शास्त्रीय संगीताची उत्तम दीक्षा आणि सुगम व लोकसंगीत यांचा अभ्यास या मिलाफातून तयार झालेला एक अत्यंत श्रवणीय आवाज म्हणजे जयपूर अत्रौली घराण्याच्या गायिका आरती अंकलीकर-टिकेकर! आग्रा ग्वाल्हेर घराण्याच्या पं. वसंतराव कुलकर्णी यांच्याकडे शास्त्रीय गायनाचे धडे गिरवणाऱ्या आरती अंकलीकर-टिकेकर यांना त्यानंतर जयपूर अत्रौली घराण्याच्या गानसरस्वती किशोरी आमोणकर या गुरुस्थानी लाभल्या. पं. दिनकर कैकिणी, पं. उल्हास कशाळकर या सगळ्यांकडूनच गायकीतील बारीकसारीक क्लृप्त्या शिकून घेतलेल्या आरती अंकलीकर-टिकेकर यांच्या आवाजात एक वेगळाच खुमार आहे. ‘उगवली शुक्राची चांदणी’ या ‘दे धक्का’ चित्रपटातील बहारदार लावणीमुळे हा आवाज शास्त्रीय संगीत न ऐकणाऱ्यांच्याही कानाकानांत घर करून बसला.
पण शास्त्रीय संगीताची तालीम आणि सुगम संगीताचा रियाज या दोन्ही गोष्टी त्यांनी कशा साध्य केल्या, गजल-ठुमरी या उपशास्त्रीय संगीत प्रकारांमध्ये त्यांनी कसे प्राविण्य मिळवले, ‘सरदारी बेगम’बद्दलच्या त्यांच्या आठवणी, संगीताबद्दलचे त्यांचे मत या सगळ्याबद्दलच जाणून घेता येईल व्हिवा लाऊंजच्या गप्पांमधून..
तारीख : १८ फेब्रुवारी २०१३
वेळ : दुपारी ३ वाजून ३० मिनिटे
स्थळ : पु.ल. देशपांडे मिनी थिएटर, प्रभादेवी  
प्रवेश सर्वासाठी खुला आहे.