News Flash

प्रयोगशील पर्यावरणस्नेही

जागतिक पर्यावरण दिना’निमित्ताने व्हिवाने खास या क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणाईच्या कामाबद्दल जाणून घेतलं आहे तेजश्री गायकवाड यांनी.

आजची तरुणाई ही प्रयोगशील आहे यात शंकाच नाही. परंतु या प्रयोगातून आजही शेती हा विषय थोडा मागेच राहिलेला दिसतो. टेक्नॉलॉजी, आरोग्य, कपडे, मेकअप यांमध्ये अनेक प्रयोग केले जातात आणि त्याची नोंदही घेतली जाते. यापलीकडे जात काही तरुण पर्यावरण, शेती यांमध्ये स्वत:हून नवनवीन प्रयोग करत आहेत. ५ जूनला साजऱ्या होणाऱ्या ‘जागतिक पर्यावरण दिना’निमित्ताने व्हिवाने खास या क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणाईच्या कामाबद्दल जाणून घेतलं आहे तेजश्री गायकवाड यांनी.

बॉम्बे ग्रीन

गेल्या वर्षी लॉकडाऊनच्या काळात तन्वी आणि अंकुर अग्रवाल या मुंबईतील तरुण जोडप्याने ‘बॉम्बे ग्रीन’ची सुरुवात केली. लोकांना घरीच भाज्या पिकवता याव्यात यासाठी त्यांनी डीआयवाय ग्रोनिंग किट्स विकायला सुरुवात केली. याबद्दल तन्वी सांगते, ‘आम्ही दोघेही घरच्या बाल्कनीमध्ये आधीपासून झाडं लावत होतो. त्यातून आम्हाला लॉकडाऊनच्या काळात रोजच्या वापरात येणाऱ्या बेसिक गोष्टी मिळत होत्या. त्या वेळी बाजारात जास्त भाज्या येत नसल्यामुळे आमच्या आजूबाजूच्या लोकांनाही साध्या भाज्या मिळवण्यासाठी झगडावं लागत होतं. तेव्हाच आम्ही ठरवलं की सोप्या पद्धतीने भाज्या पिकवण्यासाठी  लोकांना मदत केली पाहिजे. त्यातूनच या डीआयवाय ग्रोनिंग किट्सची सुरुवात झाली’. या किटमध्ये छोटय़ा कुंडय़ा, ३ प्रकारच्या भाज्यांच्या बिया, खत, कोणतं झाड लावलं आहे हे लक्षात राहण्यासाठी मार्किं ग स्टिक आणि या किटच्या वापरासंदर्भातील माहितीपत्रिका असते. हे किट बनवण्यासाठी या जोडप्याने खूप मेहनत घेतली. ‘आम्ही विचार केला की खूपदा लोकांना झाडं लावायची, भाज्या पिकवायची आवड असते परंतु त्यासाठी नक्की कोणती माती, खत वापरायचं, बिया कुठून आणायच्या हे माहिती नसतं. म्हणून किट स्वरूपात सगळ्या गोष्टी एकत्रित देण्याचं आम्ही ठरवलं. आधी आम्ही आमच्याकडे उपलब्ध असलेल्या गोष्टीतून हे किट तयार करून वापरून बघितलं. नंतर अनलॉक झाल्यावर आम्ही या गोष्टी विकणाऱ्यांशी संपर्क साधला, त्यांच्याकडून सॅम्पल मागवून घेतले. जवळजवळ १०० सॅम्पलचं टेस्टिंग केलं. लोकांना मातीशिवाय कोकोपीट (नारळाचा भुसा)किंवा अन्य गोष्टी वापरून झाडं लावता येतात हे माहिती नव्हतं. आमच्या किटमध्ये मातीपेक्षा कोकोपीट आणि खताचा वापर केलेला आहे’, असं तन्वी सांगते.

आम्ही घरीच झाडं लावत असल्यामुळे त्याविषयी माहिती देण्यासाठी सहज ‘बॉम्बे ग्रीन’ या नावाने सोशल मीडियावर अकाउंट सुरू केलं होतं. पुढे या नावाने आपली ओळख उत्तमपणे समोर येत आहे हे लक्षात घेऊन त्याच नावाने व्यवसाय सुरू के ल्याचं ती सांगते. वर्षभरातच ‘बॉम्बे ग्रीन’ने अनेक ग्राहक जोडले, काही ईकॉमर्स साइटवर बेस्ट सेलरचा किताबही त्यांनी मिळवला आहे. ‘ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन त्यांच्या गरजेनुसार आम्ही वेगवेगळे नवीन प्रॉडक्ट लाँच केले. आम्ही सुरुवातीला ईकॉमर्स साइटवरच प्रॉडक्ट विकायला सुरुवात केली होती. नंतर आम्ही वेबसाइटही सुरू केली. या सगळ्या गोष्टी करताना नेहमी एकच विचार डोक्यात होता की प्रत्येकाला उत्तम दर्जाच्या, केमिकल फ्री अशा भाज्या मिळायला हव्यात. घरात झाड लावल्यामुळे अन्य आरोग्ययुक्त गोष्टीही सहज मिळतात’, असं तन्वी सांगते. तन्वी आणि अंकुरने शेतीचं कोणत्याही प्रकारे शिक्षण घेतलेलं नाही. त्यांनी स्वानुभवातून याची सुरुवात केली आहे. अनेकदा  स्वत: पिकवलेल्या भाज्यांच्या बियाही ते किटमध्ये वापरतात. एमबीए झालेले हे दाम्पत्य आपल्या पहिल्या व्यवसायातील टीमबरोबर ‘बॉम्बे ग्रीन’साठीचं संशोधन-मार्के टिंग असा सगळाचा डोलारा उत्तमरीत्या सांभाळत आहेत.

रुक्मिणी फार्म आणि नर्सरी

तरुणवर्ग शेतीकडे वळत नाही, शेतकऱ्यांची मुलंही शहरात येऊन वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करतात, असं आपण ऐकत असतो. सोलापुरातील सांगोला तालुक्यातील अकोला(वसाड) गावच्या २५ वर्षीय  महेश आसबेने हा समज खोटा ठरवला आहे. त्याने बी.टेक. अ‍ॅग्रिकल्चर इंजिनीअरिंग केलं, पुढे प्रोसेसिंग आणि फूड एम. टेक. इंजिनीअरिंग केलं. ड्रॅगन फ्रुटसारख्या विदेशी फळाच्या लागवडीसाठी तो प्रसिद्ध आहे. त्याबद्दल तो सांगतो, ‘आमचं संपूर्ण कुटुंब शेती करतं. मी शेतीचं शिक्षण घेऊन त्यातच प्रयोग करायचं ठरवलं. बी. टेक. करत असताना मला ट्रेनिंगसाठी इस्रायलला अभ्यासासाठी जाण्याची संधी मिळाली. ४५ दिवसांच्या ट्रेनिंगमध्ये मी अनेक गोष्टी शिकलो. एवढा छोटासा देश शेतीला किती महत्त्व देतो हे प्रकर्षांने जाणवलं. तिकडे तर शेतपिकांसाठी लागणारी जमीन, माती, वातावरण, पाणीही मुबलक प्रमाणात नाही. याउलट आपल्याकडे सगळ्या गोष्टी आहेत.  योग्य अभ्यास करून लागवड केली तर उत्तम पीक घेतलं जाऊ शकतं हे पाहिल्यावर मायदेशी परतून आपणही योग्य अभ्यासासह आपल्या शेतात प्रयोग करायचं ठरवलं’.  महेश ट्रेनिंग पूर्ण करून आला तेव्हा ड्रॅगन फ्रुट हे खूप ट्रेण्डमध्ये आलं होतं. त्याने आणि त्याच्या वडिलांनी याबद्दल माहिती घेऊन त्याची शेती करायचा निर्णय घेतला.

‘२०१४ साली मी ड्रॅगन फ्रुटच्या शेतीला सुरुवात केली. पश्चिम बंगालवरून आम्ही रोप आणि अन्य गोष्टी आणल्या. याचं भविष्य काय असणार हे माहिती नव्हतं, पण प्रयोग करायचाच होता. प्रयोग सफल झाला. हे फळ, आमचा फार्म याची माहिती सोशल मीडिया आणि यूटय़ूबच्या माध्यमातून द्यायला सुरुवात के ली. लाखो प्रेक्षक जोडले गेले. आम्ही ग्रीन अ‍ॅपल बेअरची लागवड महाराष्ट्रात पहिल्यांदा आणली’, असे सांगणाऱ्या महेशने आपल्या प्रयोगाच्या माहिती प्रसाराचेही काम सुरू के ले. शेतकरी त्याच्या शेतीला भेट देऊ शकतात, प्रत्यक्ष झाड बघून माहिती घेऊ शकतात तसेच त्याची लागवड करायची असल्यास त्यांच्या नर्सरीमधून रोपही महेश विकत देतो. ड्रॅगन फ्रुट पहिल्यांदा विकताना त्याला थोडा त्रास झाला, त्याने स्वत: सप्लायरकडे जाऊन फळं विकली. उत्तम फळ आणि मार्केटिंगच्या जोरावर पुढे स्वत: सप्लायर त्याच्याशी संपर्क करू लागले.  ‘मी ड्रॅगन फ्रुटच्या शेतीमध्येही प्रयोग करायचं ठरवलं. मला त्याच्या वेगवेगळ्या जाती लावायच्या होत्या. त्यासाठी मी व्हिएतनाम, थायलंडला भेट दिली. नंतर ओमान आणि दुबईसारख्या देशांत मी ड्रॅगन फ्रुट आणि अन्य फळांच्या मार्केटिंग- विक्रीसंदर्भात भेट दिली. पुढे फूड प्रोसेसिंगमध्ये शिक्षण घेऊन ती कंपनीही सुरू केली.  मी ड्रॅगन फ्रुटचा जॅम आणि ज्यूस बनवला असून ते लवकरच बाजारात उपलब्ध होणार आहे. याशिवाय, वेगळ्या जातीची द्राक्षं, डाळिंब, पेरू, अ‍ॅपल बेअर, सीताफळ या फळांची शेती केली जाते. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर फळांची विक्री के ली जाते’, असं तो सांगतो. महेशला एशिया पॅसिफिक यंग बिझनेस अचिव्हर अ‍ॅवॉर्ड— २०२१, नॅशनल अ‍ॅग्रि युथ अ‍ॅवार्ड  २०२१, कृषक सन्मान पुरस्कार  २०२१ असे पुरस्कार मिळाले आहेत. त्याने काही रिसर्चमध्येही भाग घेतला आहे. तरुण मुलांनी शेतीकडे आवर्जून वळायला हवं. आपल्याला टेक्नॉलॉजीच्या उत्तम वापराची माहिती असल्याने त्याचा फायदा घेत आपण शेतीक्षेत्रात नक्कीच यशस्वी होऊ शकतो, असं तो विश्वासाने सांगतो.

इकोमेट इकोलॉजिकल सव्‍‌र्हिसेस

पर्यावरण क्षेत्रात काम करत त्यासंबंधित वेगवेगळ्या सेवा देण्याचे काम करणाऱ्या पुण्यातील नेहा जोशी या तरुणीचे कार्यही दखल घेण्याजोगे आहे. शिवाय रिसायकल प्रॉडक्ट बनवणे, बागकामांच्या कार्यशाळा घेण्याबरोबरच ती कॉलेजमध्ये मुलांना शिकवते. ‘मी पर्यावरण विज्ञानात पदवी शिक्षण घेऊन नंतर डिप्लोमाही  केला आहे. सध्या मी जे. आर. व्हीजेटीआयमध्ये बॉटनी आणि हॉर्टिकल्चर शिकवते आहे. २०१३ साली इकोमेट इकोलॉजिकल सव्‍‌र्हिसेसची मी सुरुवात केली. आपण जे शिकलो त्याचं सोप्या पद्धतीने लोकांना ट्रेनिंग देण्यासाठी आणि सस्टेनेबल गार्डन ही संकल्पना रुजण्यासाठी मी प्रयत्न सुरू के ले. सध्या शहरात छोटीशी बाल्कनी किंवा अगदी खिडकी असली तरी त्यात झाडं लावायची लोकांची इच्छा असते. अशा वेळी नक्की कोणती झाडं लावावीत, त्याची निगा कशी करावी, त्यांचा उपयोग काय?, या मार्गदर्शनासह मी होम गार्डनिंग, डीआयवाय गार्डनिंगबद्दल वर्कशॉप घेते. मोठमोठय़ा कंपन्यांसाठीही मी आवर्जून हे वर्कशॉप घेते. रोज लॅपटॉपवर चालणारे हात जेव्हा मातीत काम करतात तेव्हा मिळणारं समाधान मला मोलाचं वाटतं’, असं नेहा सांगते. वर्कशॉपच्या बरोबरीने नेहा लँडस्केप, ऑर्गनिक गार्डन सेटअप करून देते. पक्षी, फुलपाखरू गार्डन सेट करून देते, ज्यात त्यांना आवडणारी झाडं लावलेली असतात.

आपण अशा पद्धतीने झाडं लावू शकतो याची फारशी कल्पना लोकांना नसते. प्रत्येक झाडाची दिशा, त्यासाठी घ्यायची काळजी, झाडाचे फायदे लक्षात घेऊन बाग डिझाइन करायची. शिवाय तिथे बसण्यासाठी जागाही उपलब्ध करायची हे प्रोफे शनल पद्धतीने करून द्यायचं काम नेहा करते. नेहा वेस्ट मटेरिअलपासून गार्डन सेटअप करून देते. ‘आपल्याकडे  भेटवस्तू देण्याचा खूप ट्रेण्ड आहे. हेच हेरून मी काही तरी उपयोगात येतील असे गिफ्ट बनवायचा विचार केला. मी ग्रीन गिफ्ट्स विकायचं ठरवलं. यात ग्रीन कार्ड, वेगवेगळी झाडं, सिरॅमिक पॉट, कुंडय़ा, फ्रिज मॅग्नेट विथ पॉट, ग्रो किट असे अनेक पर्याय आहेत. याशिवाय मी होम डेकोरचं डिझाइनही करते आणि वर्कशॉपही घेते’, असं तिने सांगितलं. नेहा मेट्रो शहरातील लोकांना तिच्या कामाने पर्यावरण जपण्यासाठी आपण काय करायचं, त्यातून आपल्याला काय फायदा होतो हे दाखवून देते आहे. तिच्या या कामाला अनेक लोकांची साथ लाभली आहे. ज्यांना तिचं वर्कशॉप करणं शक्य नाही त्यांच्यासाठी ती सोशल मीडियावर छोटे छोटे व्हिडीओ, फोटो माहितीसह टाकत असते. त्या पोस्टवर आलेल्या प्रश्नांची उत्तरंही ती आवर्जून देते.

ज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या साहाय्याने स्वत: पर्यावरण संवर्धनासाठी काम करणारी, त्याबद्दल जनजागृती करत लोकांनाही या कार्यात सहज सहभागी करून घेणारी तरुणाई सचोटीने या क्षेत्रात कार्यरत आहे. त्यांचे छोटे छोटे प्रयत्नही लाखमोलाचे ठरत आहेत.

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2021 12:29 am

Web Title: article about environmental activist on world environment day 2021 zws 70
Next Stories
1 वस्त्रान्वेषी : अस्सा शेला सुरेख बाई!
2 नवं दशक नव्या दिशा : दोन ओंडक्यांची होते..
3 ‘फेन्ड्स’ फॉरेव्हर!
Just Now!
X