सर्वसामान्य वाचकांना असामान्य कर्तृत्व गाजवलेल्या व्यक्तींच्या जीवनाविषयी कुतूहल असते हे लक्षात घेऊन डॉ. नीला पांढरे यांनी ‘सहजीवनातील प्रकाशवाटा’ या पुस्तकाचे लेखन केले आहे. यात महाराष्ट्रातील अकरा दाम्पत्यांच्या जीवनसंघर्षांची कथा सुबोधरीत्या मांडली आहे. जोतिराव फुले आणि सावित्रीबाई, न्या. रानडे आणि रमाबाई, डॉ. आनंदीबाई आणि गोपाळराव जोशी, कवी ना. वा. टिळक आणि लक्ष्मीबाई, महर्षी धोंडो केशव कर्वे आणि बाया कर्वे, साधनाताई आणि बाबा आमटे, प्रभाकर पाध्ये आणि कमलताई, पु. ल. देशपांडे आणि सुनीताबाई, कवी नारायण सुर्वे आणि कृष्णाबाई, डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि शैलाताई, डॉ. जयंत नारळीकर आणि मंगलाताई या मान्यवर दाम्पत्यांचा या पुस्तकात समावेश आहे.
डॉ. नीला पांढरे यांनी ‘महाराष्ट्रातील स्त्री-सुधारक’ ही चरित्रमाला लिहिली असल्यामुळे त्यांचा त्यासंदर्भातील अभ्यास म. फुले आणि न्या. रानडे यांच्याविषयीच्या लेखांमध्ये पाहायला मिळतो. त्या दोघांचा तत्कालीन परिस्थितीशी चाललेला संघर्ष व त्याला त्यांच्या पत्नींकडून मिळालेली साथ यांचे चित्रण या लेखांमध्ये आलेले आहे. तथापि लेखिकेने एखाद् दुसऱ्या संदर्भसाधनाच्या आधारे इतर लेख लिहिले आहेत. त्यामुळे यातले बरेच लेख हे परिचित माहिती, तसेच संबंधितांच्या आत्मचरित्रातील प्रसंगांच्या मदतीने आकाराला आले आहेत. त्यात नवीन असे सखोल संशोधन आढळत नाही. आजच्या झटपट माहितीच्या युगाला हवी असलेली माहिती थोडक्यात देणारे संकलन असे स्वरूप या लेखनाचे आहे.
या पुस्तकात दिलेले संदर्भही परिपूर्ण नाहीत. लेखिकेची भाषाशैलीही वाचकाला बुचकळ्यात टाकणारी आहे. उदा. पुस्तकाच्या सुरुवातीलाच आलेले वाक्य असे आहे- ‘प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो.’ येथे वाक्प्रचारांना काही ठरावीक संदर्भक्षेत्रे असतात, हे लक्षात घेतलेले नाही. तसेच सुनीताबाईंविषयी त्या लिहितात, ‘‘बळी तो कान पिळी’ या न्यायाने त्या भाईंवर सत्ता गाजवत असत.’ लेखिकेची या विषयाबाबतची स्वत:ची अशी नेमकी भूमिका पुस्तकातून समोर यायला हवी होती. कमलताई पाध्ये त्याचप्रमाणे सुनीताबाई देशपांडे यांचे सहजीवन पारंपरिक ठशाचे नव्हते. त्याबाबतची लेखिकेची भाष्ये वरवरची वाटतात. उदा. लेखिकेला कमलताईंच्या ‘बंध-अनुबंध’मधून संसाराचं लोणचं मुरत कसं जातं याचा आलेख दिसतो. येथे लेखिका वैवाहिक जीवन आणि आधुनिक स्त्रीच्या अपेक्षा यांच्यातील गुंतागुंत झटकन् सोपी करून टाकते. डॉ. मंगलाताई नारळीकरांच्या स्वतंत्र लेखनकर्तृत्वाची तर लेखिकेने नोंदही घेतलेली नाही. एकंदरीत बदलत्या काळातील आव्हानांना फारसे महत्त्व न देता शीर्षकात सुचवल्यानुसार केवळ या व्यक्तिमत्त्वांच्या केवळ प्रेरणादायी अंगांवर भर देऊन केलेले हे लेखन आहे.
‘सहजीवनातील प्रकाशवाटा’-
डॉ. नीला पांढरे, उन्मेष प्रकाशन,
पृष्ठे- २३७, मूल्य- २५० रुपये.