vn09एखाद्या शब्दाच्या नेमक्या उच्चाराबाबत मनात अनेकदा गोंधळ होतो. कॉलेज प्रेझेंटेशनमध्ये, इंटरव्ह्य़ूमध्ये किंवा हायफाय पार्टीमध्ये इंग्रजी किंवा इतर परकीय शब्दांचा उच्चार चुकीचा केला की, इम्प्रेशन एकदम डाऊन. कुठल्या शब्दाचा उच्चार, कुठल्या ठिकाणी, कसा करावा यासाठीच हा कॉलम..
आपण जसा विचार करतो वा शब्दांचा अर्थ जोडतो तसेच शब्द निर्माण होते तर किती बरं झालं असतं नाही? कारण काळाच्या ओघात शब्द, त्यांचे अर्थ, त्यांचा उच्चार कायच्या काय बदलत जातो आणि आपण मात्र त्या शब्दाच्या आपल्याला ज्ञात कोपऱ्यालाच हाती धरून बसतो. हे सगळं सुचण्याचं कारण म्हणजे ‘शब्दसखा’च्या माध्यमातून आपण सारेच विविध शब्दांचे उच्चार तपासून पाहत आहोत. त्याचं काय झालं.. तर एका दहा-बारा वर्षांच्या पिल्लाकडून प्रश्न आला की, हॉट गोष्टी सव्‍‌र्ह होतात म्हणून त्याला हॉटेल म्हणतात का हो? गंमत म्हणजे या वेळी या प्रश्नाचे उत्तर शोधताना अर्थाकडून शब्दाच्या उच्चाराकडे प्रवास झाला आणि त्यातून हाती आल्या खूप साऱ्या चूक दर्शवणाऱ्या फुल्या.
एकतर हॉट गोष्टी आणि हॉटेल या नावाचा दूर दूर संबंध नाही. मुळात हॉटेल हा असा उच्चारच नाही. उच्चार आहे होटेल. पण रस्त्यावरच्या सगळ्या पाटय़ा डोळ्यासमोर आणा आणि आठवा की नेमके काय लिहिलेले असते? आपण काय वाचतो? आणि या शब्दाचा उच्चार कसा करतो? येस. आपण बहुतांश वेळा उच्चार करतो.. हॉटेल, हॉटल, हिंदी भाषिक असेल तर होटल. पण या शब्दाचा खराखुरा उच्चार आहे ‘होटेल’ अथवा ‘होटॅल’.
फ्रेंच भाषेतून हा शब्द इंग्रजी भाषेत आला. होटेल – होस्टेल – होस्पिटल या शब्दांत खूपच जवळचे नाते पूर्वीच्या काळात होते. मुळात फ्रेंच लोकांनी ‘होटेल’ची व्याख्या करताना म्हटले होते की, जिथे भेट देणाऱ्या मंडळींची सतत वर्दळ असते, जिथे येणाऱ्यांची काळजी घेतली जाते अशी इमारत. या जुन्या व्याख्येत राहण्याच्या सोयीचा भाग अंतर्भूत नव्हता. राहण्याकरता ‘इन्स’ असायच्या. नंतर हळूहळू प्रवाशांकरता राहण्याची सोय असलेली जागा म्हणजे ‘होटेल’ अशी संकल्पना जोडली गेली. खाणे-पिणे, चैनीच्या सोयी यानंतर वाढत गेल्या.
भारताच्या संदर्भात विचार करायचा झाल्यास एक काळ असा होता की, होटेलमध्ये जाणे ही निषिद्ध गोष्ट होती. पाश्चात्त्य मंडळी मात्र होटेलचा, राहण्याची सोय म्हणून जो विचार करतात त्याऐवजी आपल्याकडे उपाहारगृह म्हणजे होटेल असा जो संबंध जोडला गेला आहे तो बदलणं केवळ अशक्य. होटेल व रेस्तरॉ यातली सीमारेषा आपण पुसूनच टाकली आहे. होटेल व आपलं नातं आता खूपच घट्ट झालं आहे. दिवसातून वा आठवडय़ातून एकदा तरी होटेल दर्शन होणे आताच्या पिढीसाठी नवलाईचे नाही.
उच्चाराचा विचार करता हॉटेल हा उच्चार इतका रुळला आहे, पाटय़ांवर दिमाखात विराजमान झाला आहे की होटेल असा उच्चार जिभेवर पक्का होणं जरा कठीणच असले तरी अशक्य मात्र नाही. आपल्या रोजच्या लाइफस्टाइलमध्ये असे अनेक शब्द दडलेले आहेत जे काळाच्या ओघात आपण चुकीच्या उच्चारांनी मेंदूत पक्के केले आहेत. त्यांना पूर्ववत करणे प्रत्येकाने व्यक्तिश: ठरवलं तर कठीण नाही. आपला अचूक उच्चार कदाचित इतरांना खटकेल, आश्चर्यकारक वाटेल पण अचूक उच्चारच करायचा आपला निश्चय पक्का असेल तर हॉटेलचं ‘होटेल’ होणं ना तो मुश्किल है और ना ही नामुमकीन!
रश्मी वारंग -viva.loksatta@gmail.com