12 July 2020

News Flash

क्षण एक पुरे! : वाट तोलामोलाची

लहानपणापासून घराच्या आजूबाजूला झाडी असल्याने प्राण्यांचा सहवास त्याने कायमच अनुभवला होता.

(संग्रहित छायाचित्र)

|| वेदवती चिपळूणकर

‘अ‍ॅडव्हेंचर स्पोर्ट्स’ हे त्याचं पहिलं प्रेम! साप पकडायला शिकण्यापासून केलेली सुरुवात हळूहळू रॉक क्लायंबिंगपर्यंत आणि तिथून ‘हायलायनिंग’च्या वाटेवर पोहोचली. शिक्षणाने एम. कॉम. करूनही रीतसर नोकरी करायची त्याला कधी इच्छाच झाली नाही. भारतात फार कमी प्रमाणात असलेल्या रॉक क्लायंबिंगचं त्याने प्रशिक्षण घेतलं. स्वत:च्या प्रयत्नांनीच त्याने हायलायनिंगही आत्मसात केलं आणि रोहित वर्तक हा भारतातला पहिला हायलायनर ठरला. कोणालाही साधं नावही माहिती नसणाऱ्या अ‍ॅडव्हेंचर स्पोर्टमध्ये त्याने स्वत:चा ठसा उमटवला.

लहानपणापासून घराच्या आजूबाजूला झाडी असल्याने प्राण्यांचा सहवास त्याने कायमच अनुभवला होता. मात्र रोहितला सापांची प्रचंड भीती वाटायची. एकदा एका सर्पमित्र काकांनी घरातला साप रेस्क्यू करताना रोहितने प्रत्यक्ष बघितलं आणि त्याच्या मनातील भीतीची जागा त्याबद्दलच्या कुतूहलाने घेतली. रोहित सांगतो, ‘मी त्या सर्पमित्र काकांकडे साप पकडायला शिकायचं म्हणून गेलो. त्यांनीही मला शिकवायला सुरुवात केली. हळूहळू माझी भीती नाहीशी झाली आणि मी अगदी प्रशिक्षित सर्पमित्र झालो’. सर्पमित्र झाल्यानंतर साहजिकच तो आसपासच्या रेस्क्यूसाठी कॉल्सवर जायला लागला. तरुण मुलांच्या कॅम्प्समध्ये, वर्कशॉप्समध्ये ‘स्नेक अवेअरनेस’सारखा कार्यक्रम करायला त्याने सुरुवात केली. ‘एकदा एका अ‍ॅडव्हेंचर कॅम्पमध्ये जागृतीपर सेशन घेण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी तिथ रॉक क्लायंबिंग एक्स्पर्ट्सही आले होते आणि ते रॉक क्लायंबिंगचं प्रशिक्षण देण्यासाठी आले होते. मला ते फारच इंटरेस्टिंग वाटलं आणि मीही प्रयत्न करून पाहिला. त्यावेळी मला ते अजिबातच जमलं नाही, पण त्यातला इंटरेस्ट अजूनच वाढला आणि मग मी रॉक क्लायंबिंग शिकायला सुरुवात केली’, असं रोहित सांगतो.

व्यवस्थित शिक्षण घेत असूनही त्यात नोकरी करायची नाही हे रोहितचं पक्कं ठरलेलं होतं.  आपण करत असलेल्या आणि आपल्याला आवडत असलेल्या क्षेत्रात नवनवीन गोष्टी करून बघितल्या पाहिजेत असं त्याचं मत होतं. याच विचारातून त्याची ओळख स्लॅकलायनिंग आणि पर्यायाने हायलायनिंगशी झाली. रोहित म्हणतो, ‘यूटय़ूबवर व्हिडीओ बघताना मला स्लॅकलायनिंग आणि हायलायनिंग हे दोन्ही प्रकार पहिल्यांदा कळले. जमिनीपासून साधारणत: चार ते पाच फुटांच्या उंचीवर, सामान्यत: दोन पोल्सच्या मध्ये काही इंच रुंदीची पट्टी बांधून त्यावरून तोल सांभाळत चालणं म्हणजे स्लॅकलायनिंग! हाच प्रकार जेव्हा दोन इमारतींच्या मध्ये किंवा दोन सुळक्यांच्या मध्ये, म्हणजेच साधारणत: चाळीस फुटांपेक्षा जास्त उंचीवर, केला जातो तेव्हा त्याला हायलायनिंग म्हणतात’. रोहितने सांगितलेल्या दोन्ही गोष्टी ऐकल्या तरी सामान्यत: धडकी बसते, त्याला मात्र या प्रकारांमध्ये रस वाटला. ‘ज्यावेळी मला याबद्दल कळलं आणि करावंसं वाटलं तेव्हा मला कोणत्याही प्रशिक्षकाची माहिती मिळाली नाही. त्यामुळे मी हे युटय़ूबवर बघूनच शिकलो. २०१४च्या डिसेंबरमध्ये मला ते पहिल्यांदा जमलं आणि या कम्युनिटीबद्दल अधिक माहिती घेतली तेव्हा कळलं की मी भारतातला पहिला हायलायनर होतो’, असं तो म्हणतो. अशाप्रकारचा साहसी खेळ स्वत:च शिकून आत्मसात करण्याची अवघड गोष्ट रोहितने सहजी केली होती. त्यानंतरची या क्षेत्रातील त्याची वाटही त्यानेच पक्की केली. ‘हायलायनिंग हे एक अ‍ॅडव्हेंचर स्पोर्ट म्हणून बघितलं जातं आणि त्याच्या स्पर्धाही ठिकठिकाणी होतात. त्या स्पर्धांमध्येही मी भाग घेतले, काही अ‍ॅवॉर्डस् मिळाले आणि हळूहळू माध्यमं ओळखायला लागली. मी आणि माझा मित्र सेटअप्स करून हायलायनिंगचे फेस्टिव्हल्स घेतो आणि प्रशिक्षणही देतो. स्लॅकलायनर्स आतापर्यंत भारतात हजार – दीड हजारांच्या संख्येत असतील आणि भारतात हायलायनर्स आता साधारण पस्तीस ते चाळीस आहेत’, अशी माहिती त्याने दिली.

मुळातच या स्पोर्ट्सची त्याला आधी कल्पना नव्हती, त्यामुळे या अ‍ॅडव्हेंचर स्पोर्ट्समध्ये करिअर करायचं ठरवतानाही त्याला त्यातल्या नोकरीच्या शक्यतांबद्दल काहीच कल्पना नव्हती. मात्र रॉक क्लाइंबिंगमध्ये त्याने फ्री-लान्सर म्हणून काम करायला सुरुवात केली होती. वेगवेगळ्या कॅम्प्समध्ये, वेगवेगळ्या ग्रुप्सना शिकवण्याचं काम तो करत होता. वेगळी करिअर निवडल्यानंतर त्यात स्थिरस्थावर होणं हेही एक आव्हान असतं. या करिअरमध्ये आर्थिकदृष्टय़ा स्टेबल होण्याच्या अनुभवाबद्दल रोहित सांगतो, ‘सुरुवातीला माझ्याकडे फिक्स म्हणण्यासारखं काम नव्हतं. फ्री-लान्सर म्हणून जितकं करत होतो तितकंच होतं. मलाही मध्येमध्ये असं वाटत होतं की दुसरी कोणती नोकरी बघावी. मात्र त्यात मला काही रस नाही हेही मला चांगलं माहीत होतं. अशी द्विधा मनस्थिती असताना संयम ठेवून वाट बघणं हाच एक पर्याय होता’. मात्र, यावरही त्याने मात केली. ‘घरच्यांच्या आपल्याकडून अपेक्षा असतात आणि आपल्या मुलाचं भलं व्हावं हाच त्यांचा हेतू असतो. त्याचाही थोडाफार ताण असतो. मात्र मला दुसरं काहीच करायचं नसल्यामुळे मी शांतपणे कामाच्या शोधात होतो. इंडस्ट्रियल क्षेत्रात मला नोकरी मिळाली. पुलाच्या किंवा इमारतींच्या बांधकामावर सुरक्षेची खबरदारी घेऊन काम कसं करायचं याचं ट्रेनिंग देणं, सुरक्षेच्या व्यवस्थांवर लक्ष ठेवणं आणि त्या चोख असल्याची काळजी घेणं अशा साधारण स्वरूपाची ही नोकरी आहे. एकदा मला नोकरी मिळाल्यावर हळूहळू घरच्यांचीही माझ्याबद्दलची काळजी मिटली आणि मलाही माझी आवड जपता आली’, असं त्याने सांगितलं.

ज्या स्पोर्टचं प्रशिक्षणही भारतात उपलब्ध नाही अशा स्पोर्ट्मध्ये रोहितने यश मिळवलं. मात्र आपल्याकडे त्या सुविधा नाहीत तरीही तो भारत सोडून बाहेर गेला नाही. याबद्दल बोलताना तो म्हणतो, ‘आपल्याकडे सुविधा नाहीत हे खरंच आहे. हायलायनिंग तर आपल्याकडे कोणी कधी यशस्वीपणे केलंही नव्हतं. आपल्याकडे अनेक गोष्टी नसल्यामुळे आपण बाहेर जावं असंही एकदा नक्कीच वाटलं. पण त्याचवेळी दुसऱ्या बाजूला ते चुकीचंही वाटलं. आपल्या देशात एखादी गोष्ट नाही आणि आपल्याला ती येते आहे, अशावेळी आपण ती इथे सुरू करावी हे मला जास्त योग्य वाटलं’, असं सांगतानाच आपण यूटय़ूबवरून शिकलो, पण इतरांना जर रीतसर प्रशिक्षण आपण देऊ  शकत असू आणि त्यातून हायलायनिंगला स्पोर्ट म्हणून भारतात प्रचलित करण्याची एक संधी माझ्याकडे आहे, ते ज्ञानही माझ्याकडे आहे, तर ते केलं पाहिजे, या विचारामुळे एकदाच देशाबाहेर जावंसं वाटलं होतं त्यानंतर हा विचार पुन्हा कधीच मनात आला नाही, असं त्याने स्पष्ट केलं.

पाच वर्षांपूर्वीपर्यंत ज्याचं नावही कोणाला माहिती नव्हतं अशा स्पोर्टमध्ये रोहितने प्रावीण्य मिळवलं आहे. त्याच्या स्वप्नांनुसार हा खेळ भारतातही स्पोर्ट म्हणून बघितला जावा यासाठी तो प्रयत्नशील आहे. अधिकाधिक लोकांना या क्षेत्रात प्रशिक्षण देण्याची त्याची इच्छा आहे.

‘लाईफ इज ऑल अबाऊट बॅलन्सिंग! माझ्या विचारांनुसार एकाच वेळी नोकरी, जबाबदाऱ्या, आईवडील, नातेवाईक, मित्रमैत्रिणी इत्यादी सगळ्या गोष्टी सांभाळतानाच आपली पॅशनही जपायची असते. म्हणजे थोडक्यात ही तारेवरची कसरत असते. हायलायनिंगमध्ये जसं दोन्ही हात पसरून, पायांकडे लक्ष देऊन, उंचीचा अंदाज घेत असा सगळ्याच पद्धतीने बॅलन्स सांभाळावा लागतो तसंच एकावेळी या सगळ्या गोष्टी आयुष्यातही सांभाळाव्या लागतात. जसं कोणत्याच कारणाने आपल्याला बॅलन्सिंगमधली एकही गोष्ट सोडून चालत नाही तसंच आपल्याला या कोणत्याच गोष्टीत कॉम्प्रोमाइज करता येत नाही आणि पॅशनशी तर अजिबातच नाही’ -रोहित वर्तक

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2019 3:21 am

Web Title: adventure sports highlighting climbing experience akp 94
Next Stories
1 ट्रेक फॅशन
2 टेकजागर : समाजमाध्यमांवरील प्रभावाचा भाव
3 ‘इंटिरिअरवरही तत्त्वज्ञानाचा प्रभाव’
Just Now!
X