फाइन आर्ट्सचे विद्यार्थी, होतकरू चित्रकार आणि तरुण कलाकार यांना आपल्या कलेचे प्रदर्शन मोफत करायची संधी देणाऱ्या ‘आर्ट प्लाझा’ या खुल्या कलादालनविषयी..
जहांगीर आर्ट गॅलरीजवळच्या फुटपाथवर इतक्यात गेलात तर तिथे सध्या कलाकार तरुणाईची मांदियाळी जमलेली दिसेल. रंग-रेषांशी खेळत त्यातून आशयगर्भ संवाद साधायचा प्रयत्न तरुणाई करताना दिसेल. चित्रकारांची जातकुळीच वेगळी असते असं म्हणतात. चित्रकाराचं अख्खं आयुष्य हे रंगानी न्हाऊन गेलेलं असतं. तेच रंग कुंचल्याने कॅनव्हासवर उतरवताना ते फक्त चित्र रेखत नाहीत तर त्यांच्या जीवनाचं सार त्यात ओततात. तो मनस्वी असतो, स्वच्छंदीपणे बागडतो. आपल्या मनातील नवरसांना चित्रांच्या माध्यमातून वाट मोकळी करून देतो. पण हीच चित्रं जगापुढे आणताना थोडा अडखळतो. आज भारतातदेखील नामवंत चित्रकारांची यादी आखुडलेली आहे. आपल्या चित्रांना व्यासपीठ मिळवून देताना नवीन होतकरू चित्रकारांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. आजच्या घडीला मुंबईसारख्या शहरांमध्ये जहांगीर आर्ट गॅलरीसारख्या अनेक गॅलेरीज्मध्ये वर्षभर विविध चित्रकारांच्या कलाकृतींचे प्रदर्शन भरविले जाते. परंतु या गॅलेरीज्ची लाखाच्या घरात जाणारी फी आणि किमान तीन ते चार वर्षांची वेटिंग लिस्ट या सगळ्यात नवीन चित्रकार हरवून जातो.
याच समस्येचा तोडगा म्हणून कै. के. एम. शेणॉय यांनी ‘आर्ट प्लाझा’ या खुल्या कलादालनाची सुरुवात १९८८ मध्ये केली होती. या जहांगीर आर्ट गॅलरीच्या फूटपाथवर हे खुले कलादालन गेली पंचवीस र्वष दिमाखात उभे आहे. नवीन होतकरू आणि गरजू कलावंत तसेच परिस्थितीमुळे इतर व्यवसाय करणारे होतकरू कलाकार यांना एक आठवडय़ासाठी प्रदर्शनासाठी हे कला दालन विनामूल्य उपलब्ध करून दिले जाते. यंदाच्या रौप्यमहोत्सवी वर्षांनिमित्त महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेल्या चित्रकारांच्या प्रदर्शनाबरोबरच विविध चित्रकलेच्या स्पर्धा आणि काही नामवंत चित्रकारांची प्रात्यक्षिके असा ऑक्टोबर ३० ते डिसेंबर २८ पर्यंतचा दोन महिन्यांचा भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
मुळात एका कलाकाराच्या इच्छाशक्तीतून प्रत्यक्षात उतरलेल्या आर्ट प्लाझाच्या उपक्रमामध्ये कोणत्याही एकत्रित संघटनेचे वर्चस्व नाही. दरवर्षी येथे कलेबद्दल आस्था असलेले ओम राजपूत, गायत्री मेहता, चंद्रशेखर मराठे अशा चित्रकलेच्या क्षेत्रातील नामवंत व्यक्ती एकत्र जमतात आणि नवीन होतकरू चित्रकारांना मार्गदर्शन तसेच त्यांच्या कलेसाठी एक व्यासपीठ मिळवून देण्याचा प्रयत्न करतात. आर्ट प्लाझाच्या आयोजकांपकी एक चंद्रशेखर मराठे म्हणाले की, ‘हा उपक्रम उत्स्फूर्तपणे साजरा केला जातो. कलाकारांना त्यांची चित्रं सादर करण्यासाठी सर्व प्रकारची मदत करतो. जे जे स्कूल ऑफ आर्टचे सध्याचे डीन विश्वनाथ साबळे, बॉलीवूडचे प्रसिद्ध पोस्टर पेंटर पृथ्वी सोनी, व्यंगचित्रकार देविदास कदम, चित्रकार विवेक शर्मा अशा अनेक नामवंत चित्रकारांनी त्यांच्या करिअरच्या सुरुवात आर्ट प्लाझातून केली आहे.’ व्यंगचित्रकार देविदास कदम यांच्या म्हणण्यानुसार, ‘मी गेली दहा र्वष आर्ट प्लाझामध्ये भाग घेतोय. आज मी अनेक मासिकांसाठी व्यंगचित्रे काढतो. आर्ट प्लाझाने माझ्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात माझे काम लोकांपर्यंत पोहोचविण्यात मला सहकार्य केलं.’ पोस्टर पेंटर पृथ्वी सोनी आजही वेळात वेळ काढून आर्ट प्लाझाला भेट देतात आणि नवोदित चित्रकारांना मार्गदर्शन करतात.
तरुण चित्रकारांना त्यांची चित्रे लावण्यासाठी फ्रेम्सपासून ते जागेपर्यंत सर्वच गोष्टी संस्थेमार्फत पुरविल्या जातात. तसेच चित्रकारांना त्यांच्या ग्राहकांशी आणि चित्रकलेतील जाणकारांशी प्रत्यक्षपणे संवाद साधण्याची संधी येथे मिळते. फाइन आर्ट्सची विद्यार्थिनी असलेली पण गरज म्हणून शाळेत चित्रकला शिकविणाऱ्या मनिषा िशदेच्या म्हणण्यानुसार, ‘म्हणायला मी शाळेत चित्रं रोज काढते, पण माझी खरी कला दाखवण्याची संधी या प्रदर्शनातून मिळते. दोन-तीन वर्षांपूर्वी मला माझ्या सरांकडून या उपक्रमाबद्दल माहिती मिळाली आणि तेव्हापासून मी नियमितपणे या प्रदर्शनात सहभागी होते.’
कोकणातील छोटय़ाशा गावातून आलेल्या प्रभाकर रुठे यांचं म्हणणंही असंच काहीसं होतं. ‘गरज म्हणून मी शाळेत मुलांना चित्रकला शिकवायचो पण काही काळाने वाटलं आता पुरे. मग राजीनामा दिला आणि चित्रकलेला पूर्णपणे वाहून घेतले. जेव्हा लोकांपर्यंत कसे पोहोचायचे हा प्रश्न समोर आला तेव्हा या उपक्रमाची माहिती मिळाली आणि प्रदर्शनात भाग घेतला.’
केवळ १०-१५ रुपयाचे चित्र काढलेले फुगे विकून या प्रदर्शनाची सुरुवात करणारे आर्ट प्लाझाचे जनक कै. के. एम. शेणॉय यांच्यापासून सुरुवात करून गेली पंचवीस र्वष आर्ट प्लाझा होतकरू तरुण चित्रकारांसाठी आशेचा किरण बनले आहे. एम. एफ. हुसेन, माजी पंतप्रधान व्ही. पी. सिंग, के. के. हेब्बर अशा अनेक मातब्बर व्यक्तींनी जेव्हा आर्ट प्लाझामध्ये स्वत:चे प्रदर्शन भरवण्याची इच्छा व्यक्त केली होती, तेव्हा आमचा उर अभिमानाने भरून आला होता, अशी आठवण आजही येथील आयोजक काढतात.