तेजश्री गायकवाड

मुंबईच्या जवळ असलेल्या एलिफंटा लेण्यांमध्ये नुकताच भारत सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयातर्फे ‘आर्टिसन स्पीक’ नावाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. भारतीय टेक्स्टाइल इंडस्ट्रीत सुरू असलेले वेगवेगळे प्रयोग आणि त्यातून होणारी प्रगती यावर प्रकाश टाकणारा हा कार्यक्रम याचकारणाने महत्त्वाचा ठरतो.

भारतीय टेक्स्टाइल इंडस्ट्री ही शेतीनंतर सगळ्यात मोठी इंडस्ट्री आहे जी स्किल्ड आणि अनस्किल्ड लोकांना रोजगार उपलब्ध करून देते. भारतीय हातमाग हे भारताची संस्कृती, इतिहास यांच्याशी जोडलेले आहे. आपल्याकडे हातमागाची अनेक वर्षांची परंपरा आहे आणि ही परंपरा कुशल विणकर आणि कारागिरांनी अजूनही जिवंत ठेवली आहे. पश्चिम बंगालचे कांचिपुरम, पश्चिम बंगालचेच बलुचिरी आणि जामदानी, महाराष्ट्राची पैठणी, मध्य प्रदेशची चंदेरी आणि महेश्वरी, आसामचे मुगा, गुजरातचे पटोला, काश्मीरच्या कानी, टाई आणि डाई, विचित्रपुरी आणि ओडिशाचे बोमकाई, बलरामपुरम केरळ आणि आंध्र प्रदेशचे पोचमपल्ली ही मौल्यवान हातमागाची परंपरा हे कारागीर आणि विणकर अजूनही टिकवून आहेत. पण तरीही अनेक कुशल कारागिरांना अजूनही त्यांच्या कामाची योग्य ती किंमत मिळत नाही. कारागिरांच्या आणि विणकरांच्या समस्या सोडवण्यासाठी, त्यांना उत्तम रोजगार मिळवून देण्याबरोबरच विशेष हस्तकला पेटंट करणे, विरत चालेले हातमाग पुन्हा जिवंत होण्यासाठी मदत करणे, मोठय़ा प्रमाणात जॉब पुरवणे अशा अनेक गोष्टी सरकार करते आहे. यात आता भारतीय टेक्स्टाइल मिनिस्ट्रीने खासगी मोठय़ा कंपन्यांशी केलेल्या करारांचीही भर पडली आहे. या सगळ्या गोष्टींचा, प्रयत्नांचा वेध या कार्यक्रमातून घेण्यात आला.

‘आर्टिसन स्पीक’ या कार्यक्रमात अरविंद ट्रय़ू ब्ल्यू लिमिटेड, रेमंड लिमिटेड, वेल्सपुन इंडिया लिमिटेड, टाइटन कंपनी लिमिटेड आणि रिलायन्स रिटेल लिमिटेड या नामंकित कंपन्यांबरोबर करार केले गेले. या करारांनुसार या कंपन्या थेट कारागीर आणि विणकरांकडून काम करून घेऊ  शकणार आहेत. आणि त्यांना त्यांच्या कामाच्या बदल्यात योग्य तो मोबदलाही कंपन्यांकडून दिला जाईल. यामुळे कारागिरांना आपल्या कामाची बाजारात नक्की काय किंमत आहे हे सुद्धा लक्षात येईल. याविषयी भारतीय टेक्स्टाइल मंत्री स्मृती इराणी यांनी मोठय़ा कंपन्यांनी भारतीय वस्त्रोद्योगासाठी अशा पद्धतीने पुढे येणं हे खूप मोठी घटना असल्याचे स्पष्ट केले. या कंपन्या कारागीर आणि विणकरांसोबत काम करून आपली भारतीय टेक्स्टाइल परंपरा पूर्ण देशभरात मोठी करू शकतील. या करारामुळे या कंपन्या थेट कारागीर आणि विणकरांपर्यंत पोहचू शकतील आणि त्यामुळे मध्ये होत असलेली दलाली कमी होऊन प्रत्यक्ष कारागिरांना किंवा ज्यांनी काम केले आहे त्यांच्या हातात थेट मोबदला पडेल. या सगळ्या प्रक्रियेत सरकारचाही सहभाग असल्याने उत्पादनाच्या दर्जावरही नियंत्रण राहील, असे स्मृती इराणी यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनीही खास उपस्थिती दर्शवली होती. करार करणाऱ्या कंपन्यांपैकी अरविंद ट्र ब्ल्यू लिमिटेड या क्लोदिंग कंपनीचा पार्टनर असलेल्या सचिन तेंडुलकरनेही टेक्स्टाइल इंडस्ट्री आणि या नवीन संकल्पनांविषयीचे विचार मांडले. ‘भारत हा विविधतेने नटलेला आहे. आपल्याकडे वेगवेगळ्या जातीचे, भाषेचे, खाद्यसंस्कृतीचे, वेगवेगळे कपडे घालणारे लोक एकत्र राहतात. त्याच पद्धतीने एका अर्थी आपल्याकडे असलेल्या विणकरांच्या परंपरेनेही आपल्याला असेच एकत्र बांधून ठेवले आहे. आपल्याकडचे विणकर हे आपली परंपरा, सर्जनशीलता आणि कौशल्य जतन करण्यासाठी ओळखले जातात. आताच्या या करारामुळे हा वारसा नुसता जतन करण्यासाठी नाही तर पुढे नेण्यासाठी मदत होणार आहे,’ असे त्याने सांगितले. कदाचित भारत हा असा एकमेव देश आहे जिथे हातमाग, हस्तकला ही बाकीच्या देशांपेक्षा स्वस्त आहे. याचं कारण आपले कारागीर सगळ्या गोष्टी मनापासून बनवतात. ४.३ दशलक्ष लोकसंख्या या इंडस्ट्रीशी जोडलेली आहे. एवढय़ा लोकांची भागीदारी आपली संस्कृती जागतिक स्तरावर घेऊन जाण्यसाठी नक्कीच मदत करेल. कारागिरांबरोबर थेट जोडले जाण्याने त्यांच्या कलाकृती जगभरात विविध भागांत पोहोचवणे आपल्याला शक्य होणार असल्याचेही त्याने विश्वासाने सांगितले.

या कार्यक्रमात केवळ टेक्स्टाइल मिनिस्ट्री आणि कारागीर यांचा सहभाग नव्हता. तर नामवंत फॅशन डिझायनर्सनीही इथे आपला सहभाग नोंदवला. एवढेच नव्हे तर अनेकांनी आपले कलेक्शन सादर करून या उपक्रमाला साथ दिली. या वेळी फॅशन डिझायनरराहुल मिश्राने चिकनकारी, पायल खांडवाला या डिझायनरने बनारसी ब्रोकेड, मास्टर विवर भांगडे यांनी पैठणीचे, गौरव शहाने कांचिपुरम रेशमाचे, केरळमधील डॉ. उषादेवी बाळकृष्णन यांनी बाळारामपुरम साडय़ांचे तर डिझायनर मीरा मुजफ्फर अलीने चिकनकारी, डिझायनर पद्मजाने महेश्वरी, कारागीर रजब देबनाथ (बर्डवान) यांनी जमदानी साडय़ांचे, डिझायनर अब्राहम व ठाकूर यांनी हॅण्डलूम सुतीवर हात-ब्लॉक प्रिंटचे कलेक्शन सादर केले. केवळ आर्थिक विकासाच्या दृष्टीने केलेले प्रयत्नांचेच नाही तर प्रत्यक्षातही या पारंपरिक कपडय़ांची जादू नेमकी काय आहे हेही उपस्थितांना अनुभवता आले. हेच या कार्यक्रमाचे वेगळेपण म्हणता येईल.

viva@expressindia.com