एखाद्या शब्दाच्या नेमक्या उच्चाराबाबत मनात अनेकदा गोंधळ होतो. कॉलेज प्रेझेंटेशनमध्ये, इंटरव्ह्य़ूमध्ये किंवा हायफाय पार्टीमध्ये इंग्रजी किंवा इतर परकीय शब्दांचा उच्चार चुकीचा केला की, इम्प्रेशन एकदम डाऊन. कुठल्या शब्दाचा उच्चार, कुठल्या ठिकाणी, कसा करावा यासाठीच हा कॉलम..

शब्दांबद्दलची सगळ्यात इण्टरेस्टिंग गोष्ट कोणती? तर ते सतत बदलत राहतात. काही वेळा चुकून तर काही वेळा अज्ञानातून हे बदल होतात. चर्चगेटला इरॉससमोरच्या ब्युटी सलूनचं नाव वाचल्यावर नाक्यावरच्या सलूनशी माझी अनेकदा मनातल्या मनात तुलना व्हायची. पण आता त्या शब्दाच्या उच्चाराची गंमत कळल्यावर गोंधळ मिटला.
आपल्या बाबतीत बघा मेंदूचा दिवा पेटून ‘युरेका’ असं ओरडण्याचा एक हमखास क्षण असतो. माझं अगदी तस्संच झालं. (Saloon) सलून हा एकमेव शब्द नाही. त्याचा जुळा भाऊ सुद्धा आहे.. Salon. हा मूळचा फ्रेंच व इटालियन भाषेतला शब्द. इंग्लिश उच्चार सॅलोन आणि यू एस इंग्लिशमधला उच्चार सलॉन. हे समजल्यावर लक्षात आलं की, ते सलून आणि सलॉन यात काही तरी नातं आहे तसंच काही तरी भेद नक्की आहे. मग आता प्रश्न पडतो दोघांमध्ये नेमका फरक काय? दोन्ही शब्दांच्या अर्थातला फरक कळला की उच्चारातला फरक आपसूकच लक्षात येईल.
वर्षांनुवर्षे आपण सलून हा शब्द किती सहज वापरात आलो. पण प्रत्यक्षात डिक्शनरीमध्ये दिलेल्या अर्थानुसार जिथे फॅशनशी निगडित विशिष्ट प्रकारची सेवा दिली जाते. त्या ठिकाणाला सलॉन म्हटले जाते. त्यामुळे ब्युटी सलॉन हा शब्द अगदी बरोबर ठरतो. त्यशिवाय या शब्दाच्या अन्य अर्थानुसार एखाद्या मोठय़ा रूममध्ये कलात्मक प्रदर्शन भरवलं तर ते पण सलॉन ठरू शकतं.
मग आता सलूनचं काय? सलून हा स्वतंत्र शब्द आहे की नाही? तर सलून हा शब्दसुद्धा आहे. जिथे एखाद्या खोलीत विशिष्ट हेतूने लोक जमतात ते ठिकाण म्हणजे सलून. जसं की बिलियर्ड सलून, डायिनग सलून. याच न्यायाने केस कापायला एकत्र जमलेले लोक या अर्थाने सलून शब्द वापरला तर चूक नाही. पण ते अचूकही नाही. पाश्चात्त्य देशात जेवणाची किंवा मद्यपानाची सोय असलेल्या ठिकाणांनासुद्धा सलून म्हणतात.
आता हा अर्थातला फरक कळल्यावर उच्चाराचा घोळ सहज निस्तरता येईल. सलूनमध्ये केस कापले..  not bad. पण सलॉनमध्ये हेअर कट केला, हे जास्त परफेक्ट. सलूनच्या उच्चारात सहजता आहे आणि सलॉनमध्ये स्टाइल. कोणता उच्चार करायचा हे आपलं आपण ठरवू शकतो. अर्थात वापरायची जागा लक्षात घेऊनच.
आपण भारतीयांनी सलून शब्द केशकर्तनालयाशी घट्ट जोडला आहे. पण तो तेवढय़ापुरता मर्यादित नाही. तो खूप साऱ्या गोष्टींकरिता वापरला जातो. त्यामुळे डािन्सग सलून असा शब्द समोर आला तर बिचकायचं कारण नाही. काहींचं असं म्हणणं आहे की ज्याला जसा हवा तसा करेनात का उच्चार! पर परफेक्शन भी कोई चीज होती है. सो लेट्स बी परफेक्ट.
रश्मी वारंग -viva.loksatta@gmail.com