल आतार यांचे ‘मुसलमान आणि मराठी भाषा’ हा निबंध (दहाव्या महाराष्ट्र साहित्य संमेलनात वाचलेला) प्रस्तुत पुस्तकाच्या आधी प्रसिद्ध झाला होता, असे पुस्तकाच्या अंतरंगात छापलेल्या जाहिरातीवरून समजते. २) सातारचे शेवटचे छत्रपती प्रतापसिंह भोसले यांनी काही पुस्तके लेखकाकडून लिहून घेऊन प्रसिद्ध केली होती. ‘आय-व्यय’ या विषयावरील एक ग्रंथ त्यांनी तयार करून घेतला होता, तो आतार यांनी भा.इ. संशोधन मंडळात ठेवला आहे. (मराठी गद्याचा इंग्रजी अवतार- म. म. द. वा. पोतदार- १९२२) यावरून लेखकाचा बहुआयामी प्रयत्न लक्षात येतो.

Ramzan 2024
रमजान: जगातील विविध धर्मीय उपवासाच्या परंपरा नक्की काय सांगतात?
Kennedy novel Marathi short stories Ram Kolarkaran editing magazines
कथावार्ता: कॅनडी नवलघुकथा..
rbi commemorative coins
पंतप्रधान मोदींच्या हस्ते ९० रुपयांचे नाणे लाँच, RBI ला ९० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल गिफ्ट
Percival Everett is an American writer American fiction cinema Oscar
बुकबातमी: भटकबहाद्दराची मिसिसिपी मुशाफिरीच, पण भिन्न नजरेतून..

मुकुं द वझे
vazemukund@yahoo.com