‘ती’ येणं ही जरी अत्यंत नैसर्गिक गोष्ट असली तरी आजही ‘ती’ खासगी.. खरं तर शरमेची बाबच मानली जाते. ‘तिच्याविषयी’ आजही घरात उघडपणे बोललं जात नाहीच. आजही ‘ती’ लपवण्याची गोष्ट असते. आई आजीच्या काळाच्या मानाने ‘तिला’ तशी बऱ्यापैकी ‘मोकळीक’ मिळालेली असली तरी ‘तिचं’ देवाशी असलेलं ‘क्रॉस कनेक्शन’ अजूनही कुठे तरी मूळ धरून आहेच. ‘ती’ म्हणजे अशुचि. ‘ती’ असेल तेव्हा घर अमंगळ, अपवित्र! कमाल आहे ना.. आजच्या काळातली आधुनिक विचारसरणीची मुलगीदेखील ‘तिच्या’विषयीच्या भ्रामक तिढय़ातून पूर्णत: सुटलेली नाही.
घरच्या गणपतीची सजावट श्रेया आठ दिवस खपून करत होती. गणेश चतुर्थीच्या दिवशी सजावट बघायला तिने सगळ्या मैत्रिणींना बोलावलं होतं. पण त्या दिवशी सकाळी उठल्या उठल्याच तिला जाणवलं.. ‘ती’ आलीय. पूजेची तयारी होईपर्यंत ती काही बोलली नाही. स्वयंपाकघरातून नैवेद्यासाठी तयार होणाऱ्या मोदकांचा आणि इतर पदार्थाचा घमघमाट येऊ लागला होता एव्हाना. तिनं हळूच आईच्या कानात जाऊन सांगितलं ‘ती’ सुरू झाल्याचं. असंच हळू आवाजात सांगायचं, असंच आई म्हणाली होती तिला.. सहा महिन्यांपूर्वी पहिल्यांदा पाळी आली, तेव्हा याबद्दल आईनं बाजूला घेऊन चार गोष्टी सांगितल्या होत्या. तेव्हा त्याबद्दल अशी गुप्तता पाळण्याचेही संकेत दिले होते. आणि आत्ता हे ऐकल्यावर आई जवळजवळ खेकसलीच अंगावर.. ‘इथे काय घुटमळतेयस मग? मला कशाला शिवलीस? खोलीत जा आधी आपल्या. आपला नवसाचा गणपती आहे. गुरुजी आलेत पूजेला.’ श्रेयाला रडायलाच आलं. देवघरात जायचं नाही, हे आईनं सांगितलेल्या चार गोष्टीत होतं. पण गणपतीतसुद्धा? आणि मग माझ्या आवडीच्या मोदकांचं काय, ते तरी खायला मिळणार का? आणि संध्याकाळी मैत्रिणी घरी येणारेत माझी सजावट बघायला त्याचं काय? ..सगळं रद्द आता. बसा या खोलीत एकटं.. गणपतीच्या दिवसात हा प्रसंग कुणाच्या ना कुणाच्या बाबतीत अनेकींनी अनुभवला असेल. त्याविषयी चीड, दु:ख, निराशा, अगतिकता, अलिप्तपणा काहीतरी नक्कीच आलं असेल.
आजही मासिक पाळी आणि देवाचा संबंध लावताना आडून आडून का होईना पण ‘श्रद्धेचा’ मुद्दा येतोच. शाळेत-कॉलेजमध्ये काही तरी वेगळं शिकत असतो आणि वागत तर असतो त्याविरोधी. गोंधळ होतो मनात. अगदी मनापासून पटलं नाही तरी घरात अशीच ‘रीत’ आहे ना म्हणत सहन करतो शेवटी! यावर इलाज..
सणावाराला ‘ती’ येऊ नये म्हणून प्रार्थना करायची किंवा मग सोयीस्करपणे आधुनिक वैद्यकीय शास्त्राचा आधार घेत गोळ्या घ्यायच्या. सणावारी- विशेषत: गणपतीत किंवा इतर महत्त्वाच्या पूजेच्या वेळी पाळी येऊ नये म्हणून गोळ्या घेऊन पाळी पुढे ढकलणाऱ्या अनेक स्त्रिया दिसतात. वयात आल्यापासून ‘पाळी आल्यावर देवाजवळ जायचं नाही’ ही गोष्ट मुलींवर इतकी बिंबवली जाते की बऱ्याचदा मुलींनी नंतर जरी या गोष्टीचा सखोल विचार करायचं ठरवलं तरी पाळी असताना देवाजवळ जाणं, पूजा करणं आजही अनेक मुलींना चुकीचं वाटतं. दुसऱ्या बाजूला अशाही अनेक मुली दिसतात ज्यांना सुरुवातीपासूनच ही गोष्ट खूप खटकलेली असते. त्या त्यांच्या परीने घरगुती पातळीवर याविरोधात सो कॉल्ड प्रथेशी संघर्ष करताना दिसतात.
‘पाळीचा देवाशी काय संबंध?’ हा अत्यंत स्वाभाविक प्रश्न त्यांच्या मनाला छळत राहतो. पण चिडचिड व्यक्त करण्यापलीकडे त्या काही करू शकत नाहीत. गणपतीत अचानक ‘तिचं’ येणं झालं की आजही घरच्या वातावरणात होणारे बदल चटकन लक्षात आल्यावाचून राहात नाहीत. कल्याणची कविता चौधरी- इंजिनीअरिंगला शिकणारी मुलगी. तिच्या घरी ती लहान असल्यापासून गणपती येतात. पण वयात आल्यानंतर केवळ पाळी आली म्हणून देवांच्या खोलीत जायचं नाही. गणपतीच्या पूजेत सहभागी व्हायचं नाही, या गोष्टीचा तिला खूप राग यायला लागला. ‘पाळीकडे जर तुम्ही सकारात्मक दृष्टीने पाहिलंत तर त्यात घाण वाटावं असं काही नाही. या गोष्टीमुळेच आज संसार चाललाय. गणपतीच्या दिवसात पाळी असताना गणपतीच्या मूर्तीला हात नाही लावणार पण मग देवीची पूजा करायला का हरकत असावी. देवी हे शेवटी एक स्त्रीरूपच आहे’, कविता म्हणते.
पालघरला राहणाऱ्या ऋतुजा राऊतला गणपतीत पाळी असल्यानं पूजेला बसू दिलं नाही. ऋतुजा सध्या राज्यशास्त्र या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. ‘गणपतीत पाळी आलीय असं माझ्याबाबतीत २-३ वेळा झालंय. गणपतीत पाळी आली की घरचे पूजेसाठी बसू देत नाहीत. मी आरती घेते. प्रसाद खाते. पण मग मला पूजेसाठी का बसू दिलं जात नाही, याचा खूप राग येतो. काही गोष्टी केलेल्या चालतात. मग बाकी गोष्टी न करण्याची सक्ती का? मी घरच्यांना याविषयी खूप वेळा समजावण्याचा प्रयत्न करूनसुद्धा ते माझं ऐकत नाहीत.’ ‘घरात कुठलं कार्य आहे, पूजा आहे आणि आम्ही मात्र केवळ पाळी आली म्हणून तिथे फिरकायचं नाही, हे खूपच मानहानीकारक वाटतं मला’.. मुंबईची अमृता सांगते. तिच्या मनात मात्र पाळीच्या दिवसात असं बाजूला बसण्याविषयी इतकी चीड आहे की, तिने सरळ घरात तिचं वेगळं देवघर केलंय. ‘माझ्या देवघरात मी हा असला भेदभाव करत नाही. कुणाच्याही परवानगीशिवाय माझ्या देवांना हवं तेव्हा स्पर्श करू शकते. पूजा करू शकते’.. अमृता सांगते.
उच्चशिक्षण घेणाऱ्या इतर काही जणींचं मात्र याबाबतीत काहीही म्हणणं नाहीय. पॅरामेडिकल करणाऱ्या मुग्धा पटवर्धनच्या घरचं वातावरण खूप ‘लिबरल’ आहे. गणपतीत घरात कुठेही वावरताना तिच्यावर कुठल्याही प्रकारचं बंधन नसतं. पण त्या दिवसांत तिला स्वत:ला देवांजवळ जावंसं वाटत नाही म्हणून ती जात नाही. घरच्या कुणीही तिला देवाजवळ किंवा मूर्तीजवळ जाऊ नकोस, मूर्तीला हळदकुंकू वाहू नकोस असं सांगितलेलं नाही. हे ती तिच्या मर्जीने करते. ‘माझी जर देवाविषयी डोळस श्रद्धा असेल तर त्या चार दिवसांत मूर्तीजवळ जाणं- न जाणं, मूर्तीला हात लावणं- न लावणं, पूजा करणं- न करणं या गोष्टींनी काही फरक पडत नाही. कुठलाही देव पाळीच्या दिवसात माझी पूजा करू नका असं सांगत नाही. पण त्याचबरोबर पाळी असताना कुठलेही ग्रह मनात न ठेवता पूजा कराच अशी बळजबरीही करत नाही. हा शेवटी ज्याचा त्याचा निर्णय असतो आणि तो तसाच असावा.’ मुग्धा म्हणते.
प्राजक्ता एकबोटे थोडा वेगळा मुद्दा मांडते. प्राजक्ता म्हणते, ‘माझ्या श्रद्धेच्या संकल्पनेत पाळीला महत्त्व नसलं तरी दुसऱ्या एखाद्याच्या श्रद्धेच्या संकल्पनेत पाळीला महत्त्व दिलं जात असेलही. आपली श्रद्धेची संकल्पना ठरवण्याचं स्वातंत्र्य त्यांना नक्कीच आहे. त्यामुळे इतरांच्या भावना दुखवू नयेत म्हणून मी मूर्तीला हात लावणं किंवा पाळी असताना मित्रमैत्रिणींच्या घरी गणपतीत दर्शनाला जाणं टाळते.’ अंबरनाथच्या मनुजा देशपांडेचं मात्र गणपतीत पाळी असताना वेगळं बसावं लागण्याविषयी काहीच म्हणणं नाही. मनुजा सध्या एम.कॉम. करतेय. पाळी असताना देवाजवळ जायचं नाही किंवा पूजेत सहभागी व्हायचं नाही हे असंच मनावर बिंबवलं गेल्यामुळे मला त्याचं विशेष वाटत नाही. ‘त्या दिवसांत कुणी मला पूर्णत: वाळीत टाकतं अशातला भाग नाही. फक्त कुणी घरातल्या वस्तूंना मला हात लावू देत नाही. माझ्या वस्तूही ते मला हातात आणून देतात. पण माझं याविषयी काहीच म्हणणं नाही.’ मनुजा म्हणते.
पाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्यांना मात्र या सगळ्यांचाच विरोध जाणवला. जी गोष्ट नैसर्गिक आहे ती तशीच व्हायला हवी. गोळ्या घेऊन स्वत:च्या शरीरावर वाईट परिणाम होऊ देण्याला ‘श्रद्धा’ म्हणून तरी कशी मान्यता द्यायची, हा मुद्दा सगळ्यांनीच मांडला. पाळीच्या नावाखाली कुठल्याही चुकीच्या गोष्टींना खतपाणी घालणं तरी आपण नक्कीच टाळू शकतो हे एवढंच म्हणणं. बाकी कुणी ‘तिचं’ कशा प्रकारे स्वागत करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न.
लीना दातार