प्रियांका वाघुले

‘हिटिंग द जिम मे नॉट बी एव्हरीबडीज कप ऑफ टी’, असं म्हणणारी अभिनेत्री संस्कृती बालगुडे इतकी फिट राहण्यासाठी नेमकं काय करते याची उत्सुकता वाटल्याशिवाय राहात नाही. मराठी चित्रपट आणि मालिकांमधून ग्लॅमरस गर्ल म्हणून प्रेक्षकांसमोर वावरणाऱ्या संस्कृतीचा फिटनेस फंडा हा आजच्या तरुणाईला साजेसा असाच आहे. एखाद्या गोष्टीची जबाबदारी पडली की ती गोष्ट करण्याचा आपोआपच कंटाळा यायला लागतो, असं ती म्हणते. आणि हे असं प्रत्येकाच्याच बाबतीत होतं, त्यात वावगं काही नाही, उलट ते माणूसपणाचं लक्षण असल्याचं ती म्हणते.

जिम आणि फिटनेसच्या समीकरणाबद्दल इतकं परखड मत असलेली संस्कृती अशा वेळी फिटनेसच सांभाळायचा कंटाळा करण्यापेक्षा त्याला योग्य तो पर्याय शोधणं गरजेचं आहे, असं मत व्यक्त करते. तुम्हाला आवडेल असा पर्याय उपलब्ध करून तो अनुसरणं तितकं च महत्त्वाचं असतं, असं ती म्हणते. आपला फिटनेस राखण्यासाठी नियमित व्यायाम करणं आवश्यक असतानाही तो करणं आवडत नसल्याने त्याला पर्याय म्हणून आपल्याला आवडत असलेल्या नृत्य या प्रकारातून संस्कृतीने फिटनेस राखण्याचा मार्ग निवडला आहे.

नृत्य प्रकारातील झुंबा हा प्रकार संस्कृती फिटनेसच्या दृष्टीने फॉलो करत असल्याचं सांगते. झुंबा हा प्रकार आपल्या शरीराची पूर्ण हालचाल घडवून आणतो. झुंबा हा परदेशी नृत्यप्रकार असून यात नृत्य आणि अ‍ॅरोबिक हालचालींचा समावेश असतो, असं तिने सांगितलं. झुंबा नृत्यामुळे शरीरातील अवयवांची हालचाल होऊन शरीर सुटसुटीत आणि सुदृढ होण्यास मदत होत असल्याचं ती सांगते. झुंबामुळे आपोआपच शरीर आणि मन तजेलदार, एजनर्जेटिक राहण्यास मदत होते. किंबहुना, दिवसभर शरीर चंचल राहते, असं ती सांगते.

केवळ फिटनेससाठी नाही तर स्वत:वरचा आत्मविश्वास वाढण्यासाठीही झुंबा नृत्य नक्कीच उपयुक्त ठरत असल्याचं तिने सांगितलं. शरीराची लवचीकता साधण्यासाठी आणि त्याच बरोबरीने मोठमोठय़ा आजारांवर मात करण्यासाठी देखील हा नृत्यप्रकार उपयुक्त ठरत असल्याचं तिने सांगितलं.

फिटनेससाठी वेगवेगळ्या मशिन्सबरोबर अडकून न राहता, छान मजा करत, उत्साहीपणे आणि तालावर होणारा असा हा फिटनेस प्रकार आहे. त्याचबरोबर झुंबा करताना वापरलेले संगीतही आपल्या मनाला ताजंतवानं करण्यासाठी अधिक उपयुक्त ठरतं, असं संस्कृती ठामपणे सांगते. नाचत-गात फिटनेस साधणारा संस्कृतीचा हा पर्याय तरुणाईला अधिक आपलासा वाटला तर त्यात नवल नाही!

viva@expressindia.com