तेजश्री गायकवाड

गेल्या वर्षभरात इकोफ्रेंडली फॅशन, सस्टेनेबल फॅशनचा ट्रेण्ड सुरू झाला. आपली आणि आपल्या निसर्गाची गरज म्हणून याची सुरुवात झाली, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. म्हणून यंदाच्या चारही जेन नेक्स्ट डिझायनर्सनी त्यांच्या कलेक्शनमध्ये सस्टेनेबल फॅक्टर ‘मस्ट’ ठेवला आहे. सस्टेनेबल फॅशनच का?, हे या नव्या डिझायनर्सकडून जाणून घेण्याचा प्रयत्न ‘व्हिवा’ने केला.

फॅशन इंडस्ट्रीला राहुल मिश्रा, नचिकेत बर्वे, मसाबा गुप्ता, कल्लोल दत्ता आणि अनित अरोरा असे नामांकित फॅशन डिझायनर देणारा मंच म्हणजे ‘जेन नेक्स्ट डिझायनर’. भारतातील सर्वात मोठा फॅशनप्लॅटफॉर्म म्हणजे ‘लॅक्मे फॅशनवीक’. याच फॅशन वीकमध्ये होणाऱ्या ‘जेन नेक्स्ट डिझायनर’ या स्पर्धेतून दर वर्षी नवीन विचारांच्या नवीन फॅशनडिझायनरला आपलं कलेक्शन सादर करण्याची संधी मिळते. यंदा स्पर्धेच्या २७ व्या बॅचची निवड संपूर्ण देशभरातून झाली. आता निवड झालेले चारही फॅशन डिझायनर्स या वेळी सस्टेनेबल फॅशन कलेक्शन सादर करणार आहेत.

नवी दिल्लीची तरुण फॅशन डिझायनर अम्रपाली सिंह सांगते, ‘बर्डवॉक’ या माझ्या लेबलअंतर्गत मी यंदाचं माझं कलेक्शन लक्मे फॅशनवीकमध्ये सादर करणार आहे. हे कलेक्शन डिझाइन करताना मी जुन्या वर्षांनुवर्ष वापरत असलेल्या भारतीय पद्धतींचा वापर करून माझ्या कलेक्शनमध्ये सस्टेनेबिलिटी आणली आहे. माझ्या कलेक्शनमध्ये मी लिमिटेड कलर वापरले आहेत. त्याशिवाय पॅचवर्क , हाताने केलेली एम्ब्रॉयडरी असे नाहीसे होत चालेले सरफेस ऑर्नामेन्टेशनचे प्रकार वापरले आहेत. कापडामध्ये सिल्क, सिल्क ऑर्गन्झा, कॉटन, लिनन, सिल्क चंदेरी अशा इकोफ्रेंडली कापडाचा वापर केला आहे. मुंबईची फॅशन डिझायनर मधुमिता नाथनेही ‘ब्लिझ’ या तिच्या लेबलअंतर्गत सस्टेनेबल कलेक्शन आणलं आहे. ‘माझ्या कलेक्शनमध्ये मी कपडापासून ते अगदी कपडय़ावरच्या प्रिंट्सपर्यंत सगळंच सस्टेनेबल असेल याची काळजी घेतली आहे. निसर्गात असणारे रंग मी माझ्या कलेक्शनमध्ये वापरण्याचा प्रयत्न केला आहे. आणि याच रंगांचा वापर करून मी वूड ब्लॉक प्रिंट, बाटिक वूड ब्लॉक प्रिंट केलं आहे, असं मधुमिताने सांगितलं. कपडय़ामध्येही मी सेंद्रिय शॉर्ट स्टेपल स्वदेशी कापूस, नास्की-रेशीम आणि रेशीम ऑर्गन्झा यार्न वापरले आहेत, असं ती म्हणाली.

या दोन्ही डिझायनर्सप्रमाणे सुनैना खेरा आणि उज्ज्वला भडु यांनी त्यांच्या कलेक्शनमध्ये जुन्या काळातील कापडाच्या स्टाइलचा परिपूर्ण अभ्यास करून ती पुन्हा फॅशनमध्ये थोडेफार बदल करून कशी देता येईल याचा विचार करून तयार केलेले डिझाइन्स दिसतात. त्यांच्या कलेक्शनमधले कपडे हे आताच्या स्टाइलचे असले तरी पूर्वीच्या क पडय़ांचे जे प्रकार होते त्याचा पगडा त्यावर दिसून येतो. टेक्स्टाइलची संस्कृती जपून सस्टेनेबिलिटी क्रिएट करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. या चारही फॅशन  डिझायनर्सनी निसर्गातील रंग, जुन्या पण रिच अशा पद्धतीने केले जाणारे भरतकाम, डायिंगच्या पद्धती, प्रिंटच्या पद्धती, नॅचरल कापडांचा वापर करत कलेक्शन्स डिझाइन केली आहेत.

ट्रेण्ड आहे म्हणून लोकांनी लगेचच सस्टेनेबल कपडेच घालावेत असा अट्टहास या डिझायनर्सचा नाही. कारण तसं होऊ शकत नाही, असं ते स्पष्टपणे सांगतात.पर्यावरणाला आणि शरीरालाही नुकसान पोहोचवणाऱ्या गोष्टी नेहमीच मानवाला आकर्षित करतात. सस्टेनेबल स्टाइलने बनवले जाणारे कपडे तेवढे आकर्षित नसतात. सध्या बाजारात असंख्य रंगांमध्ये, कपडय़ांमध्ये, प्रिंट्समध्ये, पॉवर लूमवर किंवा मशीनवर बनवलेले कपडे सहज उपलब्ध आहेत. पण हेच कपडे निसर्गासाठी आणि मानवी शरीरासाठीही त्रासदायक आहेत याची अजून लोकांना फारशी माहिती नाही, असं त्यांनी सांगितलं. केमिकलच्या मदतीने तयार केलेले कापडे आपल्या शरीरासाठी तर त्रासदायक असतातच, पण त्यांचं विघटनही होत नसल्याने पर्यावरणाच्या दृष्टीनेही ते हानिकारक ठरतात. अनेक वर्ष अशा प्रकारे बनवलेले कापड जमिनीत पडून राहते. यातून टेक्स्टाइल वेस्टमध्ये भरच पडते. त्यामुळे जास्तीत जास्त नैसर्गिक पद्धतीने बनवलेले कपडे, रंग याचा वापर करायला सुरुवात केली तर साहजिकच त्याचा वापर वाढेल, परिणामी उत्पादन वाढेल. आणि त्याच्या किमतीही आपोआप कमी होतील, या विचारातूनच सस्टनेबल कलेक्शन सादर करायचा निर्णय या जेन नेक्स्ट डिझायनर्सनी घेतला आहे.

कुठे तरी चांगल्या गोष्टीची सुरुवात आपल्यापासून करावी लागते, तरच तो बदल समाजापर्यंत पोहोचतो, हा त्यांचा विचार समकालीन फॅशनडिझायनर्सप्रमाणेच ग्राहक म्हणून आपणही लक्षात घ्यायला हवा. लॅक्मे फॅशन वीकचा मंच त्या दृष्टीने खरोखरच महत्त्वाचा ठरणार आहे.

viva@expressindia.com