कित्येक ब्रॅण्ड्स, मॉल्स, रेस्टॉरंट्स, एवढंच नाही तर थीम पार्कही ‘व्ही डे’ ऑफर्स देऊ करताहेत. पूर्वी केवळ गुलाब, टेडी बेअर, लाल डार्ट्सनी सजणारा बाजार आता ज्वेलरी, कपडे, ब्युटी किट एवढंच नाही तर स्पा पॅकेज आणि लक्झरी ड्राइव्हनंही सजला आहे. व्हॅलेंटाइनचा इव्हेंट कसा आणि कधी झाला हे जाणून घ्यायचा प्रयत्न.
‘स्वीटू, या व्हॅलेंटाइन डेला, तू मला काय देणार?’ प्रेयसीकडून असा फोन आल्यावर हल्ली तमाम प्रियकरांच्या छातीत धडकी भरते. अगदी काही वर्षांपर्यंत ‘व्हॅलेंटाइन डे तर काय आपण रोजच साजरा करत असतो, १४ फेब्रुवारी काय वेगळा आहे..’ असा डायलॉग मारला की प्रेयसी ‘ओह..’ करून लाजून जायची आणि कट्टय़ावर सर्वासमोर ‘प्रेमवीर’ असल्याचं इम्प्रेशनही मारलं जायचं. फार तर एका कॅडबरीने किंवा गुलाबाने काम व्हायचं. पण आता चित्र बदललं आहे. ‘व्हॅलेंटाईन डे’ला कोणाचा प्रियकर कोणावर जास्त खर्च करतो यावर त्याचं प्रेम ठरवलं जातं. (अर्थात त्यामुळे १५ फेब्रुवारी ‘ब्रेकअप डे’ म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली, तर नवल वाटायला नको) पण एकूणच दसरा-दिवाळी या सणांची जशी आतुरतेने वाट पाहिली जाते, तसा काहीसा माहौल आता व्हॅलेंटाइन डेला तयार होऊ लागला आहे.
  केक्सपासून ते ज्वेलरीपर्यंत विविध ब्रॅण्ड्स व्हॅलेंटाइन डे खास बनविण्यासाठी विविध कलेक्शन्स घेऊन बाजारात आले आहेत. पाश्चात्त्य देशांप्रमाणे भारतातही हळूहळू व्हॅलेंटाइन डेला एखाद्या सणाचं स्वरूप येण्यास सुरुवात झाली असून, तरुणांमध्ये याचं प्रमाण मोठं असल्याचं ‘झामोर डॉट कॉम’चे संचालक व्ही. थियाराजन सांगतात. अर्थात असं होत असताना पूर्वी केवळ बुके, ग्रिटिंगपर्यंत मर्यादित या दिवसाचं स्वरूप आता कँडललाईट डिनर, महागडय़ा गिफ्ट्स, डिझायनर कपडे, ज्वेलरीपर्यंतही पोहोचलं असल्याचं ते सांगतात.
ग्राहकांची ही मागणी पाहता, ब्रॅण्ड्सनीसुद्धा कंबर कसण्यास सुरुवात केली आहे. कित्येक डिझायनर कलेक्शन्स, ज्वेलरी ब्रॅण्ड्स, रिसॉर्ट्स, मॉल्सनी या काळात ग्राहकांसाठी भरघोस सवलती देऊ केल्या आहेत. ‘व्हॅलेंटाइन डे’ला साजेशी डेकोरेशन्स, मेन्यू प्लॅनिंग होऊ लागले आहेत. ऑनलाइन साइट्सना या बदलत्या वाऱ्यांचा फायदा अधिक झाला आहे. ‘इंटरनेटच्या माध्यमातून आपलं प्रेम व्यक्त करण्याचे विविध मार्ग तरुणाईला सापडले आहेत. त्यात ऑनलाइन मार्केटिंगमुळे हे लोण केवळ बडय़ा शहरांमध्ये नाही, तर छोटय़ा गावांपर्यंत पोहोचलं आहे, असं ‘आस्क मी डॉट कॉम’चे मार्केटिंग हेड मानव शेठी सांगतात. त्यामुळे या काळात छोटय़ा शहरातूनही महागडय़ा गिफ्ट्सची खरेदी मोठय़ा प्रमाणात होत असल्याचं ते सांगतात.
‘व्हॅलेंटाइन डे’चं स्तोम वाढण्यामागे कुठे तरी प्रेमाचं होणारं बाजारीकरण जबाबदार असल्याचं मानसोपचारतज्ज्ञ डॉ. राजेंद्र बर्वे सांगतात. आपल्या मैत्रिणीच्या बॉयफ्रेंडपेक्षा आपल्या बॉयफ्रेंडनं महागडं गिफ्ट दिलं पाहिजे किंवा त्याच्या जुन्या गर्लफ्रेंडपेक्षा त्यानं आपल्याला चांगलं गिफ्ट दिलं पाहिजे ही ईष्र्या, स्पर्धा तरुणाईमध्ये वाढते आहे. ‘सध्या प्रेम व्यक्त करण्यापेक्षा ते वस्तू देऊन दाखविणं महत्त्वाचं ठरू लागलं आहे. त्यामुळे नातंही प्रॉडक्ट बनत आहे,’ डॉ. बर्वे सांगतात. त्याचा फायदा ब्रॅण्ड्सनी घेत प्रसारमाध्यमांच्या साहाय्याने ते तरुणाईला भुलविण्यासाठी विविध क्लृप्त्या काढत असल्याचं ते सांगतात.
मृणाल भगत -mrunal.bhagat@expressindia.com