प्रशांत ननावरे

मुंबईत येणारा परदेशी पर्यटक मुख्यत: कुलाबा परिसरात स्वच्छंदपणे वावरताना आढळतो. या परिसरातही फिरण्याची, राहण्याची आणि खाण्याची काही मोजकी ठिकाणं आहेत, जिथे गेल्याशिवाय त्यांची मुंबईवारी पूर्ण होत नाही. वादळी आयुष्य जगलेल्या ग्रेगरी डेव्हिड रॉबर्ट्स यांनी आपल्या भारतातील वास्तव्यावर आधारित लिहिलेल्या ‘शांताराम’ आणि त्याचाच पुढील भाग असलेल्या ‘द माऊंटन शॅडोव्ह’ या कादंबऱ्यांमध्येही मुंबईतील याच परिसरातील सर्वात जुन्या अशा एका कॅफेचा उल्लेख ठळकपणे केलेला आहे. तसं पाहिलं तर वाइन, प्रोव्हिजन आणि कोल्ड स्टोरेज पदार्थाची विक्री करणारा हा कॅफे फार पूर्वीपासूनच लोकप्रिय आहे. पण २००३ साली प्रसिद्ध झालेल्या ‘शांताराम’ कादंबरीनंतर या कॅफे ला अधिकच वलय प्राप्त झालं आणि हा कॅफे  जगाच्या नकाशावर ठळकपणे उठून दिसायला लागला. पण ज्या जागेच्या मनमोकळ्या वातावरणाविषयी तोंड भरून कौतुक केलं जायचं त्याच जागेबद्दल २००८ सालच्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याने परदेशी पर्यटकांना कटू आठवणीही दिल्या. आजही त्याच्या खुणा या कॅफे च्या भिंतीवर पाहायला मिळतात. ही जागा म्हणजे १८७१ साली सुरू झालेला लिओपोल्ड कॅफे.

वेलिंग्टन फाऊंटनवरून म्हणजेच ज्या चौकात रिगल सिनेमा आहे तिथून कुलाबा कॉजवेला जाणाऱ्या शहीद भगतसिंग मार्गावरील रुस्तुम मंझिलमध्ये लिओपोल्ड कॅफे आहे. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात इराणहून मुंबईत आलेल्या इराणींपैकीच काहींनी मिळून लिओपोल्डची सुरुवात केली. पण अगदी सुरुवातीचे मालक वगळता ‘लिओपोल्ड’ला जिवंत ठेवण्यात आणि आजचं वलय प्राप्त करून देण्यात शेरीअर फ्रेमरोझ जेहानी यांचा मोलाचा वाटा आहे.

शेरीअर फ्रेमरोझ जेहानी यांचा जन्म इराणच्या यझ्द प्रांतातील तफ्त गावातला. पण इराणमधील प्रतिकूल परिस्थितीमुळे वयाच्या १५व्या वर्षीच त्यांनी मुंबई गाठली. शेरीअर हे आपल्या सर्व भावंडांमध्ये मोठे असल्यामुळे सर्वाची जबाबदारी त्यांच्यावरच होती. मुंबईत आल्यावर सुरुवातीला त्यांनी अनेक इराणी कॅ फेंमध्ये पडेल ते काम केलं आणि मग कालांतराने काही कॅ फेंमध्ये भागीदारही झाले. मुंबईच्या पाच रेस्टॉरंटमध्ये त्यांची भागीदारी होती. हुगेस रोडवरील न्यूयॉर्क, फ्लोरा फाऊंटन येथील पायरक्स, कॅफे पॅरिस, मोरानाझ अ‍ॅण्ड कंपनी आणि लिओपोल्ड कॅफे. पाच कॅ फेंपैकी शेरीअर हे लिओपोल्ड येथे अधिक काळ घालवत आणि इतर कॅ फेंवर त्यांचे भाऊबहीण आणि कुटुंबातील इतर मंडळी लक्ष ठेवून असत.

रुस्तुम यांच्या मालकीच्या रुस्तुम मंझिल या इमारतीमध्ये लिओपोल्ड कॅफे आहे. फरझाद यांनी ऐंशीच्या दशकात कॅफेमध्ये यायला सुरुवात केली. इयत्ता आठवीत असतानाच त्यांनी आपल्या वडिलांना या व्यवसायात रस असल्याचं सांगितलं. त्याकाळी लिओपोल्ड हा देखील इतर इराण्यांप्रमाणे बिस्कीट, केक, औषधं, सिगारेट, सिगार, समोसे, पॅटीस या गोष्टी विकत असे. मुख्य खाद्यपदार्थामध्ये इंग्लिश चिकन रोस्ट, कटलेट विथ सूप, सॅण्डविचेस, पुडींग, कस्टर्ड आणि धनसाकसारखे काही पारशी पदार्थ होते. पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन आज लिओपोल्डच्या मेन्यूमध्ये दीडशेच्या आसपास पदार्थ आहेत. १९८६-८७च्या आसपास हा बदल घडला. सर्वात मोठा बदल होता तो म्हणजे मेन्यूमध्ये चायनिज पदार्थाचा समावेश. पण तो करणं भाग होतं कारण लोकांना ते पदार्थ आवडू लागले होते.

फरझाद सांगतात, त्यांचे वडील त्यांना सांगत की, साठचं दशक हे हिप्पींचं होतं. सत्तर आणि ऐंशीच्या दशकात अरब लोकांची येथे अधिक ऊठबस असे. आणि आत्ताचा काळ हा बॅकपॅकर्सचा आहे. शिवाय अनेक भारतीयांचं लिओपोल्ड हे आवडीचं ठिकाण झालंय. कारण त्यांचा अशा प्रकारच्या कॅफेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललाय आणि खिशात पैसादेखील खुळखुळायला लागलाय. तब्बल दहा वर्षे चाललेलं (१९७९ ते १९८९) सोव्हिएत-अफगाण युद्ध असो वा त्याच काळातील इराण-इराक युद्ध असो, त्या वेळी अनेक अफगाणी आणि इराणी नागरिक भारतात येत असत. कुलाबा परिसरात त्यांचं वास्तव्य असे. इराणींना त्यांच्या देशातून अनधिकृतपणे बाहेर पडण्यासाठी इथली अनेक मंडळी मदत करत असत, अशी आठवण फरझाद सांगतात. हे सर्व घडत असताना लिओपोल्ड पाहात होता. पण या जागेच्या मालकांच्या विनंतीवरून आणि त्यांच्या शब्दाला मान देऊ न कधीच चुकीच्या गोष्टी कॅफेच्या आवारात होऊ  दिल्या नाहीत.

लिओपोल्ड कॅफे हा एकेकाळी झोरास्ट्रीयन पारशी सायकलस्वारांचादेखील अड्डा होता. मुंबई-पुणे-मुंबई सायकल शर्यतीमध्ये भाग घेणारी या कम्युनिटीमधील मंडळी आपल्या नेहमीच्या सायकल सरावानंतर येथे येत असत. त्याशिवाय अनेक पारशी तरुण मंडळीही रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी इथे आवर्जून येत असत. पण कालांतराने मुंबईतील पारश्यांची संख्या रोडावत गेली आणि त्यांचं इथे येणं-जाणंही. पूर्वी कॅफेचा सर्व बाजार हा क्रॉफर्ड मार्केटमधून येत असे. फरझाद यांचे वडील पहाटे साडेपाच वाजता मार्केटला जाऊन मटण, चिकन आणि भाज्यांची खरेदी करत असत. त्यानंतर सर्व बाजार हातगाडीवर टाकून कॅफेला पोहोचवला जात असे, पण आता पूर्वीसारखे दिवस राहिले नाहीत.

२६ नोव्हेंबर २००८ साली रात्री पावणेदहाच्या सुमारास लिओपोल्ड कॅफेच्या दाराशी दोन तरुण त्यांच्या मोबाइल फोनवर बोलत उभे होते. फोनवर बोलणं झाल्यावर ते एकमेकांशी गप्पा मारू लागले. काही क्षणातच त्यांच्यापैकी एकाने आपल्या बॅगमधील हॅण्ड ग्रेनेड काढले आणि लगेचच एके ४७ बंदुकीतून फायरिंग करायला सुरुवात केली. त्यामध्ये कॅफेमधील अतिशय निष्ठावान कामगार, पर्यटकांचा जीव गेला आणि काही जण जखमी झाले. काही वेळापूर्वी उत्साह आणि आनंदाने भरलेल्या त्या जागेत लोक रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. मुंबईतील कुठल्याही कॅफेच्या नशिबी हा प्रसंग आला नसेल आणि येऊ  नये, अशी आठवण फरझाद सांगतात. अतिरेकी हल्ल्यामध्ये कॅफेचं मोठय़ा प्रमाणात नुकसान झालं, तरीदेखील घटनेच्या काही दिवसांमध्येच कॅफेपुन्हा सुरू झाला.

आज अनेक जण ‘लिओपोल्ड कॅफे’कडे ‘काय होतास तू काय झालास तू’ या नजरेतून पाहतात पण फरझाद सांगतात, आम्ही काळाप्रमाणे बदललो म्हणून टिकून राहिलो. लिओपोल्डमध्ये आजघडीला परदेशी पर्यटकांचा अधिक वावर असला तरी इराणी कॅफेची सर्व वैशिष्टय़े त्यांनी आवर्जून जपली आहेत. काळाप्रमाणे स्वत:ला बदललं असलं तरी जुन्या आठवणी अजूनही तशाच ताज्या ठेवलेल्या आहेत. त्यामुळे कुलाबा परिसरात गेल्यावर उंची कॅफे वाटणाऱ्या या जागेचं बाहेरूनच दर्शन न घेता आणि मनात अजिबात कसलाही न्यूनगंड न बाळगता मुद्दामहून एकदा तरी आत जाऊन बसून पाहा. काळासोबत बदलेली ही जागा नक्कीच तुम्हाला या शहराच्या, माणसांबद्दलच्या बऱ्याच गोष्टी नकळत सांगून जाईल.

viva@expressindia.com