X
X

वासुदेवशास्त्री खरे यांचे वाङ्मयीन कर्तृत्व

वासुदेवशास्त्री खरे यांचे नाव आजच्या पिढीतल्या वाचकांना माहीत असण्याची शक्यता फार कमी आहे.

वासुदेवशास्त्री खरे यांचे नाव आजच्या पिढीतल्या वाचकांना माहीत असण्याची शक्यता फार कमी आहे. नाटकांत रस असणाऱ्या जुन्या रसिकांना ‘शिवसंभव’ नावाचे नाटक आणि त्या नावाने त्याकाळी लोकप्रिय झालेली साडी (सुमारे पन्नास-साठ वर्षांपूर्वी!) लक्षात असेल. अर्थात् शास्त्रीबुवांचे कर्तृत्व त्यापेक्षा कितीतरी अधिक होते.

वासुदेवशास्त्री खरे हे लोकमान्य टिळकांचे समकालीन (१८५८- १९२४). त्यांचे हे चरित्र १९२६ साली मिरज विद्यार्थी संघाने भरवलेल्या स्पध्रेत निबंधरूपाने लिहिले गेले होते. साहित्यसम्राट न. च्िंा. केळकरांसारख्यांनी त्यावर अनुकूल अभिप्राय दिल्याने लेखकाने पुढे ते पुस्तकरूपाने प्रसिद्ध केले. शीर्षकात म्हटल्याप्रमाणे पूर्वार्धात वासुदेवशास्त्री यांचे चरित्र आणि उत्तरार्धात त्यांच्या ग्रंथांचा परिचय असे या पुस्तकाचे स्वरूप आहे. या पुस्तकाच्या प्रकाशनार्थ जमखिंडी, इचलकरंजी आणि रामदुर्गच्या संस्थानिकांनी तसेच अनेक सधन गृहस्थांनी आर्थिक मदत दिली होती.

पूर्वार्धात वासुदेवशास्त्री खरे यांचा जन्म, शिक्षण, सातारा व पुणे येथील अध्ययन, मिरज येथे केलेली शिक्षकाची नोकरी, काव्यनिर्मिती, संशोधनकार्य, नाटय़लेखन, घरगुती गोष्टी, कौटुंबिक माहिती व अखेरचा आजार आणि मृत्यू अशी पठडीतील मांडणी आहे. यात दोन गोष्टी थोडय़ा वेगळ्या व अधिकच्या आहेत. लेखकाने खरे यांच्या जन्मगावाची- गुहागरची तपशीलवार माहिती दिली आहे. त्यात एका तळटीपेत ते लिहितात- ‘‘बुद्धी या अर्थी गुहा शब्दाचा उपयोग होतो.’’ (‘शब्दकल्पद्रुम’- खंड पहिला, पृष्ठ- ३४६) तेव्हा गुहागर म्हणजे बुद्धीचे (बुद्धिवंतांचे ) आगर असे ते सुचवितात.

वासुदेवशास्त्री खरे यांचे कार्य नक्की कसे होते, याविषयी त्यांची ग्रंथसंपदा बरंच काही सांगते. १) ‘समुद्र’ (१८८४) व ‘यशवंतराय’ (१८८८) ही अनुक्रमे १३२ व १७२६ श्लोककाव्ये. २) ‘गुणोत्कर्ष’, ‘तारामंडळ’, ‘चित्रवंचना’, ‘कृष्णकांचन’, ‘शिवसंभव’ आणि ‘उग्रमंगल’ ही सहा नाटके. या नाटकांचे लेखन अनुक्रमे (१८८५, १९०४ पूर्वी, १९१६ पूर्वी व १९१७ सालातले), ३) ‘नाना फडणवीसांचे चरित्र’ (१८९२), ४) ‘अधिकारयोग अथवा नानांस फडणवीशी अधिकार कसा मिळाला?’ (१९०८), ५) ‘हरिवंशाची बखर’ (१९०९). मूळ लेखन- बा. ह. पटवर्धन. शास्त्रीबोवांनी त्याचे संपादन व टिपा लिहिल्या, ६) ‘इचलकरंजी संस्थानाचा इतिहास’, ७) ‘प्रोफेसर लठ्ठे आणि छत्री’- टीकात्मक लेखमाला (१९१४), ८) ‘ग्रँट डफच्या चुकांचे हप्ते’ (१९१५-१६), ९) ‘चालू भाषेतील ऐतिहासिक शब्द’ (१९१८)- भा. इ. सं. मंडळातील निबंध, १०) ‘मराठे व इंग्रज’ या गं्रथाचा उपोद्घात (१९१८), ११) ‘मालोजी व शहाजी’ (१९२०) ऐतिहासिक लेखसंग्रह- भाग १ ते १२. शास्त्रीबोवांचे हे काम जवळजवळ तीस वर्षे चालले होते. नाना फडणवीसांचे चरित्र लिहिताना शास्त्रीबोवांच्या हाती ‘मळे’ संस्थानची कागदपत्रे लागली. त्यात पत्रव्यवहाराचे तब्बल ३०० गठ्ठे होते. त्यातली सर्व पत्रे वाचणे, साक्षेपाने निवडणे, तपासून बघणे, मोडी लिपीत त्यांच्या नकला करून घेणे आणि त्यासाठी पदरमोड करणे व नंतर ती पत्रे छापणे असा या कामाचा क्रम पाहिला की त्यांच्या अभ्यास आणि कष्टांची कल्पना आपणास थक्क करते. त्या लेखांसंबंधी एका मार्मिक लेखकाने म्हटले आहे- ‘‘शास्त्रीबोवांनी वाचलेल्या व त्यांनी छापलेल्या पत्रांचे प्रमाण पाचशेस एक असे पडते.’’

इतिहास संशोधक राजवाडे यांनी खरे यांच्याजवळ तीस हजार निवडक लेख असल्याचा एके ठिकाणी उल्लेख केला आहे. (पृष्ठ- १०३.)

वासुदेवशास्त्री खरे आणि त्यांच्या पिढीच्या कार्यनिष्ठेचे स्वरूप समजण्यास उपरोक्त दोन विधाने पुरेशी आहेत. या चरित्राचा महत्त्वाचा भाग म्हणजे वासुदेवशास्त्री यांच्या ललित कलाकृतींचा परिचय. ‘यशवंतराय’ या दीर्घकाव्यावर एक दीर्घलेख (२७ पृष्ठे) आहे. त्यात काव्याची पाश्र्वभूमी, कथानक, काही निवडक भाग अशा विविध पैलूंचा समावेश आहे. त्यांच्या नाटकांची कथानके आहेत. खरे यांच्या साहित्याचा परिचय करून घेण्याच्या दृष्टीने हा उपयुक्त भाग आहे. ऐतिहासिक लेखसंग्रहाच्या बारा भागांत कोणत्या विषयांवरचे लेख आहेत याची सूची आहे. वासुदेवशास्त्री व लोकमान्य टिळक यांच्या स्नेहासंबंधी एक छोटेखानी लेख आहे. त्यात खरे यांना टिळकांविषयी वाटणारा आदर व त्याचे त्यांच्या नाटकात पडणारे प्रतिबिंब विशद केले आहे.

ग्रंथाची अर्पणपत्रिका संस्कृतमध्ये आहे. एका थोर इतिहास संशोधकाचा परिचय करून घेण्यास अत्यंत आवश्यक असे हे पुस्तक आहे.

प्रसिद्ध इतिहास संशोधक गुरुवर्य वासुदेव वामनशास्त्री खरे- चरित्र आणि ग्रंथपरिचय (पूर्वार्ध व उत्तरार्ध), लेखक व प्रकाशक- दामोदर मोरेश्वर भट, मूल्य-२ रुपये. प्रकाशन वर्ष- १९२९.

– मुकुं द वझे

vazemukund@yahoo.com

21
Just Now!
X