16 February 2019

News Flash

उंच माझ्या टाचा

सगळंच प्रमाणबद्ध आणि एकाच साच्यातील पद्धतीने घडवलेल्या या लुक्सची कम्फर्ट लेव्हल ही अगदीच निम्न होती.

| September 7, 2018 03:36 am

(संग्रहित छायाचित्र)

फॅशनइंडस्ट्रीत भलत्याच लोकप्रिय ठरलेल्या उंच माझ्या टाचा.. हल्ली आपसूकच लहान लहान होत दिसेनाशा होतायेत की काय.. असं चित्र निर्माण झालं आहे.

‘फॅशन’ या विषयाला एका ठरावीक दृष्टिकोनातून बघण्यात आपण मधली काही वर्ष घालवली. अगदी जुन्या काळातील फॅशनचा इथे प्रश्न नाही, कारण आताच्या फॅ शनच्या संकल्पनांपेक्षा तेव्हाच्या फॅ शनच्या संकल्पना खूप वेगळ्या उंचीच्या होत्या आणि कदाचित जास्त लिबरल होत्या. मात्र मधला काही काळ असा आला की फॅ शन इंडस्ट्रीमध्ये काही ठरावीक मापदंड वापरले जाऊ लागले. कापड आणि डिझाइन्सपासून ते मॉडेल्सचा वर्ण आणि त्यांच्या ठरावीक मापातल्या फिगपर्यंत सगळ्या गोष्टींना काही ठरावीक ठोकताळे लावले गेले आणि त्याला चिकटूनच संपूर्ण फॅ शन इंडस्ट्री काम करू लागली. अशा प्रकारची आऊटफिट्स त्या काळात डिझाइन होऊ  लागली, जी रॅम्पवरून खाली उतरून माणसांत किंवा बाजारात आलीच नाहीत. रॅम्पवरच्या मॉडेल्स वगळता बाकी कोणत्याही सामान्य माणसाने ते कपडे वापरण्याची कल्पनाही कधी केली नसेल. अर्धवट दिसणारे कपडे, त्याचं कम्फर्टेबल नसणारं फॅब्रिक आणि उंच टाचांच्या चपला ज्या घालून अगदी समारंभातही वावरायचं म्हटलं तर कंबर मोडायचीच फक्त शिल्लक राहील, असं एकंदरीत स्वरूप असणारी तेव्हाची फॅशन इंडस्ट्री! या इंडस्ट्रीत भलत्याच लोकप्रिय ठरलेल्या उंच माझ्या टाचा.. हल्ली आपसूकच लहान लहान होत दिसेनाशा होतायेत की काय.. असं चित्र निर्माण झालं आहे.

सगळंच प्रमाणबद्ध आणि एकाच साच्यातील पद्धतीने घडवलेल्या या लुक्सची कम्फर्ट लेव्हल ही अगदीच निम्न होती. हे जसजसं पुढील पिढीच्या डिझायनर्सच्या लक्षात यायला लागलं तसतसं त्यांनी या ठोकताळ्यांना आव्हान द्यायला सुरुवात केली. आपल्या डिझाइन्समध्ये बदल करीत या नवीन फळीच्या डिझायनर्सनी स्वत:पासून या चौकटी मोडण्याची सुरुवात केली. ‘वेअरेबल फॅशन’ हे या फळीचं जणू ब्रीदवाक्य झालं. याच वेअरेबल फॅ शनच्या दृष्टिकोनातून अनेक बदल केले गेले, मात्र विशेषत्वाने जाणवणारा बदल म्हणजे सॅण्डल्सच्या टाचांची कमी होत गेलेली उंची! स्टिलेटोज, प्लॅटफॉर्म हिल्स, वेजेस या सगळ्याच्या पलीकडे जाऊन फ्लॅट्सच कम्फर्टेबल आहेत याची जाणीव झाल्याने असेल कदाचित पण आऊटफिटसोबत फ्लॅट्सही डिझाइन करायला डिझायनर्सनी सुरुवात केली. कदाचित खरोखर छान दिसणाऱ्या पण वापरायला त्रासदायक अशा हिल्स घालण्यापेक्षा फ्लॅट्सनाच स्टायलिश करण्याचे प्रयत्न फॅशन विश्वात सुरू झाले. त्यातही आंतरराष्ट्रीय निकषांनुसार न चालता भारतीय शरीरयष्टीला काय शोभून दिसेल हा विचारदेखील या डिझाइन्समध्ये करण्यात येऊ  लागला.

भारतीय फॅशनमध्ये अगदी सहजपणे फ्लॅट्स मिसळून गेल्या. मात्र पाश्चात्त्य देशांमध्ये फ्लॅट्सचा वापर अजूनही तितकासा होताना दिसत नाही. हिल्स वापरल्याने शरीराला त्रास होऊ शकतो, हे वैद्यकशास्त्राने सांगूनही फ्लॅट्स त्यांच्या पचनी पडलेल्या नाहीत. अशात एखादीच क्रांतिकारी घटना घडते जेव्हा हॉलीवूडची एक अभिनेत्री एका मोठय़ा फेस्टिवलला हिल्स काढून ठेवून रेड कार्पेटवर बेअरफुट एन्ट्री करते! ‘ट्वायलाइट’ या हॉलीवूड फिल्मची अभिनेत्री क्रिस्टन स्टुअर्ट हिने या वर्षीच्या ‘कान’ फेस्टिवलला जाताना संपूर्ण मीडियासमोर पायातल्या हिल्स काढून हातात घेऊन रेड कार्पेटवरून प्रवेश केला. केवळ ‘कान’च नव्हे तर ‘मेट गाला’सारख्या अनेक फेस्टिवल्सना एक ठरावीक ड्रेसकोड असतो. हिल्स हा त्या ड्रेसकोडचा एक अविभाज्य भाग असताना अशी कृती करण्याचं धाडस दाखवणं अगदी कौतुकास्पद! २०१४ च्या गोल्डन ग्लोब अवॉर्ड्सच्या वेळी एमा थॉम्सनने स्टेजवर जाताना पायातले स्टिलेटोज काढून हातात घेतले आणि तितक्याच आत्मविश्वासाने स्टेजवर पाऊल ठेवलं. मेट गाला २०१८च्या ‘आफ्टर पार्टी’नंतर परतताना पॅरिस जॅक्सनने इव्हनिंग गाऊ न घालूनही बेअरफुट चालणं पसंत केलं. २०१८च्याच ऑस्कर अवॉर्ड्समध्ये विजेत्यांना पुरस्कार देण्यासाठी आमंत्रित केलेल्या माया रुडॉल्फ हिने बेअरफुट आणि टिफनी हॅडिश हिने स्कफेट स्लिपर घालून स्टेजवर जाणं पसंत केलं. ‘इतका काळ हिल्स घालून पाय काळेनिळे पडले’, अशा अर्थाची विधानं दोघींनीही केली.

याच पार्श्वभूमीवर नुकत्याच पार पडलेल्या ‘लॅक्मे फॅ शन वीक २०१८’ विंटर फेस्टिव्ह सीझनमध्ये ‘फेस्टिव्ह असणाऱ्या डिझाइन्ससोबत हिल्सच छान दिसतात’, हा समज मोडीत काढत गौरांग शाह या डिझायनरने मॉडेल्सना चक्क चपला न घालता रॅम्पवर आणलं. प्रत्येक सीझनला आपली पारंपरिक टेक्स्टाइल जपणारी डिझाइन्स सादर करणाऱ्या गौरांग शाहने त्याच्या रॅम्पवरच्या सादरीकरणातही कायम वेगळेपणा जपलेला आहे. कमी-अधिक प्रमाणात त्याच्याच पावलावर पाऊ ल ठेवत नकिता सिंग, साक्शा-किनी, हाफ-फुल कव्‍‌र्ह, कलोल दत्ता, मोहम्मद मजहर, ‘एका’ यासारख्या डिझाइनर्स आणि लेबल्सनीही रॅम्पवर फ्लॅट्सचा वापर केला. ‘एका’ आणि ‘मोहम्मद मजहर’ यांनी फ्लॅट शूज तर ‘हाफ-फुल कव्‍‌र्ह’ने मोजडी प्रकारच्या चपला रॅम्पवर प्रेझेंट केल्या. ‘साक्शा-किनी’ने विंटर कलेक्शन म्हणून प्लॅटफॉर्म फ्लॅट्ससोबतच आऊटफिटला कॉम्प्लिमेंट करणारे सॉक्सही डिझाइन केले आणि प्लॅटफॉर्म फ्लॅट चप्पल्समध्ये सॉक्स घालून मॉडेल्सनी रॅम्पवर कलेक्शन सादर केलं.

केवळ लॅक्मेच नाही तर भारतातील अनेक फॅ शन वीक्समध्ये आणि फॅशन प्लॅटफॉम्र्सवर अनेक डिझायनर्सनी हा बदल स्वत:ही स्वीकारला आहे आणि त्याचं प्रतिबिंब त्यांच्या डिझाइन्समध्ये, त्यांच्या कलेक्शन्समध्येही दिसतं आहे. फॅ शनही केवळ रॅम्पपुरती मर्यादित न राहता ती ‘वेअरेबल’ व्हावी म्हणून तर हे प्रयत्न आहेतच, मात्र त्याचसोबत उगीचच तयार झालेले आणि त्रासदायक असणारे फॅशनचे मापदंड मोडून काढण्याच्या दृष्टीने उचललेलं हे एक महत्त्वाचं पाऊल आहे.

viva@expressindia.com

First Published on September 7, 2018 3:36 am

Web Title: article about high heels