13 December 2019

News Flash

‘फिटनेस’वाला..!

स्वत:च्या फिटनेसपासून सुरुवात करून इतरांना फिटनेसचे धडे आणि योग्य सल्ले देणारा आदित्य बिझनेसमध्येही आता हळूहळू पाय रोवतो आहे.

|| वेदवती चिपळूणकर

बॅकग्राऊंड कॉमर्सची असल्याने स्वत:चा बिझनेस सुरू करण्यासाठी कदाचित त्याला अधिक बळ मिळालं असावं. बी.कॉम. करून, एमबीएची प्रवेश परीक्षा क्लिअर करूनही सरधोपट मार्गाने नोकरी न करता त्याने स्वत:च्या फिटनेसच्या पॅशनला जास्त महत्त्व दिलं. पुण्यातला पहिला पर्सनल ट्रेनिंग स्टुडिओ सुरू करण्याचं क्रेडिट त्याला म्हणजेच आदित्य बर्वेला जातं. फिटनेस म्हणजे केवळ जिमच नव्हे तर न्यूट्रिशनवरही त्याचा अभ्यास आहे. स्वत:च्या फिटनेसपासून सुरुवात करून इतरांना फिटनेसचे धडे आणि योग्य सल्ले देणारा आदित्य बिझनेसमध्येही आता हळूहळू पाय रोवतो आहे.

टीव्हीवर लागणाऱ्या टेलिशॉपिंगच्या जाहिरातीत काही खऱ्या-खोटय़ा गोष्टी सांगितल्या जातात. आधी मी असा होतो, नंतर मी असा झालो, थँक्स टू अमुक अमुक बेल्ट, तमुक औषध इत्यादी. त्या गोष्टींची सत्यता कितपत असते याबद्दल शंका असली तरी आदित्यची स्वत:ची गोष्ट मात्र खरी आहे. स्वत:च्या फिटनेसकडे कधीही विशेष लक्ष न दिल्यामुळे शाळेतल्या मुलांनी चिडवण्यापासून ते स्वत:चा फिटनेस स्टुडिओ उभा करण्यापर्यंतचा प्रवास त्याने संपूर्णत: स्वत:च्या मेहनतीने केला आहे. बी.कॉम.ची डिग्री असताना आणि एमबीएच्या प्रवेश परीक्षेत पात्र ठरूनही ते सगळं सोडण्याच्या निर्णयाबद्दल बोलताना आदित्य म्हणतो, ‘‘साधारणत: आपल्याकडे आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स घेण्यासाठी टक्केवारी ठरलेली असते. त्याच पद्धतीने माझाही कॉमर्सला प्रवेश झाला. इकॉनॉमिक्स, ऑर्गनायजेशन ऑफ कॉमर्स आणि सेक्रेटोरियल प्रॅक्टिस हे विषय मला आवडत होते. त्यामुळे मी ग्रॅज्युएशनही कॉमर्समध्ये करायचं ठरवलं. थोडंफार व्यवहारज्ञान मिळावं हाही एक साधासा उद्देश त्यामागे होता. सामान्यत: जे मुलं करतात तसंच बी.कॉम.नंतर एमबीए करायचं नाही तर एम.कॉम. करायचं, हेच मीही करणार होतो,’’ असं सांगणाऱ्या आदित्यने त्याच्या फिटनेसच्या प्रवासाचा किस्साही कथन केला.

कॉलेजमध्ये असताना मी स्वत:च्या फिटनेसकडे हळूहळू लक्ष द्यायला सुरुवात केली होती. मला वजन वाढवायची गरज होती. वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम करून, जिमला जाऊनही हवे तसे रिझल्ट मिळत नव्हते. मग चुकीची जिम निवडल्याची शंका मला यायला लागली. म्हणून मी जिमही बदलून बघितल्या. एकदा मी एका सेमिनारला गेलो असताना तिथे मला असं कळलं की, फिटनेस हा केवळ व्यायामाने किंवा जिमने मिळणारी गोष्ट नाही, तर त्यासाठी पोषण आणि आहार यावरही तितकंच लक्ष दिलं पाहिजे. तेव्हापासून मी या बाबतीत अधिक माहिती घ्यायला सुरुवात केली, असे आदित्य सांगतो. आदित्यने मग त्यानुसार कोर्सेस शोधले. ‘के – ११’चा ट्रेनर कोर्स मी पूर्ण केला होता. त्यामुळे मी इतरांना योग्य पद्धतीने शिकवू शकेन, असा आत्मविश्वास माझ्यात आला होता. मग मी ग्रॅज्युएशननंतर पुढे कॉमर्स वगैरेचं शिक्षण न घेता पूर्ण लक्ष फिटनेस ट्रेनिंगवरच द्यायचं ठरवलं, असं तो म्हणतो.

वडिलांचा बिझनेस असताना साहजिकच मुलानेही त्यात लक्ष घालावं, अशी अपेक्षा असते. मात्र त्याऐवजी मुलाने काही तरी वेगळा मार्ग निवडला, की आई-बाबांना पहिली गोष्ट जाणवते ती काळजी! आदित्य सांगतो, ‘‘सर्वसामान्य पालकांची असते तशी अपेक्षा माझ्याही पालकांची माझ्याकडून होती. मी वेगळा निर्णय घ्यायचा विचार केल्यानंतर त्यांना सर्वात जास्त काळजी माझ्या स्ट्रगलची होती. फिटनेस ही गोष्ट आत्ता ट्रेण्डमध्ये आहे, मात्र मी सुरू केलं तेव्हा, म्हणजे साधारण पाच ते सहा वर्षांपूर्वी, फिटनेसचं असं मार्केट तयार झालेलं नव्हतं. फिटनेस ट्रेनरना मागणी तर खूप होती, मात्र एमबीए करून मिळणाऱ्या नोकरीच्या पगाराच्या तुलनेत फिटनेस क्षेत्रात उत्पन्न खूप कमी होतं. त्यामुळे अगदी बेसिक उत्पन्नापासून सुरुवात करून स्वत:ला सिद्ध करत पुढे जावं लागणार होतं.’’ या गोष्टीची कोणत्याही पालकांना साहजिकच काळजी वाटेल तशीच ती आपल्याही आईबाबांना वाटत होती, असं आदित्य सांगतो. मात्र, ट्रेनर म्हणून काम करायला सुरुवात केल्यानंतर स्वत:चा क्लाएंट बेस हळूहळू वाढवत नेला. क्लाएण्ट्सशी सांभाळलेले संबंध, त्यातून वाढणारी क्लाएण्ट्सची संख्या आणि त्यातून हळूहळू वाढत जाणारं उत्पन्न या सगळ्या गोष्टींमुळे आईबाबांना दिलासा मिळाल्याचेही त्याने सांगितले.

ठिकठिकाणी जिम उभ्या असताना पर्सनल ट्रेनिंग स्टुडिओ सुरू करण्याची कल्पना आदित्यला सुचली आणि पुण्यातला त्याचा पहिला स्टुडिओ ठरला. साधारणत: जिममध्ये अपॉइंटेड ट्रेनर्स असतात, मात्र पर्सनल ट्रेनिंग स्टुडिओमध्ये ट्रेनर आणि त्याचे क्लाएण्ट्स यांनाच फक्त प्रवेश दिला जातो. अशा स्टुडिओमध्ये कोणताही एकटा माणूस उगीच जाऊ न त्याच्या मर्जीला येईल ते वर्कआऊ ट करू शकत नाही. फ्री-लान्स फिटनेस ट्रेनर म्हणून काम करणाऱ्या अनेक ट्रेनर्सना संपूर्ण सेटअप तयार मिळतो आणि त्या बदल्यात त्यांच्या फीच्या काही ठरावीक टक्के रक्कम त्या स्टुडिओला द्यावी लागते. या ठिकाणी मात्र आदित्यने ट्रेनर्सची सोय अधिक पाहिली आहे. त्याच्या बिझनेस मॉडेलबद्दल तो म्हणतो, ‘‘ट्रेनरला त्याच्या चार्जेसचे काही टक्के द्यावे लागले की त्यांना मेहनत खूप जास्त करावी लागते आणि तुलनेने पैसा कमी मिळतो. मी स्वत: ट्रेनर असल्याने ही परिस्थिती समजू शकतो. त्यामुळे माझ्या स्टुडिओमध्ये ट्रेनरने त्याची फी कितीही घेऊ  दे, त्याच्याशी आम्हाला देणंघेणं नसतं. आमची स्टुडिओची ठरावीक फी आहे, ती भरून ट्रेनर स्वत:च्या क्लाएण्ट्सना तिथे ट्रेन करू शकतो. या पद्धतीत ट्रेनरला स्वत:च्या उत्पन्नाची फारशी चिंता करावी लागणार नाही याचा संपूर्ण विचार केला आहे.’’

एखादा व्यवसाय उभा करायचा म्हणजे भांडवल लागतं, इन्फ्रास्ट्रक्चर लागतं आणि पूर्ण गणितं डोक्यात तयार असावी लागतात. कोणताही व्यवसाय म्हणजे रिस्क ही आलीच! त्यामुळे रिस्क घेण्याचीही तयारी असावी लागते आणि वेळ पडली तर तडजोडीही कराव्या लागतात. कॉमर्सचा विद्यार्थी असल्याने आदित्यला यातली कोणतीच गणितं अवघड गेली नाहीत. आत्ता सुरू असलेला त्याचा स्टुडिओ स्वत:च्या बळावर पूर्णत: उभा राहिला की मग त्याच्या ब्रॅन्चेस वाढवण्याची आदित्यची इच्छा आहे. मोजूनमापून घेतलेल्या रिस्कने सगळ्या गोष्टी सोप्या होतात, असं म्हणणाऱ्या आदित्यचा आत्मविश्वास नक्कीच अनेकांना प्रेरणादायी आहे.

आपल्या पॅशनला फॉलो करणं ही चांगलीच गोष्ट आहे. मात्र म्हणून कोणताही विचार न करता, प्रॅक्टिकली त्याकडे न बघता भावनेच्या भरात घेतलेला निर्णय योग्यच असतो असं नाही. आपल्याला कितीही आवड असली तरी आयुष्यभराचा निर्णय घेताना थोडंफार कॅल्क्युलेशन करणं गरजेचं असतं. मनात आलं म्हणून केलं असं न करता सारासार विचार करून एखादी गोष्ट ठरवणं महत्त्वाचं असतं. दुसरी गोष्ट म्हणजे सातत्याने नवनवीन शिकत राहणं! एकदा आपल्याला सगळं येतंय असं वाटायला लागलं, की आपलं ज्ञान तिथे खुंटतं. त्यामुळे सतत शिकत राहणंही अत्यावश्यक आहे.    – आदित्य बर्वे

First Published on August 2, 2019 12:08 am

Web Title: aditya barve mpg 94
Just Now!
X