25 August 2019

News Flash

ज्ञानकोश साकारताना..

ज्ञानकोशकार उपाधी ज्या प्रकल्पामुळे डॉ. केतकरांना लाभली, तो ज्ञानकोश तयार कसा झाला याची कहाणी.

mukund-vazeज्ञानकोशकार म्हणून उपाधी ज्या महाकाय प्रकल्पामुळे डॉ. केतकर यांना लाभली, तो ज्ञानकोश तयार कसा झाला याची ही सांगोपांग कहाणी आहे. आजच्या परिभाषेत त्याला ‘Making of Dnyankosh’ असे म्हणता येईल. १५ प्रकरणे आणि २० परिशिष्ट यातून ही कहाणी सांगितली आहे. ‘‘ज्ञानकोशासारखा मोठा ग्रंथ करू इच्छिणारा जो कोणी असेल, त्यास आपला अनुभव सांगावा अशी कल्पना मनात ठेवून हे पुस्तक लिहिले आहे. भावी ज्ञानकोशकारास जी जी माहिती उपयोगी पडेल ती ती सर्व एकत्रित करून यात घातली आहे. ज्ञानकोशाच्या पुनर्मुद्रणाचा प्रसंग २०-२५ वर्षांनंतर येईल त्या वेळेस माझा अनुभव सांगण्यासाठी मी असेनच याची खात्री नाही.’’ (प्रस्तावना)
मात्र, पुस्तकात केवळ ज्ञानकोश कसा घडला याची हकीगत नाही. त्यानिमित्ताने ज्ञानकोश मंडळावर झालेले आरोप, त्यांचे स्पष्टीकरण, मुस्लीम धर्मीयांचा ओढवलेला राग व डॉ. केतकरांनी कोणत्या भूमिकेतून छापील मजकूर वगळला याची साद्यंत हकीगत आहे. ‘प्रास्ताविक’ या प्रकरणात डॉ. केतकरांनी महाराष्ट्रात त्यापूर्वी (ज्ञानकोशापूर्वी) तयार झालेल्या मोठय़ा ग्रंथाचा आदरपूर्वक उल्लेख करून स्वत:कडे थोडासा कमीपणा घेतला आहे.
१८९७ साली एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिकाची प्रत पहिल्यांदा बघितल्यापासून प्रत्यक्ष ज्ञाननकोशाचे काम सुरू व्हायला (१-८-१९१५) जवळजवळ १८ वर्षांचा काळ लागला. अमेरिकेत पद्व्युत्तर शिक्षण घेत असताना मराठीत असा ग्रंथ असावा ही इच्छा बळावत गेली. अमेरिकन एन्सायक्लोपीडियाच्या मर्यादा लक्षात आल्या आणि मराठी ज्ञानकोशाच्या तयारीला प्रारंभ झाला, असे म्हणता येईल.
ज्ञानकोश म्हणजे केवळ माहिती छापणे असे नसून, कोणते विषय महत्त्वाचे, त्यावर काय लेखन झाले आहे, त्यातील विश्वासार्ह कुठले व उपयोगी कुठले याची तपासणी करून नोंदी करणे व त्यावरून टिपणे/लेख तयार करून घेणे ही प्रक्रिया पुस्तकात सविस्तरपणे वर्णन केली आहे. विविध विषयांवर लेख तयार करण्यासाठी अनेक स्रोतातून माहिती जमा करणे आवश्यक असते. त्यासाठी डॉक्टरसाहेबांनी मुंबईतील व्यापारी वर्ग (व्यापाऱ्यांच्या पद्धतींविषयी व वेगवेगळ्या मंडयांची माहिती देण्यासाठी), नृत्यभिज्ञ स्त्री-पुरुष (नृत्यासंबंधी माहिती गोळा करण्यासाठी) सर्व जातींच्या पुढाऱ्यांस (ज्ञातीविषयक माहिती देण्यासाठी) वाचनालयांना ग्रंथालय जोडण्यासाठी अशी पत्रके पाठवून लेखन व व्यावहारिक बाजूंची काळजी घेतली. ही पत्रके परिशिष्टात आहेत.
ज्ञानकोशाच्या प्रत्यक्ष लेखनप्रक्रियेची हकीगत सांगण्यापूर्वी विविध ज्ञानकोशात फरक कसा असतो व का असावा त्याचे विवेचन डॉ. केतकर करतात.
‘‘शास्त्रे, धंदे, कला या गोष्टी सर्वसामान्य आहेत. प्रत्येक ग्रंथात आपल्या राष्ट्रातील अपेक्षांप्रमाणे मजकूर द्यावा लागतो. जो भाग आपणास (भारतीयास/महाराष्ट्रीयास) अनावश्यक आहे तो ब्रिटानिकात घेतला नसता तर ब्रिटानिका ग्रंथ इंग्रज राष्ट्रास त्याज्य झाला असता. उदा. ख्रिस्ती संप्रदायाच्या इतिहासावर एकंदर सुमारे ८०० पृष्ठे लागली असतील असा अदमास आहे. आपणास ख्रिस्ती वाङ्मय व संप्रदायाचा इतिहास यावर सुमारे ४० पृष्ठे इतका मजकूर बस्स आहे.’’ (१०७-१०९)
याच अनुषंगाने ज्ञानकोशाच्या भूमिकेबद्दल आणि त्याच्या निर्मितीसंबंधीच्या अडचणींचा ते उल्लेख करतात. ‘‘महाराष्ट्रीय ज्ञानकोश म्हणजे पूर्वपरंपरागत ज्ञान आणि भविष्यकालीन स्थिती यांना जोडणारा दुवा होय. आज पुष्कळ संस्कृत ग्रंथातील अर्थाचे ज्ञान इंग्रजी पुस्तकावरून घ्यावे लागते. त्यामुळे परावलंबित्व निर्माण होते. (११३)
ज्ञानकोशाच्या अनन्यसाधारण महत्त्वाबद्दल व स्वत:च्या लेखनाबद्दल त्यांना प्रचंड आत्मविश्वास होता. ‘‘ज्ञानकोश मंडळात नवीन वैदिक संशोधन प्रसिद्ध झाले आहे. ते जगातील अत्यंत मोठय़ा वेदांच्या अभ्यासकांच्या सबंध आयुष्यातील कामाइतके मोठे ठरेल. मी जे लिहिले आहे त्याचे खरे महत्त्व, जो समाजशास्त्र आणि वैदिक संशोधन यामध्ये आजतागायत आहे त्यासच पटेल. पण त्याच्या दृष्टीने ते आजच पडणे शक्य नाही व महाराष्ट्रीय वाचकास त्यांचे महत्त्वही पटणार नाही.’’ (१५३-१५५) तरीही हे काम त्यांनी स्वान्तसुखाय केले. (१५४)
ज्ञानकोशासाठी पब्लिक लिमिटेड कंपनी १०० वर्षांपूर्वी काढणे हे एक नवल होते. ते करण्यामागची कारणे, कंपनीची आर्थिक बाजू, वर्गणीदार व शेअरहोल्डर कसे जमविले, देणग्या का घेतल्या नाहीत, याची सविस्तर माहिती पहिल्या काही प्रकरणात येते. ज्ञाानकोश कशा प्रकारे केला जाईल, कोणत्या विषयांवर किती पृष्ठे लिहिली जातील, ती लिहिणारे लेखक कोण व एकंदर लेखनपद्धती काय असेल यासंबंधीचे विस्तृत निवेदन विद्वान मंडळींपुढे ठेवावे असा निर्णय संचालक मंडळींनी मार्च १९१७ अखेर घेतला व ते निवेदन प्रसिद्ध केले. परिशिष्ट नं. १ मध्ये ते दिले आहे, त्यातील जे सूक्ष्म तपशील (Micro Details) आहेत ते बघितले की नियोजनाच्या खोलीने चकित व्हायला होते.
ज्ञानकोशातील लेखनामागे किती परिश्रम असत त्याचे एक उदाहरण नमद करण्यासारखे आहे. ‘‘वेदवाङ्मयाचा अभ्यास आम्हाला फार बारकाईने करावा लागला. हा सूक्ष्म पृथक्करणात्मक अभ्यास दहा एक विद्वान तीन वर्षांपावेतो माझ्या देखरेखीखाली करीत होते. आम्ही ऋग्वेदातील प्रत्येक पद तपासून त्याचे वर्गीकरण केले आहे. ऋ ग्वेदाच्या मंत्रभागात प्रतििबबित झालेल्या यज्ञक्रियेचा क्रमाने झालेला विकास आम्ही बारकाईने तपासला. हा विकास होत होत त्यातून श्रौतसुतात दिसून येणारा धर्म कसा उदयास आला त्याचे धागे आम्ही लावले आहेत.’’ (पृष्ठ १३९)
‘‘दुसऱ्या भागातील मजकूर अनेक संहितांचे सूक्ष्म पृथक्करण करून लिहिला आहे. परिशिष्ट ४/५ मध्ये हौत्रवेत्ते दातार यांचे टांचण आले आहे. ते टांचण एका पृष्ठात छापता येते खरे, पण ते करण्यास दीड महिन्याचा अवधि गेला.’’ (१५०)
ज्ञानकोश हे अर्थातच एका व्यक्तीचे काम नव्हते. त्यासाठी आणि त्यातल्या विविध अंगांसाठी-संपादकीय-संशोधन-व्यवस्थापन यासाठी डॉक्टरांना अत्यंत समर्थ, मेहनती व तळमळीने काम करणारे सहकारी लाभले. त्यांचा सविस्तर व मनापासून कृतज्ञतेने उल्लेख १३ व्या प्रकरणात त्यांनी केला आहे. उपसंहार या शेवटच्या प्रकरणत डॉक्टरांनी ज्ञानकोशाची व्यावहारिक बाजू समजावून सांगितली आहे. त्यातले विधान ज्ञानकोशाच्या आर्थिक व्यवहाराचे वेगळेपण दाखविते.
‘‘सामान्यत: या कामाला अनेक संपादक व कारकून यांनी एकत्र येऊन चालविलेल्या कामाचे स्वरूप आलेले आहे. भांडवलवाल्यांना काहीच डिव्हिडंड मिळाले नसल्याने एखाद्या सोशॉलिस्ट कंपनीचे स्वरूप आले असे म्हणण्यास हकरत नाही.’’ (पृष्ठ १८६)
काहीशी किरकोळ वाटेल, पण गर्भित अर्थ असलेली माहिती- ज्ञानकोशाची गिऱ्हाईके वेगवेगळ्या वर्गातून मिळाली. २/३ ब्राह्मण वर्गातली होती. ५००(सुमारे) संस्थानातून, मराठे व तत्सम जातीतील २५०, कायस्थ व पाठारे प्रभू मिळून ६० पारशी, मुस्लीम दहा.
या पुस्तकातला कदाचित सर्वात उद्बोधक भाग म्हणता येईल तो परिशिष्टात आहे. ‘ज्ञानकोशाचा इतिहास’ असं नाव दिलेले असले तरी परिशिष्टात तीन अभिप्राय-अर्थात ज्ञानकोश प्रकाशित झाल्यानंतरच दिलेले आहेत. एक डॉ. धनंजयराव गाडगीळ यांचा, दुसरा द. के. केळकर आणि तिसरा प्रा. स. बा. हुदलीकर यांचा. अनुक्रमे आर्थिक इतिहास, मराठी काव्य आणि जर्मन शब्दांचे उच्चार यासंबंधीच्या मजकुरांच्या (ज्ञानकोशातील) संदर्भात तीनही अभिप्राय टीका करणारे/ज्ञानकोशाच्या मर्यादा दाखविणारे आहेत. डॉ. गाडगीळांनी स्वतंत्र हिंदी अर्थशास्त्र निर्माण व्हायला हवे आणि सामाजिक रचनेमुळे आर्थिक प्रगती होत नाही, या ज्ञानकोशातील प्रतिपादनाचा प्रतिवाद केला आहे. केळकरांनी डॉ. केतकर यांच्या ‘‘आजपर्यंत झालेले मराठी वाङ्मय या दृष्टीने काही नुकसान होणार नाही’’ या मताचा खरपूस समाचार घेतला आहे. हुदलीकरांनी ज्ञानकोशातल्या जर्मन शब्दांच्या उच्चारातील चुका दाखविल्या आहेत, तर त्याचा प्रतिवाद डॉ. केतकरांनी केला आहे. तो करताना ते म्हणतात- ‘‘लिहिण्याचा मुख्य उपयोग वाचकास ते समजणे हा होय, आणि त्या दृष्टीने आम्हाला आंग्लानुसारी शब्दयोजना करावी लागली.’’
ही परिशिष्टे वाचणे हा बौद्धिक आनंद तर आहेच, पण त्याचबरोबर त्यातून डॉ. केतकरांची खरी कळकळ-मते व मतांतरे व्हावीत. उद्बोधन व्हावे-स्पष्ट होते. आज डॉ. केतकरांचा ज्ञानकोश आपल्याला १०० वर्षांनंतर कदाचित कलाबाह्य़ वाटेल (आपण तो वाचला तर), पण त्याचा इतिहास मात्र भविष्यातही लागू पडेल.
‘माझे बारा वर्षांचे काम ऊर्फ ज्ञानकोश मंडळाचा इतिहास’
लेखक व प्रकाशक : डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर,
प्रकाशन : १९२७,
मूल्य- दीड रुपया.
मुकुंद वझे

First Published on September 27, 2015 1:01 am

Web Title: review of old marathi books