एखाद्या शब्दाच्या नेमक्या उच्चाराबाबत मनात अनेकदा गोंधळ होतो. कॉलेज प्रेझेंटेशनमध्ये, इंटरव्ह्य़ूमध्ये किंवा हायफाय पार्टीमध्ये इंग्रजी किंवा इतर परकीय शब्दांचा उच्चार चुकीचा केला की, इम्प्रेशन एकदम डाऊन. कुठल्या शब्दाचा उच्चार, कुठल्या ठिकाणी, कसा करावा यासाठीच हा कॉलम..

वर्षांनुवर्षे आपण एखाद्या व्यक्तीबद्दल सॉलिड अंदाज बांधलेले असतात. जसं की, हे काका म्हणजे भयंकर कडक आहेत, हसण्याबिसण्याचं यांना टोटल वावडं आहे; असंच काही. पण एखाददिवशी तेच काका त्यांच्या मित्रांसोबत नाचताना, गाताना दिसतात आणि आपण म्हणतो, ‘यार काकांनी गुगली टाकली.’ माणसांच्या बाबतीत जसे अंदाज चुकतात तसेच काही वेळा शब्दांच्या बाबतीतही होतं. आपल्या मनातला उच्चार आणि त्याचं मूळ अंगडंटोपडं वेगळंच निघतं. माझ्या ओठांवर तर या शब्दाचा मूळ उच्चार कळला तेव्हा ‘दगाबाज रे..’ हेच गाणं आलं. पण शब्द दगाबाज नाही. आपल्या कानांवर झालेले उच्चार फसवे असतात. हा शब्द म्हणजे शेडय़ूल.
मी एका ‘हाय-टी’ला गेले होते तेव्हाची आठवण झाली. मस्त रंगीबेरंगी वातावरण होतं. रंगलेल्या स्त्रिया, हायफाय गप्पा आणि जबरदस्त एटिकेट्स. तर त्या गप्पांत एक काकू किंवा आंटी म्हणूया हवं तर. (त्यांना काकू वा आंटी न म्हणता काय म्हणावं याच विचारात मी अजूनही आहे.. असो) सारखा उच्चार करत होत्या..  ‘माय स्केड्ज्यूल इज व्हेरी बिझी.’ मनात आलं की, बाजूच्या सॉफ्ट म्युझिकच्या तालावर माझे कान काही वेगळंच ऐकताहेत बहुधा. कान देऊन ऐकल्यावर पुन्हा तोच उच्चार, स्केड्ज्यूल. इंग्रजी शब्द Schedule   आपल्याला तसा चांगलाच परिचित आहे. या आपल्या नॉर्मल शेडय़ूलला ‘स्के’ का करावं काही कळलं नाही. बाहेर पडले तरी शेड्ज्यूल की स्केड्ज्यूलचा किडा काही वळवळणं थांबवेना. मग यथोचित चौकशी केल्यावर साक्षात्कार झाला तो असा की, इंग्रजांचे ते ‘शेड्ज्यूल’ आणि अमेरिकनांचे ते ‘स्केड्ज्यूल’.
मी हे शब्द देवनागरीत लिहितानासुद्धा पायमोडय़ा ‘ड्’ आणि ‘ज्यू’ हाच शब्द वारंवार लिहितेय, कारण चोख इंग्रजी उच्चार ‘शेज्यूल’ असाच आहे. फक्त मध्ये निसटता ‘ड’ अ‍ॅड करायचा. म्हणजे ‘शेड्ज्यूल’ असं रसायन तय्यार होतं आणि तेच अचूक आहे. आपल्या भारतीय उच्चारात आपण ‘ज्’ला जा सांगून फक्त ‘ड्’ ठेवलाय. त्यामुळे बहुतांश भारतीय उच्चार कसा करतात? शेडय़ूल. पण तो ब्रिटिश इंग्रजी उच्चारात ‘शेड्ज्यूल’ असाच होईल. यातला ‘ड’ अगदी अस्पष्ट आहे.
तुम्ही म्हणाल मग त्या अमेरिकनांचं काय करायचं? तर त्यांच्यासमोर ‘स्केड्ज्यूल’ असाच उच्चार योग्य ठरेल. या दोन्ही उच्चारांतला ‘ड्’ मात्र लोणच्याइतकाच तोंडी लावावा. आता या दोन उच्चारांनी दोन वेगळ्या दिशांना तोंड करण्याचे कारण काय? पडला ना प्रश्न? तर मित्रहो, आपल्याकडचे शास्त्रीय संगीताच्या घराण्याचे गायक कसं सांगतात, आमचं जयपूर घराणं किंवा आमचं किराणा घराणं तशी या दोन उच्चारांची घराणी वेगळी आहेत. ब्रिटिश मंडळी मूळच्या फ्रेंच घराण्याला अर्थात उच्चाराला मानतात तर अमेरिकन मंडळी ग्रीक शब्दाच्या उच्चाराला मानतात. आता तुम्हाला कोणत्या घराण्याचे पाईक व्हायचंय? तुमची मर्जी आम्ही तर बाप्पा शेड्ज्यूल उच्चाराला धरूनच चालायचं ठरवलंय. इतक्या वर्षांनी जिभेची वळणं बदलण्यापेक्षा ही We follow British accent  असं म्हणणं सोप्पंय ना?
बरं उच्चाराचा गोंधळ निस्तरला ! तर जाता जाता सांगायला आवडेल की, तुमची पत्रं, प्रतिक्रिया, इमेल्स एकदम ऑन शेड्ज्यूल मिळताहेत राव ! त्यातले शब्द एकेक करून तुमच्यासमोर अचूक उच्चारांसह येतील. वादा रहा ! आपलं ‘शेड्ज्यूल’ पक्कं आहे.