|| प्रियांका वाघुले

‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतून घराघरांतील बायको आणि सासूला पुरेपूर राग येईल अशी आपली नकारात्मक भूमिका अप्रतिम वठवणारा अभिनेता म्हणजे अभिजीत खांडकेकर. चॉकलेट बॉय म्हणून प्रसिद्ध असलेला अभिजीत पहिल्यांदाच या मालिके तून खलनायकी छटा असलेली भूमिका रंगवतो आहे आणि त्याला प्रेक्षकांकडून दादही मिळते आहे. मात्र अशी नकारात्मक भूमिका साकारताना कलाकारांच्या मनावर निश्चितच परिणाम होतात आणि ते होऊ नयेत यासाठी फिटनेस महत्त्वाची भूमिका बजावतो, असं अभिजीत सांगतो.

आपल्या नकारात्मक भूमिकेचा स्वत:वर कधीच परिणाम न होऊ  देणे हे फिट राहण्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असल्याचे अभिजीत सांगतो. एक कलाकार म्हणून आपण काम करत असताना आपण दोन व्यक्तींचे जीवन जगत असतो, असं तो म्हणतो. घरी आपण स्वत: वेगवेगळ्या भूमिकांतून, विचारांनी जगत असतो, तर सेटवर काम करताना तेही जर डेली सोप असेल तर दररोज आपण साकारत असलेल्या पात्रात शिरून त्याचे जीवन आपण जगत असतो; पण खरी कसरत तेव्हा होते, जेव्हा एखादी गोष्ट अधिक वाईट, नकारात्मक दाखवायची असते, असं तो सांगतो आणि ही नकारात्मक बाजू पडद्यावर रंगवताना त्याचा हळूहळू का होईना प्रभाव आपल्या खऱ्या जीवनावर पडू नये यासाठी काटेकोर काळजी घ्यावी लागते. आपण पडद्यावर साकारलेलं पात्र ही आपली कला आहे आणि आपलं आयुष्य हे खरं वास्तव या गोष्टी सतत मनात असणे गरजेचे असते. तरच आपल्या मनात इतर वाईट विचारांना थारा मिळत नाही आणि त्या दृष्टीने एक कलाकार म्हणून फिटनेसचे महत्त्व जास्त जाणवत असल्याचे तो सांगतो.

फिटनेससाठी व्यायाम प्रकारांबरोबरच आहाराची काळजी आणि कोणत्याही पदार्थाचा नव्हे कुठल्याच गोष्टीचा अतिरेक होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, असं तो म्हणतो. आयुष्यात कोणतीच गोष्ट अति नसावी, असं तो आवर्जून म्हणतो. अति चरबी, अति कष्ट आणि अति विचार हे आपल्या आरोग्यासाठी हानीकारक असतात. माणसाने फिट राहण्यासाठी या अति गोष्टी टाळणे स्वत:साठी हिताचे असल्याचे तो म्हणतो. वैयक्तिक पातळीवर फिट राहण्यासाठी अभिजीत नियमितपणे व्यायाम करतो. यात वेगवेगळ्या प्रकारे वेट ट्रेनिंग करण्यावर तो भर देतो. मात्र रोजच्या वेट ट्रेनिंगबरोबरच आठवडय़ातून एक दिवस गार्डनमध्ये, मोकळ्या जागेतही फ्री वेट करत असल्याचे त्याने सांगितले. व्यायामाबरोबरच आपल्या चयापचय शक्तीनुसार प्रत्येकाने आपला आहार ठरवावा, असं तो म्हणतो. इतरांच्या आहारपद्धतीला फॉलो न करता आपल्यासाठी, आपल्या शरीरासाठी काय आवश्यक आहे ते करणेच उपयोगाचे ठरते, असं अभिजीत म्हणतो.

viva@expressindia.com