News Flash

‘नथिं’ग रॉन्ग

अनेक इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर ठरावीक साच्याच्या पलीकडे जाऊन मॉडेलिंग आणि ब्रॅन्डिंग करतात.

वेदवती चिपळमूणकर

रणवीर सिंग सर्रास स्कर्ट किंवा लेहंगा घालतो, अर्जुन कपूरने चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हील्स घातल्या किंवा भूमिकेच्या गरजेसाठी आमिर खानने नाक टोचलं तेव्हाही या गोष्टींची सगळ्या पद्धतींनी चर्चा झाली. मात्र सध्या चर्चेत आहे तो आपल्या घरातलाच एक वाटणारा अभिनेता-लेखक सारंग साठय़े. त्याने आपला नथ घातलेला फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आणि त्यावर कॉमेंट्सचा अक्षरश: पाऊस पडला.

कन्व्हेन्शनल किंवा रूढीबद्ध पद्धतीने मॉडेलिंग करण्याचे किंवा ट्रेण्ड सेट करण्याचे दिवस भूतकाळातच जमा झाले आहेत. अनेक इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर ठरावीक साच्याच्या पलीकडे जाऊन मॉडेलिंग आणि ब्रॅन्डिंग करतात. ‘नो बॉर्डर्स शॉप’च्या इन्स्टाग्राम पेजवर इअररिंग्जच्या कलेक्शनसाठी नुकतंच साकेत नावाच्या मेल मॉडेलने शूट केलं आहे. ‘अमेश’ हा श्रीलंकन फॅशन डिझाईन स्टुडिओ इअररिंग्ज आणि नेकलेसच्या शूटसाठी अनेकदा मेल मॉडेल्सना कास्ट करतो. मात्र हा ट्रेण्ड केवळ फॅशन स्टेटमेंटपुरता मर्यादित राहिला नसून त्याचा प्रवास हळूहळू स्त्री-पुरुष समानतेच्या दिशेने व्हायला लागला आहे.

रणवीर सिंग सर्रास स्कर्ट किंवा लेहंगा घालतो, अर्जुन कपूरने चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हील्स घातल्या किंवा भूमिकेच्या गरजेसाठी आमिर खानने नाक टोचलं तेव्हाही या गोष्टींची सगळ्या पद्धतींनी चर्चा झाली. मात्र सध्या चर्चेत आहे तो आपल्या घरातलाच एक वाटणारा अभिनेता-लेखक सारंग साठय़े. त्याने आपला नथ घातलेला फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आणि त्यावर कॉमेंट्सचा अक्षरश: पाऊस पडला. सामान्यत: अपेक्षित असणाऱ्या टीकाटिप्पणीपेक्षा त्याचा हा लुक किंवा ही कृती आवडल्याचं मत देणाऱ्या कॉमेंट्सच अधिक दिसून आल्या. सारंगच्या म्हणण्यानुसार नथ घालून बघण्याची इच्छा झाली म्हणून त्याने नथ घालून पाहिली आणि ती छान दिसली म्हणून फोटो काढून पोस्ट केला. इतक्या साध्या कृतीने फार काही मोठे बदल करण्याची त्याची इच्छाही नाही आणि अपेक्षादेखील नाही. तो म्हणतो, ‘‘मी कायमच पॉवरफुल स्त्रियांसोबत काम केलं आहे. त्यामुळे एखादी गोष्ट स्त्रिया करू शकत नाहीत हे मला पचत नाही आणि केवळ मी पुरुष आहे म्हणून मी एखादी गोष्ट करायची नाही हेही मला आवडत नाही. मला नथ घालून बघायची होती म्हणून मी घातली आणि फोटो छान आला म्हणून पोस्ट केला इतकं खरं तर ते साधं होतं. मी मुलगा आहे म्हणून मी रडायचं नाही किंवा कधी एखादा दागिना घालून बघावासा वाटला तर तो घालायचा नाही हे इतरांचं कंपल्शन नसावं, मला माझ्या विचारांचं आणि निवडीचं स्वातंत्र्य असावं एवढंच माझं म्हणणं होतं.’’

एखाद्यावर ज्या प्रकारचे संस्कार लहानपणापासून झालेले असतात त्याप्रमाणे प्रत्येक व्यक्ती आपले निर्णय घेत असते. एखाद्याने पारंपरिक विचारसरणी घेऊन इतरांना ‘जज’ करणं जसं अयोग्य आहे तसंच एखाद्या पुरोगामी विचारांच्या व्यक्तीने पारंपरिक विचारांच्या व्यक्तीला कमी लेखणंही अयोग्यच आहे. त्यामुळे अशा लहान कृतींतून कदाचित काही फार मोठं उद्दिष्ट साध्य होणार नाही, मात्र जेंडर बायसेस बाळगणाऱ्यांनी इतरांची वैयक्तिक आवडनिवड स्वीकारायला मनोमन सुरुवात केली तरी ती मोठी अचिव्हमेंट ठरेल, हे मात्र या उदाहरणांवरून अधोरेखित होतं आहे.

या जेंडर बायसमध्ये केवळ स्त्री-पुरुष भेद हा एकच वादाचा मुद्दा नाही. तर एखाद्या स्त्रीला केसांचा बॉयकट ठेवायला आवडतो किंवा सलवार—कुर्ता आवडत नाही किंवा एखाद्या मुलाला इअररिंग्ज घालायला आवडतात यावरून थेट त्यांच्या लैंगिकतेवर शंका घेणारी आणि टिप्पणी करून मोकळी होणारीही मंडळी आहेत. एखाद्याने कानात टॉप्स घातले म्हणजे तो ‘बायल्या’ आहे किंवा एखाद्या मुलीला कायम शर्ट-पॅन्टमध्येच पाहिलं म्हणजे ती ‘टॉमबॉय’ आहे अशी लेबल्स सर्रास लावली जातात. एखाद्या व्यक्तीला एखादी विशिष्ट गोष्ट आवडणं हा मुद्दा बाहेरच्यांनी त्या व्यक्तीला ‘जज’ करण्यासाठी पुरेसा आधारभूत ठरतो. सारंग याबद्दल बोलताना म्हणाला, ‘‘नाटकात काम केलेल्या माझ्या कित्येक मित्रांना ते काजळ किंवा सुरमा लावायला आवडायचं. मात्र त्या थिएटरच्या उंबऱ्याबाहेर कधी त्यांनी तशी हिंमतच केली नाही. एखाद्याला आपले डोळे छान दिसावेत असं वाटणं आणि त्यासाठी त्याने डोळ्यात काजळ घालणं ही साधीशी कृती जेंडर बायसेसच्या चष्म्यातून का बघायची?’’ असा प्रश्न तो विचारतो.

समाजाचं मानसशास्त्र समजून घेताना त्यातल्या प्रत्येकाचे वैयक्तिक प्राधान्यक्रम काय आहेत हे त्यात मोजता येत नाही. एखादी कृती चूक की बरोबर ते संपूर्ण समाज एकत्र मिळून, सहमतीने आणि सर्वाच्या एकत्रित विचाराने ठरवत असतो. स्त्री किंवा पुरुषाने काय करावं आणि काय करू नये याच्या समाजमान्य रीतींप्रमाणे प्रत्येक व्यक्तीचा न्यायनिवाडा केला जातो. प्रत्येक वेळी हा न्यायनिवाडा प्रत्यक्ष नसतो. अनेकदा तो समाजमाध्यमांवर केला जातो, तर अनेकदा केवळ स्वत:पुरते निष्कर्ष काढले जातात. मग समाजाच्या नजरेत ती ‘खळबळजनक’ कृती ठरते आणि ती कृती करणारी व्यक्ती सामान्य असो वा सेलेब्रिटी, टीकेच्या भडिमारातून सुटत नाही. कोणत्याही पद्धतीचा पोशाख करणं, दागिने घालणं, इत्यादी सर्व बाबी खरं तर प्रत्येकाच्या खासगी आणि वैयक्तिक असायला हव्यात. एखाद्या व्यक्तीची आवडनिवड इतरांना पटणारी नसेल तर त्यांनी ती जबरदस्तीने स्वत:च्या गळी उतरवावी असं नक्कीच नाही. मात्र त्या व्यक्तीचं जगणं अवघड न करता, त्याला चूक की बरोबरचं लेबल न लावता, त्याच्या मार्गाने त्याची आवड जोपासू द्यावी, असा सूर तरुणाईतून उमटू लागला आहे एवढं नक्की!

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 18, 2020 12:18 am

Web Title: actor writer sarang sathaye photo on instagram zws 70
Next Stories
1 वस्त्रांकित : लोकसाहित्य आणि वस्त्र परंपरा
2 नावातच ‘युजर’आहे!
3 केक आणि बरंच काही…
Just Now!
X