गायत्री हसबनीस

नवरात्रीला अस्सल गरबा आणि दांडिया नृत्य शिकवून आणि शिकून घेण्याचा मामला वर्षांगणिक जोर धरतो आहे. या नवरात्रीतील डान्स ट्रेण्ड कोणते आणि त्यासाठी कोणी कोणी, कुठे-कशी तयारी केली याचा हा लेखाजोखाही तितकाच रंजक ठरेल..

एव्हाना ए हालोच्या तालावर पाय थिरकू लागले आहेत आणि गरबा, दांडियाचा रासरंग प्रत्येक रात्रीनिशी चढतो आहे. नवरात्रीचा हा एक सण असा आहे जिथे तरुणाई बेभान होऊन नाचते. वर्षभरात येणाऱ्या या नऊ रात्रींसाठी अगदी महिनोन्महिने क्लास लावून खास नृत्याचे धडे घेतले जातात. मुळात नवरात्रीच्या नृत्याला, गरबा आणि दांडियाला एक परंपरा आहे. त्यात वाजवली जाणारी जुनी गाणी आणि त्यांच्या तालावर रंगणारा दांडिया हा खरंच अनुभवण्याचा प्रकार मात्र जुन्याला नवा साज चढवणं यात तरुणाईचा हातखंडा असल्याने दरवर्षी नवरात्रीतील नृत्यप्रकारात वैविध्य पहायला मिळतं. यावर्षीही खास नवरात्री नृत्य शिकवणाऱ्या क्लासेसचं पीकच मुंबई आणि मुंबईबाहेर ठिकठिकाणी पहायला मिळतंय. नवरात्रीला अस्सल गरबा आणि दांडिया नृत्य शिकवून आणि शिकून घेण्याचा मामला वर्षांगणिक जोर धरतो आहे. या नवरात्रीतील डान्स ट्रेण्ड कोणते आणि त्यासाठी कोणी कोणी, कुठे-कशी तयारी केली याचा हा लेखाजोखाही तितकाच रंजक ठरेल..

पारंपरिक नृत्यावर भर असल्याने नवरात्रीत गरबा आणि दांडियासाठी विविध डान्स क्लासेसनी नेहमीपेक्षा आपली वेळ वाढवत विद्यार्थ्यांकडून जमके सराव करून घेतला आहे. महिन्याभरापूर्वीच सर्व डान्स क्लासेसची तयारी सुरू झाली होती. माहिनाभर रोज २ ते ४ तास तरी तालीम ठेवली जायची. महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनीही ऑनलाइन शिकण्यापेक्षा प्रत्यक्ष डान्स क्लासेसला जाऊन शिकण्यावर जास्त भर दिला आहे. काहींना डान्स क्लासला पुरेसा वेळ देता येत नसल्याने वर्कशॉपला जाणं पसंत केलं. यंदा चन्या चोलीतला गरबा, सालसा गरबा, कपल गरबा, गरबा डीप, दांडिया रास असे विविध डान्स ट्रेण्ड नवरात्रीत पाहायला मिळतील.

सरोज खान, शामक दावर यांच्यासारख्या सेलेब्रिटी डान्सर्सच्या स्वतंत्र डान्स अ‍ॅकॅडमीमध्ये नवरात्री डान्स शिकवण्यासाठी एकच गर्दी आहे. शामक दावरचा ‘सॅफरॉन’ हा नवीन डान्स इव्हेंट नवरात्रीत रंगणार आहे. ऑनलाइनवर, युटय़ूबवर ‘डान्स विथ माधुरी’ आणि ‘नच ले विथ सरोज खान’ यांना फॉलो करणारी तरुण पिढीही आहे. तरुण मुलं-मुली नृत्य शिकण्यासाठी खूप उत्साही असतात, पण त्याच्यात छोटय़ा गोष्टींमध्ये म्हणजे प्राथमिक स्टेप्समध्येही चुका असतात त्यावर लक्ष द्यावं लागतं, असं डान्स ट्रेनरचं म्हणणं आहे. सालसा गरबा शिकवणारे आणि ‘ला रिदम डान्स स्टुडिओ’चे नीमेश बिजलानी यांनी सांगितले, ‘हल्ली तरुणांना गरबाची ऑथेंटिक स्टाइल आवडतेच मात्र त्यात इतर लोकप्रिय वेस्टर्न नृत्यशैलीचे फ्युजन करायला त्यांना जास्त आवडतं. म्हणूनच मग नवरात्रीत फ्यूजन डान्स ट्रेण्डमध्ये उतरतात. तरुणांच्या याच मागणीवर विचार करून मी ‘सालसा गरबा’ हा डान्स आणला ज्यात गरबाचा बेस कायम आहे पण त्यात फक्त मी सालसाची जोड दिलीय. तरुणांच्या मनात हल्ली दोन गोष्टींचे मिश्रण करण्याची किंवा आपला एक फ्लेवर देण्याचं वेड वाढतं आहे. नवरात्रीत नृत्य शिकण्यासाठी येणाऱ्यांच्या मनात हे वेड जास्त असतं असं लक्षात आल्याने मी सालसा आणि गरबा हा कॉम्बो यंदा शिकवला आहे’. याचे स्वरूप समजावून देताना मूळ गरबाच्या गाण्यांचा ठेका आणि त्याला सालसा डान्स स्टेप्सची जोड देण्यात आली असल्याचे त्याने स्पष्ट केले. यात कुठेही खास सालसासाठी वापरली जाणारी गाणी नसतील. शिवाय हा सालसा गरबा फक्त मुलगा आणि मुलगी या जोडीनेच केला पाहिजे हे बंधनही नसावं म्हणून काही बेसिक स्टेप्स शिकवल्या आहेत ज्यात दोन मुली आणि दोन मुलं एकत्र जोडीने डान्स करू शकतात. त्यामुळे हा प्रकार वेगळा ठरेल, असा विश्वास नीमेशने व्यक्त केला.

सालसा गरबा हा डान्स प्रकार थोडा लॅटिन स्टाइलचा असल्याने दोन जोडय़ा यात समोरासमोर उभ्या राहतात. त्यातून आत एक वर्तुळ आणि बाहेर एक वर्तुळ तयार करतो आणि त्या जोडय़ांना तिथे उभं करतो. तिथल्या तिथे गोलाकार गिरक्या घेत सालसा गरबा खेळला जातो. हा डान्स प्रकार पूर्णपणे ट्रेण्ड सेंटर आहे कारण गरबात फक्त सालसाच नाही तर हीपहॉप, लिरिकल, हाऊ स असे डान्स ट्रेण्डही मिळवू शकतो, असं तो सांगतो.

गरबा नक्की कसा शिकवला जातो याबद्दल माहिती देताना, ‘डान्स शिकवणारे बऱ्याचदा तरुण असतात. मी स्वत: २५ लोकांसाठी दररोज ४ तासांचं वर्कशॉप ठेवलं होतं आणि माझ्यावर ही जबाबदारी होती की ही मंडळी जिथे कुठे गरबा खेळायला जातील तिथे ते नॉनस्टॉप किंवा ८ राऊं डपैंकी २ ते ३ राऊंड तरी आत्मविश्वसाने खेळू शकतील’. आम्ही डान्सचे ४ सेट ठेवतो १६ डान्स स्टेप त्यात असतात कारण प्रत्येकाला पटकन एखादी डान्स स्टेप समजेल असं नाही. काहींना अजिबात डान्स येत नाही, पण त्यांना काहीही करून डान्स शिकायचा असतो. त्यामुळे त्यांना त्यापद्धतीने तयार करण्याची जबाबदारी आमच्यावर असते. इथे मार्गदर्शन जास्त महत्त्वाचं आहे, असं त्यांनी सांगितलं. नवरात्रीत नव्वद टक्के ट्रॅडिशनल डान्स फोकच खेळतात. काही उत्साही मंडळी बॉलीवूडच्या नवरात्रीच्या गाण्यांवर स्वत:च्या शैलीत कोरिओग्राफी करून त्यात थोडा बदल करून आपला डान्स बसवतात तसंच बॉलीवूडच्या गाण्यांच्या स्टेप्समध्ये हिप हॉप स्टेप्स मिक्स करतात, परंतु मूळ गुजराती गाण्यांवर कोणी वेस्टर्न मिक्स करत नाहीत तर पोपट, हिचको, एक ताली, बे ताली, जोडियो हे मूळ गुजराती डान्स स्टेप्सच फॉलो केले जातात, असं नीमेशने सांगितलं.

यंदा बॉलीवूडच्या हीट गाण्यांवर नवरात्रीत ताल धरला जाणार याबद्दल कोणालाही शंका नाही. ‘वीरे दी वेडिंग’ मधील ‘वीरे’, ‘पद्मावत’मधील ‘घूमर’, ‘धडक’मधील शीर्षकगीत ‘धडक’सह ‘झिंगाट’, ‘लव यात्री’ मधील ‘चोगडा’ आणि ‘ढोलिडा’, ‘स्त्री’ मधील ‘कमरिया’, ‘आवो कभी हवेली पे’, ‘मिलेगी मिलेगी’ तसेच ‘पटाखा’ मधील ‘बलमा’ आणि ‘नमस्ते लंडन’ मधील ‘धूम धडाका’ तर ‘मित्रों’ चित्रपटातील ‘कमरिया’ अशी ठेक्यावाली गाणी या नवरात्रीत वाजतील. यावेळेस रिमीक्स, डीजेच्या अनुषंगाने काही ट्रेण्डी जुनी आणि नवीन नवरात्री गाण्यांची सरमिसळही पहायला मिळेल. अजूनही ‘काय पो छे’मधील ‘शुभारंभ’ तर ‘रामलीला’मधील ‘नगाडा संग ढोल बाजे’ सारखी गाणी यावर्षीही ट्रेण्डमध्ये आहेत. यात विविध नवरात्री मॅश अपचीही भर पडली आहे. ‘रईस’मधील ‘उडी उडी जाये’, ‘पंखिदा तू उडी जाये’ आणि ‘ढोलिया ढोल धिमो’ अशी काही गुजराती उडत्या स्टाइलची गाणीही ट्रेण्डी आहेत.

नवरात्रीत डान्स प्रकाराबरोबरच नाचताना परिधान करण्यासाठी काही विशेष फॅशनही फॉलो केली जाते. त्यामुळे यंदा ‘पॅन्टालुन्स फॅशन’ने नवरात्रीत गरबा आरामात खेळता यावा आणि आपण खेळताना आकर्षकही दिसावं यासाठी काही हटके स्टाइल्स आणल्या आहेत. मॅक्सी ड्रेस, घागरा स्कर्ट, फ्युजन टॉप्स, एसिमेट्रिकल कुर्ता, लॉंग कुर्ता, टी, चिनो, प्रिंटेड डेनिम आणि प्रिंटेड शर्ट आणले आहेत, त्यामुळे यंदा आरामदायक फॅशनवर भर दिला जातो आहे.

डान्स ट्रेण्डमध्येही सातत्याने बदल होत आहेत आणि तरुणांचा सहभाग त्यात यावर्षीही तुफान आहे. नृत्य असो किंवा त्याचबरोबर गरब्याची फॅशन मुलं काय किंवा मुली काय यात आता काहीच भेद नाही आणि फरक नाही. परंतु डान्स म्हटला तर यंदा मुलींचा जोश मुलांपेक्षा जास्त आहे. फिटनेससाठी लावलेला झुंबाचा क्लास बाजूला ठेवून आज मुली आवर्जून गरब्याच्या क्लासला वेळ देतायेत. तसेच गरबा आणि झुंबा एकत्र करत ठेका धरतायेत त्यामुळे यंदाच्या नवरात्रीत गरब्याची इंडो-वेस्टर्न जुगलबंदीच जागोजागी रंग भरणार आहे.