शब्दांकन : वेदवती चिपळूणकर

‘गोलमाल’ या मराठी चित्रपटातून तिने मराठी सिनेविश्वात पदार्पण केलं. मराठीमध्ये लोकप्रिय असतानाच तिने हिंदी चित्रपटसृष्टीतही पाऊल ठेवलं. ‘नच बलिए’सारख्या हिंदी रिअ‍ॅलिटी शोमधून दिसलेल्या तिच्या नृत्यकलेलाही प्रेक्षकांनी पसंतीची पावती दिली. एकाच पठडीतल्या भूमिका न करता सतत प्रेक्षकांना काहीतरी नवीन देणारी ही मराठी अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर. ‘लोकसत्ता व्हिवा लाऊंज’च्या माध्यमातून तिच्याशी मोकळ्या गप्पा मारण्याची संधी तिच्या चाहत्यांना मिळाली. ‘जागतिक महिला दिना’च्या पूर्वसंध्येला पुण्यात झालेल्या ‘व्हिवा लाऊंज’ कार्यक्रमात अमृताशी संवाद साधला ‘लोकसत्ता’च्या प्रतिनिधी रेश्मा राईकवार आणि भक्ती बिसुरे यांनी..

एखादं क्षेत्रच तुम्हाला निवडतं

एका सामान्य मध्यमवर्गीय घरातून मी आले आहे. शिक्षण वगैरे करून घरात चार पैसे कमवून आणावेत एवढीच माझी इच्छा होती. लहानपणापासून मी नकला वगैरे करायचे. तेव्हा सहज विचार आला की या क्षेत्रात यायचा प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे! मग मी अतुल शिधये यांच्याकडून तेव्हा मोजकेच फोटो काढून घेतले आणि त्यांनी कोणताही मोबदला न घेता माझे फोटो काढले. ‘झी सिने स्टार्स की खोज’ या रिअ‍ॅलिटी शोमध्ये मी भाग घेतला, पण जिंकले नाही. मात्र त्यातून या क्षेत्राकडे वळण्यासाठीचा जो हलकासा ‘पुश’ हवा होता तो मिळाला. मग मी पुण्याहून मुंबईत आले. मुंबईत मला काम मिळालं तरच आपण मुंबईत राहू, असं मी आईला सांगितलं होतं. मात्र तशी वेळ आली नाही, मला हळूहळू कामं मिळत गेली.

शिक्षण सोडू नका!

अभिनयाचं क्षेत्र खूप अनिश्चित आहे. त्यामुळे आपलं शिक्षण आधी पूर्ण करून कोणत्याही अनिश्चित क्षेत्राकडे वळायचा निर्णय घ्यावा असं मला वाटतं. मीसुद्धा ग्रॅज्युएशन पूर्ण करून मग यात प्रवेश केला. त्यामुळे माझ्याकडे स्वत:साठी एक समाधान आहे की उद्या मला काहीच काम मिळालं नाही तर मी कमीतकमी अकाउंट्स तरी बघू शकते. मात्र या क्षेत्राचं म्हणून मी काही विशेष प्रशिक्षण घेतलेलं नाही किंवा मी नृत्यही शिकलेलेही नव्हते. अनुभवातून मी शिकत गेले. अजूनही मला सगळ्यातलं सगळं अजिबात येत नाही. एक डान्स रिअ‍ॅलिटी शो जिंकला म्हणजे मला सगळं आलं असं अजिबातच नाही. सतत होणारे बदल शिकण्याची तयारी मात्र पाहिजे. ते तर कोणत्याही नोकरीत करावं लागतंच की, तसंच इथेही स्वत:ला एका जागी थांबवून ठेवून चालत नाही.

दृष्टिकोन बदलला पाहिजे

आपण एखाद्या चेहऱ्याला, एखाद्या कलाकाराला आणि त्याच्या कलेलाही एका साच्यात बंद करून लेबल लावून मोकळे होतो. अशाने आपण प्रेक्षक म्हणून आणि निर्माते-दिग्दर्शक म्हणूनही त्या कलाकाराच्या कामात वैविध्य येण्याची संधी हिरावून घेतो. एखादी अभिनेत्री ग्लॅमरसच दिसते किंवा एखादीचा डस्की लुक आहे अशी परिमाणं आपण तिला लावतो. त्याच प्रकारच्या भूमिका मग तिला मिळायला लागतात. टाइपकास्ट केलेलं कोणालाच आवडत नाही. प्रत्येकातलं टॅलेंट बघण्याची आणि ओळखण्याची नजर दिग्दर्शकाकडे असली पाहिजे तरच कलाकाराला नवनवीन संधी मिळत राहू शकतात. या बाबतीत सुबोध भावेला मी खूप मानते. त्याने माझ्यात कटय़ारमधली ‘झरीना’ बघितली आणि म्हणून मला ती भूमिका मिळाली. एखाद्याचा चेहरा आणि त्याच्या आतापर्यंतच्या भूमिका किंवा त्याचं राहणीमान यावरून त्याची ‘कलाकार’ म्हणून पारख करणं मला पटत नाही. बॉलीवूडमध्ये जुन्या भूमिकांच्या चक्रातून बाहेर पडण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जातो, तोच आपल्याकडेही व्हायला हवा, असं मला मनापासून वाटतं.

स्वत:चा प्रवास बघावा!

माणसाने काळानुसार तर बदललं पाहिजेच, पण काळापेक्षाही स्वत:च्या आजवरच्या प्रवासाकडे पाहून माणसाने अधिक बदललं पाहिजे. आपण कुठून आलो आहोत, आपली मुळं कुठे आहेत आणि आपण किती साधे होतो याकडे लक्ष ठेवत वाटचाल केली पाहिजे, म्हणजे आपल्यातला साधेपणा आणि निर्मळपणा टिकून राहतो. आपल्या स्वत:बद्दलची व्हिजन फक्त आपल्या एकटय़ालाच असू शकते. त्यामुळे स्वत:ला ओळखण्यात आपण चूक करता कामा नये.

मुलं आणि मुली दोघंही सेफ नाहीत

‘मी टू’चे जे प्रसंग घडले आहेत ज्याबद्दल आत्ता बोललं जातंय किंवा आत्ता जे घडतायत त्यांच्याबद्दल मी थेट बोलणं योग्य ठरणार नाही, कारण मला तसा कोणताच अनुभव आजपर्यंत आलेला नाही. मात्र कोणत्याच क्षेत्रात, मुलं काय किंवा मुली काय कोणीच पूर्णत: सुरक्षित नाहीत. कॉर्पोरेटमध्ये या गोष्टी घडत नाहीत का? या गोष्टी सगळीकडे घडतात. मात्र अभिनयाचं क्षेत्र जगासमोर चटकन येतं त्यामुळे त्यातल्या गोष्टी दिसण्यात येतात. अर्थात याबाबतचा सगळाच अप्रोच हा खूप वैयक्तिक आहे. त्यामुळे त्यावर तिसऱ्या कोणी भाष्य करणं तसं फारसं योग्य नाही.

स्टेडी बट स्टेबल

करिअरचा ग्राफ वगैरे असं काहीच मी विशेष डोक्यात ठेवलं नव्हतं. रोज काहीतरी काम आपल्याकडे असलं पाहिजे ही माझी इच्छा आणि गरज दोन्ही होती. रिकामं बसून राहायला लागता कामा नये याकडे माझं लक्ष असायचं. त्यामुळे कोणत्याच कामाला ‘नाही’ न म्हणता मी इथवर येऊन पोहोचले आहे. एकाच वेळी मी हिंदी सिरियलही करत होते. त्याच वेळी मला राम गोपाल वर्मा यांच्या ‘फूंक’मध्ये काम करायची संधी मिळाली. त्या वेळी मी त्यांनाही हे सांगितलं होतं की माझ्या हिंदी सिरियलच्या शूटिंगनुसार मला सिनेमाचं शूटिंग करता येईल. तेव्हा मी त्यांना आगाऊ  वाटले असेन कदाचित, पण एका सिनेमासाठी मी सुरू असलेली सिरियल वाऱ्यावर सोडू शकत नव्हते. माझ्याकडे काम असणं ही माझी प्रायॉरिटी होती. घाईघाईने सगळ्या गोष्टींच्या मागे लागण्यापेक्षा एकेक गोष्ट हळूहळू करत गेल्यामुळे माझ्या कामात सातत्य राहिलं.

चार लोक काय म्हणतील?

सोशल मीडिया हा प्रकार म्हणजे जुन्या काळी ‘लोक काय म्हणतील’ ही जी संकल्पना होती तिचंच तांत्रिकदृष्टय़ा पुढारलेलं (?) स्वरूप! आपल्या नातेवाईकांमध्येपण असे काही नातेवाईक असतात जे उगीचच कॉमेंट्स करत असतात. पण आपण त्यांना फार सिरियसली घेत नाही, तरीही त्यांचे लाड करतो आणि त्यांच्याकडून लाड करून घेतो. या सोशल मीडिया फॅन्सचं अगदी तसंच असतं, असं मला वाटतं. त्यांना आपली एखादी गोष्ट आवडली नाही की ते निगेटिव्ह कॉमेंट्स करत सुटतात आणि नवीन काही आवडणारी गोष्ट दिसली की पुन्हा आपलं कौतुक करायला लागतात. माझी आजी एकदा म्हणाली की कसं होणार हिचं, एवढी मोठी झाली तरी अजून लग्न झालं नाही वगैरे.. त्या वेळी मी ते नुसतं ऐकून घेतलं आणि तिचं बोलून झाल्यावर तिला विचारलं, ‘आजी मी तुझे पाय चेपून देऊ?’ त्यावर ती आधीचं सगळं बोलणं विसरून छान हो म्हणाली आणि पायही चेपून घेतले. हे फॅन्स प्रकरण त्याचसारखं आहे, थोडेसे लाड केले की विरघळतात. हो पण ज्यांना या सोशल मीडिया, ट्रोलिंग अशा गोष्टींचा फार त्रास होतो त्यांनी ‘कॉमेंट्स’ सेक्शन बंद ठेवावं किंवा दुर्लक्ष करणं अंगवळणी पाडून घ्यावं. सोशल मीडिया हा चार लोकांपर्यंत पोहोचण्यासाठीचा मार्ग आहे. आपल्याला कम्फर्टेबल असेल तर आपण त्याचा वापर करावा नाहीतर करू नये.

आजची पिढी वेगळी आहे

तशी मी अगदीच जुन्या पिढीची नसले तरी माझे आईबाबा आणि आताचे पालक यांच्यात फरक आहे, तसंच तेव्हाची आम्ही मुलं आणि आताची मुलं यांच्यातही फरक आहे. लहान मुलांच्या डान्स रिअ‍ॅलिटी शोचं परीक्षण करत असताना मला ही गोष्ट प्रकर्षांने जाणवली. आपल्याला त्या वयात किती गोष्टी माहीत नव्हत्या ज्या त्यांच्या पालकांना माहिती आहेत असं मला वाटलं. कुठल्या कॅ मेऱ्यात बघ इथपासून ते स्टेपमध्ये कशी नजाकत आण वगैरे सगळं पालकच त्यांना सांगत होते. त्या वेळी मला त्यांचं काहीसं कौतुकही वाटत होतं आणि दुसऱ्या बाजूला त्या मुलांचं खेळण्याचं लहानसं वयही दिसत होतं. आताच्या पिढीला सगळ्याच बाबतीत खूप जास्त माहिती आहे. त्यांच्या करिअरच्या दिशा, संधी, त्यासाठीचं शिक्षण या सगळ्याबद्दल त्यांना खूप गोष्टी माहिती असतात. आम्ही परिस्थितीमुळे असेल कदाचित पण, चाचपडत सुरुवात केली. आजचे पालक आणि मुलं दोघंही ‘सॉर्टेड’ वाटतात.

स्वत:ला ‘मिडास टच’ समजू नका

प्रत्येक वेळी आपण करतो ते काम उत्तमच असतं असं स्वत:च गृहीत धरू नका. बोटावर मोजण्याइतकीच माझी कामं ‘हिट’ म्हणता येतील. मी सगळीकडे दिसते असंही होत नाही आणि मी करते ते सगळंच लोकांना आवडतं असंही नाही. त्यामुळे स्वत:च स्वत:चा भाव वाढवून न घेतलेलाच बरा ! मात्र हेही तितकंच खरं की एकदा ती हवा डोक्यात जायलाच हवी, जेणेकरून खाली आपटल्यावर आपल्याला पुन्हा वास्तवाचं भान येतं. एकदा स्वत:ला ‘ग्रेट’ म्हणायला सुरुवात केली की ही हवा डोक्यात शिरायला वेळ लागत नाही. ‘कटय़ार काळजात घुसली’ या चित्रपटानंतर मलाही असंच वाटलं होतं की आता माझ्याकडे कामं स्वत:हून चालून येतील, पण असं काहीही होत नसतं. स्वत:लाच उठून स्वत:साठी योग्य त्या कामाच्या शोधार्थ बाहेर पडावंच लागतं. वाघाला मोठी झेप घ्यायची असेल तर त्याला दोन पावलं मागे जावं लागतं, असं म्हणतात. तसंच आपण स्वत:ला सांगायचं आणि नव्या जोमाने कामाला लागायचं.

साधंसुधं घर

१६-१७ वर्षांची असतानाच मी ‘मोठी’ झाले होते. घरासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे ही जाणीव लहानपणापासूनच असल्यामुळे मी नववीत असताना कॉन्टॅक्ट लेन्सेस विकायचं काम केलं. या क्षेत्रात येण्याआधी मी कॉल सेंटरमध्येही काम केलं. मी काही सुंदर वगैरे दिसते असं माझ्या आई-वडिलांना कधीच वाटलं नाही, अजूनही बहुतेक वाटत नाही. माझी लहान बहीण शाळेत पुढच्या वर्षांत तरी जाईल की नाही अशी शंका माझ्या आई-बाबांना यायची. साधारण शिक्षण घ्यायचं, थोडा काळ नोकरी करायची आणि सामान्यत: लग्नाचं वय झालं की मुलींचं लग्न करून द्यायचं असं घरच्यांचं ठरलेलं होतं. मी इतक्या साध्या विचारांच्या घरातच लहानाची मोठी झाले.

काहीतरी चुकतंय..

एक मधला काळ जेव्हा माझ्याकडे काम नव्हतं तेव्हाही मला असं वाटलं की मी काही एक्स्प्लोअर करतच नाहीये ! माझ्या मते ‘यू आर अ‍ॅज गुड अँड अ‍ॅज बॅड अ‍ॅज युअर लास्ट फिल्म’ ! त्यामुळे मी जर काही नवीन शोधलंच नाही तर मला नवीन काम मिळणारच नाही हे मला थोडं उशिरा लक्षात आलं. मात्र ते लक्षात आल्यावर मी कास्टिंग डायरेक्टर्सना फोन करून ऑडिशन्सबद्दल चौकशी करत असायचे. ‘आता कामं माझ्याकडे आली पाहिजेत’ हा अ‍ॅटिटय़ूड थोडा काळ माझ्याकडे टिकला, पण अशाने कामं येत नाहीत हे कळल्यावर मी हातपाय हलवायला सुरुवात केली. काय काम करायचं आणि ते कशा पद्धतीने करायचं याबद्दलचे विचार ठाम असले पाहिजेत.

viva@expressindia.com