सौरभ करंदीकर

सौरमंडळातील ग्रहांचा इतिहास, त्यांचं भविष्य, त्यांच्यात घडणारे बदल आणि पुढेमागे मानवी वास्तव्यासाठी पर्यायी जागा, इंधनाचे पर्यायी स्रोत या साऱ्या गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी या मोहिमा आखल्या जातात. सर्वात जवळचा आणि जीवनासाठी कमी धोकादायक असल्याने मंगळाकडे मानवाची नजर वळली.

३० जुलै २०२० रोजी भर करोनाकाळात, अ‍ॅटलास व्ही ५४१ रॉकेटवर आरूढ होऊन मी या पृथ्वीला रामराम ठोकला. ताशी ३९,६०० किलोमीटर वेगाने आज मी मंगळ ग्रहाच्या दिशेने मार्गक्रमण करतो आहे. १८ फेब्रुवारी २०२१ रोजी मी मंगळावरील जेझेरो क्रेटर नावाच्या नयनरम्य विवरात पोहोचेन याची मला खात्री आहे. नासाच्या ‘पर्सिवियरन्स’ नावाच्या मंगळ—बग्गीवर (रोव्हर) मी आरूढ आहे. वाचकांना कदाचित ही कविकल्पना वाटेल. या लेखाच्या निमित्ताने रचलेली काल्पनिक कथावस्तू वाटेल, परंतु हे सत्य आहे! ‘आपलं नाव मंगळावर पाठवा’ या योजनेचा लाभ घेणाऱ्या जगभरातील १,०९,३२,२९५ व्यक्तींमध्ये माझा समावेश आहे. पर्सिवियरन्स रोव्हरच्या पृष्ठभागावर नखाच्या आकाराच्या तीन चकत्या बसवल्या गेल्या आहेत. त्या चकत्यांवर लेझरच्या साहाय्याने ही सारी नावं कोरण्यात आली आहेत. त्यापैकी एक नाव माझं आहे. न जाणो उद्या मंगळावर सूक्ष्मजीवसृष्टी आढळली आणि त्यांना इंग्रजी भाषा अवगत असली तर माझी गणती पृथ्वीच्या आद्य राजदूतांमध्ये होईल याचा मला अभिमान आहे! पण तसं झालं नाही, तरी पर्सिवियरन्स रोव्हर मंगळावर कायमस्वरूपी वास्तव्य करणार आहे. म्हणजे माझं नाव परग्रहावर दीर्घकाळ राहील हे तर नक्की.

‘मार्स २०२०’ या नासाच्या मोहिमेबद्दल सर्वांच्या मनात कुतूहल निर्माण व्हावं यासाठी नासाच्या जनसंपर्क विभागाने ही योजना आखली होती. या निमित्ताने मंगळावर स्वारी करणाऱ्या अनेक देशांमध्ये आपण अग्रगण्य आहोत याची अमेरिकेला जाहिरात करता आली, हा वेगळा मुद्दा. मंगळाच्या दिशेने अंतराळयान पाठवणाऱ्या मोजक्या देशांमध्ये भारताचा समावेश होतो ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. आतापर्यंत सोव्हिएत युनियन (आणि आताचा रशिया), अमेरिका, चीन, जपान, युरोपियन युनियन, युनायटेड अरब अमिराती आणि भारत यांनी मंगळ—मोहिमा राबवल्या आहेत.

पण हा मंगळ—ध्यास कशासाठी? आपल्या सौरमंडळातील ग्रहांचा अभ्यास केला तर शुक्र, पृथ्वी आणि मंगळ यांची रासायनिक जडणघडण, या ग्रहांवर आढळणारी खनिज आणि मूलद्रव्य काहीशी सारखी आहेत. मात्र या ग्रहांची भौतिक स्थिती कमालीची वेगळी आहे. शुक्राच्या वातावरणाचा दाब पृथ्वीच्या ९२ पट अधिक आहे तर पृष्ठभागाचं तापमान सुमारे ४५० सेल्सियस आहे. याउलट मंगळावर वातावरणाचा दाब पृथ्वीच्या केवळ एक शतांश असून रणरणत्या उन्हात पृष्ठभागाचे तापमान जेमतेम शून्यापर्यंत पोहोचते! सौरमंडळातील ग्रहांचा इतिहास, त्यांचं भविष्य, त्यांच्यात घडणारे बदल आणि पुढेमागे मानवी वास्तव्यासाठी पर्यायी जागा, इंधनाचे पर्यायी स्रोत या साऱ्या गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी या मोहिमा आखल्या जातात. सर्वात जवळचा आणि जीवनासाठी कमी धोकादायक असल्याने मंगळाकडे मानवाची नजर वळली.

मंगळावर पूर्वी अनेक मोठे तलाव आणि उत्तरेला समुद्र होता असं शास्त्रज्ञ मानतात. खुद्द जेझेरो क्रेटर, जिथे पर्सिवियरन्स रोव्हर उतरणार आहे, तिथे तर एक प्रचंड तलाव होता. त्या तलावात पाणी आणणारा प्रवाह आणि पाणी बाहेर नेणारा नैसर्गिक कालवा यांच्या खुणा स्पष्ट आहेत. जिथे रोव्हर उतरेल तिथे तलावातील गाळ शतकांपूर्वी जमा झाला असावा असा अंदाज आहे. त्यात नष्ट झालेल्या जीवसृष्टीचे अंश आढळतील अशी नासाची अपेक्षा आहे. मंगळावरचं द्रवरूप पाणी नाहीसं कसं झालं? एकेकाळी उबदार असलेला मंगळ आता शुष्क, नापीक का झाला? ध्रुवप्रदेशात पृष्ठभागाखाली किती बर्फ आहे? मंगळाचं वातावरण हलकं कसं झालं? तिथे जीवसृष्टी होती का? आहे का? नष्ट झाली तर का झाली? असे अगणित प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न पर्सिवियरंन्स रोव्हर करणार आहे.

मंगळाच्या पृष्ठभागाचे सर्वेक्षण याआधी स्पिरिट, ऑपॉच्र्युनिटी आणि पाथफाईंडर मोहिमेतील सोजोर्नर या रोव्हर्सनी केलेले आहे. दोन—अडीच अब्ज विश्लेषणं आणि हजारो छायाचित्रं आज मानवाने संग्रहित केली आहेत. पर्सिवियरन्समध्ये मात्र याहून अधिक शक्तिशाली उपकरणं आहेत. मंगळाचा पृष्ठभाग खणून नमुने गोळा करायचं आणि ते नमुने सीलबंद करून ठेवायचं यंत्र त्यात आहे. हे नमुने भविष्यातील मंगळयानं पृथ्वीवर आणतील अशी अपेक्षा आहे. इतकंच नाही, तर दर दिवशी सुमारे २०० मीटर इतकाच पल्ला गाठणाऱ्या रोव्हरला जोड म्हणून नजीकच्या प्रदेशावर घिरटय़ा घालू शकेल असं ‘इंजेन्युइटी’ नावाचं हेलिकॉप्टर देखील या मोहिमेत समाविष्ट आहे!

‘पर्सिवियरन्स’ या नावाचा शब्दश: अर्थ चिकाटी असा आहे. मंगळाचा पाठपुरावा करताना मानवजातीने खरंच चिकाटी दाखवलेली आहे. गेल्या साठ वर्षांंत मानवाने ५४ मंगळ—मोहिमा आखल्या, त्यापैकी केवळ २६ निर्विघ्न पार पडल्या. पुढल्या ६ ते १० वर्षांंत अनेक मोहिमा राबवण्यात येतील. भारतानेदेखील ‘मंगळयान-२’ या २०२४ साली प्रक्षेपण होणाऱ्या मोहिमेचं सूतोवाच केलेलं आहे. जगभरात अशा मोहिमा काही सरकारी तर काही खासगी संस्था राबवणार आहेत. इलॉन मस्क या उद्योगपतींची स्पेस—एक्स ही संस्था यात अग्रेसर आहे. त्यांच्या मानवाला मंगळावर घेऊन जाऊ शकणाऱ्या ‘स्टारशिप’च्या चाचण्या सुरू आहेत. कदाचित आपल्या आयुष्यकाळात मानवाचं मंगळावर आगमन होईल अशी आशा आता वाटू लागली आहे.

viva@expressindia.com