|| वेदवती चिपळूणकर

खरं तर ते दोघे एका गावचे, एका शहरातले वगैरे नाहीत; पण एकत्र येऊन त्यांनी काम सुरू केलं आणि बघता बघता त्यांना त्यांची वाट सापडली. सोशल मीडियाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन त्यांनी ‘सोशल स्पॉटलाइट’ हा बिझनेस डेव्हलप केला. इन्स्टाग्राम या सर्वाच्या लाडक्या आणि आकर्षक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून त्यांनी आपला बिझनेस सुरू केला. त्यांच्या बिझनेसचा केंद्रबिंदूही ‘इन्स्टाग्राम’च आहे. इन्स्टाग्रामवरचे फॉलोअर्स वाढवण्यासाठी मदत करणं, इन्स्टाग्रामवरची प्रोफाइल ‘प्रेझेंटेबल’ दिसणं, बिझनेस टुल्सचा योग्य वापर केला जाणं, फॉलोअर्सच्या संख्येचा नुसता फुगवटा न दिसता ज्यांना खरंच आवडेल अशा लोकांपर्यंत प्रोफाइल पोहोचवणं अशा गोष्टींसाठी ते दोघं मदत करतात. स्वत:ची वैयक्तिक प्रोफेशन्स सांभाळून ते हा बिझनेसही समर्थपणे पेलत आहेत. ते दोघं म्हणजे आदित्य वैद्य आणि प्रांजली निगुडकर. दोघं दोन वेगळ्या शहरांतले, ऑनलाइन गेमिंगच्या माध्यमातून भेटले आणि आता एक व्यवसाय एकत्रितपणे सांभाळतायेत.

Hanuman Temple Name in Pune Hanuman Jayanti 2024
‘जिलब्या मारुती, डुल्या मारुती…’ पुण्यातील प्रसिद्ध मारुती मंदिरांना का पडली असतील अशी नावे? जाणून घ्या…
Loksatta kalakaran Architecture heritage and reality
कलाकारण: वास्तुरचना, वारसा आणि वास्तव!
How Did Get Name Tulsibaug To Pune Famous Market
Pune : पुण्यातील प्रसिद्ध बाजारपेठेला ‘तुळशीबाग’ हे नाव कसे पडले? जाणून घ्या, या नावामागचा इतिहास
Devdutt More
देवदत्त मोरे धाराशिव लोकसभेसाठी वंचितचे उमेदवार, लवकरच प्रकाश आंबेडकर उमेदवारी जाहीर करणार

प्रांजली मूळची जयपूरची आणि नोकरीसाठी म्हणून मुंबईत आलेली. फोटोग्राफीची आवड असलेली आणि मीडियाचं शिक्षण घेतलेली प्रांजली मुंबईत आली ती एका पी.आर.च्या (जनसंपर्क अधिकारी) नोकरीसाठी. त्यानंतर तिने सेलेब्रिटी सोशल मीडिया मार्केटिंगसाठी काही महिने काम केलं. या सगळ्यात तिच्या फोटोग्राफीलाही विशेष वाव मिळत नव्हता. मुंबईच्या तिच्या वास्तव्यातच तिची आदित्यशी ओळख झाली. आदित्य मुंबईचाच, पण मीडियाशी कोणताही संबंध नसलेला मुलगा! न्यूट्रिशन हा त्याच्या आवडीचा आणि शिक्षणाचा विषय. ऑनलाइन गेमिंगमधून हळूहळू प्रांजली आणि आदित्य यांची मैत्री झाली. तिला तिच्या नोकरीचा कंटाळा आला होता आणि त्याबद्दल बोलताना आदित्यला ही कल्पना सुचली होती. तिला नोकरीही सोडायची होती आणि त्याची बिझनेस आयडियाही तिला आवडली होती. सोशल मीडिया मार्केटिंगचा तिला आधीपासून अनुभवही होता. त्या अनुभवाच्या जोरावर आणि आपल्या कल्पनेवर विश्वास ठेवून त्यांनी या बिझनेसची सुरुवात केली. गेल्या दीड वर्षांत त्यांनी साधारणत: दीडशे ते दोनशे क्लाएण्ट्सचा आकडा गाठला आहे आणि सोशल मीडियामुळे देशविदेशातून त्यांना क्लाएण्ट्स मिळाले आहेत.

घरच्यांना नोकरी सोडल्याचं न कळवता अनोळखी शहरात एखाद्या व्यक्तीसोबत बिझनेस सुरू करायचा धाडसी निर्णय प्रांजलीने घेतला होता. त्याबद्दल बोलताना प्रांजली म्हणते, ‘‘घरच्यांना सांगण्याआधी आपला बिझनेस अपेक्षेप्रमाणे वर्कआऊट करायचा होता. जेव्हा त्या बिझनेसमधून थोडे का होईना, पण पैसे मिळायला सुरुवात झाली तेव्हा मी घरी याबद्दल सांगितलं. मात्र माझ्या ताईला आधीपासून सगळं माहिती असल्याने ती माझ्या पाठीशी होती. आईबाबांनीही हे कळल्यावर ते स्वीकारून मला पाठिंबा दिला.’’ मी आणि आदित्य एकमेकांना एका वर्षांपेक्षा जास्त काळ ओळखत होतो. त्यामुळे मित्र म्हणून आम्ही काम करणं आम्हाला सोयीचं होतं. एक म्हणजे नवीन काही तरी सुरू करण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्यायही नव्हता आणि दुसरं म्हणजे आमच्या बिझनेसच्या सुरुवातीला गमावण्यासारखं आमच्याकडे काहीच नव्हतं. त्यामुळे शहर अनोळखी आहे किंवा आदित्यला मी खूप जास्त काळापासून ओळखत नाही वगैरे मुद्दे माझ्या कधी विचारातही आले नाहीत, असं प्रांजलने स्पष्ट केलं. त्या वेळी निर्णय घेणं आवश्यक होतं. कल्पना मला आवडली होती आणि प्रत्यक्षात कशी आणता येईल हे त्याला व्यवस्थित माहिती होतं. काही तरी पाऊल उचलायला हवंच होतं. त्यामुळे कोणतीही शंका न घेता आणि वेळ न घालवता मी यासाठी सहज तयार झाले, अशा शब्दांत प्रांजलने आपला अनुभव सांगितला.

आदित्यच्या म्हणण्यानुसार हा बिझनेस सुरू करण्यात नुकसान कोणतंच आणि कोणाचंच नव्हतं. तो म्हणतो, ‘‘हा बिझनेस म्हणजे बिझनेस नव्हताच. माझ्यासाठी ते एक अ‍ॅडव्हेंचर होतं. उद्या भविष्यात तो बिझनेस क्लिक झालाच नसता तर दुसरं काही तरी शोधलं असतं, पण वर्कआऊट झाला नसता तर तोटा होण्यासारखी कोणतीच गोष्ट नव्हती. नवीन खेळ खेळून बघितल्यासारखं माझ्यासाठी हे काम होतं आणि खेळ खेळणाऱ्यांमध्ये विश्वास-अविश्वासाचा प्रश्न येतच नाही. आम्ही एकत्र सुरू केलेला बिझनेस ही कोणतीही मोजूनमापून घेतलेली रिस्क नव्हती, तर ‘सुचलंय तर करून बघू’ अशा स्वरूपाची सुरुवात होती. त्यात बिझनेस रिलेशनशिप नव्हती, तर मैत्री होती. त्यामुळे मलाही कधीच कोणताच धोका वगैरे वाटला नाही आणि मागे फिरावंसंही वाटलं नाही.’’

आदित्य आणि प्रांजली आपापले वैयक्तिक प्रोफेशनल लाइफ सांभाळत हा व्यवसायही सांभाळतात. आदित्य आहारशास्त्रात शिक्षण घेतो आहे आणि त्याच क्षेत्रात कामही करतो आहे, तर प्रांजली फोटोग्राफर म्हणून करिअर घडवते आहे. या सगळ्या व्यापातून ‘सोशल स्पॉटलाइट’साठी वेळ काढताना कसरत होते का? यावर दोघेही एकमताने हेच म्हणतात की, दोघांपैकी एका कोणाला जमत नसेल तर दुसरी व्यक्ती त्याला सांभाळून घेते. आपापली स्वतंत्र करिअर करताना बिझनेसचीही वाढ करायचं आव्हान असल्यामुळे जबाबदाऱ्या वाटून घेत, समजून घेत कामं सुरू राहतात. सुरुवातीपासून प्लॅनिंग, वेब डिझायनिंग, रिसर्च, फायनान्स इत्यादी सगळ्याच गोष्टी कोणाच्याही मदतीशिवाय दोघंच सांभाळत आले आहेत. त्यामुळे दोघांनाही आता त्यांच्या बिझनेसच्या प्रत्येक बाबीची सखोल माहिती आहे.

बिझनेसचा निर्णय घेताना कोणतीच गोष्ट, जी इतरांना कदाचित अडचण वाटू शकेल ती, त्यांना समस्या वाटली नाही. बिझनेसमध्ये दुसऱ्यावर विश्वास टाकणं या सर्वात महत्त्वाच्या गोष्टीतदेखील कोणताही किंतु-परंतु त्यांच्या मनात आला नाही. मैत्री आणि व्यवसाय या दोन्ही गोष्टी जपत त्यांची वाटचाल सुरू आहे. आताच्या तरुणाईच्या सोशल मीडिया वापराबद्दल आईवडिलांना असणारा सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे ‘काय मिळतं रे त्या फोनमधून एवढं?’ या प्रश्नाला समाधानकारक उत्तर मिळेल असा खरोखर प्रॅक्टिकल बिझनेस आदित्य आणि प्रांजली यांनी उभा केला आहे आणि आता तो बिझनेस वाढवण्यासाठी दोघेही मेहनत घेत आहेत.

बिझनेसच्या बाबतीत बोलायचं तर कोणता तरी प्रॉब्लेम सोडवण्यातून अनेकदा बिझनेसच्या कल्पना सुचत असतात. एकंदरीत आपला करिअर पाथ अनेकदा आपण आधीच आखून मोकळे होतो. त्यामुळे नवीन पर्यायांचा विचार करण्याची आपली इच्छा आणि हिंमत दोन्ही होत नाही. आपल्या ठरलेल्या करिअरसाठी प्रयत्न करता करताच नवीन गोष्टींसाठीही आपण ओपन असलं पाहिजे. यामुळे आपोआप नवीन काही तरी आपल्याला मिळत जातं आणि नवीन गोष्टी ट्राय करण्यासाठी आपण मेंटली तयार असतो.’’   – आदित्य वैद्य

प्रवाह आपल्याला जसं नेईल तसं आपण जात राहावं असं माझं मत आहे. घडणारी प्रत्येक गोष्ट ही कोणत्या ना कोणत्या कारणाने घडत असते. त्यामुळे त्यावर विश्वास ठेवून, पॉझिटिव्हिटी ठेवून आपण पुढे जायला हवं. काळ जातो तशा आपोआप गोष्टी मार्गावर येतात आणि आपल्यासाठी चांगल्याच ठरतात.     – प्रांजली निगुडकर