25 April 2019

News Flash

शेफखाना : चॉकलेटच्या तऱ्हा

चॉकलेटला ४००० वर्षांचा इतिहास आहे. खोटं वाटेल पण पहिल्यांदा चॉकलेट गोड चवीऐवजी कडू पेय म्हणून वापरण्यात आले.

(संग्रहित छायाचित्र)

मनीष खन्ना

काही पदार्थ असे असतात जे लहानांपासून मोठय़ांपर्यंत सर्वानाच हवेहवेसे असतात. जसं आपलं चॉकलेट. आजच्या लेखात आपण चॉकलेट डेझर्ट व त्यामधील नवनवीन ट्रेण्ड्सची माहिती करून घेऊ ..

‘कोई भी शुभ काम करनेसे पहले मिठा खाना चाहिए, काम अच्छा होता है..’, असं म्हणत चॉकलेट सर्वाच्या गळ्यातील ताईत झाले. प्रत्येक आनंदाच्या क्षणी, वाढदिवसाला गिफ्ट म्हणून, नात्यातल्या खास क्षणी, चॉकलेट डेला चॉकलेट आदानप्रदान करण्याचा व खाण्याचा ट्रेण्ड दिवसेंदिवस वाढतोय. याला कारण म्हणजे चांगल्या दर्जाचे चॉकलेट्स सध्या बाजारात उपलब्ध आहेत. सध्या बाजारात मिळणारे चॉकलेट बार, चॉकलेटपासून बनवलेली मिठाई, चॉकलेट कॅण्डी,चॉकलेटपासून बनवलेले विविध डेझर्ट, चॉकलेट केक हे खरोखरच मूड चेंजर आहेत.

चॉकलेटला ४००० वर्षांचा इतिहास आहे. खोटं वाटेल पण पहिल्यांदा चॉकलेट गोड चवीऐवजी कडू पेय म्हणून वापरण्यात आले. चॉकलेट त्याच्या जन्मस्थळाहून म्हणजेच स्पेननंतर फ्रान्स आणि हळूहळू संपूर्ण युरोपमध्ये पसरत गेले. १८२८ मध्ये  सर्वात पहिली चॉकलेट प्रेसची निर्मिती झाली. या चॉकलेट प्रेसने चॉकलेट निर्मिती करण्यासाठी क्रांतिकारी योगदान दिले. व्हेन हौटेन यांनी चॉकलेट मध्ये क्रांती घडवून आणली. त्यांनी चॉकलेटमध्ये कन्फेक्शनरी घटक वापरून उत्पादन खर्चही कमी केला. परिणामी चॉकलेट सामान्य लोकांना अधिक परवडण्यायोग्य बनले.

मध्य अमेरिका, वेस्ट इंडिज आणि दूर पूर्वेच्या उष्ण कटिबंधीय भागात आफ्रिकेमध्ये कोको झाडांची लागवड होते. चॉकलेटची चव विकसित करण्यासाठी कापणी केलेले कोको बीन्स सूर्यप्रकाशात ठेवले जातात. नंतर कोको बीन्सचे कवच काढून उर्वरित कोको बीन्सवर प्रकिया करून कोको सॉलिड्स बनवले जातात. चॉकलेटचा पेस्ट्री, केक, मिठाई, आइसक्रीम आणि बिस्किट्ससारखे विविध प्रकार बनविण्याच्या प्रकियेत वापर केला जाऊ  शकतो. चॉकलेटचे सामान्यपणे डार्क, मिल्क, व्हाइट आणि कोको पावडर हे प्रकार आहेत.

सध्या जगभर व्हॅलेन्टाइनचे वारे वाहत आहेत. व्हॅलेन्टाइन वीकमध्ये चॉकलेट डे असतो या दिवशी जास्तीत जास्त चॉकलेटचा वापर केला जातो, यात काही आश्चर्य नाही. कारण चॉकलेट हे मधुर आणि रोमँटिक आहे. खरं तर प्रेयसीसाठी किंवा प्रियकरासाठी चॉकलेटशिवाय दुसरी चांगली भेटवस्तू होऊच शकत नाही. व्हॅलेन्टाइनच्या निमित्ताने हॅण्डमेड प्रालाइन्स, हृदयाच्या आकाराचे कप केक, केक्स, चॉकलेटपासून बनवलेले बुके आणि हार्ट स्प्रिंकल्स असलेले लोकप्रिय टी केक मोठय़ा प्रमाणात खरेदी केले जातात.

चॉकलेटचे दर वर्षी नवनवीन प्रकार बाजारात मिळत आहेत. ‘रुबी’ नावाचे नवीन चॉकलेट गेल्या वर्षी जगभरात लाँच केलं गेलं आहे. अशी अशा आहे की, या वर्षी रुबी चॉकहोलिकचे लक्ष वेधून घेतील. २०१९ मध्ये आपल्याला नवनवीन चॉकलेट आणि चॉकलेटपासून बनविलेल्या रेसिपीज बाजारात दिसतील. चॉकलेटबरोबर तिरामिसु, क्रीम ब्रुली, क्रेपेससुद्धा आपल्याला बाजारात दिसतील. चॉकलेट आता हॅण्डमेड चॉकलेट बारपासून वैयक्तिक मोनोग्राम बार किंवा बॉम्बोन्सवर, चॉकोलेट बकेट केक, केक गार्निशिंग करण्यासाठीचे चॉकलेट शेल्स, शार्ड यामध्ये रूपांतर झाले आहे. व्हेजिटेबल्सच्या कॉम्बिनेशनबरोबर चॉकलेट आता चॉकलेट पॉप कॉर्न किंवा चॉकलेट चिप्ससारखे दिसू शकते. जेव्हा गरम चॉकलेट ब्राऊनी किंवा आइसक्रीम बरोबर सव्‍‌र्ह केले जाते तेव्हा ते जिभेसोबतच मनालादेखील तृप्ती देणारे ठरते. मुलांना त्यांच्या टिफिनमध्ये चॉकलेट ब्राऊनी, चॉकलेट पोपसिकल्स, टी केक्स, कप केक्स आणि मफीन्स घेण्यास आवडते. चॉकलेट असे मिष्टान्न आहे ज्याला विरोध करणे खूप कठीण आहे. खालील रेसिपीज तुमच्या तोंडाला पाणी आणल्याशिवाय राहणार नाहीत, त्या सर्व अगदी सहजतेने आणि अत्यंत थोडय़ा प्रयत्नांत बनवता येतात.

हॅझेलनट ब्राऊनी

साहित्य : ११५ ग्रॅम बटर, २३० ग्रॅम डार्क चॉकलेट, २ अंडी, १२० ग्रॅम साखर, ८० ग्रॅम मैदा, एक टी स्पून बेकिंग पावडर, ५० ग्रॅम हॅझेलनटचे तुकडे

कृती : १८० डिग्री सेल्सिअसपर्यंत ओव्हन गरम करून घ्या. एका काचेच्या भांडय़ात चॉकलेट आणि बटर घेऊन मायक्रोवेव्हमध्ये वितळवण्यासाठी ठेवा. वितळलेले मिश्रण एकजीव होईपर्यंत ढवळत राहा. अंडी आणि साखर दोन मिनिट्स एकजीव करून घ्या. त्यात बटर मिश्रित चॉकलेट घालून पुन्हा एकजीव करून घ्या. मैदा आणि बेकिंग पावडर चाळून वरील मिश्रणात हळूहळू भिजवा. त्यात हॅझेलनटचे तुकडे  टाकावेत. वरील मिश्रणाला ८x८च्या चौकोनी ग्रीसिंग केलेल्या टीनमध्ये घालून २५ ते ३० मिनिट्स गरम केलेल्या ओव्हनमध्ये शिजवून घ्यावे. नंतर त्यात टूथपिक टाकून व्यवस्थित शिजले आहे की नाही याची खात्री करून घ्यावी. ओव्हनमधून बाहेर काढून थंड करण्यासाठी ठेवावे. त्याचे चौकोनी तुकडे करून सव्‍‌र्ह करावे. हवाबंद डब्यात ८ दिवस ब्राऊनी फ्रिजमध्ये राहू शकते. तुम्ही ब्राऊनीवरती चॉकलेट सॉस टाकून सव्‍‌र्ह करू शकता.

चॉकलेट ट्रफल्स्

साहित्य : २५० ग्रॅम डार्क चॉकलेट, १२५ ग्रॅम क्रीम, ७० ग्रॅम कोको पावडर.

कृती : मंद आचेवर एका पॅनमध्ये क्रीम गरम करण्यासाठी ठेवून द्यावे. नंतर त्यात डार्क चॉकलेट वितळले जाईपर्यंत ढवळून घ्यावे. नंतर फ्रिजमध्ये ३ ते ४ तास थंड करण्यासाठी किंवा सेट होण्यासाठी ठेवून द्यावे. थंड झालेल्या मिश्रणाचे हातावर तेल घेऊन छोटे छोटे दहा गोळे करून घ्यावे. प्लेटमध्ये कोको पावडर पसरवून घ्या आणि त्यात एका वेळी एक ट्रफल बॉल ठेवा आणि पूर्ण कोट होईपर्यंत कोको पावडरमध्ये फिरवून घ्या. एका प्लेटमध्ये व्यवस्थित ट्रफल बॉल मांडून फ्रिझमध्ये ठेवावेत आणि आवश्यकतेनुसार काढून सव्‍‌र्ह करावेत.

चॉकोलेट नुटेला मूस

साहित्य : २०० ग्रॅम नुटेला, २५० ग्रॅम व्हीप क्रीम, ३० ग्रॅम हेझलनटचे तुकडे, ५० ग्रॅम गार्निशिंगसाठी चॉकलेटचे फ्लेक्स, ६ ओरिओ बिस्किट्स.

कृती : ६ सर्व्हिंग ग्लास घ्या. प्रत्येक ग्लासात एक ओरिओ बिस्किट क्रश करून टाका. एका भांडय़ात नुटेला घेऊन त्यात हेझलनटचे तुकडे टाकावेत. हळुवारपणे त्यात व्हीप क्रीम सोडा. वरील मिश्रण प्रत्येक ग्लासात सम प्रमाणात घाला आणि फ्रिजमध्ये किमान एक तास थंड आणि सेट करण्यासाठी ठेवा. वरती चॉकलेट फ्लेक्स गार्निश करून सव्‍‌र्ह करा चॉकोलेट नुटेला मूस.

First Published on February 8, 2019 1:16 am

Web Title: article about chocolate