|| वेदवती चिपळूणकर

तंत्रज्ञानाच्या मदतीने शिक्षणासाठी आधी वेबसाइटचा आणि आता तर मोबाइलमध्ये घेऊन फिरता येणाऱ्या अ‍ॅप्सचा जन्म झाला. अनेक विषय, अनेक स्पेशलायझेशन्स, अनेक भाषा, वेगवेगळी काठिण्यपातळी, ऑडिओ-व्हिज्युअल मार्गदर्शन अशा अनेक वैशिष्टय़ांनी शब्दश: ‘संपन्न’ अशी ही शैक्षणिक अ‍ॅप्स तयार केली गेली आहेत.

पुराणात कधीकाळी एकलव्य नावाच्या कोण्या एका गुरुभक्त शिष्याने मानलेल्या गुरूला गुरुदक्षिणा म्हणून उजव्या हाताचा अंगठा दिला होता. ज्या हाताने धनुष्य चालवायचं त्याच हाताचा अंगठा त्याने गुरूच्या पायाशी अर्पण केला. कधीकाळी पुराणातच आपल्याला शिष्य म्हणून स्वीकारावं या इच्छेने कर्णाने ब्राह्मण असल्याचं नाटक केलं आणि भुंग्याचा दंशही सहन केला. या दोन्ही कहाण्यांचं दुर्दैव असं की ज्यांना गुरुस्थानी मानण्यात आलं त्यांनी शिष्याच्या वर्णावरून त्याची योग्यता पारखली. कर्ण निराश झाला मात्र एकलव्याने हट्ट न सोडता द्रोणाचार्यांच्या मूर्तीला गुरू मानून ज्ञान प्राप्त केलं. गुरूच्या प्रत्यक्ष शिकवण्याचा अभाव असतानाही एकलव्य त्यात पारंगत झाला. गुरूच्या भेदाभेदांच्या पलीकडे जाऊ न आपल्याला हवं ते साध्य करण्याची शिष्याची जिद्द ही कदाचित तेव्हापासून चालत आलेली असावी.

पुराण संपलं, कलियुग सुरू झालं, तरीही शिक्षणातल्या अडचणी कायम राहिल्या. अडचणींचं स्वरूप बदलत गेलं, मात्र अडचणी संपल्या नाहीत. कधी एखाद्या प्रकारचं शिक्षण आपल्या जवळपास उपलब्ध नाही म्हणून तर कधी प्रत्यक्ष हजर राहून शिक्षण घेणं शक्य नाही म्हणून, शिक्षण घेण्याचे वेगवेगळे मार्ग शोधले गेले. अगदी आत्ताच्या काळात उदयाला आलेला, भरात असलेला आणि सर्वाच्या सोयीचा मार्ग म्हणजे तंत्रज्ञान! तंत्रज्ञानाच्या मदतीने शिक्षणासाठी आधी वेबसाइटचा आणि आता तर मोबाइलमध्ये घेऊन फिरता येणाऱ्या अ‍ॅप्सचा जन्म झाला. अनेक विषय, अनेक स्पेशलायझेशन्स, अनेक भाषा, वेगवेगळी काठिण्यपातळी, ऑडिओ-व्हिज्युअल मार्गदर्शन अशा अनेक वैशिष्टय़ांनी शब्दश: ‘संपन्न’ अशी ही शैक्षणिक अ‍ॅप्स तयार केली गेली आहेत. सुरुवातीच्या काळात त्यांची संख्या अगदी हाताच्या बोटांवर मोजण्याइतकीच होती. हळूहळू त्यांचे फायदे कळत गेले आणि वापरण्यात सुलभता यायला लागली, तशी या अ‍ॅप्सची संख्या अतोनात वाढली.

‘अ‍ॅप’ या तंत्रज्ञानाचं वैशिष्टय़ म्हणजे ते कोणत्याही ठिकाणी आणि कोणत्याही वेळेला घेऊन जाता येतं आणि वापरता येतं. त्यामुळे आपोआपच त्याच्या माध्यमातून घेता येणाऱ्या शिक्षणाच्या मर्यादा कमी होतात. असंख्य प्रकारचे कोर्सेस, त्यासाठी अमाप अभ्याससाहित्य आणि आपल्याला हव्या त्या वेळी शिक्षण घेण्याचं स्वातंत्र्य असा याचा तिहेरी फायदा होतो. ‘कोर्सेरा’, ‘खान अकॅडेमी’, ‘ई.डी.एक्स.’ ही या अ‍ॅप्सपैकी काही जुनी नावं ज्यात आता असंख्य नावांची भर पडली आहे. ‘यूडेमी’, ‘अनअकॅडेमी’, ‘स्टेपिक’ ही काही नवीन नावं जी जुन्या अ‍ॅप्ससारखी एखादा कोर्स केल्याचे प्रमाणपत्रही देतात. अशा अ‍ॅप्समध्ये आणखी एक प्रकार आहे जो शिक्षण न देता माहिती आणि ज्ञान मिळवण्यासाठी मदत करतो, मात्र कोणत्याही प्रकारचे कोर्सेस घेत नाही किंवा प्रमाणपत्रे देत नाही. ‘डय़ुओलिंगो’ हे भाषा शिकण्यासाठी तयार झालेलं अ‍ॅप आहे जे लेव्हलनुसार भाषा शिकण्यासाठी मदत करतं, सरावासाठी आणि उजळणीसाठी साहाय्य करतं. याचबरोबर वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी, आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या इंग्लिशच्या परीक्षेच्या तयारीसाठी, वेगवेगळ्या प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी मदत करणारी अशी अनेक अ‍ॅप्स उपलब्ध आहेत. ‘इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी’ अर्थात कॅठडवचा ई-कन्टेन्ट, मुंबई युनिव्हर्सिटीचं ‘स्वयम’ अशा अनेक वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीजचं अभ्याससाहित्य त्यांनी अ‍ॅपवर उपलब्ध करून दिलेलं आहे. या सगळ्या अ‍ॅप्सच्या माध्यमातून ‘स्वशिक्षण’ ही संकल्पना मूळ धरू लागली आहे.

या अ‍ॅप्सवरून शिकण्याचा एक मुख्य सकारात्मक मुद्दा म्हणजे तुमच्या आधीच्या शिक्षणाच्या क्षेत्राचं इथे कोणतंही बंधन नसतं. या माध्यमातून एखादा वकील सहजपणे मानसशास्त्र शिकू शकतो आणि एखादा डॉक्टर सहजपणे ग्राफिक डिझायनिंग शिकू शकतो. केवळ वाचनावर अवलंबून न ठेवता बहुतेक सगळी अ‍ॅप्स व्हिडीओ लेक्चर्स उपलब्ध करून देतात. व्हिडीओच्या मदतीने कोणताही विषय सहजपणे समजावून घेता येतो. वाचनाच्या सोबतीला समजावणारा व्हिडीओ असण्याचं कॉम्बिनेशन ही अ‍ॅप्स काळजीपूर्वक पाळतात. त्यासोबतच या अ‍ॅप्समध्ये अनेक असाइनमेंट्स, होमवर्क, प्रोजेक्ट्स, छोटे छोटे टास्क, क्विझ अशा गोष्टी असतात ज्यामुळे प्रगती, माहिती, त्याचं उपयोजन या सगळ्या गोष्टी तपासून पाहिल्या जातात.

अनेक अ‍ॅप्समध्ये ही सोय आहे की एका टप्प्यापर्यंत घेत असलेलं शिक्षण संपूर्णपणे मोफत असतं. मात्र काही विशिष्ट कोर्सेसना किंवा काही विशिष्ट पातळीनंतर तो कोर्स पूर्ण करण्यासाठी पैसे भरावे लागतात. काही अ‍ॅप्स कोर्स पूर्ण करू देतात, मात्र प्रमाणपत्र हवं असल्यास पैसे भरावे लागतात. अर्थात हे सर्व पर्याय कोर्स सुरू करण्याच्या आधीच पुढय़ात ठेवले जातात आणि त्यावेळीच ते निवडायचे असतात. त्यामुळे हवा तो पर्याय निवडण्याचं स्वातंत्र्य अबाधित राहतं. प्रमाणपत्र न घेता केवळ स्वेच्छा आणि स्वानंद म्हणून शिकायचं असेल तर बहुतेक सर्वच अ‍ॅप्स हे ज्ञान विनाशुल्क उपलब्ध करून देतात. सर्व प्रकारच्या फोन्समध्ये ही अ‍ॅप्स वापरता येतात.

‘तोत्तोचान’ नावाचं एक सुंदर पुस्तक बहुतेक सगळ्यांनीच लहानपणी वाचलं असेल. त्यातल्या शाळेची एक इंटरेस्टिंग पद्धत होती. प्रत्येक दिवसाचा एक ठरलेला अभ्यास मुलांना सकाळी लिहून द्यायचा आणि मग मुलांनी तो दिवसभरात त्यांना हव्या त्या क्रमाने पूर्ण करायचा. त्यावेळी ही पद्धत सगळ्यांनाच फार आवडली होती आणि कधीतरी तरी आपल्याला अशा पद्धतीने शिकायला मिळावं, अशी इच्छा सगळ्यांचीच होती. ती इच्छा काही प्रमाणात ही अ‍ॅप्स पूर्ण करतायत असं म्हणायला हरकत नाही. दिलेल्या डेडलाइनमध्ये कामं पूर्ण करणं महत्त्वाचं, मग ती कोणत्याही क्रमाने केली तरी चालतील असं स्वातंत्र्य केवळ ही अ‍ॅप्सच आपल्याला देतात. मनासारखं शिक्षण, आवडेल त्या ठिकाणी राहून, जमेल त्या वेगाने, गरज पडेल तितक्या वेळा पुन्हा पुन्हा ऐकून, शिकून घेणं हे स्वातंत्र्य या अ‍ॅप्सनी तरुणाईला दिलं आहे.

सुरुवातीला लहानशी वाटलेली ही गोष्ट अत्यंत उपयोगी आणि तितकीच इंटरेस्टिंग आहे हे कळल्यानंतर मात्र तरुणाई त्याची प्रचंड फॅन झाली आहे. त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने तरूणाईने यंदा या ‘अ‍ॅप’गुरूंचे आभार मानायला हरकत नाही.

viva@expressindia.com