|| प्रियांका वाघुले

‘कुंकू टिकली आणि टॅटू’ , ‘रात्रीस खेळ चाले’सारख्या मालिकेतून एक अगदी तरुण चेहरा सगळ्यांच्या आवडीचा झाला तो म्हणजे अभिनेता आदिश वैद्य. अगदी पंचविशीत असताना ‘कुंकू टिकली आणि टॅटू’ मालिकेत ज्या पद्धतीची भूमिका करावी लागली होती ती करताना हवा असलेला उत्साह, ऊर्जा ही केवळ फिटनेसमधूनच आपण मिळवू शकतो. त्यासाठी हे फिट राहणं आपलं आपण जमवायलाच हवं, असं आदिश म्हणतो.

कोणतीही भूमिका साकारताना ती व्यक्तिरेखा प्रेक्षकांसमोर रंगवायची असते. त्यामुळे मुळात ते पात्र, त्याचे मालिकेतील महत्त्व आपल्याला समजणं गरजेचं असतं. आणि मग ती भूमिका साकारताना त्यासाठी लागणारी शारीरिक आणि मानसिक क्षमता आपल्याला नियमित व्यायाम केल्याने मिळते, असं तो सांगतो. दिवसभर उत्साही राहण्यासाठी, पहिल्या दृश्यापासून ते रात्री शिफ्ट संपण्याच्या वेळेस असलेले शेवटचे दृश्य देतानासुद्धा कलाकाराने तितक्याच उमेदीने, सळसळत्या उत्साहाने ते दृश्य करणे ही कलाकार म्हणून आवश्यक असते. आणि कलाकार त्या पद्धतीने दृश्य देत असेल तर व्यक्ती म्हणून तो फिट असल्याचे लक्षण आहे, असं तो म्हणतो.

फिटनेससाठी नित्यनियमित व्यायाम करणे. वेळोवेळी आपल्या आहारात शरीराला आवश्यक असलेल्या पदार्थाचा समावेश करणे हे आपण के लंच पाहिजे. आदिश स्वत: अतिशय फुडी असल्याचे सांगतो. पण जेव्हा प्रश्न स्वत:च्या फिट राहण्याचा येतो तेव्हा आपल्या फुडीपणावर म्हणजेच जिभेवर संयम कसा ठेवायचा हे आपल्याला समजून घेतलंच पाहिजे. ते आपल्याकडून त्याच काटेकोरपणाने पाळलंही गेलं पाहिजे, असं आदिशने सांगितलं.

फुडी माणसाला खाणं बंद करणं हे अवघड जातं. त्यामुळे सगळंच खाणं बंद करण्यापेक्षा आपण काय आणि किती खातो हे महत्त्वाचे असल्याने ते लक्षात घेतलं पाहिजे. आणि मग आपण जे खातो आहे, त्यातून हेल्दी किती खातो, आपल्या आहारातून शरीराला पोषक असणाऱ्या गोष्टी पोटात जात आहेत का, याचा विचार करूनच आपला आहार निवडला पाहिजे, असं तो म्हणतो. पेट खूश तो दिल भी खूश असं म्हणत पोटाला हेल्दी पद्धतीने खूश ठेवण्याचा तो सतत प्रयत्न करत असल्याचे सांगतो. मात्र फुडी असल्याने जिममधील मेहनतही तितकीच गरजेची असते, हेही तो सांगतो. जिममध्ये नियमित व्यायाम करताना कार्डिओच्या आठवडय़ातील दोन वेळा ठरलेल्या असून त्या कधीच टाळल्या जात नसल्याचं त्याने सांगितलं. त्याचं मुख्य कारण सेटवर असताना अनेकदा कलाकार म्हणून शूट करण्याव्यतिरिक्त आपण अतिशय कमी अ‍ॅक्टिव्ह असतो. त्यामुळे त्याची भरपाई म्हणून जिममध्ये तितकी मेहनत करून घाम गळणे अनिवार्य ठरत असल्याचं आदिश म्हणतो.

viva@expressindia.com