vn77एखाद्या शब्दाच्या नेमक्या उच्चाराबाबत मनात अनेकदा गोंधळ होतो. कॉलेज प्रेझेंटेशनमध्ये, इंटरव्ह्य़ूमध्ये किंवा हायफाय पार्टीमध्ये इंग्रजी किंवा इतर परकीय शब्दांचा उच्चार चुकीचा केला की, इम्प्रेशन एकदम डाऊन. कुठल्या शब्दाचा उच्चार, कुठल्या ठिकाणी, कसा करावा यासाठीच हा कॉलम..

शीर्षक वाचून तुम्हाला नक्की प्रश्न पडला असेल की हा असा काही शब्द अस्तित्वात आहे? तर याबाबतीत असं म्हणता येईल की भाषेचा वापर नेहमी दोन अंगांनी होतो. एक तर तिचं साधं बोलीभाषेतलं रूप आणि दुसरं थोडंसं अलंकृत रूप. उदाहरणच घ्यायचं झालं तर ती हसली हे साधं सरळ वाक्य, पण तिने स्मित केलं किंवा दंतपंक्तींची कवाडं खुली केली हे थोडं अलंकारिक रूप. जसं हे मराठी भाषेत आहे, तशीच अन्य भाषांतही ही रूपं दिसून येतात. त्यात टेय्टटेट् हा शब्दप्रयोग खास ठेवणीतला म्हणता येईल. खरं तर हा शब्द देवनागरीत टेय्टअटेट् असा लिहिता येईल.
Tete-a-tete  असं त्याचं मूळ इंग्रजी रूप अनेकदा गॉसिप मॅगझिन्स वाचताना आपल्या नजरेखालून गेलेलं असतं. पण अर्थ पार डोक्यावरून जातो. त्या त्या भाषेतली खास गुपितं आपल्याला नेहमीच कशी बरं माहीत असणार? उद्या मराठीत कुणी म्हटलं की माझ्या तर बाई नाकी नऊ आले! इंग्रजीत बाई व नाकी नऊ येणेचा शब्दश: अर्थ घेता येणार नाही. तसंच या ‘टेय्टअटेट्’चं आहे. हा मूळचा फ्रेंच शब्द. त्याचा एक अर्थ अगदी छोटासा सोफा. लहानशा अशा या सोफ्यावर जर दोन माणसं बसून बोलत असतील तर काय होणार? डोक्याला डोकं भिडणार.  head to head संवाद होणार. हाच या शब्दाचा अर्थ. अगदी खास, अगदी सिक्रेट असा दोन व्यक्तीतील संवाद. आपण म्हणतो ना की त्याचं काय गुर्टऽऽगू चाललं होतं. देव जाणे किंवा ती बराच वेळ तिच्या कानाला लागली होती. अगदी दोघांचंच काही तरी खास बोलणं म्हणजे टेय्टअटेट् हा शब्दप्रयोग रोजच्या वापरातला नाही. बऱ्याचदा इंग्रजी मॅगझिन्स वा बातम्या वाचताना आपला व या शब्दाचा संबंध येतो. अगदी सरधोपटपणे उच्चारायचं म्हटलं तर टेटे अ टे टे असा उच्चार वाटतो. पण यातल्या पहिल्या tete चा उच्चार टेय्ट तर दुसऱ्या tete चा उच्चार टेट असा काहीसा आहे. यातल्या ‘य’ आणि ‘ट’ चा पाय मोडला आहे, कारण ते तोंडी लावण्यापुरतेच उच्चारायचे आहेत.
Tete-a-tete  शब्दाचा विचार करता एका ठिकाणी २ शेपचा सोफा जिथे समोरासमोर बसून दोन व्यक्तींमधला संवाद होतो असा अर्थ आहे तर लॅटिन भाषेत tete म्हणजे skull. कवटी. हे जरी सत्य असलं तरी tete-a-tete ¸हणजे head to head conversation अर्थात दोन व्यक्तींमधला खासम खास संवाद हे मात्र नक्की! It so happened that their tete-a-tete was a earshot. . असा काहीसा या शब्दाचा प्रयोग होतो. रोजच्या बोलण्यात या शब्दाचा वापर करणारी मंडळी कमी असली तरी यापुढे एखाद्या पार्टीत वा गप्पांत या शब्दाचा उच्चार होईल तेव्हा तो किमान डोक्यावरून तरी जाणार नाही. या सदराच्या माध्यमातून आपलाही एक प्रकारे संवादच होत असतो. पण त्यापलीकडे काही शब्द सुचवण्याकरिता अथवा प्रतिक्रिया देण्याकरिता ईमेलच्या माध्यमातून आपल्यातही टेय्टअटेट् होऊ शकतं की नाही?
 रश्मी वारंग  viva.loksatta@gmail.com