चित्रपट आणि त्यासंबंधित सर्व बाबींशी ‘ऑस्कर’ पुरस्कार निगडित असला तरी ऑस्कर पटकावणारी किंवा तिथे स्पर्धा करणारी गाणी ही फार लक्षात राहणारी बाब कधीच नसते. त्यातील नामांकने आणि विजेते यांबाबत कित्येकदा ऑस्कर सोहळा पाहात असतानाच लोकांना जाणीव होते. अर्थात, ‘टायटॅनिक’मधील ‘माय हार्ट विल गो ऑन’ सारखे सर्व खंडांमध्ये पोहोचलेले गीत किंवा ‘स्लमडॉग मिलिऑनेर’ने जगभरात पाठविलेल्या वैश्विक सकारात्मकतेच्या संदेशाच्या ‘जय हो’ गाण्याने त्या त्या वर्षांमध्ये याबाबत अपवाद केला होता. सिलिन डिऑन या कॅनडियन गायिकेचे आयुष्य आणि कारकीर्द शिखरावर नेऊन ठेवले, ते ‘माय हार्ट विल गो ऑन’ या गाण्यातील सादरीकरणामुळे. १९८० पासून सक्रिय असलेली ही गायिका कॅनडा-अमेरिकेपुरती लोकप्रिय होती. १९९४ साली झालेला तिचा लग्नसोहळा कॅनडाच्या टीव्हीवर लाइव्ह दाखविण्यात यावा, इतपत पत तिला होती. ‘टायटॅनिक’ने त्यात आणखी भर टाकली. कन्सर्टबाबत ती फ्रॅन्क सिनात्रा आणि एलविस प्रेस्ले या साठच्या दशकातील कलाकारांशी बरोबरी करणारी ठरली. ऑस्कर मिळाल्यानंतर तिचे उत्साहवर्धक संगीत आणि तिचे आत्मचरित्र यांना जगभरात मागणी होती.

२००९चा ऑस्कर सोहळा आणि त्याआधी-नंतरचा काळ जगभरात ‘जय हो’ या शब्दांची भुरळ होती. इतकी की ‘ऑक्सफर्ड डिक्शनरी’ला हा शब्द त्या वर्षी समाविष्ट करून घ्यावा लागला. हे गाणे लिहिले होते जनप्रियोत्तम कवी गुलजार यांनी. संगीतबद्ध केले होते विश्वप्रिय भारतीय संगीतकार ए.आर. रेहमान यांनी आणि गायले होते सुखविंदर सिंग या उत्साहउत्कट देशी कलावंताने. ऑस्करच्या नियमानुसार गाणे लिहिणाऱ्याला पारितोषिक मिळते. गाणाऱ्याने शब्द लिहिले असल्यास किंवा संगीतबद्ध केल्यास तो गाण्यासाठी ऑस्कर मिळविण्यास पात्र ठरतो. या नियमानुसार गुलजार आणि रेहमान यांना ऑस्कर मिळाले. सिलिन डिऑन हिने ‘टायटॅनिक’चे गाणे लिहिले नव्हते किंवा संगीतबद्धही केले नव्हते. त्यामुळे गाणे बासरीच्या तुकडय़ासह अचूक संगीतबद्ध करणाऱ्या जेम्स हॉर्नर यांना गाण्यासाठी पारितोषिक मिळाले नाही, तर ते रचणाऱ्या विल जेनिंग्ज यांना पुरस्कार लाभला. इथे गंमत अशी की माय हार्ट गाण्याच्या सादरकर्त्यां सिलिन डिऑनला सारी प्रसिद्धी आणि श्रेय मिळाले तेवढय़ा प्रमाणात यश सुखविंदरला ‘जय हो’ गाण्यासाठी मिळाले नाही.

ऑस्कर मिळविणारी गाणी आधी लोकप्रिय असावीत असा नियम नाही. २००८ साली ‘वन्स’ या चित्रपटातील ‘फॉलिंग स्लोली’ हे युगुलगीत ऑस्कर पटकावून गेले. हा चित्रपटच मुळी संगीताने भारावून गेलेल्या दोन व्यक्तींवर आहे. अन् त्या दोघांचे प्रेम नव्हे तर फुलत जाणारे सांगीतिक नाते दर्शवणारा आहे. हा चित्रपट मुख्य धारेतल्या सर्व चित्रपटांच्या चमचमत्या प्रसिद्धीमध्ये लक्ष वेधून घेण्यास समर्थ नव्हता. पण निव्वळ या संयत गाण्याने चित्रपटाकडे लक्ष वेधून घेतले गेले. कुतूहल म्हणून या गाण्यासाठी चित्रपटाकडे जाणाऱ्यांना या चित्रपटाच्या सांगीतिक खजिन्याने आपलेसे केले. या चित्रपटातील सगळी गाणी यूटय़ूबवर आजही आवडीने पाहिली-ऐकली जातात. १९३४ पासून ऑस्कर सोहळ्यामध्ये सवरेत्कृष्ट गाण्यासाठी पुरस्कार देण्यास सुरुवात करण्यात आली. सुरुवातीच्या दशकांमध्ये सर्वच अज्ञात गीतकारांनी तो पटकावलेला दिसतो. नव्वदीच्या दशकामध्ये एमटीव्ही काळाने घराघरांत गायक कलाकारांची माहिती होऊ लागली होती. ब्रुस िस्प्रग्टन, एल्टन जॉन, िस्टग, बोनो, फिल कॉलिन्स यांची पुरस्कार मानांकनात वर्णी लागलेली दिसते. या दशकात अडेल या ब्रिटिश गायिकेला सहगीतलेखक म्हणून ‘स्कायफॉल’ या जेम्स बॉण्ड मालिकेतील चित्रपटातील गाण्यासाठी मिळालेला पुरस्कार मोठा मानला जातो. गॅ्रमीपासून ऑस्कपर्यंत या गायिकेने एकाच वेळी आपला आवाज सिद्ध केला होता.

यंदा ‘रिमेंबर मी’ या ‘कोको’ चित्रपटातील गाण्यासाठी ख्रिस्टन अ‍ॅण्डरसन लोपेझ आणि रॉबर्ट लोपेझ या गीतकार द्वयीला पारितोषिक मिळाले. या संपूर्ण चित्रपटातील गाणी सुंदर आहेत. याच स्तंभात जानेवारी महिन्यामध्ये या चित्रपटातील गाणे ऑस्करचे दावेदार ठरेल, हे भाकीत खरे ठरले. ‘रिमेंबर मी’ या गाण्यासोबत या चित्रपटाची थीम म्युझिक कित्येकदा ऐकूनही कंटाळा येणार नाही. गेल्या वर्षीच्या ‘ला ला लॅण्ड’मधील पुरस्कार विजेते गाणे ‘सिटी ऑफ स्टार’ किंवा तीन-चार वर्षांपूर्वी ऑस्करच्या नामांकनात असलेले ‘लॉस्ट स्टार’ आवर्जून जाणून घ्यावीत अशी गाणी आहेत. ‘बिगिन अगेन’ या चित्रपटातही सर्वच गाणी श्रवणीय आहेत. यंदा सुफियान स्टीव्हन्स या गायकाचे ‘मिस्ट्री ऑफ लव्ह’ नामांकनात होते. ऑस्करच्या कार्यक्रमात ते सादर करण्यात आले आणि त्यातील संगीत तुकडय़ाला कार्यक्रमाच्या पाश्र्वसंगीतातही वापरण्यात आले. ‘मिस्ट्री ऑफ लव्ह’मध्ये वाजणारी वाद्यशैली या कलाकाराचे खास वैशिष्ट आहे. ती त्याच्या सगळ्याच गाण्यांमध्ये झिरपलेली आहे. ‘ग्रेटेस्ट शोमन’मधील ‘धिस इज मी’ किंवा ‘मडबाऊंड’मधील ‘मायटी रिव्हर’ ही यंदाचा पुरस्कार हुकलेली गाणीही ऐकावीत अशीच आहेत. अल्पकाळाच्या आपल्या एमपीथ्री यादीत ती स्थान नक्कीच घेऊ शकतील.

म्युझिक बॉक्स

Coco- Remember me

The Greatest Showman – This Is Me

James Bond 007 Skyfall – Adele

BEGIN AGAIN – Lost stars, Keira Knightley

Frozen –    “Let It Go”

Tarzan –    “You’ll Be in My Heart”

Once “Falling Slowly”

 

viva@expressindia.com