26 October 2020

News Flash

माध्यमी : पडद्यामागची गोष्ट

अपर्णा पाडगावकर यांनी पत्रकारितेतून सुरुवात करून मनोरंजन क्षेत्रातल्या निर्माती-दिग्दर्शिकेपर्यंत प्रवास केला आहे.

अपर्णा पाडगावकर

वेदवती चिपळूणकर – viva@expressindia.com

इथे यायचं असेल तर स्वत:ला सतत तपासून बघण्याची तयारी हवी. मनोरंजन हे क्षेत्र असं आहे की इथे नावीन्याला महत्त्व आहे. तुमचं काम नवीन असायला हवं असेल तर तुम्हाला तुमचं मन आणि बुद्धी सतत ताजीतवानी ठेवावी लागेल. त्यासाठी सतत नवं काही वाचणं, बघणं, नवे अनुभव घेणं हे करत राहायला हवं. शारीरिक कष्ट कुठल्या क्षेत्रात नसतात? इथे थोडे अधिक आहेत, इतकंच. पण हे क्षेत्र  तुमच्या आवडीचं असेल, तर त्या कष्टांची तमा बाळगण्याचं कारण नाही. झटपट यश तितक्याच पटपट विरूनही जातं.  किमान दोन र्वष तरी इथली तुमची गुणवत्ता सिद्ध करायला स्वत:ला द्या. इंडस्ट्री गुणवान लोकांची नेहमीच कदर करते.- अपर्णा पाडगावकर

भारतीय स्त्रियांसाठी मल्टिटास्किंग ही संकल्पना अजिबातच नवी नाही. त्यामुळे एकाच वेळी कितीही कामं त्या करू शकतात. त्यांनी हाती घेतलेल्या प्रत्येक कामात त्या एक्स्पर्ट असतात. साहजिकच कोणतीही नवीन गोष्ट शिकण्याची, करून बघण्याची आवड त्यांच्यात असतेच. फरक इतकाच की काही स्त्रिया ती आवड केवळ घरापुरती बाळगतात तर काही स्त्रिया त्यातून स्वत:चं करिअर घडवतात. कोणत्याही क्षेत्रात गेल्या तरी अनेक गोष्टी शिकून घेणं, प्रयोग करणं, प्रयत्न करत राहाणं, इत्यादी गोष्टी स्त्रिया करतच असतात. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या कामांचा त्यांना अनुभवही असतो आणि त्याबद्दलचं ज्ञानही! अशाच विविध क्षेत्रांत वावरलेल्या आणि मनोरंजन क्षेत्रात स्थिरावलेल्या माध्यमी अपर्णा पाडगावकर. पत्रकारितेतून सुरुवात करून मनोरंजन क्षेत्रातल्या निर्माती-दिग्दर्शिकेपर्यंत त्यांनी प्रवास केला आहे.

‘माध्यमातल्या माझ्या करिअरची सुरुवात लोकसत्तामधूनच झाली आहे,’ असं अपर्णा सांगतात. ‘वेगवेगळ्या वृत्तसमूहांत काम करून मग मी मनोरंजन क्षेत्राकडे वळले. लेखन, दिग्दर्शन, निर्मिती अशा अनेक बाजू मी सांभाळल्या आहेत,’ असं त्या म्हणतात. अपर्णा पाडगावकर सध्या हिंदीत ‘मेरे साई’ आणि मराठीत ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’, ‘सावित्री-जोति’ या मालिकांसाठी क्रिएटिव्ह प्रोडय़ुसर म्हणून काम करत आहेत. मागील पाच वर्षांपासून त्या क्रिएटिव्ह क्षेत्रात काम करण्याच्या इच्छेने ‘दशमी क्रिएशन्स’सोबत जोडल्या गेल्या आहेत. ‘पत्रकारितेमुळे समाजाकडे जवळून निरखून बघण्याची दृष्टी मिळाली. त्या दृष्टीचा उपयोग आज सिनेमा आणि मालिका क्षेत्रांत काम करताना होतो. शेवटी लेखक आणि प्रेक्षक एकाच समाजाचा भाग आहेत. ‘बुकशेल्फ’सारखा कार्यक्रम दिग्दर्शित करताना अनेक तांत्रिक गोष्टी शिकता आल्या,’ असं त्या सांगतात. अपर्णा यांचं मूळ शिक्षण विज्ञान शाखेतलं आणि त्यानंतर त्यांनी मॅनेजमेंटचीही पदवी घेतली. या दोन्हींचा उपयोग त्या माध्यमांच्या क्षेत्रातही वेळोवेळी करत आलेल्या आहेत. त्या म्हणतात, ‘मॅनेजमेंटच्या अभ्यासक्रमातल्या गोष्टींचा प्रत्यक्ष आयुष्यात अनेक गोष्टी एका वेळी करण्यासाठी खूप उपयोग होतो. मायक्रोबायोलॉजीचं किंवा केमिस्ट्रीचं प्रात्यक्षिक करताना वेळेचं नेमकं आणि अचूक भान ठेवावं लागतं. या गोष्टीचा वेळेच्या नियोजनासाठी खूप उपयोग होतो. कोणत्याही पुढच्या पायरीवर जाताना आपण मागच्या प्रत्येक पायरीवर गोळा केलेलं संचित घेऊनच पुढे जात असतो.’

माध्यमांत काम करताना स्त्रियांना सामान्यत: येणारी अडचण म्हणजे कामाच्या अनिश्चित वेळा. चित्रपट, मालिका कोणत्याच क्षेत्रात केवळ ऑफिस टायमिंगमध्ये कामं होत नाहीत. त्यामुळे सुरुवातीला उत्साहाने या क्षेत्रात आलेल्या मुली किंवा स्त्रिया इतर जबाबदाऱ्या येऊ लागल्या की करिअरपासून मागे हटतात. अपर्णा म्हणतात, ‘या क्षेत्रात काम करताना कुटुंब सांभाळण्यासाठी कुटुंबाचाच मोठा आधार असावा लागतो. घरातल्या लोकांनी समजून घेणं हा मोठा फॅक्टर ठरतो. मी गेली वीस र्वष या क्षेत्रात काम करते आहे. वैयक्तिक आयुष्य आणि काम असं काही वेगळं आता राहिलंच नाही आहे.  सतत डोक्यात नवीन कल्पनांचे विचारच सुरू असतात. साध्या गप्पांमधूनही विषय सुचतात, घरच्यांना यात सहभागी करून घेतलं की त्यांनाही बरं वाटतं. फक्त जेव्हा वेळ देण्याचा विषय येतो तेव्हा मात्र मला आणि त्यांनाही थोडी तडजोड करावी लागते. कामाच्या वेळा अनिश्चित असण्याचा इमर्जन्सीच्या वेळी काही अंशी फायदा होतो. मी थोडय़ाफार अ‍ॅडजस्टमेंट्स करून वेळ काढू शकते.’

पडद्यामागे काम करणाऱ्या स्त्रिया कमी आहेत हे सर्वानाच माहिती आहे. तांत्रिक बाबी समजण्यात अडचणी, कौटुंबिक जबाबदाऱ्या अशी एक ना अनेक कारणं त्यामागे असतात. मात्र अनिश्चित वेळा आणि स्वत:चं वैयक्तिक अनिश्चित फ्युचर यामुळे अनेकदा मुली खूप कमी काळ या क्षेत्रात काम करतात असं अपर्णा यांचं निरीक्षण आहे. त्या सांगतात, ‘काहीवेळा असं होतं की ही मुलगी तर लग्न करून दुसरीकडे जाईल किंवा काम सोडेल. मग हिच्यावर मोठय़ा जबाबदाऱ्या कशा सोपवायच्या, हा प्रश्न सीनियर्सना पडतो आणि मग मुलींकडे कामं पण सोपी-सोपी दिली जातात ज्यातून त्यांच्या करिअरचा काही विशेष विकास होत नाही. मुलं झाल्यावरची पाच र्वष घरच्यांचा सपोर्ट आणि कामाचा बॅलन्स खूप महत्त्वाचा असतो. त्याच काळात बहुतेक मुली काम करणं सोडून देतात आणि परत येतात त्या वेळी मधल्या गॅपमुळे त्यांना कॉम्प्लेक्स आलेला असतो. मग त्या थोडंसं काही तरी काम करतात आणि शेवटी सोडूनच देतात. मात्र काही वेळा मुलींना उगीचच असं वाटत असतं की आपल्यावर अन्याय होतोय. तेही चुकीचं आहे. याने इतर मुलींना या क्षेत्रात येण्याची प्रेरणा मिळत नाही.’

वेळेची प्रचंड मागणी करणाऱ्या मनोरंजन क्षेत्रात एकाच वेळी अनेक गोष्टींचं नियोजन करण्याचं कौशल्य असावं लागतं. रोजच्या जगण्यातून इन्स्पिरेशन घेऊन काम करणाऱ्या अपर्णा पाडगावकर त्यांच्या कामाला पूर्ण न्याय देतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 22, 2020 1:02 am

Web Title: aparna padgaonkar interview madhyami dd70
Next Stories
1 वसुधैव कुटुम्बकम्
2 सदा सर्वदा स्टार्टअप : स्टार्टअपचे मूल्यांकन
3 अन्नदानातील ‘आनंद’
Just Now!
X