सायली सोमण

आपल्या भारत देशात टेक्स्टाइल आणि क्लोदिंगला मुळातच एक विशिष्ट सामाजिक, सांस्कृतिक आणि कलात्मक स्थान असल्यामुळे जुने झाले तरी कुठलेही कापड किंवा कपडा प्रथम निरुपयोगी वस्तू म्हणून टाकाऊ  मानला जात नाही. त्याउलट त्याचे रूपांतर एका वेगळ्या कामात उपयोगी ठरणाऱ्या वस्तूमध्ये कसे होईल आणि ते सुंदर, कलात्मक कसे दिसेल, यावर जास्त भर दिला जातो. मग ते लघुउद्योग स्तरावर असो किंवा मोठय़ा उद्योग स्तरावर. कपडा हा सतत ‘रिसायकल’ होत असतो आणि तो वेगवेगळ्या रूपांत आपल्यासमोर येतो.

काही वर्षांपूर्वीपर्यंत टेक्स्टाइल रिसायकलिंग ही एक घरगुती, छोटय़ा प्रमाणात केली जाणारी कलाकुसर होती. याचे अगदी सोपे उदाहरण म्हणजे आपल्या आजीने तिच्या जुन्या सुती आणि मऊ  साडय़ांपासून शिवलेली ‘गोधडी’ किंवा लहान तान्ह्य़ा बाळांच्या त्वचेसाठी खास जुन्या मऊ  सुती साडय़ांपासून, ओढण्यांपासून बनवली जाणारी दुपटी, टोपडे, पांघरुण अशा अनेक छोटय़ा-मोठय़ा गोष्टी. घरगुती वापरातल्या गोष्टी म्हणाल तर जुन्या कपडय़ापासून आईने घरातील स्वच्छतेसाठी बनवलेली कापडे किंवा पोतेरी आपल्याला नवीन नाही. जसजसा काळ पुढे सरकला तसेच इतर क्षेत्रांप्रमाणेच या क्षेत्रात पण रिसायकलिंगच्या अजून काही आधुनिक प्रकार आणि प्रक्रियांचा शोध लागला आणि तो घरगुती तसेच औद्योगिक वापरातील वस्तूंसाठीच महत्त्वाचा ठरला.

कॉटनप्रमाणे सिल्क, वुल आणि इतर प्रकारच्या टेक्स्टाइलमधील प्री कन्झ्युमर वेस्टचे आपापल्या गुणांना ओळखून नेमून दिलेले असे रिसायकलिंगमधील उपयोग आहेत. जसे सिल्कच्या बाबतीत ते सिल्कच्या यार्न/दोऱ्यांवर आणखी काही प्रक्रिया करून त्यांचा वापर भरतकामासाठी केला जातो, तसेच सिल्कच्या राहिलेल्या कापडाचा वापर आपण स्कार्फ, स्टोल, दुपट्टे, ज्वेलरीसाठी करू शकतो. तर वुल म्हणजे लोकरीच्या बाबतीत त्या उर्वरित लोकरीवरही थोडी प्रक्रिया करून त्यांचा वापर हाताने स्वेटर किंवा मफलर विणण्यासाठीचे लोकरीचे धागे तयार करण्यासाठी होतो.

टेक्स्टाइल किंवा अ‍ॅपरल वेस्टची विभागणी प्री कन्झ्युमर किंवा पोस्ट कन्झ्युमर अशा दोन प्रकारांत विभागली जाते. प्री कन्झ्युमर वेस्ट हे दोरा बनवताना राहिलेल्या कापसापासून किंवा कुठल्याही प्रकारचे कापड विणताना राहिलेल्या दोऱ्यापासून नाही तर अ‍ॅपरल इंडस्ट्रीमध्ये कपडे शिवताना राहिलेल्या कपडय़ांमधून वेचली जाते. तसेच पोस्ट कन्झ्युमर वेस्टचे मूळ जास्त करून घरगुती किंवा जुने कपडे इत्यादी टाकाऊ  वस्तूंमध्ये जास्त सापडते. प्री कन्झ्युमर वेस्टपासून रोजच्या राहणीमानातल्या आणि सामान्य जनतेला लागणाऱ्या अनेक वस्तूंचे उत्पादन होताना आढळते. उदाहरणार्थ, कागदाच्या विविध प्रकारांचे उत्पादन; बँडेज, पॅड्ससारख्या सर्जिकल गोष्टी किंवा गाद्या आणि उशांमध्ये लागणारा कापूस, इत्यादी.

तर पोस्ट कन्झ्युमर वेस्ट रिसायकलिंगमधील ज्वलंत उदाहरण म्हणजे वरती सांगितल्याप्रमाणे गोधडी, दुपटीसारख्या घरगुती गोष्टी. यांच्या व्यतिरिक्तही हा रिसायकलिंग प्रकार म्हणजे एक मोठा औद्योगिक विभाग आहेच. जिथे डोअरमॅट्स, नॅपकिन्स, ब्लँकेट्स, कार्पेट/ गालिचा, घरगुती सामान आणण्यासाठी लागणाऱ्या कापडी पिशव्या यांसारख्या अनेक उपयुक्त गोष्टी बनवल्या जातात. मागच्या काही चार-पाच वर्षांमध्ये ‘टाकाऊ मधून टिकाऊ ’ गोष्टी बनवताना त्याच्याकडे कलात्मक दृष्टिकोनातून बघितले जात आहे. यामुळे एक फायदा तर नक्कीच झाला आहे. काही तरी वेगळं आणि सर्जनशील करायला मिळत असल्यामुळे सर्व वयोगटांतील लोकांमध्ये एक उत्साह तर असतोच, पण ‘टाकाऊ मधून टिकाऊ ’ गोष्टी बनवताना त्याच वेळी त्या गोष्टीचे बाह्य़ रूप कसे आकर्षित दिसेल याकडे पण लक्ष दिले जाते. म्हणजे पूर्वी जसं जुन्या साडय़ा या फक्त घरगुती वापरासाठी पिशव्या बनवण्यापुरतीच मर्यादित होत्या, पण आता अशाच काही साडय़ांपासून सुंदर ड्रेसेस, बटवे, डिझायनर पडदे, भारतीय बैठकीत दिवाणावर घालायला एखादा सुंदर बेडशीट आणि उशीच्या अभ्य्रांचा  सेट या सर्व गोष्टी बनवू शकतो. आणि यांना अजून आकर्षित बनवण्यासाठी एखादी लेस किंवा विविध प्रकारचे इतर सरफेस ऑर्नमेंटेशनच्या पद्धती वापरून या  वस्तू फक्त घरगुती वापरासाठी नाहीतर व्यावसायिकदृष्टय़ा बाजारात विकायला पण उपयोगी ठरतात. फक्त साडय़ा नाहीतर हल्ली जुन्या टी-शर्ट्स-शर्ट्सपासून पण तरुण मुलींसाठी कॉलेज किंवा बाहेर फिरायला जाताना काही ट्रेंडी लुकमधील बॅग्स बनवून त्यावर आणखी कलाकुसर करून त्याचा उत्तम वापर केला जाऊ शकतो. अशाच काही जुन्या टी-शर्टस्/ नॅपकिन्सना एकत्र गोळा करून आकर्षक अशा डोअरमॅट्स बनवू शकतो. तरुण मुलींच्या लेटेस्ट फॅशन टेंड्समध्ये सध्या अँटीफिट्स/ बॉयफ्रेंड फिट्स म्हणजेच थोडय़ा ढगळ्या कपडय़ांची खूप चलती आहे. त्यामुळे एखाद्या मोठय़ा मापाचा टी-शर्ट किंवा शर्ट मिळाल्यावर त्यात थोडेफार मापाचे बदल करून आणि एखादी छानशी अ‍ॅक्सेसरीजची भर टाकून एक उत्तम ड्रेस तयार होऊ  शकतो.

उत्तर भारतात पानिपत ही जागा जगातील टेक्स्टाइल रिसायकलिंगचे सर्वात मोठे हब मानले जाते. त्यामुळे फक्त भारतामधून नाहीतर यूएसए, यूकेसारख्या देशांमधून पण रिसायकलिंगला लागणारी टेक्स्टाइल वेस्ट किंवा कच्चा माल पानिपतमध्ये पोचवला जातो. मग काही काळ याच टेक्स्टाइल वेस्टवर काही प्रक्रिया होऊ न, त्याचे इतर वस्तूंमध्ये रूपांतर झाले. त्या वस्तू आज इतर देशांमध्ये पण एक्स्पोर्ट केल्या जातात. या टेक्स्टाइल रिसायकलिंगच्या क्षेत्रात अजून लक्ष घातलं गेलं आणि आधुनिकता, सर्जनशीलता याचे योग्य समतोल साधला तर आणखीन नावीन्यपूर्ण उपयुक्त आणि फायद्याचे परिणाम आपल्याला बघायला मिळतील. अनेक लोकांना, बायकांना रोजगार मिळवण्याचे उत्तम मार्ग आहे हा!

viva@expressindia.com