26 January 2020

News Flash

कॅफे कल्चर : मी कात टाकली..

एखाद्याच्या वाटय़ाला किती महत्त्वपूर्ण संस्था याव्यात? बरं असंही नाही, की त्या आता अस्तित्वात नाहीत किंवा कार्यरत नाहीत.

(संग्रहित छायाचित्र)

प्रशांत ननावरे

कॅफे युनिव्हर्सल

वेलिंग्टन फाऊंटनपासून सुरू होणारा शहीद भगतसिंग रोड तसा ऐतिहासिकच म्हणावा लागेल. चित्ता गेट, ओल्ड कस्टम हाऊस, हॉर्निमन सर्कल, एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई, रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडिया, आतल्या बाजूला मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि पुढे जनरल पोस्ट ऑफिस. एखाद्याच्या वाटय़ाला किती महत्त्वपूर्ण संस्था याव्यात? बरं असंही नाही, की त्या आता अस्तित्वात नाहीत किंवा कार्यरत नाहीत. ‘एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई’ तर गेल्या दोनशे वर्षांपासून त्याच जागी आहे, तर मुख्य रस्त्यापासून थोडय़ा आतल्या बाजूला असलेल्या मुंबई पोर्ट ट्रस्टची स्थापना ही १८७० सालची महत्त्वपूर्ण घटना होती. खासगी कंपन्यांची मक्तेदारी संपुष्टात आणण्यासाठी मुंबई पोस्ट ट्रस्ट उभारण्यात आले होते. मुंबईत रेल्वेमार्गाची उभारणी होण्याआधी आणि झाल्यानंतरही मुंबई बंदर हे कायमच सार्वजनिक वाहतूक आणि व्यापारामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आले आहे. मुंबईच्या व्यापारात प्रचंड वेगाने वाढ होत असल्याने मजुरांची मागणी वाढत होती आणि १८८२ मध्ये मोठय़ा संख्येने मराठा समाज मुंबईत दाखल झाला. या कामगार वर्गाने कुलाबा आणि गिरगाव परिसरांत आसरा घेतला. राहायची सोय झाली, परंतु सकाळ- संध्याकाळ खिशाला परवडेल अशा खाण्यापिण्याची सोय केली ती परगावाहून आलेल्या इराण्यांनी.

नाक्यानाक्यांवरील वाघमुखी म्हणून हिणवल्या गेलेल्या अपशकुनी जागा इराण्यांनी विकत घेतल्या आणि मूळ मुंबईकर व बाहेरून उदरनिर्वाहासाठी आलेल्या कामगार वर्गाच्या खिशाला त्यांनी मोठा दिलासा दिला. याच कुलाबा परिसरात एके काळी नाक्यानाक्यांवर इराणी कॅफे होते. पहाटेपासून ते रात्री उशिरापर्यंत त्यांची दारे सताड उघडी असत आणि माफक दरात पोटभर खाऊ  घालण्यात त्यांचा हातखंडा होता. इराणी कॅफे सुरू व्हायची सुरुवात साधारण एकोणिसाव्या शतकाच्या मध्याला झाली आणि विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत सुरूच होती. त्याच लाटेत सुरू झालेला मुंबईतील एक महत्त्वपूर्ण कॅफे म्हणजे ‘कॅफे युनिव्हर्सल’. हा कॅफे यासाठी महत्त्वाचा कारण तो अतिशय मोक्याच्या ठिकाणी आहे, मुंबई पोर्ट ट्रस्टच्या अगदी मागच्या बाजूला. १९२१ साली सुरू झालेला हा कॅफे तीन-चार वर्षांत वयाची शंभरी पूर्ण करेल.

शहीद भगतसिंग रोडवरील आदी मर्झबान पथ मार्गाच्या कोपऱ्यावर मजबूत दगडी आणि लाकडी बांधकाम असलेल्या देखण्या इमारतीच्या तळाला ‘कॅफे युनिव्हर्सल’ आहे. एन. एन. कामा यांच्या मालकीची ही इमारत आजही मोठय़ा दिखामात उभी आहे आणि मुख्य म्हणजे या इमारतीचे वैभव टिकवण्यात ‘कॅफे युनिव्हर्सल’ मोठा हातभार लावत आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण आजही केवळ बाहेरूनच नव्हे तर आतूनही जुन्या मुंबईची आठवण करून देण्यात हा कॅफेकुठेच कमी पडत नाही. सारोस मोझगानी यांनी कॅफेची सुरुवात केली. त्यानंतर त्यांच्याकडेच काम करत असलेल्या बेहराम इरानी यांच्याकडे त्याची मालकी आली. ज्यांचं मागच्याच वर्षी निधन झालं आणि सुरुवातीपासून कॅफेची जडणघडण पाहिलेला एक महत्त्वपूर्ण माणूस काळाच्या पडद्याआड गेला. मोठाले लाकडी दरवाजे आणि खिडक्या, उंच छप्पर, एका बाजूला जुन्या इराणी कॅफेमध्ये आढळणारे गोलाकार लाकडी टेबल, बेंटवूडच्या खुच्र्या, भिंतीवर लटकणारी जुनी घडय़ाळं, इराणच्या तसबिरी आणि बरंच काही ही आजही कॅफेची ओळख आहे.

‘कॅफे युनिव्हर्सल’च्या वाटय़ाला एकूण तीन स्थित्यंतरं आली. १९२१ साली हा कॅफे सुरू झाला तेव्हा तो पारंपरिक इराणी कॅफेहोता. इराण्याच्या हॉटेलमध्ये मिळणारे चहा, बन मस्का, ब्रून मस्का, ऑमलेट आणि खिमा पावसारखे पदार्थ येथे मिळत असत. सोबतीला जनरल स्टोर्स, बेकरी आणि काही नेहमीची औषधंही मिळायची. गोदीतील कामगार हा इथला मुख्य ग्राहक होता. त्यानंतर साठ-सत्तरच्या दशकात मुंबईत उडिपी हॉटेल्स मोठय़ा प्रमाणात सुरू झाली. तेव्हा सामान्य लोकांसोबतच डॉकमधील कामगारांनीही आपला मोर्चा या उडप्यांकडे वळवला. याच काळात म्हणजे १९७९ साली कॅफेमधील जनरल स्टोर्स बंद झाले ते कायमचेच; पण त्यानंतर इथे बीअर मिळायला लागली. सत्तर-ऐंशीच्या दशकात मुंबईत स्मगलिंग मोठय़ा प्रमाणात वाढलेलं. परदेशातून भारतात येणारा सर्व माल समुद्रमार्गे दाखल होत असे. अशा वेळी मालासोबत येणाऱ्या माणसांसाठी हा कॅफे हक्काची जागा बनला. त्या वेळी कॅफेमध्ये ब्रेकफास्ट आणि बीअर असे दोन भाग पाडले गेले होते.

२००३ साली देहमिरी कुटुंबीयांकडे कॅफेची मालकी आली. तेव्हापासून गुस्ताद आणि त्यांचा मुलगा रुस्तम कॅफेची धुरा सांभाळत आहेत. देहमिरी कुटुंबीय आणि ‘कॅफे लिओपोल्ड’चे मालक एकमेकांचे जवळचे नातेवाईक आहेत. त्यामुळेच असेल कदाचित

‘कॅफे माँडेगार’ आणि ‘कॅफे लिओपोल्ड’ यांच्यानंतर मुंबईतील सर्वात देखणा आणि काळाप्रमाणे बदललेला कॅफेम्हणून ‘कॅफे युनिव्हर्सल’कडे पाहिलं जातं. गुस्ताद देहमिरी १९८० सालापर्यंत इराणमध्येच स्थायिक होते. त्यामुळे इराणी संस्कृती आणि समाजाशी त्यांची नाळ अद्यापही जोडलेली आहे. एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीला ‘कॅफेयुनिव्हर्सल’चा ताबा घेतल्यानंतर देहमिरी कुटुंबीयांनी मद्याचा परवाना मिळवला आणि बीअरसोबतच इतर मद्येही येथे मिळू लागली. असं असलं तरी आजही ‘कॅफे युनिव्हर्सल’ हा केवळ बार म्हणून न ओळखला जाता जुना इराणी कॅफेम्हणून आपली ओळख टिकवून आहे. त्याचं कारण म्हणजे त्यांनी आपल्या मेन्यूमध्ये केलेले बदल. इराणी आणि पारशी पदार्थाच्या साथीला कॉन्टिनेंटल आणि चायनीज पदार्थाना मेन्यूमध्ये स्थान दिल्याने इथे केवळ दर्दी लोकांची गर्दी पाहायला मिळते.

देहमिरी कुटुंबीयांनी जाणीवपूर्वक कॅफेचंजुनं रूप कायम ठेवलं आहे. बसायच्या टेबलांची नव्याने रचना करताना मध्यभागी लाकडी टेबल्स आणि त्याच्या दोन्ही बाजूंना जुन्या इराणी स्टाइलचे गोल टेबल मांडण्यात आले आहेत. सर्व टेबलांचा पाया लाकडी असून दगडी पृष्ठभागाची जागा आता लाकडाने घेतली आहे. ‘कॅफे युनिव्हर्सल’मध्ये आता ऑर्डर दिल्यावर चहा जरी मिळत असला तरी बन मस्कासारखे पारंपरिक पदार्थ मेन्यूमधून नाहीसे झाले आहेत, याची खंत वाटते. असं असलं तरी या कॅफेमध्ये मोठाल्या दरवाजापाशी टेबलावर बसून बीअर पिताना जुन्या मुंबईत हरवून गेल्यासारखं वाटतं हे नक्की. त्यानिमित्ताने कृष्णधवल मुंबईच्या आठवणींना उजाळा मिळतो. बासुदेव रजकसारखा इथे अर्धशतक काम करणारा अवलिया कॅफेच्या जुन्या आठवणींना अधूनमधून उजाळा देत असतो.

मोक्याच्या जागी असूनही मुंबईतील इराणी कॅफे काळाप्रमाणे बदलले नाहीत आणि त्याची परिणती त्यांच्या अस्तामध्ये झाली. ‘कॅफे युनिव्हर्सल’ आज तीनशे साठ अंशाच्या कोनात जरी बदलला असला तरी त्या बदलामुळे तो आपलं अस्तित्व टिकवून आहे, हे नाकारता येणार नाही; पण एक विशेष, बदलतानाही त्याने जुना बाज कायम ठेवला आहे. त्यामुळे नावाप्रमाणेच जागतिक असलेल्या आणि कात टाकलेल्या जागेचं नवीन रूप पाहायचं असेल तर ‘कॅफे युनिव्हर्सल’ला भेट आवश्यक ठरते.

viva@expressindia.com

First Published on December 7, 2018 2:08 am

Web Title: article about cafe universal
Next Stories
1 अंडय़ाची खाबूगिरी
2 व्हिवा दिवा : श्रुती अइर
3 उडी उडी जाए..
Just Now!
X