‘श्शी. कसले वेडय़ासारखे गरम होतेय. रखरखाट नुसता. कधी एकदाचा संपतोय हा उन्हाळा असं होतंय.’ चिरंजीवांचा होणारा हा वैताग तीर्थरूप अगदी शांतपणे ऐकत होते. ‘काय हो बाबा. गरम होत नाहीये का. तुम्हाला पाहून तर असं वाटतंय की हा रणरणता उन्हाळा फक्त आमच्यासाठी आहे. तुमच्यापर्यंत तर पोहोचतच नाहीये.’ बाबा हसले आणि म्हणाले, ‘अरे आता हिवाळ्यात  थंडी वाजली नाही तर तुम्ही हिवाळ्याला नावं ठेवता पावसाळ्यात पाऊस पडला नाही तर पावसाळ्याला नावं ठेवता पण उन्हाळ्यात मात्र गरम न होण्याची अपेक्षा करता. आता सांग यात चूक कोणाची.’ बाजूला बसलेली आई सारं काही  समजल्यासारखं छद्मी हसत होती. ‘आता लगेच मी लेक्चर देत असल्यासारखी वेडीवाकडी तोंडं करू नका चिरंजीव. अं. बरं. चल आज तुला एक मी वाचलेली लवस्टोरी सांगतो. उन्हाळ्यातील प्रेमकथा’
म्हटलं तर बऱ्याच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे ही. उन्हाळ्याने नुकताच आपला जोर आजमावण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे दिवस उजाडल्यावेळचा थोडासा गारवा सोडता नंतर व्यवस्थित उन्हं पडायला सुरुवात व्हायची. या गोष्टीतील नायक आणि नायिका अंदाजे एकमेकांसमोरच रहायचे. त्या दिवशी सुट्टीचा वार होता. त्यामुळे सगळे तसे रेंगाळतच चालले होते. नायक गॅलरीत उभा होता. उन चांगलेच जोर धरत होते. नायक घरात जायला निघणार तेवढय़ात त्याची नजर समोर गेली. समोर नायिका आपले ओले केस पुसत होती. उन्हाची एक तिरप तिच्या काळ्योभोर केसांवर पडत होती त्यामुळे सोनं लकाकल्यासारखे तिचे ते केस लकाकत होते. चेहऱ्यावर येणाऱ्या त्या सोनेरी किरणांमुळे तिचा संपूर्ण चेहरा उजळत होता. डोळे अगदी नितळ पाण्यासारखे पारदर्शक होते. नायक कितीतरी वेळ तिलाच निरखत तिथेच होता. आपल्याकडे कोणीतरी टक लावून पाहतंय हे कळल्यावर नायिका एकदम भानावर आली. आसपास पाहिल्यावर तिला नायक आपल्याकडे टक लावून पाहत असल्याचे कळले. लगबगीने ती घरात निघून गेली. तुमचं काय ते ‘लव्ह अ‍ॅट फर्स्ट साईट’ची लागणच त्यावेळी नायकाला होते. संपूर्ण दिवसभर नायिकेचा चेहरा नायकाच्या डोळ्यांसमोर फिरत होता. पण त्यानंतर पुन्हा ती काही दिसली नाही. सकाळी कामावर जाताना नायक नित्यनेमाने तिच्या घराकडे अगदी निरखून पाही. पण ती मात्र त्याला काही दिसत नव्हती. अशात काही दिवस गेले. आणि एकदा अचानकच ती त्याला दिसली. उन असल्यामुळे  ती छत्री घेऊन जात होती. नायकाने ठरवले की आज काही केल्या तिच्याशी बोलायचेच. ही संधी वाया जाऊ द्यायची नाही. काहीतरी कारणाने बोलणे सुरू करूया म्हणू तो तिच्या समोर जातो पण तिला पाहताच तो ‘अहो मला जरा पाणी मिळेल का. मी तुमच्या समोरच्याच घरात राहतो. तुम्ही ओळखीच्या वाटलात इथे म्हणून तुम्हाला विचारले.’ असं काहीतरी एका दमात बरळला. मनातल्या मनात स्वत:ला शिव्या घालत. इतकं रद्दड कारण शोधल्याबद्दल. नायिकेने मात्र शांतपणे त्याला पाणी दिले. या एका घटनेचे रूपांतर हळूहळू मैत्रीत झाले. नायकाचा ऑफिसला जाण्याचा रस्ता अचानक तिच्या कॉलेजला जाण्याच्या रस्त्यावरून जायला लागला.
एक दिवस दोघेही ‘अचानकच’ एकमेकांना रस्त्यावर भेटले. रोजच्यासारखे. बोलायला काहीतरी विषय काढायचा म्हणून नायकाने सुरुवात केली. ‘किती हे ऊन. वैताग आलाय या ऊन्हाचा. कधी एकदा संपतोय हा उन्हाळा असं झालंय. नाही का.’ नायिकेकडून सकारात्मक प्रतिक्रियेची वाट पहात नायकाने तिच्याकडे पाहिले. नायिका हसली आणि म्हणाली ‘काय हो. हिवाळ्यात थंडी वाजली नाही तर तुम्ही हिवाळ्याला नावं ठेवता पावसाळ्यात पाऊस पडला नाही तर पावसाळ्याला नावं ठेवता पण उन्हाळ्यात मात्र गरम न होण्याची अपेक्षा करता.’ हे अनपेक्षित उत्तर ऐकून नायकाने तिच्याकडे काहीसे अवाक्  होऊन पाहिले. ‘आपण सगळे ना उन्हाळ्याला अगदी वाळीत टाकल्यासारखे वागवतो. पण हे विसरतो की ऋतुराज वसंत आपली किमया याच उन्हाळ्यात साध्य करतो. आपण जर रस्त्यावरून चालताना ऊन्हाला दोष देण्यापेक्षा आसपासच्या निसर्गावर एक नजर फिरवली तर आपसूकच प्रवास सुखद होईल.’ नायकाने हळूच सभोवताली नजर फिरवली अन् त्याला जाणवले की खरंच आजूबाजूची झाडं लाल पिवळ्या पांढऱ्या फुलांनी बहरली आहेत. नाविन्याचे प्रतीक असलेली ती पालवी झाडांवर अगदी दिमाखाने पसरली आहे. वेगवेगळ्या पक्ष्यांची किलबिल कानी पडत आहे. ‘अरे हो खरंच की. माझ्या तर हे    कधी लक्षातच आले नाही.’ ‘तुम्ही बर्फाचा गोळा खाणार.’ एवढे विचारून नायिका त्या गोळेवाल्यापाशी पोहोचलीसुद्धा. गोळ्याचा एक चुटका घेतल्यानंतर थंड वाऱ्याची झुळूक स्पर्शून गेल्यासारखे वाटत होते. ‘काही पदार्थ एक्सक्लुजिवली उन्हाळ्यातच  खायला मजा येते. गोळा आइसकॅडी थंडगार आंबटगोड पन्हं कोकमी रंगाचे गर्द कोकमी सरबत आवळे चिंचा करवंदं अख्ख्या घरभर घुमणाऱ्या वासाचा फणस.’ ती अगदी गुंगून गेली होती. तो मात्र गोळा  खाऊन लालचुटूक झालेल्या ओठांकडे पाहण्यात रममाण झालेला.. अन् एकदम आठवून ती म्हणाली, ‘आंबा. या उन्हाळ्याचीच तर देणगी आहे तो. आमराईची ती गर्द सावली आणि आंब्याला येणारा तो अवर्णनीय सुगंध. दोघांनाही आपल्यात साठवून ठेवावेसे वाटते.’ घरं आता जवळ येत होती. दोघांचीही चलबिचल वाढली होती. ‘कमालच वाटतेय मला. आता येताना फारसे गरम झालेच नाही मला.’ नायक नवल वाटून बोलला. ‘कारण तुम्हाला ऊन जाणवले नाही. ऊन लागले असेल. पण तुम्ही ते स्वत:ला जाणवूच दिले नाही. संकटांचे सुद्धा असेच असते की. त्यांचा बाऊ केला तर ती आपल्याला कमजोर बनवतात याउलट त्यांचा सामना केला तर आपणच अधिक बळकट होतो. निसर्ग आपल्याला त्याच्या प्रत्येक कृतीतून काहीनाकाही शिकवतच असतो. बघा ना. वर्षभर एकच एक वातावरण असते तर आपले आयुष्य पण किती एकसुरी झाले असते ना. उन्हाळा आहे म्हणूनच तर आपल्याला त्यानंतर येणाऱ्या पावसाची किंमत कळते. बापरे. किती बोलले मी. आपण निघायला हवं.’ दिवस मावळतीला झुकत होता. दिवसाचा लख्ख प्रकाश परतीच्या वाटेला निघाला होता. मात्र त्याची आभा सोडून. उन्हाळ्यातली संध्याकाळ काहीशी जादूई असते. मधेच वाऱ्याची एक शांत झुळूक आणणारी तर मधेच उबदारपणाची दुलई चढवणारी. सांगावे की न सांगावे या संभ्रमात पडलेल्या नायकाला समोरच लाल फुलांनी बहरलेले बहावाचे झाड दिसते. त्यातले एक टपोरे फूल उचलून ते तो तिला देतो. खूप हिंमत करून. हळूच  ते नाजूक फूल तिच्या हातात जाऊन विसावते.
अशा रीतीने ऊन्हाळ्याचा तो एक दिवस त्या दोघांच्या आयुष्यातला एक गुलाबी दिवस बनतो.
‘वाह बाबा. काय फिल्मी ए ही स्टोरी. कुठे वाचलीत तुम्ही.’ ‘तुझ्या आईच्या डायरीमध्ये. मी दिलेले बहावाचे फूल ठेवलेल्या पानावर.’

water bodies, Tadoba,
ताडोबातील वाघांना आवडे नैसर्गिक पाणवठे, रखरखत्या उन्हापासून बचावासाठी….
Breakfast Recipe
Breakfast Recipe : उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवण्यासाठी बनवा मुगडाळीचा पौष्टिक नाश्ता, जाणून घ्या ही हटके रेसिपी
5 Indian fruits that keep you hydrated during summer
शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी होईल मदत; उन्हाळ्यात करा ‘या’ ५ फळांचं सेवन
Makeup tips for people with oily skin during summer
Summer Makeup Tips: उन्हाळ्यात मेकअप कसा करावा? असा करा स्वेट प्रूफ मेकअप