आसिफ बागवान

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तुम्ही कधी हे अनुभवलंय? जोडून सुट्टय़ा आलेल्या एखाद्या वीकेण्डला तुम्ही कुटुंब किंवा मित्रमंडळींसोबत एखाद्या पर्यटनस्थळी जाण्याचा बेत आखता आणि अचानक तुमच्या ‘फेसबुक’च्या वॉलवर ट्रॅव्हल कंपन्या, हॉटेलांच्या जाहिरातींचा रतीब सुरू होतो. किंवा..मकरसंक्रांतीच्या निमित्तानं तुम्ही यूटय़ूबवर तिळाचे लाडू कसे बनवायचे, याच्या रेसिपी पाहता आणि मग फेसबुकवरील तुमच्या वॉलवर रेसिपीच्या व्हिडीओंचा भडिमार होतो..

आपल्यातल्या प्रत्येकाच्या बाबतीत या ना त्या प्रकरणात असंच काहीसं घडलं असेल. त्यावेळी ‘का?’ असा प्रश्न अनेकांच्या मनातही डोकावत नाही. अनेकदा तर या योगायोगाची आपल्याला कल्पनाही येत नाही आणि आपण नकळतपणे एका जाळय़ात ओढले जातो. ते जाळं म्हणजे तुमचा खासगीपणाची बोली लावून व्यवसायवृद्धीसाठी पसरवलेलं जाळं. एकमेकांशी ‘कनेक्टेड’ राहण्याच्या सध्याच्या अपरिहार्यतेतून सोशल मीडियावर अनेक अ‍ॅपशी आपण संलग्न होतो. हेच अ‍ॅप आपल्याभोवती हे जाळं पसरवत असतात आणि यातला सर्वात मोठा शिकारी आहे ‘फेसबुक’.

वापरकर्त्यांची माहिती जाहिरातदार, व्यावसायिक कंपन्या, बँका, मनोरंजन वाहिन्या यांना विकल्याच्या फेसबुकच्या कर्मकहाण्या आजवर अनेकदा समोर आल्या आहेत. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत तर ‘क्रेंब्रिज अ‍ॅनालिटिका’ या कंपनीने फेसबुकवरून अमेरिकी नागरिकांची माहिती गोळा करून त्यांचा राजकीय कल दर्शवणारे ‘प्रोफाइल’ तयार केले आणि त्याची विक्री केल्याचं गेल्या वर्षी उघड झालं. त्यानंतर फेसबुकच्या गोरखधंद्याचं पितळ उघडं पडलं. त्या वेळी फेसबुकचा संस्थापक मार्क झकरबर्ग यानं जाहीर माफी मागून यापुढे असं कधीच घडणार नाही, असं म्हटलं होतं. पण गेल्याच महिन्यात फेसबुकच्या लबाडीचा आणखी एक प्रकार ‘द न्यू यॉर्क टाइम्स’नं समोर आणला. ‘द न्यू यॉर्क टाइम्स’च्या पडताळणीनुसार फेसबुकने नेटफ्लिक्स, स्पॉटीफाय, रॉयल बँक ऑफ कॅनडा यांसह अनेक कंपन्यांना आपल्या वापरकर्त्यांच्या माहितीचा खजिना अक्षरश: खुला करून दिला. केवळ वापरकर्त्यांची व्यक्तिगत माहितीच नव्हे तर, त्यांचे खासगी मेसेज वाचण्याची, त्यात बदल करण्याची आणि ते काढून टाकण्याचे अधिकारही फेसबुकने या कंपन्यांना बहाल केले. अशाच प्रकारे अ‍ॅमेझॉन, मायक्रोसॉफ्ट आणि सोनी या कंपन्यांना वापरकर्त्यांसह त्यांच्या मित्रांचेही ई-मेल फेसबुकने पुरवल्याचं या तपासात निष्पन्न झालं.

फेसबुकचा वापर करताना वापरकर्त्यांची ठरावीक माहिती जाहिरातीच्या किंवा व्यावसायिक प्रसाराच्या हेतूने ‘शेअर’ केली जाईल, असे फेसबुकने वापरकर्त्यांकडून कबूल करून घेतलेलं असतंच. पण त्यात नमूद केलेल्या माहितीपेक्षाही अधिक माहिती फेसबुकने या कंपन्यांना हातोहात विकल्याचं उघड झालं आहे. खुद्द ‘द न्यू यॉर्क टाइम्स’लाही अशा प्रकारे माहितीचा मोठा संच मिळाल्याचं त्या वृत्तपत्रानेच उघड केलं आहे.

फेसबुकने केलेल्या या प्रतारणेनंतर पाश्चात्य देशांत ‘फेसबुक हटाव’ ही मोहीम सुरू झाली आहे. #deletefacebook अशी चळवळ सध्या तिकडे जोर धरू लागली आहे. वापरकर्त्यांच्या खासगी माहितीचा बाजार मांडणाऱ्या फेसबुकला हद्दपार करण्याच्या आवाहनांमुळे या कंपनीच्या शेअरमध्येही गेल्या सहा महिन्यांत सातत्याने घसरण होत आहे. एकूणच फेसबुकला जेरीस आणण्यासाठी आता वापरकर्तेच उभे राहू लागले आहेत.

या सगळ्यांनी फेसबुकवर काही परिणाम होतोय का?, या प्रश्नाचं उत्तर नाही असंच म्हटलं पाहिजे. जगभरात तब्बल १.५७ अब्ज लोक आजही रोज फेसबुकवर सतत सक्रिय असतात. फेसबुकच्या वापरकर्त्यांची संख्या २ अब्ज २३ कोटींच्याही पुढे आहे. अशा वेळी शे-दोनशेंनी अगदी ठरवून फेसबुक बंद करण्याचा निर्णय घेतला, तरी बिघडलं कुठे? नेमक्या याच भावनेतून फेसबुकची मनमानी सुरू आहे. नेटफ्लिक्स, स्पॉटीफायच्या माहिती विक्रीचं प्रकरण उजेडात आल्यानंतर फेसबुकने ‘आम्ही नियमांच्या पलीकडे जाऊन काहीही केलं नाही. आमच्या वापरकर्त्यांना याची पुरेपूर कल्पना आहे,’ असा खुलासा केला. एकूणच या प्रकरणात सारवासारव करण्यापलीकडे फेसबुकने काहीही केलं नाही. अशा वेळी ‘आपण काय करतोय?’, हा प्रश्न निश्चितच उभा राहतो.

आपल्या खासगीपणाचा बाजार मांडण्याची मुभा देण्याइतपत फेसबुकची आपल्याला गरज आहे का, हा प्रश्न सर्वप्रथम स्वत:ला विचारला पाहिजे. सतत एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी फेसबुकने पहिल्यांदा एक मोठं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. पण म्हणून आपली व्यक्तिगत माहिती या कंपनीच्या ओंजळीत अशीच टाकायची? आजघडीला ‘डेटा प्रायव्हसी’ हा ज्वलंत प्रश्न बनला आहे. शॉपिंगपासून बँकिंगपर्यंत आणि जोडीदार निवडण्यापासून पर्यटन स्थळ निवडण्यापर्यंत प्रत्येक बाबतीत इंटरनेटचा वापर वाढला आहे. अशा वर्तमानात आपली व्यक्तिगत माहिती गैरहाती पडून त्यातून आपलं नुकसान करण्याचा प्रयत्न होईल, ही भीती प्रत्येकालाच सतावत असते. मग हीच माहिती खिरापतीसारखी कुणालाही वाटण्याचा अधिकार फेसबुकला आपण देतोच कसा, यावर विचार आणि कृती करणं आवश्यक बनलं आहे.

पण, फेसबुक ‘डिलिट’ करणं हा अंतिम उपाय नाही. आज फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप आणि इन्स्टाग्राम या तीन समाजमाध्यमांचा सर्वाधिक वापर होतो. ही तिन्ही माध्यमं ‘फेसबुक’च्याच मालकीची आहेत. त्यामुळे फेसबुकवरून तुम्ही बाजूला झालात तरी अन्य दोघांच्या माध्यमातून तुम्ही त्यांच्या तावडीत सापडताच. याही पलिकडे, फेसबुककडून जे आज घडतंय, ते उद्या तिसऱ्याच सोशल नेटवर्किंग साइटकडून किंवा अ‍ॅपकडून घडणार नाही, याची हमी देता येत नाही. कॉल फ्री आणि इंटरनेटला पैसे आकारत असलेल्या जमान्यात ‘डेटा’ हीच सर्वात मौल्यवान वस्तू आहे. या ना त्या प्रकारे तुमच्या डेटावर डल्ला मारण्याचा प्रयत्न होतच राहणार. अशा वेळी आपणच सजग राहणं आणि आपल्या ‘सोशल’तेचं नियमन करणं अत्यावश्यक आहे (ते कसं करायचं याच्या काही टिप्स सोबत दिल्या आहेत). काय पाहावं, किती वेळ पाहावं, किती वेळ ऑनलाइन रहावं, कुणाशी किती आणि काय शेअर करावं या प्रश्नांची चौकट आपण स्वत:ला आखून दिली तरी, आपण आपल्या माहितीची योग्य राखणदारी करू शकू.

फेसबुकवर ‘प्रायव्हसी’ जपा!

* ‘फेसबुक’वरील तुमचा डेटा वेळोवेळी डाऊनलोड करा. फेसबुकवर तशी सुविधा दिली गेली आहे.

* ‘टाइमलाइन’ आणि ‘टॅगिंग’च्या सेटिंगमध्ये आवश्यक ते बदल करा. त्यामुळे तुम्हाला नेमकं काय पाहायचं आहे, तेवढंच दिसेल.

* तुमच्या ‘प्रायव्हसी सेटिंग’वर वेळोवेळी लक्ष ठेवा. त्यात बदल करा.

* फेसबुकचा वापर कमीत कमी करा.

* वरीलपैकी काहीच जमणार नसेल तर फेसबुकच डिलीट करा आणि निश्चिंत व्हा!

viva@expressindia.com

मराठीतील सर्व व्हिवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article about deletefacebook movement
First published on: 18-01-2019 at 01:22 IST