07 July 2020

News Flash

आठवणींचा अल्बम

काळ जरी बदलला असला तरी आठवणी जपण्यासाठी आजही फोटोंना तितकंच महत्त्व आहे.

लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातला महत्त्वाचा टप्पा आणि त्याचा सोहळा हा प्रत्येकासाठी अविस्मरणीय अनुभव असतो. या सोहळ्याच्या आठवणींना दृश्यस्वरूप देण्याचं काम करत असतात ते म्हणजे लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ शूटिंग !

लग्नाचा अल्बम उघडला गेला की, त्यासोबत आपोआपच त्याच्याशी जडलेल्या आठवणी उलगडू लागलात नि पुन्हा ते जुने किस्से, जुन्या माणसांच्या गोष्टी, ओळखीपाळखी सांगितल्या जातात.
काळ जरी बदलला असला तरी आठवणी जपण्यासाठी आजही फोटोंना तितकंच महत्त्व आहे. मात्र पूर्वीचा टिपिकल फोटो अल्बम जाऊन त्यात नावीन्य आलं आहे. फोटोंमध्ये आणि ते खुलवण्यामध्येदेखील नावीन्य आहे. हल्ली पोज देऊन फोटो काढण्यापेक्षा नैसर्गिक आणि नकळत काढले जाणारे फोटो हवेहवेसे वाटतात. अशा कँडिड शॉट्सना मागणी असते. सोहळ्याचे साचेबद्ध रीतीने फोटो काढण्याऐवजी वेगळी फोटो ऑकेजन्स हल्ली शोधली जातात. नववधूची मिरर पोज असेल किंवा मग तिचं मागे वळून पाहणं असेल, तिच्या नकळत हे फोटो आवर्जून काढले जातात, अर्थात तिने आधी दिलेल्या सूचनेनुसारच. सध्याच्या वेडिंग फोटोग्राफीमधल्या ट्रेण्डबद्दल सांगताना फोटोग्राफर निखिल चिवटे म्हणाला की, ‘प्री वेडिंग, पोस्ट वेडिंग, कँडिड फोटोशूटची मागणी वधू-वरांकडून केली जाते. प्री वेडिंग फोटोशूटमध्ये जोडप्यावर आम्हाला फोकस करता येतो.
हे फोटोशूट अगदीच कॅज्युअली केलं जातं, कधी कधी वधू-वरांची प्रेमाची गोष्ट यातून उलगडली जाते. हे फोटो काढताना आम्हाला वधू-वरांचा योग्य तितका वेळ घेता येतो आणि तसंच निसर्गरम्य ठिकाणी जाऊन फोटोशूट करण्याचा पर्यायही असतो. त्यात नवनवीन तांत्रिक बाबींचा उपयोग करून फोटो कसे चांगले येतील यावर भर दिलेला असतो. नैसर्गिक हावभाव टिपलेले लोकांना आवडतात.’
फोटो अल्बमही मग या फोटोंना तितकाच न्याय देणारा बनवला जातो. फोटो अल्बमचं स्वरूप बदलून ‘वेडिंग कॉफी टेबल बुक’, ‘फोटोबुक’ असं केलं जातं. त्यातही आता फिक्स फोटो अल्बमची संकल्पना रुळली आहे. फोटोग्राफर अमित कुलकर्णी म्हणाले, ‘कँडिड फोटोग्राफी करत असताना वधू-वर, आई-वडील, काही जवळचे नातेवाईक, मित्रमंडळी अशा वधू-वरांच्या जवळच्या नातेवाईकांवर फोकस केला जातो. अल्बम प्रिंट करताना हेच फोटो सहसा यांचेच फोटो प्रिंट करून घेतले जातात. अल्बम प्रिंटिंगमध्ये चांगल्या प्रतीच्या मटेरिअलचा वापर केला जातो; जेणेकरून अल्बम आकर्षक दिसेल. लेदर बाऊंड, वेलवेट पेपर, कॅन्व्हास पेपर यापासून अल्बम कव्हर्स बनवतात. या फोटोबुकमुळे फोटो खराबही होत नाहीत.’ त्यामुळे आता त्या अल्बमचं आयुष्यही वाढलंय असं म्हणायला हरकत नाही.
कँडिड फोटोग्राफीसोबत व्हिडीओग्राफीच्या माध्यमातून लग्नाची शॉर्ट फिल्म बनवण्याकडे काही नवदाम्पत्यांचा कल आहे. लग्न कुठे आहे, किती लोक, कशा प्रकारचे फोटो यानुसार बजेट ठरतं. तरी साधारणपणे २०,००० ते ४०,००० रुपयांपासून याची सुरुवात होते. मागणीनुसार बजेट वाढत जातं. लग्नावर जितका खर्च केला जातो तो लक्षात घेता लोक फोटोग्राफीवरदेखील तितकाच खर्च करतात. फोटोग्राफर धनश्री आवळस्कर म्हणाल्या की, ‘हल्ली वधू-वर कँडिड तर त्यांचे आई-वडील पारंपरिक विधी आणि पोज देऊन फोटो काढण्यास सांगतात तेव्हा आम्ही दोन्ही गोष्टींची फोटोंच्या माध्यमातून सांगड घालण्याचा प्रयत्न करतो. आजकाल प्रत्येक फोटोग्राफरची स्वत:ची अशी वेबसाइट असते. त्यामुळे लोकांना अनेक पर्याय उपलब्ध झालेले आहेत. डिजिटल फोटोबुक, फेसबुकवरचे फोटो पाहून वधू-वर त्यांना हवं तसं फोटोशूट करून घेण्यास आग्रही असतात.’ वेगवेगळ्या ठिकाणी पाहिलेले फोटो पाहून लग्नकार्यात नवनवीन संकल्पना आता येतायत. आणि त्यावर मेहनत व तितकाच खर्च केला जातो, त्यामुळे लग्नसोहळा कायमस्वरूपी अविस्मरणीय करणारा आठवणींचा अल्बम तर सुंदर होईलच..!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 27, 2015 1:06 am

Web Title: album memories
Next Stories
1 ‘बँड-बाजा-वराती’च्या पलीकडे
2 क्लिक
3 उदितजी द बॉस
Just Now!
X