News Flash

चमचमता तारा

फोटो कसे काढायचे याविषयी जितकं तुम्ही शोधत जाल तितकंच तुम्हाला या बाबतीतचे ज्ञान मिळत जाईल,’  अशी माहिती प्रथमेशने दिली.

गायत्री हसबनीस viva@expressindia.com

‘अ‍ॅस्ट्रोफोटोग्राफी करताना बऱ्याच अडचणी येतात, पण नितांत आवड आणि शोध घेण्याची तयारी व जोखीम स्वीकारायची तयारी असेल तर नक्कीच यात यशस्वी होता येते. मी मोठेमोठे अ‍ॅस्ट्रोफोटोग्राफर पाहून, त्यांना फॉलो करत अ‍ॅस्ट्रोफोटोग्राफी शिकलो. पृथ्वी, आकाश यांचं मला प्रचंड आकर्षण आणि तितकंच कुतूहल आहे. अ‍ॅस्ट्रोफोटोग्राफीचे काम संयम आणि आवड या दोघांचे संमिश्रण आहे. मला विचाराल तर एखादा ग्रह, तारा जसा दिसतो तसाच्या तसा मी फोटोतून लोकांना कसा दाखवेन हाच माझा ड्रीम शॉट आहे’.

पुण्याच्या प्रथमेश जाजूचे वय आहे फक्त सोळा! त्याने नुकतीच दहावी पूर्ण केली. पण सध्या त्याची ख्याती लुकलुकणाऱ्या ताऱ्यांप्रमाणे सर्वदूर पसरली आहे. त्याने चंद्राचा काढलेला फोटो लोकांच्या पसंतीस उतरला असून गेले काही दिवस त्याचीच चर्चा सुरू आहे. अगदी दिग्गज शास्त्रज्ञांपासून ते जनसामान्यांपर्यंत सगळ्यांकडून प्रथमेशच्या फोटोंचे कौतुक होत आहे. मला मिळालेला प्रतिसाद शब्दात सांगता येण्यासारखा नाही. माझ्या घरचे, मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईकांनी माझ्या कामाचे खूप कौतुक केले आहे, असं प्रथमेश सांगतो. ‘समाज माध्यमावर मी काढलेला चंद्राचा फोटो टाकला होता. ‘नासा’च्या एका नामवंत शास्त्रज्ञाला तो फोटो इतका आवडला की त्यांनी तो फोटो त्यांच्या झूमच्या बॅकग्राउंडला ठेवला आहे. तर चंद्रावर प्रबंध क रणारा एक इंजिनीअर मुलगा त्याच्या प्रबंधासाठी हा फोटो वापरणार आहे, असे प्रथमेश सांगतो.

अ‍ॅस्ट्रोफोटोग्राफी प्रथमेश नक्की कसा शिकला, त्याच्याकडे फोटोग्राफीचे साहित्य कसे आले? तो फोटोग्राफीसाठी किती वेळ देतो? वेगवेगळ्या पद्धतीचे फोटो काढताना त्याच्या मनात नक्की काय सुरू असतं?, अशा सगळ्या प्रश्नांना त्याने मनमोकळेपणाने उत्तरं दिली.  अ‍ॅस्ट्रोफोटोग्राफी शिकणं हा माझ्यासाठी छंद आहे. सध्या करिअर या अर्थाने मी अ‍ॅस्ट्रोफोटोग्राफी करत नाही, असं सांगणाऱ्या प्रथमेशला अ‍ॅस्ट्रोफिजिक्स आणि रिसर्चमध्ये इंटरेस्ट आहे. पुण्यातील ‘ज्योतिर्विद्या परिसंस्था’ या संस्थेचा तो चार वर्षे सदस्य आणि तीन वर्षे स्वयंसेवक आहे. या संस्थेशी जोडल्यामुळे प्रथमेश बेसिक अ‍ॅस्ट्रोफोटोग्राफी शिकला आणि फोटोचे प्रोसेसिंग तो इंटरनेटवरून शिकला. ‘मी यूटय़ूबवर ‘अ‍ॅस्ट्रोबॅकयार्ड’ नावाचं एक यूटय़ूब चॅनल फॉलो करतो तेथून मी फोटोचे प्रोसेसिंग कसं करायचं हे शिकलो, पण हे सगळं करण्यामागे त्याची आवड हेच कारण होतं’, असं तो सांगतो. इंटरनेटवर वेगवेगळे यूटय़ूबवरचे व्हिडीओज् पाहात आणि इन्स्टाग्रामवरून मोठमोठे अ‍ॅस्ट्रोफोटोग्राफर्स कशा पद्धतीने काम करतात हे हळूहळू शिकत गेलो. इंटरनेटच्या माध्यमातूनच मी अ‍ॅस्ट्रोफोटोग्राफी पूर्णपणे शिकलो आणि आता त्यात माझा चांगलाच हात बसला आहे, असं त्याने स्पष्ट के लं.

प्रथमेशने आत्तापर्यंत शंभरहून अधिक फोटो काढले आहेत, ज्यात ग्रह, तारे आणि आकाशगंगा यांचे फोटो आहेत. जेव्हा मोठय़ा खगोलीय घडामोडी होणार असतात उदाहरणार्थ, गुरू-शनीची महायुती. तेव्हा तो आवर्जून फोटोग्राफी करतो. ‘हे फोटो काढण्यासाठी मला तीन ते चार दिवसांचा वेळ लागतो. म्हणजे एक रात्र फोटो काढण्यासाठी आणि उरलेले दिवस प्रोसेसिंगसाठी लागतात. चंद्राचा फोटो काढण्यासाठी मला पाच तास लागले. चंद्राचा फोटो काढल्यावर तो झूम के ल्यावरही त्या फोटोतील पिक्सलेट दिसता कामा नयेत यासाठी मी प्रयत्न केला. चंद्राची इमेज मी इतकी मॅग्निफाय केली की चंद्राच्या प्रत्येक भागाचे फोटो काढले आणि तसे मी अडतीस भाग म्हणजे अडतीस व्हिडीओज काढले. एका जिगसॉ पझलप्रमाणे मी फोटो जोडत गेलो. थोडक्यात, एक अ‍ॅस्ट्रोफोटोग्राफर ज्याप्रमाणे फोटो काढतो त्या पद्धतीने हा चंद्र माझ्या फोटोत कसा उतरेल याचा विचार करून मी हे काम पूर्ण के ले, असे तो म्हणतो.  ‘जर तुम्हाला अ‍ॅस्ट्रोफोटोग्राफीची आवड असेल तर तुम्ही टेलिस्कोप लायब्ररीतून एक महिन्यासाठी टेलिस्कोप घेऊ शकता. त्यासाठी अगदीच महागडी साधनं घ्यावी लागतील असेही नाही. सेलेस्ट्रऑनचा ‘अ‍ॅस्ट्रॉमास्टर १३० इक्यू’ हा टेलिस्कोप घेऊ शकता जो परवडणारा आहे. फोटोसाठी डीएसएलआर कॅमेऱ्याचा वापर करता येईल. फोटो कसे काढायचे याविषयी जितकं तुम्ही शोधत जाल तितकंच तुम्हाला या बाबतीतचे ज्ञान मिळत जाईल,’  अशी माहिती प्रथमेशने दिली.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 11, 2021 1:20 am

Web Title: article about astrophotographer prathamesh jaju zws 70
Next Stories
1 प्रयोगशील पर्यावरणस्नेही
2 वस्त्रान्वेषी : अस्सा शेला सुरेख बाई!
3 नवं दशक नव्या दिशा : दोन ओंडक्यांची होते..
Just Now!
X