कपडे ही केवळ गरज म्हणून न पाहता त्यापलीकडे कपडय़ांबाबत वेगळे प्रयोग करू पाहणारी फॅशन ही कुठल्या एका वयोगटापर्यंत मर्यादित राहिलेली नाही. प्रत्येक वयोगटाच्या आणि आकाराच्या मंडळींना फॅशन करता येईल, दैनंदिन आयुष्यात वावरताना हे कपडे परिधान करता येतील, अशा प्रकारचे डिझायनिंग करण्यावर भर दिलेला यंदाच्या लॅक्मे फॅशन वीकमध्ये पाहायला मिळाला..

अमूक एका प्रदेशातील वातावरणाप्रमाणे कपडे न वापरता विविध देशांमध्ये प्रचलित असणारी फॅशन आणि आपली गरज याची सांगड घालण्याचा प्रयत्न फॅशन डिझायनर्स कडून सातत्याने होतो आहे. कपडेही केवळ गरज म्हणून न पाहता त्यापलीकडे कपडय़ांबाबत वेगळे प्रयोग करू पाहणारी फॅशन ही कुठल्या एका वयोगटापर्यंत मर्यादित राहिलेली नाही. प्रत्येक वयोगटाच्या आणि आकाराच्या मंडळींना फॅशन करता येईल, दैनंदिन आयुष्यात वावरताना हे कपडे परिधान करता येतील, अशा प्रकारचे डिझायनिंग करण्यावर भर दिलेला यंदाच्या लॅक्मे फॅशन वीकमध्ये पाहायला मिळाला..

कपडय़ांच्या फॅब्रिकवर केलेल्या पॅटर्नमधले बदल, स्ट्राइप्स, लाइनेन, चेक्स, सिमेट्रिक एमब्रॉयडरी, मल्टिकलर शेड्स, लूज सिल्हाऊट्स, लॉन्ग गाऊ न व स्कर्ट जे कोणावरही उठून दिसतात अशा प्रकारचे कपडे आणि दिशा पाटील, पुनीत बालना, रीतू कुमार, श्वेता तानतिया, उर्वशी कोर, कुणाल रावल, योगेश चौधरी, साक्शा आणि किन्नी, आणि विनीत व राहुल या सध्याच्या आघाडीच्या फॅ शन डिझायनर्सनी साध्याच पद्धतीने पण तरीही आपला प्रभाव पाडेल, अशा प्रकारे केलेल्या कलेक्शनचा या फॅ शन वीकमध्ये बोलबाला झाला. या वर्षी ‘लॅक्मे फॅशन वीक’ला १९ वर्षे पूर्ण झाली. इतक्या वर्षांत या एकाच मंचावरून फॅशन आज कुठपर्यंत पोहोचली आहे, याचे दाखले मिळत गेले. खरं तर १९९१ च्या ग्लोबलायझेशननंतर भारतीय टॅलेंट जागतिक पातळीवर पोहचत होतं. नव्वदच्या दशकात अनेक परदेशातील ब्रॅण्ड भारतात आले. त्याच दशकात ‘लॅक्मे फॅशन वीक’ची सुरुवात झाली. वेस्टर्न आऊटफिट भारतीय तरुणींच्या अंगावर चढले पण पारंपरिक धाग्याने बनलेल्या आपल्या वस्त्रांनाही त्या विसरल्या नाहीत. त्यामुळे पारंपरिक वस्त्र आणि पाश्चात्त्य डिझाइन यांचा संगम तेव्हापासून आजपर्यंत साधलेला पाहायला मिळतो. हातमागावर काम करून वेस्टर्न आऊटफिट तयार करणारे परदेशी फॅशन डिझायनरही वाढले आहेत तर इथून परदेशातील फॅब्रिकवर काम करून अस्सल भारतीय वस्त्रे तयार करणारे फॅशन डिझायनरही गेल्या आठवडय़ात झालेल्या लॅक्मे फॅशन वीकच्या मंचावर पाहायला मिळाले.

यंदाच्या ‘लॅक्मे फॅशन वीक’च्या सीझनला डिझायनर्सचा कलेक्शनच्या मागे एक वेगळा विचार, दृष्टिकोन तसेच एक हेतू होता. ‘जेन नेक्स्ट’ डिझायनर अजय कुमार सिंगने ‘और’ लेबल अंतर्गत लहान मुलांच्या भावनांचा विचार डोळ्यासमोर ठेवून आपल्या कपडय़ांचे डिझाईन केले आहे. डिझायनर उर्वशी जॉनेजा हिने ‘अवे’ म्हणजे मुक्त या संकल्पनेअंतर्गत तिचं कलेक्शन सादर केलं. पक्षी आकाशात मुक्तपणे उडतात म्हणून पंखांच्या प्रतिकातून तिने तिच्या कपडय़ांवर बर्ड प्रिंट आणले. ते प्रिंट खास थ्रीडी टेक्स्चरमध्ये होते, त्यामुळे बर्ड प्रिंट हे अ‍ॅक्सिसमध्ये दिसत होते तसेच तिचे बर्ड प्रिंट उठून दिसावे म्हणून तिने क्रेप, कॉटन सिल्कचा उपयोग केला. ज्यात लाँग गाऊन, ओपन जॅकेट, अंगरखा याचा समावेश आहे. डिझायनर सोहाया मिश्रा तिच्या एसिमेट्रिक व ओवर लेयिरग गार्मेटसाठी ओळखली जाते. तिची या वेळेसची थीम होती ‘बाय फेलिसिया’ म्हणजे विचित्र किंवा काही तरी हरवलेले, चुकलेले. या हिशेबाने तिने तिच्या नेहमीच्याच लाइनेन, रिसायकल्ड आणि ऑरगॅनिक कॉटनच्या फॅब्रिकचे एसिमेट्रिक, स्ट्राइप्ड, क्रॅप टॉप, लूज ट्राऊझर आणि लाँग स्लिव्ह्ड शर्ट, वन स्लिव्हड शर्ट आणले. डिझायनर गुंजन जैनच्या ‘वृक्ष’ या लेबलअंतर्गत ‘योगिनी’ कलेक्शन सादर केले. तस्सर सिल्क व खादीचा वापर करून तिने धोतीवर साडी असे प्रयोग केले. ‘खासकरून ओडिसातील पद्धतींचा व फॅब्रिकचा आपल्याकडे विचार होत नाही. मग मी तिथल्याच स्त्री कारागिरांना प्रत्यक्षात भेटले व त्यांच्या कलागुणांसोबत तिकडच्या क्राफ्टिंगला मला वाव देता आला,’ असं गुंजनने सांगितले. राजेश प्रताप सिंगने फेमिनाइन फॅशन आणली. ज्यात चंदेरी ब्लाऊज, धोती आणि फूल फ्लेअर्ड स्कर्टबरोबर शेरवानी होती. मोहम्मद म्हझर या फॅशन डिझायनरने ‘रूफागर’ या संकल्पनेंतर्गत रेड, व्हाइट, ब्लॅक या रंगातून व्हिसकोस, सिल्क, वेलवेटचा वापर केला. ज्यात कुर्ता, जॅकेट, चुणीदार त्याने आणले. त्यावरची एम्ब्रॉयडरी सहारणपूरहून आलेल्या झमीर एहमद यांनी केली होती. ‘छोटय़ा गावांत परिस्थिती फार बिकट आहे. तिथे कला आहे पण त्या जोरावर लोक दिवसाला ५० रुपयेही कमवू शकत नाहीत. म्हणून मी झमीर एहमद यांना हाताशी घेऊन त्यांना मदत म्हणून माझं कलेक्शन आणलं,’ असं मोहम्मद म्हझरने सांगितलं. अक्षत भन्साल याने ‘बलोनी’ या लेबलमधून प्लॅस्टिक वापर यावर भाष्य करणारे कलेक्शन आणले. टाय अ‍ॅण्ड डाय व बांधणीचा वापर करून त्याने कुर्ता, जॅकेट, पॅण्ट, शर्ट, कोट, टय़ूनिक आणले. त्यामुळे वेगळ्या ध्येयासह एक समकालीन व ट्रेण्डसेटिंग फॅशन रुजवायचा डिझायनर्सचा प्रयत्न कामी आला, असे म्हणता येईल.

रंगांचे ‘ह्य़ू’जन

डिझायनर्स डेव्हिड अब्राहम आणि राकेश ठाकोर यांनी ‘कॉकटेल्स आणि समोसाज’ या थीमवर विरोधी रंगांच्या डय़ूएल शेड्स वापरल्या. टाय अ‍ॅण्ड डायमार्फत गोल्डन आणि ब्लॅक एम्ब्रॉयडरीसोबत काळ्या व पांढऱ्या शेड्सचे फ्यूजन आणि डार्क ग्रीनचा वापर कलेक्शनमधून उठावदार दिसेल व वापरलेल्या शेड्स परिपूर्ण होतील म्हणून गडद हिरव्या रंगाची ह्य़ू शेड वापरली ज्यात बाकू, किमोनो व सारॉन्गसारखे ड्रेसेस आणले. ‘अंतर – अग्नी’ या लेबलतर्फे उज्ज्वल दुबे यांनी ‘बीगन’ या थीमवरून काळ्या रंगाचे शेड्स आणले, ज्यात मिलिटरी ग्रीन व नेव्ही ब्ल्यू रंगांचा हय़ू कलर वापरून एकाच लुकवर रंगांचे प्रयोग केले. झारी या फॅब्रिकला घेऊ न टय़ुनिक्स, स्कर्ट्स, जॅकेट्स आणि मेन्स वेअरमध्ये कुर्ता, पायजमा आणला. डिझायनर सलोनी साकारिया हिने ब्ल्यू शेड्स असताना त्यात रेड, मरून, पिंक या हय़ू कलरचा वापर केला. खादी सिल्क व खादी कॉटनचा वापर करीत तिने टय़ुनिक व कुर्ते आणले. डिझायनर सुनीता शंकरच्या कलेक्शनमध्ये एकेरी व दुहेरी रंगांचे शेड्स तर मल्टिकलर शेड्सही दिसले. कांजीवरम साडीपासून प्रेरित कांजीवरम पॅण्ट, जॅकेट, कोट तर साडीवर लाँग नेक ब्लाऊज अशी तिची पद्धत होती. त्यामुळे हय़ू रंगांचा मिलाफ करताना त्यात गुलाबी, हिरवा व सोनेरी रंग वापरला तर वाराणसीचे ब्रोकेड वापरले. गौरव दत्ताचे इण्डो-ब्रिटिश फ्यूजन असल्याने पिंक व गोल्डनबरोबर हय़ू इफेक्ट म्हणून पांढऱ्या रंगाची जरदोसी एम्ब्रॉयडरी ठेवली आहे. नेहा अगरवाल हिने आपल्या ‘अगामी’ लेबलअंतर्गत ‘पुश्तैनी’ या थीमद्वारे डय़ूल आणि मिक्स रंगांचा वापर केला. तिनेसुद्धा टय़ुनिक पॅण्टवर भर दिलाय ज्यात कॉन्ट्रास म्हणून तिनेही जरदोसी एम्ब्रॉयडरीचा वापर केला आहे. नूपुर कनोय या डिझायनरने रंगांचा पुरेपूर वापर करीत तिचे संपूर्ण कलेक्शन सेमी लाइट रंगात ठेवून त्याच डार्क हिरव्या रंगाचा ऑड मेन आऊटसारखा वापर केला. तिचं कलेक्शन हे ‘प्रोटी’ या थीमवर होतं. ज्यात बॉटनिकल प्रिंटची प्रेरणा होती म्हणून तिच्या कपडय़ांमध्ये गडद हिरवा रंग थीमला धरून ठरला. पंकज आणि निधी यांनी मल्टिकलरचा ह्य़ू कलर त्यांच्या कलेक्शनमध्ये ठेवला. त्यांच्या ‘आफ्टर डार्क’ या थीमनुसार डार्क रंगातही मिसळणारा पांढरा रंग व लाइट रंगातही मिसळणारे गडद रंग या थीम लाइनचा पुरेपूर वापर झाला. ‘अंधारात केवळ काळा रंग नसून उजेड पडल्यावर पांढऱ्या शेड्सही पसरतात त्याचप्रमाणे विविध रंगांचा मेळ जिथे असतो तेव्हा त्याला काळ्या रंगांची बॉर्डर आपण देतो, त्यामुळे ‘आफ्टर डार्क’ ही संकल्पना असल्याने त्यात विविध शेड्स आणले,’ असे मत पंकजने व्यक्त केले. आशीष सोनीने काळ्या रंगाच्या संपूर्ण कलेक्शनमध्ये पांढरा रंग ह्य़ू कलर म्हणून ठेवला. मिसफिट पांडा या डिझायनरची थीम होती ‘हिरोईन ऑफ द ऑपेरा’ त्यामुळे त्यांनी कलर शेड्समध्ये प्रचंड कॉन्ट्रास वापरला होता. त्यावरचे डिझायनिंगही आर्किटेक्चरल बारोक पद्धतीचे व फ्रेंच नॉट असलेल्या एम्ब्रॉयडरीचे असून सिल्कचा वापर केला होता. त्यावर शिमर टेक्स्चरही होते. गाऊ न व मिडी स्कर्टवर त्याने प्रयोग केले. ‘एखाद्या परंपरेत मुळापासून मुरलेली तरुणी आहे. तर तिचं ऑपेरात वावरणाऱ्या गायकेप्रमाणे राहणीमान हे रोज नवं असतं पण तिच्या सौंदर्यात एक वेगळाच पेहराव असतो, तो पेहराव मला खूप भावला त्यामुळे मी यंदा ही थीम घेतली,’ असं मतं मिसफिट पांडाने मांडले. गौरांग शहाने त्यांचे वेगळे रंग या वेळेस मांडले, ज्यात भरपूर शेड्स होत्या ‘आजच्या काळातही जुनी गाणी ऐकत साडी नेसून वावरणाऱ्या बायका आहेत मग त्यांच्या मूडवरून विविध शेड्स त्यातून कांजीवरम सिल्क, ब्रोकेड, ऑरेंगजा व हॅण्ड वुलन फॅब्रिकचा समावेश केला,’ असं गौरांग म्हणतो.

विविध प्रयोग, प्रयत्न, विचार, ध्येय, हेतू व डिझाइनसह फॅशन शो झाला खरा पण डिझायनर्सनी आपली स्टाइल न बदलता नव्या थीमसह, नव्या विचारासह कपडय़ांवर प्रयोग करून विंटर/फेस्टिव्हच्या अनुषंगाने कलेक्शन्स सादर केले. उर्वशी जोनेजा, सोहाया मिश्रा, रितू कुमार, नचिकेत बर्वे, अनुश्री रेड्डी, सोनम आणि पारस मोदी, कुणाल रावल आणि अमित अग्रवाल यांनी त्यांच्या स्टाइलनुसार कपडय़ांचे कलेक्शन आणले अर्थात काहींच्या मागे प्रायोजक होते. यंदाच्या डिझायनरनी एकाच पद्धतीचे रंग वापरले पण त्यातून बोल्ड आणि कलरफुल कलेक्शन सादर करण्याचे धाडसही कित्येकांनी केले हेही तितकेच खरे.