शेफ वरुण इनामदार 

या स्तंभातून आजवर विस्ताराने वा संक्षेपाने मांडलेल्या लेखांमध्ये अल्कोहोल, स्पिरिट, वाइन आणि बेव्हरेजच्या निर्मितीविषयी कथन केले. पण हा सारा लेखनप्रपंच केवळ उत्पादनाविषयीच होता. या साऱ्या सोमरसनिर्मिती विश्वात स्वत:ला ‘ओतून’ काम करणाऱ्यांविषयी लिहिण्याकडे मात्र माझी लेखणी वळली नव्हती. पण आज ती वेळ आलीय. म्हणूनच एका अशा व्यक्तीची मी तुम्हाला भेट घडवून देणार आहे की  मक्तेदारी मोडीत काढणे काय असते, हे या व्यक्तीच्या कर्तृत्वातून आपोआप लक्षात येईल.

दारू म्हणा, वाइन म्हणा वा बेव्हरीज. हे सारे तयार करणाऱ्यांची शतकांपासून मक्तेदारी होती. म्हणजे येथे पुरुषांचे वर्चस्व होते. ते या व्यक्तीने संपवले आणि ती आज या विश्वात घट्ट पाय रोवून उभीच नाही, तर त्याचा आधारस्तंभ बनली आहे.

अल्कोहोल वा वाइनचे उद्योगविश्व लोकसंपर्कावर आधारलेले आहे. म्हणूनच या विश्वात उत्तमोत्तम निर्मिती करून अनेकांच्या कॉकटेल्स आणि मॉकटेल्स मेजवान्या बहारदार करणाऱ्यांचीही येथे दखल घेणे सयुक्तिक ठरेल आणि या इतक्या उल्लेखनीय आठवडय़ात एका व्यक्तीच्या कर्तृत्वाचा आलेख मांडणे कधीही आनंददायी ठरेल. या आठवडय़ात भारतमातेची मुलं तिच्या मुक्ततेचा अर्थात स्वातंत्र्याचा सोहळा साजरा करीत आहेत. देशभक्तीला असा पूर आला असताना तिच्याच एका कन्येच्या कार्याचा धांडोळा या लेखात मी घेत आहे. देशातील आदरातिथ्य उद्योगविश्वातील पहिली ‘बारटेंडर’ अर्थात शात्भी बसू. यासाठी शात्भीला राष्ट्रपती आणि महिला आणि बालकल्याण मंत्रालयाच्या वतीने गौरविण्यात आले आहे.

शात्भी बसू हिच्या नावासमोर ‘पहिली’ हे बिरुद तिच्या अनेक कार्यासाठी चिकटलेलं आहे. पहिली महिला बारटेंडर, भारतातील पहिल्या स्टेनलेस स्टील मॉडय़ुलर बार बनवून घेणारी, बेव्हरेजवर पहिलं पुस्तक लिहिणारी (द कान्ट गो राँग ऑन कॉकटेल्स) ‘स्टिर’ नावाने भारतात पहिली बारटेंडिंग अकादमी स्थापन करणारी महिला आणि भारताच्या वतीने अमेरिकन व्हिस्की सदिच्छादूत म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर पाऊल ठेवणारी महिला, असं बरंच काही तिच्या नावावर आहे.

मी तिला पहिल्यांदा २००२ साली भेटलो. त्यानंतर आम्हा दोघांमध्ये एकमेकांविषयी आदर, प्रेम आणि स्वत:च्या क्षेत्रातील विषयांविषयी आवडच वाढत गेली. नाहीतरी या क्षेत्रात एकमेकांचे पाय ओढण्यात आणि वरिष्ठांची हुजरेगिरी करून काही पॉइंट्स स्वत:च्या खिशात काही जण धन्यता मानतात. परंतु या अशा विपरीत वातावरणात माझ्यात आणि शात्भीमध्ये अशी कोणतीही सुप्त स्पर्धा कधीही राहिली नाही. प्रत्येक प्रसंगात आम्ही दोघेही एकमेकांच्या विकासप्रक्रियेसाठीच कार्यरत राहिलो. कोणत्याही सल्लागार प्रकल्पावर आम्ही दोघांनी कदाचित एकत्रित काम केले नसेलही, परंतु वेगवेगळ्या पातळ्यांवर आम्ही दोघांनी ‘मास्टर क्लास’ आयोजित केले. किंबहुना आम्ही दोघे मुंबईत अगदी एकाच परिसरात राहतो. पण मुंबईचं वैशिष्टय़ असं आहे की अगदी गगनचुंबी इमारतीत राहणारे लोक कधीच एकमेकांना भेटत नाहीत. त्यातलेच आम्ही एक होतो. घरात नाही, पण जगभरात कुठेही गेलो की दोघे भेटायचो.

मला एक प्रसंग आठवतो. आम्हा दोघांना एका कार्यक्रमासाठी ‘परफॉर्मर’ म्हणून बोलावण्यात आले होते. मी ‘फूड मास्टर्स’ म्हणून आणि शात्भी ही कॉकटेल्ससाठी. त्या कार्यक्रमाला साधारण १५०० जण उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले होते. मैदान मोठं होतं. आयोजकही खुशीत होते. पण जेव्हा प्रत्यक्षात आम्ही तिथे गेलो तेव्हा फक्त दहा जण मैदानावर उपस्थित होते. झालं. साऱ्यांचा उत्साह मावळतीला लागू लागला. पण मी आणि शात्भीने एकमेकांकडे पाहिलं. आम्हा दोघांना जे काही सांगायचं होतं ते त्यातून स्पष्ट होतं. आम्ही कामाला लागलो आणि बघता बघता मास्टर्स क्लासची भट्टी जमून आली. मी वेगवेगळे खाद्यपदार्थ आणि शात्भी वेगवेगळी कॉकटेल्स तयार करून देऊ लागली. काही मिनिटांत खाद्यपदार्थ आणि दारूचा असा प्रवाह सुरू झाला की मैदान सहभागींनी भरून गेलं. पण शेवटी या साऱ्याचं श्रेय आयोजकांकडे गेलंच! कारण मी किचनमध्ये आणि शात्भी बारमध्ये होती, हे त्यामागील गुपित!!

शात्भी ही दादर केटरिंग कॉलेजची १९८०च्या बॅचची विद्यार्थिनी. तिथं प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर जुहू येथील सेन्टॉर हॉटेलमधून तिने प्रशिक्षित शेफ म्हणून सुरुवात केली आणि ‘ओरिएंटल फूड’, अर्थात चायनीज जेवणात करिअर करण्याची इच्छा व्यक्त केली. परंतु तिला तिच्या वरिष्ठांकडूनच म्हणावा तितका प्रतिसाद मिळाला नाही. मात्र पुढे ती तेथून निघाली आणि ‘फूड अँड बेव्हरेज’ विश्वात कर्तृत्व गाजविण्यासाठी तिने हॉटेल्स फिडाल्गो, गोवा चॉपस्टिक आणि मुंबईसह इतर अनेक शहरांत तिने कामाला आरंभ केला.

नुकतीच आमची उदयपूर येथे भेट झाली. तेव्हा शात्भीनं एका दमात सांगून टाकलं की, खरेतर मला पशुवैद्यक व्हायचं होतं. त्यासाठी मी बारावीनंतर मुंबईतील एका संस्थेत प्रवेशही मिळवला होता. पण इथेही कोणीतरी आडवं आलंच. माझ्या कुटुंबाचे डॉक्टर म्हणाले की, हिला पशुवैद्यक होण्यास एक अडचण आहे.. झालं माझ्या घरच्यांचं अवसान गळालं. ते म्हणाले, हिला अ‍ॅलर्जी आहे. त्या क्षेत्रात तिला टाकू नका. तेही स्वप्न सोड यासाठी माझ्या घरातील सारे जण माझ्या मागे लागले. व्हायचं तेच झालं. मी पशुवैद्यक झाले नाही.

पण आई म्हणाली की का नाही तू हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रात स्वत:ला अजमावून बघत? तिथे मला तिच्या डोळ्यात चमक दिसली आणि मी या क्षेत्रात करिअरसाठी पहिलं पाऊल टाकलं. मी केटरिंगला सुरुवात केली.

एकूणच शात्भीच्या नशिबात जे काही लिहून ठेवलं होतं, तेच तिला मिळालं. पण तरीही शात्भी म्हणते की, मी तसंच काही व्हायचं काही पक्कं ठरवलेलं नव्हतं. त्या वेळी माझे वय २१ होते. तेव्हा माझ्याकडे हॉटेल सुपरवायझरची जबाबदारी होती आणि व्यवस्थापनाने बारटेंडर म्हणून अतिरिक्त जबाबदारी माझ्याकडे सोपवली. खरेतर सुरुवातीला उरात थोडी धाकधूक होती. कॉलेजमधल्या काही रेसिपी माझ्या लक्षात होत्या. स्पिरिट आणि वाइन याशिवाय अल्कोहोलबाबत काही वेळा काम केलेले होते. परंतु माझ्या मेंदूतून पहिल्यांदा कॉकटेल उतरलं आणि पाहुण्यांना ते पसंत पडलं. मग तेथून खऱ्या अर्थाने शिकण्यास आरंभ झाला. हे सारं उत्साहवर्धक तर होतंच, पण आव्हानात्मकही तितकंच होतं. त्याचे फळही मला मिळाले. मग मी मागे वळून पाहिलं नाही.

‘भारतीय समाजात राहताना काही प्रश्न पडतात, त्यातील एक, जो सर्वाना पडतो, म्हणजे उद्या जग काय म्हणेल. हा प्रश्न पडला की मन थोडंफार गोंधळतं. काय आणि कसं, हे प्रश्न मनात रुंजी घालू लागतात. कधी कधी जग काय म्हणेल, या प्रश्नाने अनेकांची स्वप्नं स्वप्नच बनून राहतात. पण यावर जालीम उपाय होताच माझ्याकडे. ते म्हणजे कुटुंब!..’ शात्भी सांगत होती. कुटुंबानं तिला खंबीर साथ दिली. ‘खरेतर मी हॉटेल मॅनेजमेंट करीत असताना मला बारटेंडरचे पहिले मॅन्युअल देणारी कोण असेल तर माझी आई आणि माझी काकी. या पुस्तकाने माझे आयुष्य बदलून टाकले. गंमत अशी की माझ्या या निर्णयापेक्षा आई-काकीने दिलेल्या पुस्तकाने मित्रमैत्रिणींना अधिक आश्चर्याचा धक्का दिला. त्यांच्या शुभेच्छा मागे उभ्याच होत्या. त्यानंतर जेव्हा या व्यवसायात मला जेव्हा ग्राहकांच्या आकांक्षा पूर्ण करायच्या होत्या.’

या दरम्यान तिने बारटेंडरिंगला स्वत:ला वाहून घेतलं. यावर तिच्या संशोधनाला आणि अभ्यासाला सुरुवात झाली आणि मग त्याविषयीचे अध्यापनही आले. यासाठी तिने ‘स्टिर’ (२३्र१) नावाची स्वत:ची अकादमी खोलली. त्यानंतर तिथे कॉर्पोरेट कार्यशाळा सुरू झाल्या. त्यात कॉकटेल मिक्सिंगचे एकाहून एक सरस पाठ सुरू  झाले. आज शात्भी ही बारटेंडर आहे. बेव्हरीज कन्सल्टंट आहे. लेखक आहे आणि अकादमीची प्रमुख आहे!!

पण अजूनही तिला मोठं व्हायचं आहे. जे काही मिळालं आहे ते पुरेसं नाही आणि सर्वोत्तम अद्याप तिच्या हाती गवसायचं आहे, असं ती म्हणते. ‘प्रत्येक निर्णयासरशी मी बदलत गेले. यातील विद्यार्थ्यांना शिकवणं हे सर्वात आव्हानात्मक आणि शिकवणारं होतं. जेव्हा एखादा विद्यार्थी तुमच्या हाताखाली शिकून तयार होतो आणि नाव कमावतो. त्याच्या आनंद आणि गौरवाचे प्रतिबिंब तुमच्या मनाच्या पटलावर उमटलेलं असतं.’ ती सांगत होती.

अमेरिकन व्हिस्की अ‍ॅम्बॅसेडर (सदिच्छादूत) म्हणून माझी भारताच्या वतीने नियुक्ती होणे हा माझ्या आयुष्यातील सर्वात गौरवशाली क्षण होता. आजही मी तो क्षण अनुभवत आहे. अनेक लोक संपर्कात येतात. त्यांच्याकडून काहीतरी शिकता येतं आणि मोठं होण्यासाठी ते फार महत्त्वाचं असतं. माझ्या प्रेरणा अद्याप जिवंत आहेत. मी जे काही माझ्या भूतकाळात करू शकले नाही. ते मला आज या घडीला करायचे आहे. जेव्हा जेव्हा ती संधी मिळेल ती साधण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन. प्रत्येकामध्ये बरंच काही करण्याची क्षमता दाटून भरलेली असते. ती फक्त वापरण्यासाठी सतत तयार असायला हवे. तरच तुम्हाला सर्वोच्च शिखर गाठता येतं. आज मी ज्या क्षेत्रात कार्यरत आहे, त्या बाहेरही एक जग आहे, ते धुंडाळण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असतो, शात्भीचा चेहरा हे सारं सांगताना उजळलेला होता.

पुन्हा उदयपूरची आठवण जागी झाली म्हणून सांगतो. आम्ही दोघे पुन्हा भेटलो. मग माझ्यासाठी तिने विविध कॉकटेल्स बनवून दिली आणि मी तिच्यासाठी विविध प्रकारचे खाद्यपदार्थ. पण आज तिच्या कॉकटेल्सची इथे चर्चा असल्याने मी तिच्या कलाकृतीविषयीच बोलेन. मिश्रणातील सम्राज्ञी म्हणून जिचा गौरव केला जातो. तिच्या तीन रेसिपी इथे प्रत्येकाला पाहायला आवडतीलच.

द एडिटेड जुलेप

संत्र्याचे बर्फाळ (फ्रॉस्टी) जुलेप, स्ट्रॉबेरी आणि पुदिन्याचा अर्क. सोबत पॉल जॉन एडिटेड आणि थोडीशी आग.

ग्लास : ओल्ड फॅशन्ड् / रॉक्स

साहित्य : ४५ मिली. पॉल जॉन एडिटेड सिंगल माल्ट, ४ माल्टा संत्र्याचे काप, अर्धी हिरवी किंवा लाल मिर्ची किंवा काप, १५ पुदिन्याची पाने, दीड लिंबू काप, १५ मिली मोनीन स्ट्रॉबेरी गर आणि ४ ताज्या स्ट्रॉबेरी

सजविण्यासाठी : लाल मिर्ची, संत्र्याचे काप आणि ताज्या स्ट्रॉबेरी

कृती : ओल्ड फॅशन्ड ग्लासमध्ये संत्रे आणि पुदिन्याची पाने एकत्रित टाकून ती घुसळा. किसलेल्या बर्फासह हिरवी वा लाल मिर्ची ग्लासात अलगद टाका. त्यात स्ट्रॉबेरीचा गर मिसळा. त्यानंतर लिंबू आणि जॉन पॉल एडिटेड घालून चांगले घुसळून घ्या. त्यावर थोडा अधिक बर्फ टाका आणि सजवा.

सफरचंद व डाळिंब जीन स्लिंग

ग्लास : फूटेड पिल्सनर

साहित्य : ४५ मिली ग्रेटर थान जीन, ६० मिली सफरचंद रस, ६० मिली डांळिब्याचा रस, २ लिंबाचे काप, सेव्हन अप किंवा स्प्राइटने भरा.

सजविण्यासाठी : सफरचंदाचे काप आणि डाळिंब्याच्या बिया.

कृती : ग्लासात डाळिंब्याचा रस ओता. ग्लास बर्फाने भरा. त्यात उरलेले सर्व साहित्य टाका आणि सेव्हन अप वा स्प्राइटने ग्लास भरा.

अननस आणि भोपळी मिर्ची मार्गारिटा

ग्लास : मार्गारिटा/ओल्ड फॅशन्ड ग्लास

साहित्य : ४५ मिली डेसमोन्डजी ५१% अगाव स्पिरिट, १५ मिली लिंबूरस, १५ मिली शुगर सिरप, ५ ते ६ अननसाचे तुकडे, ६ भोपळी मिर्चीचे तुकडे (लाल, हिरवी, पिवळी), ६० मिली अननसचा रस

सजविण्यासाठी : लाल, हिरव्या पिवळ्या भोपळी मिर्चीचे प्रत्येकी एक काप.

कृती : ग्लासच्या वरच्या कडेला मीठ लावा. त्यात भोपळी मिर्चीचे काप आणि अननस ‘शेक’ करा. अर्धे कॅन बर्फाच्या क्युब्सनी भरा. त्यावर अगाव स्पिरिट ओता. त्यानंतर लिंबूरस, शुगर सिरप, अननस रस घालून घुसळा.

viva@expressindia.com

(अनुवाद : गोविंद डेगवेकर)