16 January 2021

News Flash

‘जग’ते रहो : रम्य ही स्वर्गाहून लंका

जगाच्या नकाशावर विशाल अशा भारताखालोखाल श्रीलंका हा देश एखाद्या छोटय़ाशा ठिपक्यासारखा आहे.

(संग्रहित छायाचित्र)

निवेदिता पराडकर-मोने, कोलंबो, श्रीलंका

श्रीलंका म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर येतं ते रामायण, त्यातला रावण आणि त्याची सोन्याची लंका किंवा हल्लीच्या काळातील श्रीलंकेचे महान क्रिकेटपटू जयसूर्या, मुरलीधरन, संगकारा किंवा तिथला निळाशार समुद्र, हिरवेगार लांबचलांब चहाचे मळे आणि अर्थातच सीफूड.. पण या सगळ्यापलीकडची श्रीलंका आम्हाला बघायला मिळाली. इथली माणसं, संस्कृती, त्यांचे आहार-विहार, इथला निसर्ग आणि अशा बऱ्याच गोष्टींनी या देशाला समृद्ध केलं आहे.

जगाच्या नकाशावर विशाल अशा भारताखालोखाल श्रीलंका हा देश एखाद्या छोटय़ाशा ठिपक्यासारखा आहे. त्याचं क्षेत्रफळ आपल्या महाराष्ट्राएवढं असून पूर्ण देशाची लोकसंख्या आपल्या मुंबईएवढी आहे. श्रीलंका हा इतर काही साऊ थ-ईस्ट आशियातल्या देशांप्रमाणे एक बुद्धिस्ट देश आहे. इथे मोठी अशी दोनच शहरं आहेत. एक कोलंबो आणि दुसरं कँडी. बाकी सगळी गावं किंवा छोटी शहरं आहेत. अमेयच्या नोकरीनिमित्त आम्ही जेव्हा इथे पहिल्यांदा कोलंबोला राहायला आलो तेव्हा मनात अनेक शंका आणि विचार घेऊ नच.. इथली माणसं कशी असतील, इथं राहताना, फिरताना आम्हाला कसला प्रॉब्लेम तर येणार नाही ना? हे आणि असे अनेक. पण इथल्या लोकांनी आमच्या या सगळ्या शंका अगदी सहज दूर केल्या. इथली माणसं बोलायला अतिशय नम्र, प्रेमळ आणि सदा हसतमुख असतात. नेहमी मदतीसाठी तत्पर. त्यामुळे अमेयच्या ऑफिसमध्ये किंवा शेजारीपाजाऱ्यांनी आमचं नेहमीच मोकळ्या मनानं स्वागत केलं. आदरातिथ्य केलं. इथली एक चांगली आणि मजेशीर गोष्ट म्हणजे इथले लोक कोणालाही ‘अरे-तुरे, ए बॉस, शुक-शुक किंवा विचित्र आवाज काढून हाका न मारता आपल्यापेक्षा मोठय़ा व्यक्तीला ‘अय्ये’ म्हणजे मोठा भाऊ  तर लहानाला ‘मल्ली’ म्हणजे लहान भाऊ  आणि स्त्रियांना ‘नंगी’ म्हणजे लहान बहीण असं म्हणतात. यावरून त्यांच्या संस्कृतीतच आदर करणं हा गुण आहे हे दिसून येतं.

माणसांबरोबरच निसर्गाचाही तेवढाच आदर इथले लोक करतात. आपल्याकडून पर्यावरणाची हानी होणार नाही याची प्रत्येक जण दक्षता घेतं आणि त्यामुळेच रोजच्या जीवनातही प्लास्टिकऐवजी काचेच्या पाण्याच्या बाटल्या, काच-स्टीलचे डबे, कापडी बॅगा यांचा वापर होताना दिसतो. आपला परिसर, रस्ते कसे स्वच्छ राहतील याची सगळेच जण आवर्जून काळजी घेतात. म्हणूनच मी या देशाला क्लीन कंट्री आणि ग्रीन कंट्री म्हणते. श्रीलंकेला निसर्गाचं खूप मोठं वरदान लाभलेलं आहे. सगळीकडे हिरवीगार झाडं नजरेस पडतात. इकडे आपल्यासारखे उंचच उंच टॉवर्स न दिसता बहुतेक बैठी घरं दिसतात. तीसुद्धा प्रशस्त, ऐसपैस, चहूबाजूंनी झाडांनी वेढलेली. आम्हालाही अशा मोठय़ा घरात, घर कसलं दुमजली बंगलाच म्हणा ना, राहायची संधी मिळाली. मुंबईत पहिल्यापासून फ्लॅट सिस्टीममध्ये राहिल्यामुळे हा बदल आल्हाददायक होता.

पर्यटनासाठी इकडे खूप सुंदर, नयनरम्य अशी ठिकाणं आहेत. जाऊ  तिकडे निसर्ग अक्षरश: वेड लावतो. इकडचा निसर्ग बघून आपल्या गोवा, केरळची आठवण येते. आम्ही कँडी आणि एल्ला ही दोन हिल स्टेशन्स फिरून आलो. इथे ट्रेन जर्नी म्हणजे डोळ्यांना एक सुखद अनुभव आहे. नारळाची उंचच्या उंच डोलणारी झाडं आपल्या ट्रेनबरोबर रस्त्यावरून पळत असतात. कँडीला जाताना आम्ही हा अनुभव घेतला. एल्लाला कारने जातानाही एका बाजूला हिरवेगार चहाचे मळे दूरवर पसरलेले दिसतात. एल्लामध्ये ‘नाइन आर्क ब्रिज’, ‘लिटिल अ‍ॅडम्स पीक’ आणि ‘रावणाज केव्हज’ अशी बरीच आकर्षणे आहेत. ‘रावणाज केव्हज’ ही डोंगरात मोठी खडकाळ गुहा आहे. असं म्हणतात की सीतेला अशोक वाटिकेमध्ये ठेवण्याआधी रावणाने काही काळ इकडे ठेवलं होतं. या अंधाऱ्या गुहेत सीता कशी राहिली असेल असा विचार मनात येऊ न जातो. रामायणाची आठवण म्हणून आम्ही वपर्यंत ही जागा बघून आलो. अजून एक जरूर बघण्यासारखं ठिकाण म्हणजे ‘गल्ले फोर्ट’. हा किल्ला म्हणजे आतमध्ये एक छोटंसं शहरच वसलंय. इकडे वेगवेगळ्या पाश्चात्त्य म्हणजेच पोर्तुगीज, डच आणि इंग्रज अशा तीन संस्कृती गेली पाच शतकं नांदल्या आहेत. त्या सगळ्यांचा प्रभाव त्यावर दिसून येतो. याला युनेस्कोचा वर्ल्ड हेरिटेज असा किताबही मिळालाय. याच्या तटावर बसून सूर्यास्त आणि अवखळ समुद्र एकत्र बघण्यात एक वेगळी मजा आहे. इकडे फिरताना मात्र भाषेची फार अडचण आम्हाला जाणवली नाही. प्रमुख भाषा सिन्हला किंवा तमिळ या असल्या तरी लोकांना प्रमाणात इंग्रजी भाषा समजते. अगदी रिक्षावालेही बऱ्यापैकी इंग्रजी बोलतात.

इथली अजून एक वेगळी गोष्ट म्हणजे इकडे लोक सकाळी आठलाच ऑफिसला हजर असतात. सक्ती म्हणून नाही तर ते याच गोष्टीला प्राधान्य देतात आणि संध्याकाळी साडेपाच-सहापर्यंत घरी परततात. त्यामुळे अर्थातच त्यांना फिटनेस आणि रिक्रिएशनसाठी खूप वेळ मिळतो. संध्याकाळी ऑफिसनंतर हे लोक जॉगिंग, व्यायाम, सायकलिंग किंवा मैदानी खेळ खेळताना दिसतात. कोलंबोत असलेलं ‘इण्डिपेण्डन्स स्क्वेअर’ हे ठिकाण संध्याकाळी फिटनेसप्रेमींनी फुललेलं दिसतं. ‘लवकर उठे, लवकर निजे त्याला आरोग्य धनसंपदा लाभे’ हे अगदी तंतोतंत खरं आहे, हे यांच्याकडे बघून पटतं. इथल्या तरुणाईवर पाश्चात्त्य संस्कृतीचा जास्त प्रभाव दिसून येतो. टीव्हीवरील कार्यक्रमांपुरतंच मर्यादित न राहता ही मंडळी हॉलीवूड मूव्हीज, नेटफ्लिक्स, वेस्टर्न म्युझिक यांत जास्त रमते. आम्ही भारतीय आणि मुंबईकर म्हटल्यावर आमच्याबद्दल त्यांना कुतूहल वाटतं. मुंबईत तुम्हाला शाहरुख खान, सलमान खान रोज दिसत असतील ना, असे प्रश्न आम्हाला सुरुवातीला विचारले जायचे. बॉलीवूड, रजनीकांत याबद्दल त्यांना फार उत्सुकता आहे.

सिन्हला नवीन वर्ष म्हणजेच ‘अवरुधू’ आणि ‘वेसाक’ म्हणजे बुद्धपौर्णिमा हे दोन मोठे सण लोक दणक्यात साजरे करतात. आजूबाजूचा सगळा परिसर, गाव, शहर, दिव्यांच्या रोषणाईत सजून जातो. जणू काही ही त्यांची दिवाळीच. या सणांना पारंपरिक पदार्थ बनवले जातात. पारंपरिक पेहरावात सगळे जण खूप छान दिसतात. सणांना इकडे पुरुष लुंगी आणि कुर्ता घालतात, तर स्त्रिया साडी नेसतात. पण इथली साडी नेसायची पद्धत ही आपल्यापेक्षा वेगळी आहे. साडी अंगाभोवती गुंडाळून कमरेजवळ फ्रिल बाहेर काढून नेसली जाते. अजून एक इथला मासिक सण म्हणजे पोया, आपली पौर्णिमा. प्रत्येक महिन्यातील पौर्णिमेला सगळ्यांना इकडे सुट्टी असते आणि तो दिवस लोक मेडिटेशन करण्यात घालवतात. पोयाच्या मासिक सुट्टीमुळे आणि इतर बऱ्याच सणांमुळे श्रीलंका हा जगातला सर्वात जास्त सार्वजनिक सुट्टय़ा असणारा देश आहे.

त्यांचे हे सण बघून आम्हीही आपला गुढीपाडवा दणक्यात साजरा केला. आमच्या १०-१२ मित्रांना आम्ही घरी जेवायला बोलावलं. त्यात हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन, बुद्धिस्ट आणि स्वीडिश अशा अनेक धर्मीय मित्रमंडळींचा समावेश होता. हा गुढीपाडवा आमच्या कायमचा लक्षात राहील. सगळे जण गुढी म्हणजे काय, ती का उभारायची, हे जाणून घेत होते. आमच्या आग्रहाखातर सगळे पारंपरिक पेहरावात आले होते. गुढीपाडवा मस्त आनंदात साजरा झाला मात्र त्या गुढीसाठी सगळं सामान जमवताना आमची जी तारांबळ उडाली होती ती आता आठवली की हसायला येतं. मराठी सण म्हणून आम्ही अगदी टिपिकल मराठमोळं म्हणजेच पुरी-भाजी, शेवयांची खीर आणि मसालेभात असा बेत केला होता. सगळ्यांनीच जेवणावर ताव मारलेला बघून आम्हाला आनंद झाला आणि आमचा पाडवा हिट झाला.

श्रीलंकेच्या खाद्यपदार्थामध्ये प्रामुख्याने भात मोठय़ा प्रमाणात खाल्ला जातो. भात आणि त्यावर तीन-चार भाज्या हे त्यांचं जेवण. पोळी फक्त मैद्यापासून बनवलेली. पण आपल्यासारखी पोळीभाजी इथे खाल्ली जात नाही. तांदुळापासून बनवलेले स्टिंग हॉपर्ससुद्धा इकडे ब्रेकफास्ट किंवा जेवणात खाल्ले जातात. शेवयांसारखा गोल-गोल छोटय़ा चकत्या असलेला हा पदार्थ खोबऱ्याच्या लाल चटणीबरोबर टेस्टी लागतो. आपल्यासारखं स्ट्रीट फूड इथे जास्त मिळत नाही. काही खायची इच्छा झालीच तर थेट मोठय़ा रेस्तराँमध्येच जावं लागतं. त्यातून तुम्ही शाकाहारी असाल तर फारच कमी पर्याय उपलब्ध असतात. मांसाहारी पदार्थ खूप आणि चांगले मिळतात. परंतु बाहेर खाणं हेसुद्धा थोडं महागच असल्यामुळे कधीतरीच बाहेर खाल्लं जातं. त्यातल्या त्यात बाहेर छोटय़ा गाडय़ांवर एकच मिळणारा पदार्थ म्हणजे कोत्तु. हा शाकाहार आणि मांसाहार अशा दोन्ही प्रकारांत मिळतो. मैद्याच्या पोळीचे तुकडे करून त्याबरोबर भाज्या एकत्र करून त्याला फोडणी दिली की कोत्तु तयार होतो. तो खाताना आपल्या फोडणीच्या पोळीची आठवण येते. हे पदार्थही आता आम्हाला आपलेसे वाटायला लागले आहेत.. या सुंदर, निसर्गाने नटलेल्या, निरनिराळे पैलू असणाऱ्या देशाच्या आम्ही प्रेमात कधी पडलो, हे आम्हालादेखील कळलं नाही. ‘रम्य ही स्वर्गाहून लंका’ म्हणतात ना ते काही खोटं नाही.

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 10, 2018 12:11 am

Web Title: article about luminous shrilanka
Next Stories
1 ‘कट्टा’उवाच : फाटय़ावर..
2 ‘पॉप्यु’लिस्ट : अपरिचित धूनप्रदेश
3 ब्रॅण्डनामा : हॉर्लिक्स
Just Now!
X